Crime rate decline in Maharashtra : महाराष्ट्रातील गुन्हेगारीत घट

Information about Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांची माहिती

महाराष्ट्र राज्यामध्ये गुन्हेगारीत मोठी घट झाली असून न्यायव्यवस्थेत महाराष्ट्र आघाडीवर असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत एका प्रश्नाचे उत्तर देताना दिली आहे. राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन, कायदा सुव्यवस्थेचे बळकटीकरण, गुन्हेगारी नियंत्रण, सायबर गुन्ह्यावर आळा आणि न्यायव्यवस्थेतील सुधारणा या सर्व क्षेत्रात राज्य सरकार व्यापक प्रमाणात काम करत मोठी प्रगती करत आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पोलीस दलाचे सशक्तीकरण आणि जलद न्यायप्रक्रिया यावर भर देत राज्यातील सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दोषींना कठोर शिक्षा होणार

ashok kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या प्रकरणाची मुळापर्यंत चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा केली जाईल. नागरिकांनी अशा घटनांबाबत माहिती शासनापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी केले.

श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील सूक्ष्म फरक ओळखणे आवश्यक असल्याचे सांगत संत परंपरेचा दाखला देऊन अंधश्रद्धेविरोधात समाजाने जागरूक राहावे, असे त्यांनी नमूद केले.राज्यात जादूटोणा विरोधी कायद्याचे नियम अंतिम टप्प्यात असून, याबाबतची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

न्याय संहितेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

राज्यात भारतीय न्याय संहितेची प्रभावी अंमलबजावणी होत असून महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ई-साक्ष प्रणालीचा वापर 28 टक्क्यांवरुन वरून 84 टक्क्यांपर्यंत वाढला असून 60 दिवसांत आरोपपत्र दाखल करण्याचे प्रमाण 2-3 टक्क्यांवरुन वरून 46% पर्यंत पोहाचले आहे.

महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांत 60 दिवसांत आरोपपत्र दाखल करण्याचे प्रमाण जवळपास 89 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. दोषसिद्धीच्या दरामध्ये 78 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. यामुळे न्यायप्रक्रियेला वेग मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

गुन्हेगारीत घट; तपास आणि दोषसिद्धीत वाढ

Crime rate decline in Maharashtra : 2024 च्या तुलनेत 2025 मध्ये खून, चोरी, दरोडे, विनयभंग यासारख्या प्रमुख गुन्ह्यांमध्ये घट झाल्याची माहिती त्यांनी दिली. अपहरण आणि अमली पदार्थ प्रकरणे उघडकीस येण्याचे प्रमाण वाढले आहे.

महिलांच्या सुरक्षेबाबत त्यांनी सांगितले की, बेपत्ता झालेल्या मुलींपैकी बहुतांश प्रकरणे प्रेमसंबंध, कौटुंबिक वाद किंवा इतर सामाजिक कारणांशी संबंधित असतात. प्रत्यक्ष अपहरणाची टक्केवारी अत्यल्प (1.86%) आहे.

Crime rate decline in Maharashtra : महाराष्ट्रातील गुन्हेगारीत घटअमली पदार्थांविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई करत २०२५ मध्ये ५६ हजार किलोपेक्षा अधिक जप्ती केल्याचे सांगितले, तसेच ड्रग्स प्रकरणात सहभागी पोलिसांवर थेट बडतर्फीची कारवाई केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सायबर गुन्ह्यांविरोधात आधुनिक यंत्रणा

Modern system against cybercrime : राज्यात वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा उभारण्यात आली असून तपासाची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले.

सायबर गुन्ह्यांमधील आर्थिक ‘रिकव्हरी’ कमी असली, तरी अत्याधुनिक साधनसामग्रीमुळे तपास अधिक प्रभावी झाला आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्याच्या सायबर सुरक्षा प्रकल्पांतर्गत २० देशांतून ५१ अत्याधुनिक साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. कमांड अँड कंट्रोल सेंटर, सायबर पोलीस ठाणे तसेच सीईआरटी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. ‘डिजिटल अरेस्ट’सारखे प्रकार हे फसवणुकीचे प्रकार असल्याचा इशाराही देण्यात आला असून तात्काळ तक्रारींसाठी १०४५ ही हेल्पलाईन उपलब्ध आहे. या प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय स्तरावरही गौरव मिळाल्याचे सांगण्यात आले.

