Shree Gajanan Maharaj Vijay Granth Aadhyay 2 : गजानन महाराज विजय ग्रंथ अध्याय 2
Shree Gajanan Maharaj Vijay Granth Aadhyay आज आपण गजानन महाराज विजय ग्रंथातील अध्याय 2 पाहणार आहोत. त्याचबरोबर कोणत्या अध्यायाचे काय महत्त्व आहे हे ही आपण पाहणार आहोत.
Shree Gajanan Maharaj Vijay Granth Aadhyay गजानन महाराजांचा वार हा गुरुवार आहे. त्यामुळे भक्तगण गुरुवारी याचे पारायण करतात. ज्याला जसे जमेल तसे पारायण अनेक भक्त करतात. पारायणाचे अनेक प्रकार आहेत आणि गजानन महाराजांच्या प्रत्येक अध्यायात त्यांच्या लीला सांगितल्या आहेत. हे पारायण प्राकृत भाषेत आहे.
Gajanan Vijay Granth In Marathi गजानन महाराजांचा दुसरा अध्याय हा कुटुंबातील व्यथा आणि अडचणी दूर करण्यासाठी वाचला जातो.
गजानन महाराज विजय ग्रंथ अध्याय 1
अध्याय 2
॥ श्रीगणेशाय नमः ॥ जयजय अज अजिता सर्वेश्वरा । हेचंद्रभागातटविहारा । पूर्णब्रह्मा रुक्मिणीवरा । दीनबंधो पाहि माम् ॥१॥ तुझ्या वशिल्यावांचून । अवघेंच देवा आहे शीण । कुडीमाजीं नसल्या प्राण । कोण विचारी मढयातें ॥२॥ सरोवराची दिव्य शोभा । तोयामुळें पद्मनाभा । रसभरीत आंतला गाभा । टरफलातें महत्त्व आणी ॥३॥ तुझी कृपा त्याच परी । शरणांगतातें समर्थ करी । पाप ताप दैन्य वारी । हेंच आहे मागणें ॥४॥ मागले अध्यायीं झालें कथन । समर्थ गेले निघून । तेणें बंकटलाला लागून । हुरहूर वाटूं लागली ॥५॥ गोड न लागे अन्नपाणी । समर्थांचा ध्यास मनीं । न हाले दृष्टीपासोनी । गजाननाचें रुप तें ॥६॥ जिकडे पहावें तिकडे भास । होवो लागला त्यांचा खास । याचें नांव श्रोते ध्यास । उग्या नसती पोरचेष्टा ॥७॥ चुकलेल्या धेनूची । वत्स शुद्धि करी साची । तैसी बंकटलालाची । स्थिति झाली विबुध हो ! ॥८॥ हें हितगुज सांगावया । जागा नव्हती कोठें तया । वडिलांपासीं बोलावया । छाती त्याची होईना ॥९॥ ऐशा रीति चित्तीं भलें । विचाराचें काहूर झालें । शेगांव अवघें धुंडाळिलें । परी न पत्ता लागला ॥१०॥ घरीं येतां वडील पुसती । भवानी राम सन्मती । बाळा तुझी आज वृत्ती । का रे झाली चंचळ ॥११॥ चित्तीं उत्साह दिसेना । वदनीं दिसे म्लानपणा । ऐशा असह्य यातना । होती कशाच्या सांग मज ? ॥१२॥ तूं पोर्या तरणा ज्वान । नाहीं कशाची तुला वाण । ऐसें साच असोन । चिंतातुर दिसतोसी ॥१३॥ किंवा शरीरीं कांहीं व्याधी । होतसे ती सांग आधीं । चोरुन पुत्र ठेवी न कधीं । गोष्ट कोणती पित्याला ॥१४॥ कांहीं तरी सांगून । केलें पित्याचें समाधान । पुन्हा शोधाकारण । फिरुं लागला शेगांवीं ॥१५॥ बंकटलालाचे शेजारीं । एक होते सदाचारी । घरीं होती जमेदारी । परी अभिमान नसे त्याचा ॥१६॥ ते देशमुख रामाजीपंत । वयानें वृद्ध अत्यंत । बंकटलालानें इत्यंभूत । हकीकत त्यांना निवेदिली ॥१७॥ ते बोलले बंकटलाला । तुझा वृत्तान्त मी ऐकिला । तूं जो पुरुष कथिसी मला । तो योगी असावा कोणीतरी ॥१८॥ योग्यावांचुनी ऐशा क्रिया । मिळती न कोठें पाहावया । पूर्वसुकृता वांचोनिया । होणें न दर्शन अशाचें ॥१९॥ तूं घेतलें दर्शन । जन्म तुझा धन्य धन्य । भेटतां ते तुजलागून । ने मलाही दर्शना ॥२०॥ ऐशा स्थितींत दिवस चार । गेले निघून साचार । बंकटलालासी तीळभर । विसर न पडे तयाचा ॥२१॥ गोविंदबुवा टाकळीकर । होते एक कीर्तनकार । ज्यांच्या कीर्तनीं शारंगधर । प्रसन्नचित्त होतसे ॥२२॥ लौकिक यांचा वर्हाडांत । होता मोठया प्रमाणांत । ते आले फिरत फिरत । कीर्तन कराया शेगांवीं ॥२३॥ शंकराच्या मंदिरीं । झाली कीर्तनाची तयारी । धांवो लागल्या नरनारी । कीर्तन ऐकायाकारणें ॥२४॥ बंकटलालही तेथें आला । कीर्तन श्रवणासाठीं भला । मध्यें शिंपी भेटला । पितांबर नाम ज्याचें ॥२५॥ हा शिंपी पितांबर । भोळां भाविक होता फार । त्यासी समर्थाचा समाचार । बंकटलालें कथन केला ॥२६॥ दोघे कीर्तना चालले । तों अवचित समर्थ पाहिले । मागल्या बाजूस बसलेले । फरसावरी तेधवां ॥२७॥ मग कशाचें कीर्तन । गेले उभयतां धांवून । जेवीं द्रव्य-घटातें पाहून । कृपण जाय हपापोनी ॥२८॥ वा चातकातें स्वातिघन । वा मोरासी मेघदर्शन । किंवा तो रोहिणीरमण । चकोर पाहातां आनंदें ॥२९॥ तैसें उभयतांसी झालें । दूर उभे राहिले । विनयानें बोलूं लागले । कांहीं आणूं का खावया ? ॥३०॥ महाराज बोलले त्यावरी । तुला गरज असेल जरी । आण झुणकाभाकरी । माळणीच्या सदनांतून ॥३१॥ बंकटलालें सत्वरीं । चून अर्धी भाकरी । आणोन ठेविली हातावरी । तया योगेश्वराच्या ॥३२॥ चून भाकरी खात खात । वदले पितांबरासी समर्थ । जा जावोनी ओढयाप्रत । तुंबा भरोनी आण पाणी ॥३३॥ पितांबर बोले गुरुराया । ओढयास पाणी अल्प सदया । पाण्यांत तुंबा बुडावया । मुळीं नाहीं अवसर ॥३४॥ इतुकें असून तें पाणी । खराब केलें गुरुंनीं । तेवीं जाणार्या येणार्यांनीं । नाहीं पिण्याच्या योग्य तें ॥३५॥ मर्जी असल्या दुसरीकडून । पाणी आणितों तुंबा भरुन । तैं बोलले गजानन । दुसरें पाणी आम्हां नको ॥३६॥ नाल्याचेंच आण पाणी । आंत तुंबा बुडवोनी । उगीच ओंजळी-ओंजळींनीं । तुंब्यांत पाणी भरुं नको ॥