Shree Shivlilamrut All Adhyay Marathi : श्री शिवलीलामृत संपूर्ण अध्याय (1 ते 15)
Shree Shivlilamrut Adhyay All Marathi : आज आपण या लेखाच्या माध्यमातून श्री शिवलीलामृतचे संपूर्ण अध्याय पाहणार आहोत.
श्री शिवलीलामृत संपूर्ण अध्याय (1 ते 15)
Shree Shivlilamrut sampoorna Adhyay Marathi
श्री शिवलीलामृत अध्याय पहिला
श्री गणेशाय नम: ॥ श्री सरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीसांबसदाशिवाय नम: ॥
ॐ नमोजी शिवा अपरिमिता ॥ आदि अनादि मायातीता ॥ पूर्णब्रह्मानंदशाश्वता ॥ हेरंबताता जगद्गुरो ॥१॥
ज्योतिर्मयस्वरुपा पुराणपुरुषा ॥ अनादिसिध्दा आनंदवनविलासा ॥ मायाचक्रचाळका अविनाशा ॥ अनंतवेषाजगत्पते ॥२॥
जय जय विरूपाक्षा पंचवदना ॥ कर्माध्यक्षा शुध्द्चैतन्या ॥ विश्वंभरा कर्ममोचकगहना ॥ मनोजदहना मनमोहन जो ॥3॥
भक्तवल्लभ तूं हिमनगजामात ॥ भाललोचन नीलग्रीव उमानाथ ॥ मस्तकीं स्वर्धुनी विराजित ॥ जातिसुमनहारवत जी॥४॥
पक्षिरथप्रिय त्रिपुरांतक ॥ यक्षपतिमित्र प्रतापार्क ॥ दक्षमखविध्वंसक मृगांक ॥ निष्कलंक तव मस्तकीं ॥५
विशाळ भाळ कर्पूरगौर ॥ काकोलभक्षक निजभक्तरक्षणा ॥ विश्वासाक्षी भस्मलेपन ॥ भयमोचन भवहार जो ॥६॥
जो सर्गस्थित्यंतकारण ॥ त्रिशूलपाणी शार्दुलचर्मवसन ॥ स्कंदतात सुहास्यवदन ॥ मायाविपिनदहन जो ॥७
जो सच्चिदानंद निर्मळ॥ शिव शांत ज्ञानघन अचळ ॥ जो भानुकोटितेज अढळ ॥ सर्वकाळ व्यापक जो ॥॥
सकलकलिमलदहन कल्मषमोचन ॥ अनंतब्रह्मांडनायक जगरक्षण ॥ पद्मजतातमनरंजन ॥ जननमरणनाश जो ॥९॥
कमलोद्भव कमलावर ॥ दशशतमुख दशशतकर ॥ दशशतनेत्र सुर भूसुर ॥ अहोरात्र ध्याती जया ॥१०
भव भवांतक भवानीवर ॥ स्मशानवासी गिरां अगोचर ॥ जो स्वर्धुनीतीरविहार ॥ विश्वेश्वर काशीरज जो ॥११॥
व्योमहरण व्यालभूषण ॥ जो गजदमन अंधकमर्दन ॥ ॐकारमहाबलेश्वर आनंदघन ॥ मदगर्वभंजन अज अजि जो ॥१२॥
अमितगर्भ निगमागमनुत ॥ जो दिगंबर अवयवरहित ॥ उज्जयिनी महाकाळ कालातीत ॥ स्मरणे कृतांतभय नाशी ॥१॥
दुरितकाननवैश्वानर ॥ जो निजजनचित्तचकोर चंद्र ॥ वेणुपवरमहत्पापहर ॥ घुष्णेश्वर सनातन जो ॥१४
जो उमाहृदयपंजकीर ॥ जो निजजनहृदयाब्जभ्रमर ॥ तो सोमनाथ शशिशेखर ॥ सौराष्ट्रदेशविहारी जो १५॥
कैरवलोचन करुणासमुद्र ॥ रुद्राक्षभूषण रुद्रावतार ॥ भीम भयानक भीमाशंकर ॥ तपा पार नाहीं ज्याच्या॥१६॥
नागदमन नागभूषण ॥ नागेंद्रकुंडल नागचर्मपरिधान ॥ ज्योतिर्लिंग नागनाथ नागरक्षण ॥ नागाननजनक जो॥१७॥
वृत्ररिशत्रुजनकवरदायक ॥ बाणवल्लभ पंचबाणांतक ॥ भवरोगवैद्य त्रिपुरहारक ॥ वैजनाथ अत्यद्भुत जो ॥१८
त्रिनयन त्रिगुणातीत ॥ त्रितापशमन त्रिविधभेदरहित ॥ त्र्यंबकराज त्रिदोषानलशांत ॥ करूणाकर बलाहक जो ॥१९॥
कामसिंधुरविदारककंठीरव ॥ जगदानंदकंद कृपार्णव ॥ हिमनगवासी हैमवतीधव ॥ हिमकेदार अभिनव जो ॥२०॥
पंचमुकुट मायामलहरण ॥ निशिदिन गाती आम्नाय गुण ॥ नाहीं जया आदि मध्य अवसान ॥ मल्लिकार्जुन श्रशैलवास ॥२१॥
जो शक्रारिजनकांतकप्रियकर ॥ भूजासंतापहरण जोडोनि कर ॥ जेथे तिष्ठत अहोरात्र ॥ रामेश्वर जगद्गुरु ॥२२
ऐसिया शिवा सर्वोत्तमा ॥ अज अजित ब्रह्मानंदधामा ॥ तुझा वर्णावया महिमा ॥ निगमागमां अतर्क्य ॥२३
ब्रह्मानंद म्हणे श्रीधर ॥ तव गुणार्णव अगाध थोर ॥ तेथें बुध्दि चित्त तर्क पोहणार ॥ न पावती पार तत्तां ॥२४॥
कनकाद्रिसहित मेदिनीचें वजन ॥ करावया ताजवा आणूं कोठून ॥ व्योम सांठवे संपूर्ण ॥ ऐसें सांठवण कोठून आणूं॥२५॥
मेदिनीवसनाचें जळ आणि सिकता ॥ कोणत्या मार्पे मोजूं आतां ॥ प्रकाशावया आदित्या ॥ दीप सरता केवीं होय ॥२६
धरित्रीचें करूनि पत्र ॥ कुधर कज्जल जलधि मषीपात्र ॥ सुरद्रुम लेखणी विचित्र ॥ करूनि लिहीत कंजकन्या ॥२७
तेही तेथें राहिली तटस्थ ॥ तरी आतां केवीं करूं ग्रंथ ॥ जरी तूं मनीं धरिसी यथार्थ ॥ तरी काय एक न होय २८॥
द्वितीयेचा किशोर इंदु ॥ त्यासी जीर्णदशी वाहती दीनबंधु ॥ तैसे तुझे गुण करुणासिंधु ॥ वर्णीतसें अल्पमती ॥२९
सत्यवतीहृदयरत्नमराळ ॥ भेदीत गेला तव गुणनिराळ ॥ अंत नकळेचि समूळ ॥ तोही तटस्थ राहिला ॥३०
तेथें मी मंदमति किंकर ॥ केवीं क्रमूं शकें महीमांबर ॥ पर आत्मसार्थक करावया साचार ॥ तव गुणार्णवींमीन झालों ॥३१॥
ऐसे शब्द ऐकतां साचार ॥ तोषला दाक्षायणीवर ॥ म्हणे शिवलिलामृत ग्रंथ परिकर ॥ आरंभी रस भरीन मी ॥३२
जैसा घरूनि शिशूचा हात ॥ अक्षरें लिहवी पंडित ॥ तैसे तव मुखें मम गुण समस्त ॥ सुरस अत्यंत बोलवीन म ॥ ३३॥
श्रोतीं व्हावें सावधचित्त ॥ स्कंद्पुराणीं बोलिला श्रीशुकतात ॥ अगाध शिवलीलामृत ग्रंथ ॥ ब्रह्मोत्तरखंड जें ॥३४
नैमिषारण्यीं शौनकादिक सुमती ॥ सूताप्रति प्रश्न करिती ॥ तूं चिदाकाशींचा रोहिणीपति ॥ करीं तृप्ति श्रवणचकरां ॥३५॥
तुवां बहुत पुराणें सुरस ॥ श्रीविष्णुलीला वर्णिल्या विशेष ॥ अगाध महिमा आसपास ॥ दशावतार वर्णिले ॥३६॥
भारत रामायण भागवत ॥ ऐकतां श्रवण झाले तृप्त ॥ परी शिवलीलामृत अद्भुत ॥ श्रवणद्वारें प्राशन करूं ॥३॥
यावरी वेदव्यासशिष्य सूत ॥ म्हणे ऐका आतां देऊनि चित्त ॥ शिवचरित्र परमाद्भुत ॥ श्रवणें पातकपर्वत जळती ॥३८॥
आयुरारोग्य ऐश्वर्य अपार ॥ संतति संपत्ति ज्ञानविचार ॥ श्रवणमात्रें देणार ॥ श्रीशंकर निजांगे ॥३९
सकळ तीर्थव्रतांचे फळ ॥ महामखांचे श्रेय केवळ ॥ देणार शिवचरित्र निर्मळ ॥ श्रवणें कलिमल नाती ॥४०॥
सकल यज्ञामाजी जपयज्ञ थोर ॥ म्हणाल जपावा कोणता मंत्र ॥ तरी मंत्रराज शिवषडक्षर ॥ बीजसहित जपवा ॥४१॥
दुजा मंत्र शिवपंचाक्षर ॥ दोहींचे फळ एकचि साचार ॥ उतरती संसारार्णवपार ॥ ब्रह्मादिसुरऋषी हाचि जपती ॥४२
दारिद्र दु:ख भय शोक ॥ काम क्रोध द्वंद्व पातक ॥ इतुक्यांसही संहारक ॥ शिवतारक मंत्र जो ॥४३
तुष्टीपुष्टीधृतिकारण ॥ मुनिनिर्जरांसी हाचि कल्याण ॥ कर्ता मंत्रराज संपुर्ण ॥ अगाध महिमा न वर्वे ॥४४॥
नवग्रहांत वासरमणि थोर ॥ तैसा मंत्रात शिवपंचाक्षर ॥ कमलोद्भव कमलावर ॥ अहोरात्र हाचि जपती ॥४५
शास्त्रांमाजी वेदांत ॥ तीर्थामाजी प्रयाग अद्भुत ॥ महास्मशान क्षेत्रांत ॥ मंत्रराज तैसा हा ॥४६
शास्त्रांमाजी पाशुपत ॥ देवांमाजी कैलासनाथ ॥ कनकादे जैसा पर्वतांत ॥ मंत्र पंचाक्षरी तेवींहा ॥४७॥
केवळ परमतत्व चिन्मात्र ॥ परब्रह्म हेंचि तारक मंत्र ॥ तीर्थव्रतांचे संभार ॥ ओवाळूनि टाकावे ॥४८
हा मंत्र आत्म प्राप्ताची खाणी ॥ कैवल्यमार्गीचा प्रकाशतरणी ॥ अविद्याकाननदाहक ब्रह्माग्नी ॥ नकादिक ज्ञानि हाचि जपती ॥४९॥