अमली पदार्थांविरोधात राज्यात मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे. २०२४ मध्ये ४४ हजार किलो, तर २०२५ मध्ये ५६ हजार किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले. २०२५ मध्ये १५,९३३ आरोपींना अटक करण्यात आली असून सुमारे ५,५०० कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. केवळ आरोपींना पकडण्यापेक्षा संपूर्ण साखळी उघड करण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलीस दल बळकटीसाठी प्रयत्न

Efforts to strengthen the police force : मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पोलीस दल बळकट करण्यासाठीही महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. राज्यात एकूण २.३० लाख पदांपैकी २.०६ लाख पदे भरलेली असून १६,६०७ पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत ५० हजारांहून अधिक पोलिसांची भरती करण्यात आली आहे. तसेच १२,९५२ पोलीस घरे बांधकामाधीन असून पोलिसांना मालकी हक्काची घरे देण्याबाबत उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

डायल ११२ या आपत्कालीन सेवेचा प्रतिसाद वेळ १५ मिनिटांवरून ६ मिनिटांपर्यंत कमी करण्यात यश आले आहे. ‘महानेत्र’ या सीसीटीव्ही नेटवर्कद्वारे राज्यभरातील कॅमेरे एकत्रित करण्याचे काम सुरू असून मुंबईत १.८२ लाख गुन्ह्यांच्या तपासात सीसीटीव्हीचा उपयोग झाला आहे. यापैकी ७,२४८ प्रकरणांत सीसीटीव्ही पुरावा निर्णायक ठरला आहे. भविष्यात खाजगी कॅमेरेही या नेटवर्कमध्ये जोडण्याची योजना असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

अंतिम अहवालानंतरच दुर्घटनेमागील कारण स्पष्ट होणार

Baramati plane crash : बारामती तालुक्यातील विमान अपघाताबाबत सरकारकडून सुरू असलेल्या चौकशीची माहिती देताना संबंधित प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, 28 जानेवारी 2026 रोजी बारामती विमानतळाजवळ लिअर जेट विमान कोसळून तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेची चौकशी केंद्राच्या मार्गदर्शक तत्वांनुसार सुरू असून राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडेही तपास सोपविण्यात आला आहे.

प्राथमिक तपासात पायलट आणि सहपायलट यांच्या ब्रेथ अॅनालायझर चाचणीत अल्कोहोल आढळले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मृतांच्या पोस्टमॉर्टम अहवालानुसार अनेक दुखापती आणि भाजल्यामुळे मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. डीएनए तपासणी, विषतपासणी तसेच स्फोटक पदार्थांच्या तपासणीत कोणताही संशयास्पद निष्कर्ष आढळलेला नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विमानाच्या उड्डाणापूर्वी सर्व प्रक्रिया नियमानुसार पार पडल्याचे समोर आले असून पायलटची नेमणूकही आधीच करण्यात आली होती. मात्र बारामती विमानतळावरील अपुरी दृश्यमानता, मर्यादित सुविधा आणि रनवेची स्थिती यांसारखे मुद्देही तपासात विचारात घेतले जात आहेत.

दरम्यान, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी सर्वच पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहे. सीआयडीचा तपास सुरू असून एएआयबीचा अंतिम अहवाल आल्यानंतरच अंतिम निष्कर्ष काढला जाणार आहे. तसेच गरज भासल्यास पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.या प्रकरणी चौकशी पूर्णपणे निष्पक्ष होईल, असा पुनरुच्चार करून कोणताही घातपात किंवा निष्काळजीपणा आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. एफआयआर नोंदणीबाबतही त्यांनी यावेळी स्पष्टीकरण दिले. अपघाताच्या प्रकरणांमध्ये सुरुवातीला एडीआर नोंदवला जातो. तपासात गुन्हेगारी बाबी आढळल्यास त्याचे एफआयआरमध्ये रूपांतर होते. ही कायदेशीर प्रक्रिया असून त्यानुसारच पुढील कारवाई होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या प्रकरणात केंद्र सरकारकडेही पाठपुरावा सुरू असून, आवश्यक ती सर्व मदत राज्य सरकारकडून केली जाईल. अंतिम अहवाल आल्यानंतरच दुर्घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