३७॥ तुंबा घेऊन पितांबर । तात्काळ गेला नाल्यावर । तुंबा भरेल ऐसें नीर । कोठें न त्यानें पाहिलें ॥३८॥ तळवे पदाचे भिजतील । इतुकेंच तेथें होतें जल । करुन हातांची ओंजळ । तुंब्यांत पाणी भरणें नसे ॥३९॥ ऐसी झाली आड विहीर । चिंतावला पितांबर । हिय्या करुन अखेर । तुंवें स्पर्श केला जला ॥४०॥ तों ऐसें झालें अघटीत । तुंबा ठेवावा जेथ जेथ । तो बुडे तेथ तेथ । खळगा पाहून ओढयाला ॥४१॥ नाल्याचें घाण जीवन । तुंब्यांत स्फटिकासमान । आल तैसें पाहोन । शिंपी चित्तीं चकित झाला ॥४२॥ तो म्हणे ही ऐशी स्थिति । कीं आज झाली निश्चिती । ती योगेश्वराची साच शक्ति । संशय येथें धरणें नको ॥४३॥ तुंबा आणून ठेविला । योगेश्वराचे सान्निध्याला । त्याचा समर्थें स्वीकार केला । झुणकाभाकर सेविल्यावर ॥४४॥ बंकटलालासी सुपारी । मागते झाले साक्षात्कारी । अरे माळिणीच्या भाकरीवरी । माझी सेवा करतोस कां ? ॥४५॥ काढ सुपारी खिशांतून । फोडोन देई मजकारण । तें ऐकतां समाधान । बंकटलालास झालें बहु ॥४६॥ सुपारीच्या बरोबरी । दोन पैसे हातावरी । ठेवितां झाला व्याघ्रांबरी । दुदंडी तांब्याचे ॥४७॥ खडकु दुदंडी व्याघ्रांबरी । हीं मुसलमानी नाणीं सारीं । चालत होतीं व्यवहारीं । तया वर्हाड प्रांतांत ॥४८॥ पैशाप्रती पाहून । महाराज बोलले हांसोन । काय व्यापारी समजून । मजला तूं हें अर्पिसी ? ॥४९॥ हें नाणें तुमचें व्यवहारीं । मला न त्याची जरुरी । भावभक्ति नाण्यावरी । संतुष्ट मी रहातसे ॥५०॥ तें तुझ्याजवळ होतें । म्हणून भेटलों पुन्हां तूंतें । याचा विचार चित्तातें । करी म्हणजे कळेल ॥५१॥ जा आतां कीर्तन । दोघे जाऊन करा श्रवण । मी लिंबापाशीं बैसोन । कथा त्याची ऐकतों ॥५२॥ दोघे कीर्तनाप्रती आले । महाराज लिंबापाशीं बैसले । गोविंदबुवांचें सुरु झालें । आरंभींचें निरुपण ॥५३॥ निरुपणासी भागवतीचा । घेतला होता एक साचा । श्लोक एकादश स्कंधाचा । हंसगीतामधील ॥५४॥ बुवांनीं पूर्वार्धा विशद केलें । त्याचा उत्तरार्ध समर्थ वदले । तें ऐकोन घोटाळले । गोविंदबुवा मनांत ॥५५॥ हा उत्तरार्ध वदणारा । पुरुष अधिकारी दिसतो खरा । जा त्या घेऊन मंदिरा । या हो कीर्तनश्रवणास ॥५६॥ बंकटलाल पितांबर । आणिक मंडळी निघाली इतर । समर्थासी साचार । कीर्तनासी आणावया ॥५७॥ केली विनंती अवघ्यांनीं । श्रोते अती विनयांनीं । परी बसल्या जागेपासोनी । मुळीं न महाराज हलले हो ॥५८॥ गोविंदबुवा अखेर । येवोन जोडीते झाले कर । कृपा करावी एक वार । चला शिवाच्या मंदिरीं ॥