स्त्री शूद्र आदिकरूनी ॥ हाचि जप मुख्य चहूं वर्णी ॥ गृहस्थ ब्रह्मचारी आदिकरूनी ॥ दिवसरजनीं जपावा ॥५०
जाग्रुतीं स्वप्नी येतां जातां ॥ उभें असतां निद्रा करितां ॥ कार्या जातां बोलतां भांडता ॥ सर्वदाही जपावा ॥५१
शिवमंत्रध्वनिपंचानन ॥ कर्णी आकर्णितां दोषावारण ॥ उभेचि सांडती प्राण ॥ न लागतां क्षण भस्म होती ॥५॥
न्यास मातृकाविधि आसन ॥ न लागे जपावा प्रीतीकरून ॥ शिव शिव उच्चारितां पूर्ण ॥ शंकर येऊनि पुढें उभ ॥५३॥
अखंड जपती जे हा मंत्र ॥ त्यांसी निजांगे रक्षी त्रिनेत्र ॥ आपुल्या अंगाची साउली करी पंचचक्र ॥ अहोरात्र रक्षी तयां॥५४॥
मंत्र जपकांलागुनी ॥ शिव म्हणे मी तुमचा ऋणी ॥ परी तो मंत्र गुरुमुखेंकरूनी ॥ घेइंजे आधीं विधीने ॥५५
गुरु करावा मुख्यवर्ण ॥ भक्तिवैराग्यदिव्यज्ञान ॥ सर्वज्ञ उदार दयाळू पूर्ण ॥ या चिन्हेकरून मंडित जो ॥५॥
मितभाषणी शांत दांत ॥ अंगी अमानित्व अदंभित्व ॥ अहिंसक अतिविरिक्त ॥ तोचि गुरु करावा ॥५७॥
वर्णानां ब्राह्मणो गुरु: ॥ हीं वेदवचनें निर्धारु ॥ हा त्यापासोनि मंत्रोच्चारु ॥ करूनि घ्यावा प्रीतीनें ॥५८॥
जरी आपणासी ठाउका मंत्र ॥ तरी गुरुमुखें घ्यावा निर्धार ॥ उगाचि जपे तो अविचार ॥ तरी निष्फळ जणिजे ॥५९॥
कामक्रोधमदयुक्त ॥ जे कां प्राणी गुरुविरहित ॥ त्यानी ज्ञान कथिलें बहुत ॥ परी त्यांचे मुख न पहावें ॥६०
वेदशास्त्रं शोधून ॥ जरी झालें अपरोक्षज्ञान ॥ करी संतांशीं चर्चा पूर्ण ॥ तरी गुरुविण तरेना ॥६१॥
एक म्हणती स्वप्नी आम्हांते ॥ मंत्र सांगितला भगवंतें ॥ आदरें सांगे लोकांते ॥ परी तो गुरूवण तरेना ॥६२॥
प्रत्यक्ष येऊनियां देव सांगितला जरी गुह्यभाव ॥ तरी तो न तरेचि स्वयमेव ॥ गुरूसी शरण न रिघतां ॥६३
मौजीबंधनाविण गायत्रीमंत्र ॥ जपे तो भ्रष्ट अपवित्र ॥ वराविण वर्हाडी समग्र ॥ काय व्यर्थ मिळोनी ॥६४॥
तो वाचक झाला बहुवस ॥ परी त्याचे न चुकती गर्भवास ॥ म्हणोनि सांप्रदाययुक्त गुरूस ॥ शरण जावेंनिर्धारे ॥६५॥
जरी गुरु केला भलता एक ॥ परी पूर्वसंप्रदाय नसे ठाऊक ॥ जैसे गर्भांधासी सम्यम ॥ वर्णव्यक्त स्वरूप न कळेचि॥६६॥
असो त्या मंत्राचे पुरश्चरण ॥ उत्तम क्षेत्री करावें पूर्ण ॥ काशी कुरुक्षेत्र नैमिषारण्य ॥ गोकर्णक्षेत्र आदिकरुनि ॥६७॥
शिवविष्णुक्षेत्र सुगम ॥ पवित्र स्थळीं जपावा सप्रेम ॥ तरी येचिविषयीं पुरातन उत्तम ॥ कथा सांगेन ते ऐका ॥६८॥
श्रवणी पठणीं निजध्यास ॥ आदरें धरावा दिवसेंदिवस ॥ आनुमोदन देता कथेस ॥ सर्व पापास क्षय होय ॥६९॥
श्रवण मनन निजध्यास ॥ धरितां साक्षात्कार होय सरस ॥ ब्रह्मघ्न मार्गघ्न तामस ॥ पावन सर्व होती ॥७०॥
तरी मथुरानाम नगर ॥ यादवंशी परमपवित्र ॥ दाशार्हनामें राजेंद्र ॥ अति उदार सुलक्षणी ॥७१॥
सर्व राजे देती करभार ॥ कर जोडोनि नमिती वारंवार ॥ त्यांच्या मुगुटरत्नाकिरणें साचार ॥प्रपदें ज्याचीं उजळलीं ॥७२॥
मुगुटघर्षणेंकरूनी ॥ किरणें पडलीं दिसती चरणीं ॥ जेणें सत्तावसन पसरूनी ॥ पालाणिली कुंभिनी हे ॥७३॥
उभारिला यशोध्वज ॥ जेवीं शरत्काळींचा द्विजराज ॥ सकल प्रजा आणि द्विज ॥ चिंतिती कल्याण जयाचे ॥७४॥
जैसा शुध्दद्वितीयेचा हिमांश ॥ तेवीं ऐश्वर्य चढे विशेष ॥ जो दुर्बुध्दि दासीस ॥ स्पर्श न करी कालत्रयीं ॥७५
सब्दुध्दिधर्मपत्नीसीं रत ॥ स्वरूपाशीं तुळिजे रमानाथ ॥ दानशस्त्रें समस्त ॥ याचकांचे दारिद्र्य निवटिलें ॥७६॥
भृभुजांवरी जामदग्न्य ॥ समरांगणी जेवीं प्रळयाग्न ॥ ठाण न चळे रणींहून ॥ कुठारघायें भूरुह जैसा ॥७७॥
चतुर्दश विद्या चौसष्टी कळा ॥ आकळी जेवीं करतळींचा आंवळा ॥ जेणें दानमेघें निवटिला ॥ दारिद्यधुरोळा याचकांचा ॥७८॥
बोलणें अति मधुर ॥ मेघ गजें जेवीं गंभीर ॥ प्रजाजनांचे चित्तमयूर ॥ नृत्य करिती स्वानंदे ॥७९॥
ज्याचा सेमासिंधु देखोनि अद्भुत ॥ जलसिंधु होय भयभीत ॥ निश्चळ अंबारींचा ध्रुव सत्य ॥ वच तेवीं न चळेचि ॥८०॥
त्याची कांता रूपवती सती ॥ काशीराजकुमारी नाम कलावती ॥ जिचें स्वरूप वर्णी सरस्वती ॥ विश्ववदनेंकरूनियां ॥८१॥
जे लावण्यसागरींची लहरी ॥ खंजनाक्षी बिंबाधरी ॥ मृदुभाषिणी पिकस्वरी ॥ हंसगमना हरिमध्या ॥८२॥
शशिवदना भुजंगवेणी ॥ अलंकारां शोभा जिची तनु आणी ॥ दशन झळकती जेवीं हिरेखाणी ॥ बोलतां सदनी प्रकाश पडें ॥८३॥
सकलकलानिपुण ॥ यालागी कलावती नाम पूर्ण ॥ जें सौदर्यवैरागरींचे रत्न ॥ जे निधान चातुर्यभूमीचें ॥८४॥
आंगीचा सुवास न माये सदनांत ॥ जिचें मुखाब्ज देखतां नृपनाथ ॥ नेत्रमिलिंद रुंजी घालीत ॥ धणी पाहता न पुरेचि ॥८५॥
नूतन आणिली पर्णून ॥ मनसिजें आकर्षिले रायाचें मन ॥ बोलावूं पाठविलें प्रीतीकरून ॥ परी ते न येचि प्रार्थितां ॥८६
स्वरूपश्रुंगारजाळें पसरून ॥ आकर्षिला नुपमानसमीन ॥ यालागीं दशार्हराजा उठोन ॥ आपणचि गेला तिजपाशीं ॥८७
म्हणे श्रुंगारवल्ली शुभांगी ॥ मम तनुवृक्षासी आलिंगीं ॥ उत्तम पुत्रफळ प्रसवसी जगीं ॥ अत्यानंदे सर्वांदेखतां ॥८८
तंव ते श्रुंगारसरोवरमराळीं ॥बोले सुहास्यवदना वेल्हाळी ॥ म्हणे म्यां उपासिला शशिमौळी ॥ सर्वकाळ व्रतस्थ असे ॥८९॥
जे स्री रोगिष्ट अत्यंत ॥ गर्भिणी किंवा ऋतुस्नात ॥ अभुक्त अथवा व्रतस्थ ॥ वृध्द अशक्त न भोगावी ॥९०॥
स्त्रीपुरूषें हर्षयुक्तं ॥ असावीं तरुण रूपवंत ॥ अष्टभोगेंकरूनि युक्त ॥ चिंताग्रस्त नसावीं ॥९१॥
पर्वकाळ व्रतदिन निरसून ॥ उत्तमकाळी षड्रस अन्न भक्षून ॥ मग ललना भोगावी प्रीतीकरून राजलक्षण सत्य हे ॥९२॥
राव काममदें मत्त प्रचंड ॥ रतिभरें पसरोनि दोर्दंड ॥ अलिंगन देतां बळें प्रचंड ॥ शरीर त्याचे पोळले ॥९३
लोहार्गला तप्त अत्यंत ॥ तैसी कलावतीची तनू पोळत ॥ नृप वेगळा होऊनि पुसत ॥ कैसा वृत्तांत सांग हा ॥९४॥
श्रृंगरसदनाविलासिनी ॥ मम हृदयानंदवर्धिनी ॥ सकळ संशय टाकुनी ॥ मुळींहूनी गोष्टी सांग ॥९५॥
म्हणे हे राजचक्रमुकुटावतंस ॥ क्रोधें भरों नेदीं मानस ॥ माझा गुरु स्वामी दुर्वास ॥ अनसुयात्मज महाराज ॥९६॥
त्या गुरुने परम पवित्र ॥ मज दीधला शिवपंचाक्षरी मंत्र ॥ तो जपतां अहोरात्र ॥ परमपावन पुनीत मी ॥९७॥
ममांग शीतळ अत्यंत ॥ तव कलेवर पापसंयुक्त ॥ अगम्यागमन केलें विचाररहित ॥ अभक्ष्य तितुकें भक्षिलें ॥९८॥
मज श्रीगुरुदयेंकरून ॥ राजेंद्रा आहें त्रिकाळज्ञान ॥ तुज जप तप शिवार्चन ॥ घडलें नाहीं सर्वथा ॥९९॥
घडलें नाहीं गुरुसेवन ॥ पुढें राज्यांतीं नरक दारूण ॥ ऐकतां राव अनुतापेंकरून ॥ सद्गदित जाहला ॥१००॥
म्हणे कलावती गुणगंभीरे ॥ तो शिवमंत्र मज देई आदरें ॥ ज्याचेनि जपें सर्वत्रं ॥ महत्पापें भस्म होती ॥१॥