साखर उद्योगासाठी मदतीचा निर्णय

Decision to provide assistance to the sugar industry : राज्यातील विविध क्षेत्रांच्या विकासासाठी शासनाने महत्त्वाचे निर्णय घेतले असून, शेती, उद्योग, पर्यावरण आणि गृहनिर्माण या क्षेत्रांना चालना देण्यावर भर दिला जात असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

राज्यात साखर उद्योगासमोर एफआरपी देयके आणि पुढील हंगामाबाबत केंद्र सरकारशी चर्चा करण्यासाठी पुढील आठवड्यात बैठक होणार असून, राज्यस्तरावर उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन तातडीने निर्णय घेतले जातील, असे त्यांनी सांगितले.कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठीही पावले उचलण्यात येत आहेत.

महाराष्ट्रात देशातील सुमारे 50 टक्के कांदा उत्पादन होते. शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. केंद्राकडून मदत मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मॉरिशसला 1 लाख मेट्रिक टन कांदा निर्यातीचा विचार सुरू असून, दीर्घकालीन उपाय म्हणून पिकांचे वैविध्यीकरण करण्यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

विमा न घेतलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीत वाढ होणार

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कोकणातील आंबा व काजू उत्पादकांना हवामान बदलाचा फटका बसला आहे. नुकसानग्रस्तांना विमा योजनांतून भरपाई दिली जाणार असून, विमा नसलेल्या शेतकऱ्यांनाही मदत देण्यात येणार आहे. किमान मदत 15 हजारांवरून 22 हजार रुपयांपर्यंत वाढविण्याचा विचार आहे. पंचनाम्यानंतर तातडीने मदत जाहीर केली जाईल.
‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेअंतर्गत 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 1800 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. केंद्र व राज्य मिळून आतापर्यंत 54 हजार कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. धानाला बोनस देण्याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

उद्योग क्षेत्रालाही चालना दिली जात असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यात देशातील सर्वाधिक एमएसएमई नोंदणीकृत असून, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. ‘महाराष्ट्र उद्योग, गुंतवणूक व सेवा धोरण 2025’ जाहीर करण्यात आले असून, स्वतंत्र एमएसएमई आयुक्तालय स्थापन करण्यात येणार आहे.

अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि गेमिंग क्षेत्रात मोठ्या संधी निर्माण होत आहेत. एव्हीजीसी-एक्सआर धोरण राबवणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे. या क्षेत्रात आठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. मुंबईत ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी’ सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

पर्यावरण संरक्षणासाठीही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. मुंबईतील बांधकाम साईट्सवर आयओटी आणि एआय आधारित यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत असून, क्लायमेट ॲक्शन प्लॅनसाठी तीन हजार कोटी रुपयांचा निधी ठेवण्यात आला आहे. पर्यावरण संतुलनासाठी पुढील सात वर्षांत ३०० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. यासाठी जीआयएस आणि उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आरोग्य क्षेत्रात ३७०८ कोटी रुपयांचा प्रकल्प राबविणार

A project worth Rs 3708 crore will be implemented in the health sector : आरोग्य क्षेत्रासाठी जपानच्या सहकार्याने 3708 कोटी रुपयांचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. नवीन वैद्यकीय व नर्सिंग महाविद्यालये सुरू करण्यात येणार असून, आधुनिक उपकरणे उपलब्ध करून दिली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

याशिवाय, बदलापूर आयव्हीएफ प्रकरणात 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आदिवासी विद्यार्थ्यांचा भत्ता वाढविण्यात आला असून, ‘जलयुक्त शिवार 2.0’ अंतर्गत कामे सुरू आहेत. दिव्यांग प्रमाणपत्र प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी डिजिटल प्रणाली लागू करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रांत ठोस निर्णय घेतले जात असून, शेतकरी, उद्योग आणि सामान्य नागरिकांना दिलासा देण्यावर सरकारचा भर असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र देशात एमएसएमईमध्ये अव्वल असून लवकरच 1 कोटी नोंदणीकृत उद्योगांचा टप्पा गाठणार असल्याचे त्यांनी सांगितले. एव्हीजीसी एक्सआर (अ‍ॅनिमेशन, गेमिंग) क्षेत्रात मोठी गुंतवणूक येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यासमोरील कृषी, उद्योग आणि पर्यावरणीय आव्हानांचा सामना करण्यासाठी ठोस पावले उचलली असल्याचे सांगितले. शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.