५९॥ तुम्ही साक्षात् शंकर । बरें न बसणें बाहेर । धन्यावांचून मंदिर । शून्य साच समर्था ॥६०॥ पूर्वजन्मींचें पुण्य भलें । माझें आज उदेलें । म्हणून हे दृष्टी पडले । साक्षात् चरण शिवाचे ॥६१॥ कीर्तनाची फलप्राप्ती । झाली आज मजप्रती । वेळ न करा गुरुमूर्ती । चला मंदिरीं माझ्यासवें ॥६२॥ ऐसें गोविंदबुवा बोलतां । समर्थ वदलें तत्त्वतां । ठेवी एकवाक्यता । भाषणीं गोविंदा लवमात्र ॥६३॥ तूं इतक्यांत प्रतिपादिलें । अवघें ईश्वरें व्यापिलें । आंत बाहेर कांहीं न उरलें । मग हा ऐसा हट्ट कां ? ॥६४॥ जें जें जयानें सांगावें । तें तें त्यानें आचरावें । शब्दच्छलासी न करावें । साधकानें केव्हांही ॥६५॥ भागवताचा श्लोक सांगसी । आणि त्याच्या विरुद्ध वागसी । कथेकर्याची रीत ऐसी । बरवी नव्हे गोविंदा ॥६६॥ पोटभर्या कथकेरी । तूं न व्हावें भूमीवरी । जा कीर्तन समाप्त करी । मी येथून ऐकतों ॥६७॥ बुवा कीर्तनीं परत आले । गर्जोन अवघ्यां बोलले । तुमच्या शेगांवीं अमोल आलें । रत्न हें त्या सांभाळा ॥६८॥ हें न शेगांव राहिलें । पंढरपूर खचीत झालें । चालते बोलते येथ आले । साक्षात् हे पांडुरंग ॥६९॥ यांची तरतूद ठेवावी । सेवा यांची करावी । यांची आज्ञा मानावी । वेदवाक्यापरी हो ॥७०॥ तरीच तुमचें कल्याण । होईल निःसंशय करुन । अनायासें हें निधान । जोडलें त्या दवडूं नका ॥७१॥ कीर्तन अवघें सांग झालें । लोक आपुल्या घरां गेले । बंकटलाल घरीं आले । चित्तीं हर्ष मावेना ॥७२॥ आपल्या सन्माननीय पित्यासी । हकीकत कथिली प्रेमेंसी । बाबा आपुल्या घरासी । गजानन आणा हो ! ॥७३॥ पुत्रानें जें कथन केलें । तें भवानीरामें ऐकिलें । आणि प्रेमें ऐसें वदलें । तूंच ये त्या घेऊन ॥७४॥ पित्याची मिळाली संमती । बंकटलाल हर्षें अती । म्हणे कधीं भेटेल गुरुमूर्ती । मजला सदनीं आणावया ॥७५॥ पुढें माणिक चौकांत । चौथे दिवशीं सद्गुरुनाथ । भेटले बंकटलाला प्रत । अस्तमानाचे समयाला ॥७६॥ दिनपति अस्ता गेला । इकडे बोधसूर्य उदेला । माणिक चौक प्राचीला । बंकटलालाच्या भाग्यानें ॥७७॥ गुराखी घेऊन धेनूस । येऊं लागले ग्रामास । समर्थांच्या आसपास । गाई जमूं लागल्या ॥७८॥ त्या वाटले नंदसुत । आला येथें साक्षात । वृक्षावरी करितात । पक्षी किलकिलाट आनंदें ॥७९॥ दिवाबत्तीची तयारी । दुकानदार करिती खरी । अशा वेळीं आला घरीं । घेऊन बंकट महाराजा ॥८०॥ पित्यानें मूर्ति पाहातां क्षणीं । अती आनंद झाला मनीं । नमन साष्टांग केलें चरणीं । पाटावरी बैसविलें ॥