ती म्हणे हे भृभुजेंद्र ॥ मज सांगावया नाहीं अधिकार ॥ मी वल्लभा तूं प्राणेश्वर ॥ गुरु निर्धार तूं माझा ॥२॥
तरी यादवकुळीं गुरु वसिष्ठ ॥ गर्गमुनि महाजाज श्रेष्ठ ॥ जो ज्ञानियांमाजी दिव्यमुकुट ॥ विद्या वरिष्ठ तयाची ॥३॥
जैसे वरिष्ठ वामदेव ज्ञानी ॥ तैसाच महाराज गर्गमुनी ॥ त्यासी नृपश्रेष्ठा शरण जाऊनी ॥ शिवदीक्षा घेइंजे ॥४॥
मग कलावतीसहित भूपाळ ॥ गर्गाश्रमीं पातला तत्काळ ॥ साष्टांग नमूनि करकमळ ॥ जोडूनि उभा ठाकला ॥५॥
अष्टभावें दाटूनि हृदयीं ॥ म्हणे शिवदीक्षा मज देई ॥ म्हणूनि पुढती लागे पायीं ॥ मिती नाही भावार्था ॥६॥
यावरी तो गर्गमुनी ॥ कृतांतभगिनीतीरा येऊनी ॥ पुण्यवृक्षातळी बैसोनी ॥ स्नान करवी यमुनेचें ॥७॥
उभयतांनी करूनि स्नान ॥ यथासांग केलें शिवपूजन ॥ यावरी दिव्य रत्नें आणून ॥ अभिषेक केला गुरूसी ॥८॥
दिव्याभरणें दिव्य वस्त्रें ॥ गुरु पुजिला नृपे आदरें ॥ गुरुदक्षिणेसी भांडारे ॥ दाशार्हरायें समर्पिली ॥९॥
तनुमनधनेंसी उदार ॥ गर्गचरणीं लागे नृपवर ॥ असोनि गुरूसी वंचिती जे पामर ॥ ते दारुण निरय भोगिती ॥११०॥
श्रीगुरुचे घरीं आपदा ॥ आपण भोगी सर्व संपदा ॥ कैचें ज्ञान त्या मतिमंदा ॥ गुरुब्रह्मानंदा न भजे जो ॥११॥
एक म्हणती तनुमनधन ॥ नाशिवंत गुरुसी काय अर्पून ॥ परम चांडाळ त्याचें शठज्ञान ॥ कदा वदन न पाहावें ॥१२॥
धिक् विद्या धिक् ज्ञान ॥ धिक् वैराग्यसाधन ॥ चतुर्वेद शास्त्रें आला पढून ॥ धिक् पठण तयाचें ॥१३॥
जैसा खरपृष्ठईवरी चंदन ॥ षड्रसीं दर्वी व्यर्थ फिरून ॥ जेवीं मापें तंदुल मोजून ॥ इकडून तिकडे तिकडे टाकिती ॥१४॥
घाणा इक्षुरस गाळी ॥ इतर सेविती रसनव्हाळी ॥ कीं पात्रांत शर्करा सांठविली ॥ परी गोडी न कळे तया ॥१५॥
असो ते अभाविक खळ ॥ तैसा नव्हे तो दाशार्हनृपाळ ॥ षोडशोपचारें निर्मळ ॥ पूजन केलें गुरूचें ॥१६॥
उभा ठाकला कर जोडून ॥ मग तो गर्गे हृदयी धरून ॥ मस्तकीं हस्त ठेवून ॥ शिवषडक्षर मंत्र सांगे ॥१७॥
हृदयाआकाशभुवनीं ॥ उगवला निजबोधतरणी ॥ अज्ञानतम तेच क्षणी ॥ निरसूनि नवल जाहलें ॥१८॥
अद्भुत मंत्राचें महिमान ॥ रायाचिया शरीरामधून ॥ कोट्यवधि काक निघोन ॥ पळते झाले तेधवां ॥१९॥
किती एकांचे पक्ष जळाले ॥ चरफडितचि बाहेर आले ॥ अवघेचि भस्म होऊनि गेले ॥ संख्या नाहीं तयांते ॥१२०॥
जैसा किंचित् पडतां कृशान ॥ दग्ध होय कंटकवन ॥ तैसे काक गेले जळोन ॥ देखोनि राव नवल करी ॥२१॥
गुरूसी नमूनि पुसे नृप ॥ काक कैंचे निघाले अमूप ॥ माझें झालें दिव्य रूप ॥ निर्जराहूनि आगळं ॥२२॥
गुरु म्हणे ऐक साक्षेपें ॥ अनंत जन्मींची महापापे ॥ बाहेर निघालीं काकारूपें ॥ शिवमंत्रप्रतापे भस्म झाली ॥२३॥
निष्पाप झाला नृपवर ॥ गुरुस्तवन करी वारंवार ॥ धन्य पंचाक्षरी मंत्र ॥ तूं धन्य गुरु पंचाक्षरी ॥२४॥
पंचभुतांची झाडणी करून ॥ सावध केलें मजलागून ॥ चारी देह निरसून ॥ केले पावन गुरुराया ॥२५॥
पंचवीस तत्वांचा मेळ ॥ त्यांत सांपडलों बहुत काळ ॥ क्रोध महिषासुर सबळ ॥ कामवेताळ धुसधुसी ॥२६॥
आशा मनशा तृष्णा कल्पना ॥ भ्रांति भुली इच्छा वासना ॥ या जखिणी यक्षिणी नाना ॥ विटंबीत मज होत्या ॥२७॥
ऐसा हा अवघा मायामेळ ॥ तुवां निरसला तात्काळ ॥ धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ ॥ गुरु दयाळ धन्य तूं ॥२८॥
सहस्त्रजन्मपर्यंत ॥ मज ज्ञान झालें समस्त ॥ पापें जळाली असंख्यात ॥ काकरूपे देखिलीं म्यां ॥२९॥
सुवर्णस्तेय अभक्ष्यभक्षक ॥ सुरापान गुरूतल्पक ॥ परदारागमन गुरुनिंदक ॥ ऐसीं नाना महत्पापें ॥१३०॥
गोहत्या ब्रह्महत्या धर्मलोपक ॥ स्त्रीहत्या गुरुहत्या ब्रह्मछळक ॥ परनिंदा पशुहिंसक ॥ वृत्तिहारक अगम्यस्त्रीगमन ॥३१॥
मित्रद्रोही गुरुद्रोही ॥ विश्वदोही वेदद्रोही ॥ प्रासादभेद लिंगभेद पाहीं ॥ पंक्तिभेद हरिहरभेद ॥३२॥
ज्ञानचोर पुस्तकचोर पक्षिघातक ॥ पाखांडमति मिथ्यावादक ॥ भेदबुध्दि भ्रष्टमार्गस्थापक ॥ स्त्रीलंपटदुराचारी ॥३३॥
कृतघ्न परद्रव्यापहारक ॥ कर्मभ्रष्ट तीर्थमहिमाउच्छेदक ॥ बकध्यानी गुरुछळक ॥ मातृहतक पितृहत्या ॥३४॥
दुर्बलघातुक कर्ममार्गघ्न ॥ दीनहत्यारी पाहती पैशून्य ॥ तृणदाहक पीडिती सज्जन ॥ गोत्रवध भगिनीवध ॥३५॥
कन्या विक्रय गोविक्रय ॥ हयविक्रय रसविक्रय ॥ ग्रामदाहक आत्महत्या पाहें ॥ भ्रूणहत्य महापापें ॥३६॥
हीं महापापें सांगितलीं क्षुद्रपापें नाहीं गणिलीं ॥ इतुकीं काकरूपें निघालीं ॥ भस्म झालीं प्रत्यक्ष ॥३७॥
कांही गांठी पुण्य होतें परम ॥ म्हणोनि नरदेह पावलों उत्तम ॥ गुरुप्रतापें तरलों नि:सीम ॥ काय महिमा बोलू आतां ॥३८॥
गुरुस्तवन करूनि अपार ॥ ग्रामासी आला दाशार्ह नृपवर ॥ सवें कलावती परमचतुर ॥ केला उध्दार रायाचा ॥३९॥
जपतां शिवमंत्र निर्मळ ॥ राज्य वर्धमान झालें सकळ ॥ अवर्षणदोष दुष्काळ ॥ देशांतूनि पळाले ॥१४०॥
वैधव्य आणि रोग मृत्य ॥ नाहींच कोठें देशांत ॥ अलिंगितां कलावतीसी नृपनाथ ॥ शशीऐसी शीतल वाटे ॥४१॥
शिव भजनीं लाविले सकळ जन ॥ घरोघरीं होत शिवकीर्तन ॥ रुद्राभिषेक शिवपूजन ॥ ब्राह्मणभोजन यथाविधि ॥४२॥
दाशार्हरायाचें आख्यान ॥ जे लिहिती ऐकती करिती पठण ॥ प्रीतीकरूनि ग्रंथरक्षण ॥ अनुमोदन देती जे ॥४३॥
सुफळ त्यांचा संसार ॥ त्यांसी निजांगे रक्षी श्रीशंकर ॥ धन्य धन्य तेचि नर ॥ शिवमहिमा वर्णिती जे ॥४४॥
पुढें कथा सुरस सार ॥ अमृअताहूनि रसिक फार ॥ ऐकोत पंडित चतुर ॥ गुरुभक्त प्रेमळ ज्ञानी जे ॥४५॥
पूर्ण ब्रह्मानंद शूळपाणी ॥ श्रीधरमुख निमित्त करूनी ॥ तोचि बोलवीत विचारोनी ॥ पहावें मनीं निर्धारें ॥४६॥
श्रीधरवरद पांडुरंग ॥ तेणें शिरी धरिलें शिवलिंग ॥ पूर्णब्रह्मानंद अभंग ॥ नव्हे विरंग कालत्रयी ॥४७॥
शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड ॥ स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ॥ परिसोत सज्जन अखंड ॥ प्रथमोध्याय गोड हा ॥१४८॥
इतिश्री प्रथमोध्याय: समाप्त: ॥
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥
श्री शिवलीलामृत अध्याय दुसरा
श्रीगणेशाय नमः॥
जेथें सर्वदा शिवस्मरण ॥ तेथें भुक्ति मुक्ति सर्वकल्याण ॥ नाना संकटें विघ्नें दारुण ॥ न बाधती कालत्रयी ॥१॥
संकेतें अथवा हास्येंकरून ॥ भलत्या मिसें घडो शिवस्मरण ॥ न कळतां परिसासी लोह जाण ॥ संघटतां सुवर्ण करी कीं ॥२॥
न कळतां प्राशिलें अमृत ॥ परी अमर करी कीं यथार्थ ॥ औषधी नेणतां भक्षित ॥ परी रोग सत्य हरी कीं ॥३॥
शुष्कतृणपर्वत अद्भुत ॥ नेणतां बाळक अकस्मात ॥ अग्निस्फुलिंग टाकीत ॥ परी भस्म यथार्थ करी कीं ॥४॥