८१॥ आणि विनविलें जोडोन होत । कांहीं भोजन करा येथ । तुम्ही साक्षात् पार्वतीकांत । प्रदोष वेळीं आला या ॥८२॥ शिव आराधन प्रदोषकालीं । घडेल तो भाग्यशाली । ऐसी आहे ऐकिली । स्कंदपुराणीं गोष्ट म्यां ॥८३॥ ऐसें म्हणोन आणिलें । बिल्वपत्र तात्काळ भलें । समर्थांच्या ठेविलें । परमभक्तीनें मस्तकीं ॥८४॥ करा येथें भोजन । ऐसें गेलों बोलून । परी स्वयंपाकाकारण । अवधी आहे कांहींसा ॥८५॥ स्वयंपाक होईपर्यंत । हे न थांबले जरी येथ । तरी प्रदोषकालीं पार्वतीकांत । गेला उपासी घरांतूनी ॥८६॥ त्यास करुं कैसी तोड । ऐसें संकट पडलें जड । जनसमुदाय प्रचंड । जमला मौज पाहावया ॥८७॥ विचार केला अखेरीं । दुपारच्या पुर्या आहेत घरीं । त्याच ठेवोन तबकांतरीं । पुढें ठेवूं समर्थांच्या ॥८८॥ ते अवघेच जाणती । कपट नाहीं माझ्या चित्तीं । भावें भेटतो उमापती । ऐसा आहे सिद्धान्त ॥८९॥ मी शिळें अवर्जुन । यास घालीत नाहीं अन्न । शिवाय पक्क्या रसोईकारण । शिळें म्हणणें उचित नसे ॥९०॥ चिंतिल्याप्रमाणें तयारी । तात्काळ त्यानें केली खरी । आणून ठेविलें समोरी । तबक एक समर्थांच्या ॥९१॥ पुर्या बदाम खारका । केळीं मोसंबीं मुळे देखा । भालाप्रती लाविला बुका । कंठीं घातिला पुष्पहार ॥९२॥ गुरुमूर्ति प्रसन्न चित्तें । अवघे झाले सेविते । जें जें पडेल पात्रातें । तें तें खाती भराभर ॥९३॥ उदरीं सुमारें तीन शेर । अन्न सांठविलें साचार । तेथेंच राहिले रात्रभर । श्रीगजानन महाराज ॥९४॥ बंकटलालें दुसरे दिवशीं । मंगल स्नान समर्थांसी । घातलें असे अतिहर्षी । तो न थाट वर्णवे ॥९५॥ घागरीं सुमारें शंभर । उष्णोदकाच्या साचार । पाणी घालती नारीनर । मन मानेल ऐशा रीतीं ॥९६॥ कुणी शिकेकाई लाविती । कुणी साबण घेऊन हातीं । समर्थांतें घासीती । पदकमळ आवडीनें ॥९७॥ कोणी दवना कोणी हीना । कोणी चमेली तेल जाणा । कोणी बेलियाच्या मर्दना । करुं लागले निजहस्तें ॥९८॥ अंगराग नानापरी । त्यांचें वर्णन कोण करी । बंकटलालाचिया घरीं । उणें नव्हतें कशाचे तें ॥९९॥ स्नानविधि संपला । पितांबर तो नेसविला । अति सन्मानें बैसविला । योगिराज गादीवरी ॥१००॥ भालीं गंध केशरी । गळ्यांत हार नानापरी । कोणी तुळशीमंजरी । वाहूं लागले शिरावर ॥१॥ नैवेद्य नानापरीचे । झाले समर्थार्पण साचे । भाग्य त्या बंकटलालाचें । खचित आलें उदयाला ॥२॥ तें बंकटलालाचें घर । झालें द्वारका साचार । तया दिनीं सोमवार । वार शिवाचा होता हो ॥३॥ अवघ्या मंडळींनीं आपुले । मनोरथ ते पूर्ण केले । एक मात्र त्यांतून उरले । इच्छाराम शेटजी ॥४॥ हा चुलत बंधु बंकटाचा । होता भाविक मनाचा । भक्त असे शंकराचा । त्यासी ऐसें वाटलें ॥५॥ आज आहे सोमवार । मसी उपास साचार । घरां प्रत्यक्ष शंकर । चालते बोलते आलेच कीं ॥६॥ त्यांची पूजा अस्तमानीं । यथासांग करोनी । करुं पारणा ऐसी मनीं । इच्छा त्यानें धरली असे ॥७॥ तों झाला अस्तमान । मावळलासे नारायण । इच्छारामें केलें स्नान । प्रदोष वेळा लक्षुनी ॥८॥ पूजासाहित्य घेऊन । साधु जे कां गजानन । त्यांचें केलें पूजन । परम प्रेमें करोनी ॥९॥ आणि विनंती केली वरी । झालें आहे दुपारीं । आपुलें तें भोजन जरी । परी आतां कांहीं खावें ॥११०॥ आपण जेवल्यावांचून । मी नाहीं घेणार अन्न । आहे मजला उपोषण । सोमवारचें गुरुराया ! ॥११॥ अवघ्या भक्तांचा हेत पुरला । माझा मात्र राहिला । तो पाहिजे पुरविला । तुम्ही कृपा करुन ॥१२॥ जन कुतूहल दृष्टींनीं । पाहूं लागले तया स्थानीं । इच्छाराम तो घेवोनी । नैवेद्य आला परातींत ॥१३॥ आंबेमोहर तांदळाचा । दोन मुदी भात साचा । नानाविध पक्वान्नांचा । थाट केला तयानें ॥१४॥ जिलबी राघवदास मोतीचूर । करंज्या अनारसे घीवर । शाखांचे नाना प्रकार । वर्णन करावे कोठवरी ? ॥१५॥ अगणित चटण्या कोशिंबिरी । वाडगा दह्याचा शेजारीं । तुपाची ती वाटी खरी । आदनाच्या सव्य भागा ॥१६॥ चार मनुष्यांचें अन्न । ऐसा नैवेद्य परिपूर्ण । समर्थांपुढें आणून । ठेवला इच्छारामानें ॥१७॥ पाहोन त्या नैवेद्यासी । महाराज बोलले आपणासी । खातो खातो अहर्निशीं । ऐसें बोलसी गणप्पा ॥१८॥ खा हें आतां अवघें अन्न । अघोर्या न करी अनमान । पाहों आले अवघे जन । तुझ्या अघोर वृत्तीला ॥१९॥ महाराज भोजना बैसले । अन्न अवघें पार केलें । पात्रीं न कांहीं ठेविलें । मीठ लिंबू तेंही पाहा ॥१२०॥ आग्रहाचा प्रकार । काय होतो अखेर । हें दावण्या साचार । कौतुक केलें गुरुवरें ॥२१॥ खणाणून उलटी झालि । खाल्ल्या अन्नाची ती भली । ऐसीच गोष्ट होती केली । श्रीरामदासें एकदां ॥२२॥ खिरीची झाली वासना । रामदासाचीया मना । तिची खोड मोडण्या जाणा । आकंठ खीर प्याले कीं ॥२३॥ उलटीं होतां परत । ती भक्षूं लागले सद्गुरुनाथ । श्रीरामदासस्वामी समर्थ । वासनेसी जिंकावया ॥२४॥ तैसें लोकाग्रहाला । घालावयासी शीघ्र आळा । हा उलटीचा प्रकार केला । अंगीं बळ असूनिया ॥२५॥ सत्पुरुषाचें आचरण । पुढील पिढीला साधन । होतें कराया संरक्षण । निसर्गाच्या धर्माचें ॥२६॥ तेंच समर्थें येथें केलें । लोकांलागीं सुचविलें । आग्रह करणें न चांगलें । तो विपरीत फळ देई ॥