तैसे न कळतां घडे शिवस्मरण ॥ परी सकळ दोषां होय दहन ॥ अथवा विनोदेंकरून ॥ शिवस्मरण घडो कां ॥५॥
हे कां व्यर्थ हांका फोडिती ॥ शिव शिव नामें आरडती ॥ अरे कां हे उगे न राहती ॥ हरहर गर्जती वेळोवेळां ॥६॥
शिवनामाचा करिती कोल्हाळ ॥ माझें उठविलें कपाळ ॥ शिव शिव म्हणतां वेळोवेळ ॥ काय येतें यांच्या हाता ॥७॥
ऐसी हेळणा करी क्षणक्षणीं ॥ परी उमावल्लभनाम ये वदनीं ॥ पुत्रकन्यानामेंकरूनी ॥ शिवस्मरण घडो कां ॥८॥
महाप्रीतीनें करितां शिवस्मरण ॥ आदरें करितां शिवध्यान ॥ शिवस्वरूप मानूनी ब्राह्मण ॥ संतर्पण करी सदां ॥९॥
ऐसी शिवीं आवडी धरी ॥ त्याहीमाजी आली शिवरात्री ॥ उपवास जागरण करी ॥ होय बोहरी महत्पापा ॥१०॥
ते दिवशीं बिल्वदळें घेऊन ॥ यथासांग घडलें शिवार्चन ॥ तरी सहस्त्रजन्मींचे पाप संपूर्ण ॥ भस्म होऊन जाईल ॥११॥
नित्य बिल्वदळें शिवासी वाहत ॥ त्याएवढा नाहीं पुण्यवंत ॥ तो तरेल हें नवल नव्हे सत्य ॥ त्याच्या दर्शनें बहुत तरती ॥१२॥
प्रातःकाळी घेतां शिवदर्शन ॥ यामिनीचें पाप जाय जळोन ॥ पूर्वजन्मींचें दोष गहन ॥ माध्यान्हीं दर्शन घेतां नुरती ॥१३॥
सायंकाळीं शिव पाहतां सप्रेम ॥ सप्तजन्मींचें पाप होय भस्म ॥ शिवरात्रीचा महिमा परम ॥ शेषही वर्णू शकेना ॥१४॥
कपिलाषष्ठी अर्धोदय संक्रमण ॥ महोदय गजच्छाया ग्रहण ॥ इतुकेही पर्वकाळ ओंवाळून ॥ शिवरात्रीवरून टाकावें ॥१५॥
शिवरात्री आधींचि पुण्यदिवस ॥ त्याहीवरी पूजन जागरण विशेष ॥ त्रिकाळपूजा आणि रुद्रघोष ॥ त्याच्या पुण्यासी पार नाहीं ॥१६॥
वसिष्ठ विश्वामित्रादि मुनीश्वर ॥ सुरगण गंधर्व किन्नर ॥ सिद्ध चारण विद्याधर ॥ शिवरात्रिव्रत करिताती ॥१७॥
यदर्थी सुरस कथा बहुत ॥ शौनकादिकां सांगे सूत ॥ ती श्रोतीं ऐकावी सावचित्त ॥ अत्यादरेंकरूनियां ॥१८॥
तरी मासांमाजी माघमास ॥ ज्याचा व्यास महिमा वर्णीं विशेष ॥ त्याहीमाजी कृष्णचतुर्दशीस ॥ मुख्य शिवरात्रि जाणिजे ॥१९॥
विंध्याद्रिवासी एक व्याध ॥ मृगपक्षिघातक परमनिषिध्द ॥ महानिर्दय हिंसक निषाद ॥ केले अपराध बहु तेणें ॥२०॥
धनुष्यबाण घेऊनि करीं ॥ पारधीसी चालिला दुराचारी ॥ पाश वागुरा कक्षेसी धरी ॥ कवच लेत हरितवर्ण ॥२१॥
करीं गोधांगुलित्राण ॥ आणिकही हातीं शस्त्रसामुग्री घेऊन ॥ काननीं जातां शिवस्थान ॥ शोभायमान देखिलें ॥२२॥
तंव तो शिवरात्रीचा दिन ॥ यात्रा आली चहुंकडून ॥ शिवमंदिर श्रुंगारून ॥ शोभा आणिली कैलासींची ॥२३॥
शुद्धरजततगटवर्ण ॥ देवालय झळके शोभायमान ॥ गगनचुंबित ध्वज पूर्ण ॥ रत्नजडित कळस तळपताती ॥२४॥
मध्यें मणिमय शिवलिंग ॥ भक्त पूजा करिती सांग ॥ अभिषेकधारा अभंग ॥ विप्र धरिती रुद्रघोषें ॥२५॥
एक टाळ मृदंग घेऊन ॥ सप्रेम करिती शिवकीर्तन ॥ श्रोते करटाळी वाजवून ॥ हरहरशब्दें घोष करिती ॥२६॥
नाना परिमळद्रव्यसुवास ॥ तेणें दशदिशा दुमदुमिल्या विशेष ॥ लक्ष दीपांचे प्रकाश ॥ जलजघोष घंटारव ॥२७॥
शशिमुखा गर्जती भेरी ॥ त्यांचा नाद न माये अंबरी ॥ एवं चतुर्विध वाद्यें नानापरी ॥ भक्त वाजविती आनंदे ॥२८॥
तो तेथें व्याध पातला ॥ समोर विलोकी सर्व सोहळा ॥ एक मुहूर्त उभा ठाकला ॥ हांसत बोलिला विनोदे ॥२९॥
हे मूर्ख अवघे जन ॥ येथें द्रव्य काय व्यर्थ नासोन ॥ आंत दगड बाहेरी पाषाण ॥ देवपण येथें कैचें ॥३०॥
उत्तम अन्न सांडून ॥ व्यर्थ कां करिती उपोषण ॥ ऐसिया चेष्टा करीत तेथून ॥ काननाप्रती जातसे ॥३१॥
लोक नामें गर्जती वारंवार ॥ आपणहि विनोदें म्हणे शिव हर हर ॥ सहज सव्य घालूनि शिवमंदिर ॥ घोर कांतार प्रवेशला ॥३२॥
वाचेसी लागला तोचि वेध ॥ विनोदें बोले शिव शिव शब्द ॥ नामप्रतापें दोष अगाध ॥ झडत सर्व चालिले ॥३३॥
घोरांदर सेवितां वन ॥ नाढळतीच जीव लघुदारूण ॥ तों वरूणदिग्वधूचें सदन ॥ वासरमणि प्रवेशला ॥३४॥
निशा प्रवर्तली सबळ ॥ कीं ब्रह्मांडकरंडा भरलें काजळ ॥ कीं विशाळ कृष्णकंबळ ॥ मंडप काय उभारिला ॥३५॥
विगतधवा जेवीं कामिनी ॥ तेवीं न शोभे कदा यामिनी ॥ जरी मंडित दिसे उडुगणीं ॥ परी पतिहीन रजनी ते ॥३६॥
जैसा पंडित गेलिया सभेंतून ॥ मूर्ख जल्पती पाखंडज्ञान ॥ जेवीं अस्ता जातां सहस्त्रकिरण ॥ उडुगणें मागें झळकती ॥३७॥
असो ऐसी निशा दाटली सुबद्ध ॥ अवघा वेळ उपवासी निषाद ॥ तों एक सरोवर अगाध ॥ दृष्टीं देखिलें शोधितां ॥३८॥
अनेक संपत्ती सभाग्यसदनीं ॥ तेवीं सरोवरी शोभती कुमुदिनी ॥ तटीं बिल्ववृक्ष गगनीं ॥ शोभायमान पसरला ॥३९॥
योगभ्रष्ट कर्मभूमीसी पावती जनन ॥ तेवीं बिल्वडहाळिया गगनींहून ॥ भूमीस लागल्या येऊन ॥ माजी रविशशिकिरण न दिसे ॥४०॥
त्यांत तम दाटलें दारूण ॥ माजी बैसल्या व्याध जाऊन ॥ शरासनीं शर लावून ॥ कानाडी ओढोन सावज लक्षी ॥४१॥
दृष्टीं बिल्वदळें दाटलीं बहुत ॥ तीं दक्षिणहस्तें खुडोनि टाकीत ॥ तो तेथें पद्मजहस्तें स्थापित ॥ शिवलिंग दिव्य होतें ॥४२॥
त्यावरी बिल्वदळें पडत ॥ तेणें संतोषला अपर्णानाथ ॥ व्याधासी उपवास जागरण घडत ॥ सायास न करितां अनायासें ॥४३॥
वाचेसी शिवनामाचा चाळा ॥ हर हर म्हणे वेळोवेळां ॥ पापक्षय होत चालिला ॥ पूजन स्मरण सर्व घडलें ॥४४॥
एक याम झालिया रजनी ॥ तों जलपानालागीं एक हरिणी ॥ आली तेथें ते गर्भिणी ॥ परम सुकुमार तेजस्वी ॥४५॥
व्याध तिणें लक्षिला दुरून ॥ कृतांतवत परम दारुण ॥ आकर्ण ओढिला बाण ॥ देखोनि हरिणी बोलतसे ॥४६॥
म्हणे महापुरुषा अन्यायाविण ॥ कां मजवरी लाविला बाण ॥ मी तव हरिणी आहे गर्भिण ॥ वध तुवां न करावा ॥४७॥
उदरांत गर्भ सूक्ष्म अज्ञान ॥ वधितां दोष तुज दारुण ॥ एक रथभरी जीव वधितां सान ॥ तरी एक बस्त वधियेला ॥४८॥
शत बस्त वधितां एक ॥ वृषभहत्येचें पातक ॥ शत वृषभ तैं गोहत्या देख ॥ घडली शास्त्र वदतसे ॥४९॥
शत गोहत्येचें पातक पूर्ण ॥ एक वघितां होय ब्राह्मण ॥ शत ब्रह्महत्येचें पातक जाण ॥ एक स्त्री वधिलिया ॥५०॥
शत स्त्रियांहूनि अधिक ॥ एक गुरुहत्येचें पातक ॥ त्याहूनि शतगुणी देख ॥ एक गर्भिणी विधिलिया ॥५१॥
तरी अन्याय नसतां ये अवसरीं ॥ मज मारिसी कां वनांतरी ॥ व्याध म्हणे कुटुंब घरी ॥ उपवासी वाट पहात ॥५२॥
मीही आजि निराहार ॥ अन्न नाहींच अणुमात्र ॥ परी मृगी होऊनि सुंदर ॥ गोष्टी वद्सी शास्त्रींच्या ॥५३॥
मज आश्चर्य वाटतें पोटीं ॥ नराऐशा सांगसी गोष्टी ॥ तुज देखोनियां दृष्टीं ॥ दया हृदयीं उपजतसे ॥५४॥
पूर्वीं तुं होतीस कोण ॥ तुज एवढें ज्ञान कोठून ॥ तूं विशाळनेत्री रूप लावण्य ॥ सर्व वर्तमान मज सांगे ॥५५॥
मृगी म्हणे ते अवसरीं ॥ पूर्वी मंथन करितां क्षीरसागरीं ॥ चतुर्दश रत्ने काढिलीं सुरासुरीं ॥ महाप्रयत्नेंकरूनियां ॥५६॥
त्यांमाजी मी रंभा चतुर ॥ मज देखोनि भुलती सुरवर ॥ नाना तपें आचरोनि अपार ॥ तपस्वी पावती आम्हांतें ॥५७॥
म्यां नयनकटाक्षजाळें पसरून ॥ बांधिले निर्जरांचें मनमीन ॥ माझिया अंगसुवासा वेधून ॥ मुनिभ्रमर धांवती ॥५८॥
माझे गायन ऐकावया सुरंग ॥ सुधापानीं धांवती कुरंग ॥ मी भोगीं स्वर्गीचे दिव्य भोग ॥ स्वरूपें न मानी कोणासी ॥५९॥
मद अंगी चढला बहुत ॥ शिवभजन टाकिलें समस्त ॥ शिवरात्री सोमवार प्रदोषव्रत ॥ शिवार्चन सांडिलें म्यां ॥६०॥
सोडोनियां सुधापान ॥ करूं लागलें मद्यप्राशन ॥ हिरण्यनामा दैत्य दारूण ॥ सुर सोडोनि रतले त्यांसी ॥६१॥
ऐसा लोटला काळ अपार ॥ मृगयेसी गेला तो असुर ॥ त्या दुष्टासंगे अपर्णावर ॥ भजनपूजन विसरलें ॥६२॥
मनासी ऐसें वाटलें पूर्ण ॥ असुर गेला मृगयेलागून ॥ इतुक्यांत घ्यावें शिवदर्शन ॥ म्हणोनि गेलें कैलासा ॥६३॥
मज देखतां हिमनगजामात ॥ परम क्षोभोनि शाप देत ॥ तूं परम पापिणी यथार्थ ॥ मृगी होई मृत्युलोकीं ॥६४॥
तुझ्या सख्या दोघीजणी॥ त्या होतील तुजसवं हरिणी ॥ हिरण्य असुर माझिये भजनीं ॥ असावध सर्वदा ॥६५॥
तोही मृग होऊनि सत्य ॥ तुम्हांसींचि होईल रत ॥ ऐक व्याधा सावचित्त ॥ मग म्यां शिव प्रार्थिला ॥६६॥
हे पंचवदना विरूपाक्षा ॥ सच्चिदानंदा कर्माधक्षां॥ दक्षमखदळणा सर्वासाक्षा ॥ उ:शाप देईं आम्हांतें ॥६७॥
भोळा चक्रवर्ती दयाळ ॥ उःशाप वदला पयःफेनधवल ॥ द्वादश वर्षे भरतां तात्काळ ॥ पावाल माझिया पदातें ॥६८॥
मग आम्हीं मृगयोनी ॥ जन्मलों ये कर्मअवनीं ॥ मी गर्भिणी आहें हरिणी ॥ प्रसूतकाळ समीप असे ॥६९॥
तरी मी आपुल्या स्वस्थळा जाऊन ॥ सत्वर येतें गर्भ ठेवून ॥ मग तूं सुखें घेई प्राण ॥ सत्य वचन हें माझें ॥७०॥
ऐसी मृगी बोलिली सावचित्त ॥ त्यावरी तो व्याध काय बोलत ॥ तूं गोड बोलसी यथार्थ ॥ परी विश्वास मज न वाटे ॥७१॥
नानापरी असत्य बोलोन ॥ करावें शरीराचें संरक्षण ॥ हें प्राणीमात्रासी आहे ज्ञान ॥ तरी तूं शपथ वदें आतां ॥७२॥
महत्पापें उच्चारून ॥ शपथ वदें यथार्थ पूर्ण ॥ यावरी ते हरिणी दीनवदन ॥ वाहत आण ऐका ते ॥७३॥
ब्राह्मणकुळीं उपजोन ॥ जो न करी वेदशास्त्रध्ययन ॥ सत्यशौचवर्जित संध्याहीन ॥ माझे शिरीं पातक तें ॥७४॥
एक वेदविक्रय करीती पूर्ण ॥ कृतघ्न परपीडक नावडे भजन ॥ एक दानासी करिती विघ्न ॥ गुरु निंदाश्रवण एक करिती ॥७५॥
रमावराउमावरांची निंदा ॥ त्या पापाची मज होय आपदा ॥ दान दिधलें जें ब्रह्मवृंदा ॥ हिरोनी घेती माघारें ॥७६॥
एक यतिनिंदा करिती ॥ एक शास्त्रें पहाती द्वैत निर्मिती ॥ नाना भ्रष्टमार्ग आचरती ॥ स्वधर्म आपुला सांडोनियां ॥७७॥
देवायला माजी जाऊनी ॥ हरिकथापुराणश्रवणीं ॥ जे बैसती विडा घेउनी ॥ ते कोडी होती पापिये ॥७८॥
जे देवळांत करिती स्त्रीसंभोग ॥ कीं स्त्रीभ्रतारांसी करिती वियोग ॥ ते नपुंसक होऊनि अभाग्य ॥ उपजती या जन्मीं ॥७९॥
वर्मकर्मे निंदा करीत ॥ तो जगपुरीषभक्षक काग होत ॥ शिष्यांसी विद्या असोनि न सांगत ॥ तो पिंगळा होत निर्धारें ॥८०॥
अनुचित प्रतिग्रह ब्राह्मण घेती ॥ त्यानिमित्तें गंडमाळा होती ॥ परक्षेत्रींच्या गाई वळूनि आणिती ॥ ते अल्पायुषी होती या जन्मीं ॥८१॥
जो राजा करी प्रजापीडण ॥ तो या जन्मीं व्याघ्र कां सर्प होय दारूण ॥ वृथा करी साधुछळण ॥ निर्वंश पूर्ण होय त्याचा ॥८२॥
स्त्रिया व्रतनेम करीत ॥ भ्रतारासी अव्हेरीत ॥ धनधान्य असोनि वंचित ॥ त्या वाघुळा होती या जन्मीं ॥८३॥
पुरूष कुरूप म्हणोनियां त्यागिती ॥ त्या या जन्मीं बालविधवा होती ॥ तेथेंही जारकर्म करिती ॥ मग त्या होती वारांगना ॥८४॥
ज्या भ्रतारासी निर्भर्त्सिती ॥ त्या दासी किंवा कुलटा होती ॥ सेवक स्वामीचा द्रोह करिती ॥ ते जन्मा येती श्वानाच्या ॥८५॥
सेवकापासूनि सेवा घेऊन ॥ त्याचें न दे जो वेतन ॥ तो अत्यंत भिकारी होऊन ॥ दारोदारी हिंडतसे ॥८६॥
स्त्रीपुरुष गुज बोलतां ॥ जो जाऊनि ऐके तत्वतां ॥ त्याची स्त्री दुरावे हिंडतां ॥ अन्न न मिळे तयातें ॥८७॥
जे जारणमारण करिती ॥ ते भूत प्रेत पिशाच होती ॥ यती उपवासें पीडिती ॥ त्यांते दुष्काळ जन्मवरी ॥८८॥
स्त्री रजस्वला होऊनी ॥ गृहीं वावरें जे पापिणी ॥ पूर्वज रुधिरीं पडती पतनीं ॥ त्या गृही देव पितृगण न येती ॥८९॥
जे देवाच्या दीपांचें तोत नेती ॥ ते या जन्मीं निपुत्रिक होती ॥ ज्या रांधितां अन्न चोरोनी भक्षिती ॥ त्या मार्जारी होती या जन्मीं ॥९०॥
ब्राह्मणांसी कदन्न घालून ॥ आपण भक्षिती षड्रसपक्वान ॥ त्यांचे गर्भ पडती गळोन ॥ आपुलिया कर्मवशें ॥९१॥
जो मातापित्यांसी शिणवीत ॥ तो ये जन्मी मर्कट होत ॥ सासुश्वशुरा स्नुषा गांजित ॥ तरी बाळक न वांचे तियेचें ॥९२॥
मृगी म्हणे व्याधालागून ॥ जरी मी न ये परतोन ॥ तरी हीं महत्पापें संपूर्ण ॥ माझ्या माथां बैसोत ॥९३॥
हे मिथ्या गोष्ट होय साचार ॥ तरी घडो शिवपूजेचा अपहार ॥ ऐसी शपथ ऐकतां निर्धार ॥ व्याध शंकला मानसी ॥९४॥
म्हणे पतिव्रते जाई आतां ॥ सत्वर येई निशा सरतां ॥ हरिणी म्हणे शिवपदासी तत्वतां ॥ पुण्यवंता जाशील ॥९५॥
उदकपान करूनि वेगीं ॥ निजाश्रमा गेली कुरंगी ॥ इकडे व्याघ्र दक्षिणभार्गी ॥ टाकी बिल्वदळे खुडूनियां ॥९६॥
दोन प्रहर झाली यामिनी ॥ द्वितीय पूजा शिवें मानुनी ॥ अर्धपाप जळालें मुळींहुनी ॥ सप्तजन्मींचें तेधवां ॥९७॥
नामीं आवड जडली पूर्ण ॥ व्याध करी शिवस्मरण ॥ मृगीमुखें ऐकिलें निरूपण ॥ सहज जागरण घडलें तया ॥९८॥
तों दुसरी हरिणी अकस्मात ॥ पातली तेथें तृषाक्रांत ॥ व्याधे बाण ओढीतां त्वरित ॥ करुणा भाकी हरिणी ते ॥९९॥
म्हणे व्याधा ऐक ये समयी ॥ मज कामानळें पीडीलें पाहीं ॥ पतीसी भोग देऊनि लवलाही ॥ परतोनि येतें सत्वर ॥१००॥
व्याध आश्चर्य करी मनांत ॥ म्हणे शपथ बोलोनि जाई त्वरित ॥ धन्य तुमचे जीवित्व ॥ सर्व शास्त्रार्थ ठाउका ॥१॥
चापी तडाग सरोवर ॥ जो पतित मोडी देवागार ॥ गुरुनिंदक मद्यपानी दुराचार ॥ तीं पापें समग्र मस्तकीं माझ्या ॥२॥
महाक्षत्रिय आपण म्हणवित ॥ समरांगणी मागें पळत ॥ वृत्ति हरी सीमा लोटित ॥ ग्रंथ निंदित महापुरूषांचे ॥३॥
वेदशास्त्रांची निंदा करी ॥ संतभक्तांसी द्वेष धरी ॥ हरिहर चरित्रें अव्हेरी ॥ माझे शिरीं तीं पापें ॥४॥
धनधान्य असोनि पाहीं ॥ पतीलागीं शिणवी म्हणे नाहीं ॥ पति सांडोनि निजे परगृही ॥ तीं पापे माझिया माथां ॥५॥
पुत्र स्नुषा सन्मार्ग वर्तता ॥ त्यांसी व्यर्थची गाजिती जे नं पाहंतां ॥ ते कुरुप होती तत्वतां ॥ हिंडता भिक्षा न मिळेचि ॥६॥
बंधुबंधु जे वैर करिती ॥ ते या जन्मीं मत्स्य होती ॥ गुरुचें उणें जे पाहती ॥ त्यांची संपत्ति दग्ध होय ॥७॥