२७॥ असो उलटी झाल्यावरी । जागा केली साफ सारी । नेवोन बैसविले पहिल्या परी । स्नान घालोन महाराजा ॥२८॥ नरनारी दर्शनें घेती । महाराजांची आनंदवृत्ती । तों भजन करण्याप्रती । दिंडया आल्या दोन तेथें ॥२९॥ आवाज ज्यांचे सुस्वर । खडे पहाडी मनोहर । विठ्ठलाचा नामगजर । करुं लागले आवडीनें ॥१३०॥ इकडे महाराज आसनीं । होते ते वदले वदनीं । भजनाचिया मिषांनीं । “गणगण गणांत बोते” ॥३१॥ हेंच सर्वदा त्यांचें भजन । करिती टिचक्या वाजवून । ऐसा झाला आनंद जाण । रात्रभरीं ते ठायां ॥३२॥ ’गण गण’ हें त्यांचें भजन । हमेशा चाले म्हणून । लोकांनीं दिलें अभिधान । गजानन हें तयाला ॥३३॥ जो स्वयमेव ब्रह्म झाला । नांवरुप कोठून त्याला ? । नामरुपाचा गलबला । प्रकृतीच्या आश्रयास ॥३४॥ अस्ति-भाति-प्रिया ठायीं । योगेश्वर निमग्न राही । त्या आनंदा न वर्णवे कांहीं । त्याची उपमा त्यालाच असे ॥३५॥ आषाढीसी पंढरपूर । वा सिंहस्थीं गोदातीर । वा कुंभमेळ्यासी साचार । गर्दी होते हरिद्वारीं ॥३६॥ त्यापरि शेगांवांत । बंकटलालाच्या घरांत। लांबलांबून असंख्यात । जन येती दर्शना ॥३७॥
स्वामी समर्थ गजानन । हेच विठ्ठल नारायण । निश्चय विटेस ठेवून । पाय उभे राहिले ॥३८॥ त्यांचें वचन गोदातीर । आनंद हा हरिद्वार । गजबजलें शेगांव नगर । सदन राऊळ बंकटाचें ॥३९॥ जो ब्रह्मपदा पोंचला । जात कोठून उरली त्याला ? । सूर्याचिया प्रकाशाला । अवघेंच आहे सारखें ॥१४०॥ नित्य यात्रा नवी येई । समाराधना होती पाही । त्यांतें वाणितां शेषही । थकून जाईल निःसंशय ॥४१॥ तेथें माझा पाड कोण । मी कीटकासमान । अवघें वदे गजानन । निमित्त करुन माझ्या मुखा ॥४२॥ समर्थांची दिनचर्या । सांगतों थोडी या ठायां । अगाध त्यांचें चरित्र गाया । मज पामरा मती नसे ॥४३॥ कधीं करावें मंगलस्नान । कधीं हाळांत जाऊन । कधीं कधीं प्राशन । करावें गढूळ जलाचें ॥४४॥ त्यांच्या दिनचर्येचा । नियम नव्हता एक साचा । प्रकार वायूच्या गतीचा । न ये ठरवितां कोणासी ॥४५॥ चिलमीवरी प्रेम भारी । ती लागे वरच्यावरी । नव्हती आसक्ति तिच्यावरी । तें केवळ कौतुक ॥४६॥ असो आतां पुढीलाध्याया । भाव ठेवा ऐकावया । आली पर्वणी साधावया । वेळ करुं नका हो ! ॥४७॥ हें श्रीगजाननचरित्र । आदर्श होवो भाविकांप्रत । हेंच विनवी जोडोन हात । दासगणू ईशातें ॥१४८॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ ॥ इति द्वितीयोऽध्यायः समाप्तः ॥
!! गण गण गणात बोते !!