जे मार्गस्थांचीं वस्त्रे हरिती ॥ ते अतिशूद्र प्रेतवस्त्रें पांघरती ॥ आम्ही तपस्वी म्हणोनिया अनाचार करिती ॥ ते घुले होती मोकाट ॥८॥
दासी स्वामीची सेवा न करी ॥ ती ये जन्मी होय मगरी ॥ जो कन्याविक्रय करी ॥ हिंसक योनी निपजे तो ॥९॥
स्त्री भ्रताराची सेवा करीत ॥ तीस जो व्यर्थचि गांजित ॥ त्याचा गृहभंग होत ॥ जन्मजन्मांतरी न सुटे ॥११०॥
ब्राह्मण करी रसविक्रय ॥ घेतां देतां मद्यपी होय ॥ जो ब्रह्मवृंदा अपमानिताहे ॥ तो होय ब्रह्मराक्षस ॥११॥
एकें उपकार केला ॥ जो नष्ट नाठवी त्याला ॥ तो कृतघ्न जंत झाला ॥ पूर्वकर्मे जाणिजे ॥१२॥
विप्र श्राध्दीं जेवुनी ॥ स्त्रीभोग करी ते दिनीं ॥ तो श्वानसुकरयोनीं ॥ उपजेल नि:संशये ॥१३॥
व्यवहारी दहांत बैसोन ॥ खोटी साक्ष देई गर्जोन ॥ पूर्वज नरकीं पावती पतन ॥ असत्य साक्ष देतांचि ॥१४॥
दोघी स्त्रिया करून ॥ एकीचेंच राखी जो मन ॥ तो गोचिड होय जाण ॥ सारमेय शरीरी ॥१५॥
पूर्वजन्मीं कोंडी उदक ॥ त्याचा मळमूत्रनिरोध देख ॥ करितां साधुनिंदा आवश्यक ॥ सत्वर दंत भग्न होती ॥१६॥
देवालयीं करी भोजन ॥ तरी ये जन्मी होय क्षीण ॥ पृथ्वीपंतीची निंदा करितां जाण ॥ उदरीं मंदाग्नि होय पैं ॥१७॥
ग्रहणसमयीं करी भोजन ॥ त्यासी पित्तरोग हो दारुण ॥ परबाळें विकी परदेश नेऊन ॥ तरी सर्वांगीं कुष्ठ भरे ॥१८॥
जी स्त्री करी गर्भपातन ॥ तीउपजे वंध्या होऊन ॥ देवालय टाकी पाडोन ॥ तरी अंगभंग होय त्याचा ॥१९॥
अपराधाविण स्त्रीसी गांजिताहे ॥ त्याचें ये जन्मीं एक अंग जाये ॥ ब्राह्मणाचें अन्न हरिती पापिये ॥ त्यांचा वंश न वाढे कधीं ॥१२०॥
गुरु संत माता पिता ॥ त्यांसी होय जो निर्भर्त्सिता ॥ तरी वाचा जाय तत्वतां ॥ अडखळे बोलतां क्षणाक्षणां ॥२१॥
जो ब्राह्मणांसी दंड भारी ॥ त्यासी व्याधितिडका लागती शरीरीं ॥ जो संतासीं वादविवाद करी ॥ दीर्घ दंत होती त्याचे ॥२२॥
देवद्वारींचे तरुवर ॥ अश्वत्थादि वृक्ष साचार ॥ तोडितां पांगुळ होय निर्धार ॥ भिक्षा न मिळे हिंडातां ॥२३॥
जो सूतकान्न भक्षित ॥ त्याचे उदरीं नाना रोग होत ॥ आपणचि परिमळद्रव्य भोगी समस्त ॥ तरी दुर्गंधी सत्य सर्वांगी ॥२४॥
ब्राह्मणाचें ऋण न देतां ॥ तरी बाळपणीं मृत्यु पावे पिता ॥ जलवृक्षाच्छाया मोडितां ॥ तरी एकही स्थळ न मिळे त्यातें ॥२५॥
ब्राह्मणासी आशा लावून ॥ चाळवी नेदी कदा दान ॥ तो ये जन्मीं अन्न अन्न ॥ करीत हिंडे घरोघरीं ॥२६॥
जो पुत्रद्वेंष करीत ॥ आणि दरिद्रियाचें लग्न मोडित ॥ तरी स्त्रीसी सल राहे पोटांत ॥ वंध्या निश्चित संसारी ॥२७॥
जेणे ब्राह्मण बांधिले निग्रहून ॥ त्यासी सांडसें तोडी सुर्यनंदन ॥ जो नायके कथाग्रंथ पावन ॥ बधिर होय जन्मोजन्मी ॥२८॥
जो पीडी मातापितयांस ॥ त्याचा सर्वदा होई कार्यनाश ॥ एकासी भजे निंदी सर्व देवांस ॥ तरी एकचि पुत्र होय त्यासी ॥२९॥
जो चांडाळ गोवध करी ॥ त्यासी मिळे कर्कश नारी ॥ वृषभ वधितां निर्धारीं ॥ शतमूर्ख पुत्र होय त्यासी ॥१३०॥
उदकतृणेंविण पशु मारीत ॥ तरी मुक्याचि प्रजा होती समस्त ॥ जो पतिव्रतेसी भोगूं इच्छित ॥ तरी कुरूप नारी कर्कशा मिळे ॥३१॥
जो पारधी बहु जीव संहारी ॥ तो फेंपरा होय संसारी ॥ गुरूचा त्याग जो चांडाळ करी ॥ तो उपजतांचि मृत्यु पावे ॥३२॥
नित्य अथवा रविवरीं मुते रवीसमोर ॥ त्याचे बाळपणीं दंत भग्न केश शुभ्र ॥ जे मृत बाळासाठीं रूदती निर्धार॥ त्यांस हांसता निपुत्रिक होय ॥३३॥
हरिणी म्हणे व्याधालागून ॥ मी सत्वर येतें पतीसी भोग देऊन ॥ न यें तरी हीं पापें संपूर्ण ॥ माझ्या माथां बैसोत पैं ॥३४॥
व्याध मनांत शंकोन ॥ म्हणे धन्य धन्य तुमचें ज्ञान ॥ सत्वर येई गृहासी जाऊन ॥ सत्य संपूर्ण सांभाळी ॥३५॥
जलपान करूनि वेगीं ॥ आश्रम गेली ते कुरंगी ॥ तों मृगराज तेचि प्रसंगीं ॥ जलपानार्थ पातला ॥३६॥
व्याधें ओढिला बाण ॥ तों मृग बोले दीनवदन ॥ म्हणे माझ्या स्त्रिया पतिव्रता सगुण ॥ त्यांसी पुसोन येतों मी ॥३७॥
शपथ ऐकें त्वरित ॥ कीर्तन करिती प्रेमळ भक्त ॥ तो कथारंग मोडितां निर्वंश होत ॥ तें पाप सत्य मम माथां ॥३८॥
ब्रह्मकर्म वेदोक्त ॥ शुद्र निजांगे आचरत ॥ तो अधम नरकीं पडत ॥ परधर्म आचरतां ॥३९॥
तीर्थयात्रेसी विघ्नें करी ॥ वाटपाडी वस्त्र द्रव्य हरी ॥ तरी सर्वांगी व्रण अघोरीं ॥ नरकीं पडे कल्पपर्यंत ॥१४०॥
शास्त्रकोशीं नाहीं प्रमाण ॥ कूटकविता करी क्षुद्र लक्षून ॥ हरिती ब्राह्मणांचा मान ॥ तरी संतान तयांचे न वाढे ॥४१॥
हरिदिनीं शिवदिनी उपोषण ॥ विधियुक्त न करी द्वादशी पूर्ण ॥ तरी हस्त पाद क्षीण ॥ होती त्याचे निर्धारें ॥४२॥
एक शिवहरीप्रतिमा फोडिती ॥ एक भगवद्भक्तां विघ्नें करिती ॥ एक शिवमहिमा उच्छेदिती ॥ नरसीं होती कीटक ते ॥४३॥
मातृद्रोही त्यासी व्याधी भरे ॥ पितृद्रोही पिशाच विचरे ॥ गुरुद्रोही तात्काळ मरे ॥ भूतप्रेतगणीं विचरे तो ॥४४॥
विप्र आहार बहुत जेविती ॥ त्यांसी जो हांसे दुर्मती ॥ त्याचे मुखीं अहोचक्ररोग निश्चि ती॥ न सोडती जन्मवरी ॥४५॥
एक गोविक्रय करिती ॥ एक कन्याविक्रय अर्जिती ॥ ते नर मार्जार मस्त होती ॥ बाळें भक्षिती आपुलीं ॥४६॥
जो कन्या भगिनी अभिलाषी ॥ कामदृष्टीं न्याहाळी पतिव्रतेसी ॥ प्रमेहरोग होय त्यासी ॥ कीं खडा गुह्यांत दाटत ॥४७॥
प्रासादभंग लिंगभंग करी ॥ देवांचीं उपकरणें अलंकार चोरी ॥ देवप्रतिष्ठा अव्हेरी ॥ पंडुरोग होय ॥४८॥
एक मित्रद्रोह विश्वासघात करिती ॥ मातृपितृहत्या गुरूसी संकटी पाडिती ॥ ब्रह्मवध गोवध न वारिती ॥ अंगी सामर्थ्य असोनियां ॥४९॥
ब्राह्मण बैसवोनि बाहेरी ॥ उत्तमान्न जेविती गृहांतरी ॥ सोयर्यांची प्रार्थना करी ॥ संग्रहणी पोटशूळ होती तयां ॥१५०॥
एक कर्मभ्रष्ट पंचयज्ञ न करिती ॥ एक ब्राह्मणांची सदनें जाळिती ॥ एक दीनासी मार्गी नागविती ॥ एक संतांचा करिती अपमान ॥५१॥
एक करिती गुरुछळाण ॥ एक म्हणती पाहों याचें लक्षण ॥ नाना दोष आरोपिती अज्ञान ॥ त्यांचे संतान न वाढे ॥५२॥
जो सदा पितृदोष करी ॥ जो ब्रह्मवृंदासी अव्हेरी ॥ शिवकीर्तन ऐकतां त्रासे अंतरी ॥ तरी पितृवीर्य नव्हे तो ॥५३॥
शिवकीर्तनीं नव्हे सादर ॥ तरी कर्णमूळरोग निर्धार ॥ नसत्याचि गोष्टी जल्पे अपार ॥ जो दर्दुर होय निर्धारें ॥५४॥
शिवकीर्तन किंवा पुराण श्रवण ॥ तेथें शयन करीतां सर्प होय दारुण ॥ एक अविवादक छळक जाण ॥ ते पिशाचयोनी पावती ॥५५॥
एकां देवार्चनीं वीट येत ॥ ब्राह्मण पूजावया कंटाळत ॥ तीर्थप्रसाद अव्हेरीत ॥ त्यांच्या आंखुडती अंगशिरा ॥५६॥
मृग म्हणे ऐसीं पापें अपार ॥ मम मस्तकीं होईल परम भार ॥ मग पारधई म्हणे सत्वर ॥ जाई स्वस्थाना मृगवर्या ॥५७॥
व्याध शिवनामें गजें ते क्षणीं ॥ कंठ सद्गदित अश्रु नयनीं ॥ मागुती बिल्वदळें खुडोनी ॥ शिवावरी टाकीतसे ॥५८॥
चौं प्रहरांच्या पूजा चारी ॥ संपूर्ण झाल्या शिवजागरीं ॥ सप्तजन्मींचीं पापें निर्धारीं ॥ मुळींहूनी भस्म झालीं ॥५९॥
तों पूर्वदिशा मुख प्रक्षाळित ॥ सुपर्णाग्रज उदय पावत ॥ आरक्तवर्ण शोभा दिसत ॥ तेंचि कुंकुम प्राचीचें ॥१६०॥
तों तिसरी मृगी आली अकस्मात ॥ व्याध देखिला कृतांतवत ॥ म्हणे मारूं नको मज यथार्थ ॥ बाळासी स्तन देऊनि येतें मी ॥६१॥
व्याध अत्यंत हर्षभरित ॥ म्हणे ही काय बोलेल शास्त्रार्थ ॥ तो ऐकावया म्हणत ॥ शपथ करूनि जाय तूं ॥६२॥
यावरी मृगी म्हणे व्याधा ऐक ॥ जो तृणदाहक ग्रामदाहक ॥ गोब्राह्मणांचें कोंडी उदक ॥ क्षयरोग त्यासी न सोडी ॥६३॥
ब्राह्मणांची सदनें हरिती देख ॥ त्यांचे पूर्वज रौरवीं पडती नि:शंक ॥ मातृपुत्रां बिघडती एक ॥ स्त्रीपुरुषां विघड पाडिती ॥६४॥
देवब्राह्मण देखोन ॥ खालती न करिती कदा मान ॥ निंदीती बोलती कठोर वचन ॥ यम कर चरण छेदी तयांचे ॥६५॥
परवस्तु चोरावया देख ॥ अखंड लाविला असें रोंख ॥ साधुसन्मानें मानी दुःख ॥ त्यासी नेत्ररोगतिडका न सोडिती ॥६६॥
पुस्तकचोर ते मुके होती ॥ रत्नचोरांचे नेत्र जाती ॥ अत्यंत गर्वी ते महिष होती ॥ पारधी निश्चिती श्येनपक्षी ॥६७॥
भक्तांची जो निंदा करीत ॥ त्याचे मुखीं दुर्गंधी घाणित ॥ जो मातापितयांसी ताडित ॥ लुला होत यालागीं ॥६८॥
जो अत्यंत कृपण ॥ धन न वेंची अणुप्रमाण ॥ तो महाभुजंग होऊन ॥ धुसधुसीत बैसे तेथें ॥६९॥
भिक्षेसी यतीश्वर आला ॥ तो जेणें रिता दवडिला ॥ शिव त्यावरी जाण कोपला ॥ संतती संपत्ती दग्ध होय ॥१७०॥
ब्राह्मण बैसला पात्रावरी ॥ उठवूनि घातला बाहेरी ॥ त्याहूनियां दुराचारी ॥ दुसरा कोणी नसेचि ॥७१॥
ऐसा धर्माधर्म ऐकोन ॥ पारधी सद्गद बोले वचन ॥ स्वस्थळा जाई जलपान करूनियां ॥ बाळांसी स्तन देऊन येई ॥७२॥
ऐसें ऐकोनि मृगी लवलाह्या ॥ गेली जलप्राशन करूनियां ॥ बाळें स्तनी लावूनियां ॥ तृप्त केलीं तियेनें ॥७३॥
वडील झाली प्रसूत ॥ दुसरी पतीची कामना पुरवीत ॥ मृगराज म्हणे आतां त्वरित ॥ जाऊं चला व्याधापासी ॥७४॥
मृग पाडसांसहित सर्वही ॥ व्याधापासीं आलीं लवलाहीं ॥ मृग म्हणे ते समयी ॥ आधीं मज वधीं पारधिया ॥७५॥
मृगी म्हणे हा नव्हे विधी ॥ आम्हीं जाऊं पतीच्या आधी ॥ पाडसे म्हणती त्रिशुध्दी ॥ आम्हांसी वधीं पारधिया ॥७६॥
त्यांची वचनें ऐकतां ते क्षणी ॥ व्याध सद्गद झाला मनीं ॥ अश्रुधारा लोटल्या नयनीं ॥ लागे चरणीं तयांच्या ॥७७॥
म्हणे धन्य जिणें माझें झालें ॥ तुमचेनि मुखें निरूपण ऐकिलें ॥ बहुतां जन्मींजें पाप जळालें ॥ पावन केलें शरीर ॥७८॥
माता पिता गुरु देव ॥ तुम्हीच आतां माझे सर्व ॥ कैचा संसार मिथ्या वाव ॥ पुत्रकलत्र सर्व लटकें ॥७९॥
व्याध बोले प्रेमेकरून ॥ आतां कधीं मी शिवपद पावेन ॥ तों अकस्मात आलें विमान ॥ शिवगण बैसले त्यावरी ॥१८०॥
पंचवदन दशभुज ॥ व्याघ्रांबर नेसले महाराज ॥ अद्बुत तयांचे तेज ॥ दिक्चक्रामाजी न समाये ॥८१॥
दिव्य वाद्यें वाजविती किन्नर ॥ आलाप करिती विद्याधर ॥ दिव्य सुमनांचे संभार ॥ सुरगण स्वयें वर्षती ॥८२॥
मृगे पावलीं दिव्य शरीर ॥ व्याध करी साष्टांग नमस्कार ॥ मुखें म्हणे जयजय शिव हर हर ॥ तों शरीरभाव पालटला ॥८३॥
परिसीं झगडतां लोह होय सुवर्ण ॥ तैस व्याध झाला दशभुज पंचवदन ॥ शिवगणीं बहुत प्रार्थून ॥ दिव्य विमानीं बैसविला ॥८४॥
मृगें पावलीं दिव्य शरीर ॥ तींही विमानी आरूढलीं समग्र ॥ व्याधाची स्तुति वारंवार ॥ करिती सुरगण सर्वही॥८५॥
व्याध नेला शिवपदाप्रती ॥ तारामंडळी मृगे राहती ॥ अद्यापि गगनीं झळकती ॥ जन पाहती सर्व डोळां ॥८६॥
सत्यवतीहृदयरत्नखाणी ॥ रसभरित बोलिला लिंगपुराणीं ॥ तें सज्जन ऐकोत दिनरजनीं ॥ ब्रह्मानंदेकरूनियां ॥८७॥
धन्य तें शिवरात्रिव्रत ॥ श्रवणें पातक दग्ध होत ॥ जे हें पठण करिती सावचित्त ॥ धन्य पुण्यवंत नर तेचि ॥८८॥
सज्जन श्रोते निर्जर सत्य ॥ प्राशन करोत शिवलीलामृत ॥ निंदक असुर कुतर्कि बहुत ॥ त्यांसी प्राप्त कैचें हें ॥८९॥
कैलासनाथ ब्रह्मानंद ॥ तयांचे पदकल्हार सुगंध ॥ तेथें श्रीधर अभंग षट्पद ॥ रुंजी घालीत शिवनामें ॥१९०॥
शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड ॥ स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड परिसोत सज्जन अखंड ॥ द्वितीयाध्याय गोड हा ॥१९१॥
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥
श्री शिवलीलामृत अध्याय तिसरा
श्रीगणेशाय नमः ॥
जय जय शिव मंगलधामा ॥ निजजनहृदयआरामा ॥ चराचरफलांकितद्रुमा ॥ नामाअनामातीत तूं ॥१॥
इंदिरावरभगिनीमनरंजना ॥ षडास्यजनका शफरीध्वजदहना ॥ ब्रह्मानंदा भाललोचना ॥ भवभंजना त्रिपुरांतका ॥२॥
हे शिव सद्योजात वामघोरा ॥ तत्पुरुषा ईशान ईश्वरा ॥ अर्धनारीनटेश्वरा ॥ गिरिजारंगा गिरीशा ॥३॥
गंगाधरा भोगिभूषणा ॥ सर्वव्यापका अंधकमर्दना ॥ परमातीता निरंजना ॥ गुणत्रयविरहित तूं ॥४॥
हे पय:फेनधवल जगज्जीवना ॥ द्वितीयाध्यायीं कृपा करून ॥ अगाध सुरस आख्यान ॥ शिवरात्रिमहिमा वर्णविला ॥५॥
यावरी कैसा कथेची रचना ॥ वदवीं पंचमुकुट पंचानना ॥ शौनकादिकां मुनिजनां ॥ सूत सांगे नैमिषारण्यीं ॥६॥
इक्ष्वाकुवंशीं महाराज ॥ मित्रसहनामें भूभुज ॥ वेदशास्त्रसंपन्न सतेज ॥ दुसरा बिडौजा पृथ्वीवरी ॥७॥
पृतनावसनेंकरून ॥ घातलें उर्वीसी पालाण ॥ प्रतापसूर्य उगवला पूर्ण ॥ शत्रुभगणें मावळलीं ॥८॥
तो एकदां मृगयाव्याजेंकरून ॥ निघाला धुरंधर चमू घेऊन ॥ घोरांदर प्रवेशला विपिन ॥ तों सावजें चहूंकडून ऊठलीं ॥९॥
व्याघ्र वृक रीस वनकेसरी ॥ मृग मृगी वनगौ वानर वानरी ॥ शशकजबुंकांच्या हारी ॥ संहारीत नृपवर ॥१०॥
चातक मयूर बदक ॥ कस्तूरीकुरंग जवादिबिडालक ॥ नकुल राजहंस चक्रवाक ॥ पक्षी श्वापदें धांवती ॥११॥
नृपे मारिले जीव बहुवस ॥ त्यांत एक मारिला राक्षस ॥ महाभयानक तामस ॥ गतप्राण होऊनि पडियेला ॥१२॥
त्याचा बंधु परम दारुण ॥ तो लक्षिता झाला दुरोन ॥ मनीं कापट्य कल्पून ॥ म्हणे सूड घेईन बंधूचा ॥१३॥
मित्रसह पातला स्वनगरास ॥ असुरें धरिला मानववेष ॥ कृष्णवसनवेष्टित विशेष ॥ दर्वी स्कंधीं घेऊनियां ॥१४॥
नृपासी भेटला येऊन ॥ म्हणे मी सूपशास्त्रीं परम निपुण ॥ अन्न शाका सुवास करीन ॥ देखोन सुरनर भूलती ॥१५॥
रायें ठेविला पाकसदनीं ॥ त्यावरी पितृतिथी लक्षुनी ॥ गुरु वसिष्ठ घरालागुनी ॥ नृपश्रेष्ठें आणिला ॥१६॥
भोजना आला अब्जजनंदन ॥ तो राक्षसें कापट्यस्मरून ॥ शाकांत नरमांस शिजवून ॥ ऋषीस आणून वाढिलें ॥१७॥
त्रिकालज्ञानी वसिष्ठमुनी ॥ सकळ ऋषींमाजी शिरोमणी ॥ कापट्य सकळ जाणुनी ॥ मित्रसह शापिला ॥१८॥
म्हणे तूं वनीं होई राक्षस ॥ जेथें आहार न मिळे नि:शेष ॥ मी ब्राह्मण मज नरमांस ॥ वाढिलें कैसें पापिया ॥१९॥
राव म्हणे मी नेणें सर्वथा ॥ बोलावा सूपशास्त्रीं जाणता ॥ तंव तो पळाला क्षण न लगतां ॥ गुप्तरुपें वना आपुल्या ॥२०॥
राव कोपला दारुण ॥ म्हणे मज शापिले काय कारण ॥ मीही तुज शापीन म्हणोय ॥ उदक करीं घेतलें ॥२१॥
तंव रायाची पट्टराणी ॥ मदयंती नामें पुण्यखाणी ॥ रूपें केवळ लावण्यहरिणी ॥ चातुर्य उपमे जेवीं शारदा ॥२२॥
मदयंती म्हणे राया ॥ दूरदृष्टीं पाहें विचारूनियां ॥ शिष्यें गुरूसी शापावया ॥ अधिकार नाहीं सर्वथा ॥२३॥
गुरूसी शाप देतां निर्धारीं ॥ आपण नरक भोगावे कल्पवरी ॥ राव म्हणे चतुर सुंदरी ॥ बोललीस साच तें ॥२४॥
म्हणे हें उदक खालीं टाकूं जरी ॥ तरी पीक न पिके दग्ध होय धरित्री ॥ मग आपुल्याचि प्रपदांवरी ॥ जल टाकी मित्रसह ॥२५॥
तों जानुपर्यत चरण ॥ दग्ध झालें कृष्णवर्ण ॥ कुष्ठ भरला मग तेथून ॥ कल्माषपाद नाम त्यांचें ॥२६॥
वसिष्ठें जाणोनि वृत्तांत ॥ रायासी उ:शाप देत ॥ म्हणे द्वादशवर्षी होसील मुक्त ॥ येसी स्वस्थाना आपुल्या ॥२७॥
गुरु पावला अंतर्धान ॥ मग कल्माषपाद राक्षस होऊन ॥ क्षुधाक्रांत निशिदिनी ॥ वनीं भक्षी जीव सर्व ॥२८॥
परम भयानक असुर ॥ विशाळ देह कपाळी शेंदुर ॥ विक्राळ वदन बाहेर शुभ्र ॥ दंतदाढा वाढलिया ॥२९॥
जीव भक्षिले आसमास ॥ वनीं हिंडतां तो राक्षस ॥ एक ब्राह्मणकुमर डोळस ॥ द्वादश वर्षी देखिला ॥३०॥
सर्वे त्याची ललना चिमणी ॥ दोघें क्रीडती कौतुकें वनीं ॥ तंव तो ब्राह्मणपुत्र राक्षसें धरूनी ॥ भक्षावया सिद्ध झाला ॥३१॥
तंव त्याची वधू काकुळती येत ॥ अरे तूं मित्रसह राजा पुण्यवंत ॥ गोब्राह्मणप्रतिपाळक सत्य ॥ माझा कांत मारूं नको ॥३२॥
गडबडां लोळे सुंदरी ॥ करुणाभाकी पदर पसरी ॥ सवेचि जाऊनि चरण धरीं ॥ सोडी झडकरी पति माझा ॥३३॥
पतीस भक्षूं नको राजेंद्रा ॥ महत्पाप घेऊं नको एकसरा ॥ स्वर्गमार्ग तरी चतुरा ॥ कैसा पावसी अंतकाळीं ॥३४॥
ऐसी करुणा भाकिता कामिनी ॥ निर्दये भक्षिला तेच क्षणीं ॥ अस्थिपंजर टाकूनी ॥ तियेपुढें दिधला ॥३५॥
तंव ती दुःखे करूनी ॥ आक्रोशें कपाळ पिटी धरणीं ॥ मृत्तिका घेऊनि घाली वदनी ॥ कोण वनीं सांवरी तीतें ॥३६॥
मग तिनें शाप दीधला रायातें ॥ जो अलोट विधिहरिहरातें ॥ म्हणे दमयंती संगसुरते ॥ प्राण जाईल तेचि क्षणीं ॥३७॥
कोणे एके स्त्रीचा संगसोहळा ॥ तुज न घडोरे चांडाळा ॥ ऐसा शाप वदोनि ते वेळां ॥ केल्या गोळा अस्थि पतीच्या ॥३८॥
तात्काळ प्रवेशली अग्नी ॥ इकडे द्वादशवर्षी शापमुक्त होऊनी ॥ राव स्वनगरा येऊनी ॥ वर्तमान सांगे स्त्रियेशीं ॥३९॥
येरी कपाळ पिटी आक्रोशें करून ॥ म्हणे झालें वंशखंडन ॥ पतीसी म्हणे ब्रह्मचर्य धरून ॥ प्राण आपुला रक्षीं कां ॥४०॥
अनिवार अत्यंत मन ॥ न करी कोण स्त्रियेशीं संभाषण ॥ खदिरांगाराची सेज आजपासून ॥ झाली तुजलागी जाण पां ॥४१॥
परम तळमळी राजेंद्र ॥ जैसा सांपळा कोंडिला व्याघ्र ॥ कीं महाभुजंगाचे दंत समग्र ॥ पाडोनि गारुडी दीन करी ॥४२॥
कीं नासिकीं वेसण घालून ॥ महावृषभ करिती दीन ॥ कीं वनीं निरंकुश वारण ॥ धरूनि क्षीण करिती मग ॥४३॥
तैसा कल्पाषपद भूप ॥ होऊनि राहिला दीनरूप ॥ पुढें प्रकाशावया कूळदीप आपण धर्मशास्त्र पाहातसे ॥४४॥
तेथीचे पाहोनि प्रमाण ॥ वसिष्ठें मदयंतीस भोग देऊन ॥ अमोघ वीर्य पडतां पूर्ण ॥ दिव्य पुत्र जाहला ॥४५॥
तेणें पुढें वंश चालिला ॥ असो तो राव मृगयेस निघाला ॥ यथारण्य तथा गृह वाटे नृपाला ॥ भोग त्यजिले सर्वही ॥४६॥
मनांत मनोजविकार उठत ॥ विवेकांकुशें कामइभ आवरूत ॥ म्हणे स्त्रीस वैधव्य मज मृत्यु ॥ तें कर्म सहसा न करावें ॥४७॥
आपुली कर्मगती गहन ॥ प्राक्तन विचित्र दारुण ॥ देवावरी काय बोल ठेवून ॥ भोगल्याविण न सुटेचि ॥४८॥
ऐसा राव उदासयुक्त ॥ वनीं हिंडता मागें पहात ॥ तों पिशाच भयानक अत्यंत ॥ रायापाठीं उभें सदा ॥४९॥
दंपत्ये पूर्वी मारिलीं ॥ ती ब्रह्महत्या पाठीसी लागली ॥ राजा तीर्थे हिंडता सकळीं ॥ परी कदाकाळीं न सोडी ॥५०॥
न सोडी स्वप्नीं जागृतींत ॥ महाविक्राळ दांत करकरां खात ॥ रायें व्रतें केलीं बहुत ॥ दान देत बहुसाल ॥५१॥
ऐसा हिंडतां राव भागला ॥ मिथुलानगरासमीप आला ॥ वनश्री देखतां आनंदला ॥ परी ब्रह्महत्या पाठीसी उभी ॥५२॥
वृक्ष लागले बहुत ॥ आम्रवृक्ष फळभारें डोलत ॥ पोफळी रातांजन विराजित ॥ केळी नारळी खर्जुरिया ॥५३॥
चंपक जाई जुई मालती ॥ मोगरे पुन्नागराज शेवंती ॥ मलयागर कृष्णागर जाती ॥ जपा करवीर कोविदार ॥५४॥
वड पिंपळ औदुंबर ॥ पारिजातक बकुळ देवदार ॥ कपित्थ बिल्व अंजीर ॥ अर्जुन पिचुमंद कदंब ते ॥५५॥
ऐसिया वनामाजी नृपती ॥ क्षणएक पावला विश्रांती ॥ परी ते पाठीसीं पापमती ॥ ब्रह्महत्या उभी असे ॥५६॥
तों उगवला भाग्यवासरमणी ॥ कीं निधान जोडे रंकालागुनी ॥ कीं क्षुधितापुढें उचंबळोनी ॥ क्षीरब्धि जैसा पातला ॥५७॥
कीं मरतियांच्या मुखांत ॥ अकस्मात घातलें अमृत ॥ कीं चिंताग्रस्तासी प्राप्त ॥ चिंतामणी जाहला ॥५८॥
तैसा तापसियांमाजी मुकुटमणीं ॥ शिष्यमांदी सवे घेऊनी ॥ महाराज तपस्वी गौतममुनी ॥ तये स्थानीं पातला ॥५९॥
रायें घातलें लोटांगण ॥ दाटला अष्टभावेंकरून ॥ उभा ठाकला कर जोडून ॥ करी स्तवन प्रीतीनें ॥६०॥
सहज होतां संतदर्शन ॥ पापें संहारती संपूर्ण ॥ तूं विलोकिसी जरी कृपा करून ॥ तरी रंक सहस्त्रनयन होय ॥६१॥
यावरी तो महाराज गौतम ॥ कल्माषपादा पुसे कुशलक्षेम ॥ राज्य राष्ट्रज प्रजा अमात्य परम ॥ सुखेंकरून नांदती कीं ॥६२॥
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ॥ स्वधर्म आचरती कीं समग्र ॥ पशु सेवक पुत्र कलत्र ॥ समस्त सुखरूप आहेत कीं ॥६३॥
राव म्हणे आपुले कृपेकरून ॥ समस्त आहेत क्षेमकल्याण ॥ परंतु आलासी वाटतें दुरून ॥ आनंदघन दिसतोसी ॥६४॥
तुझ्या दर्शनें मज वाटे सत्वर ॥ ब्रह्महत्या दूर होईल समग्र ॥ मग पूर्वकर्म आपुलें दुस्तर ॥ ऋषीप्रती निवेदिलें ॥६५॥
गौतम म्हणे परम पवित्र ॥ भूकैलास गोकर्णक्षेत्र ॥ तेथूनि मी आलो अपार ॥ महिमा तेथींचा न वर्णवें ॥६६॥
ॐकाररूपें कैलासनाथ ॥ भवानीसहित तेथें नांदत ॥ सुर असुर किन्नर सेवित ॥ अर्धमात्रापीठ जें ॥६७॥
त्या गोकर्णींचे शिवदर्शन ॥ ब्रह्मादिकां दुर्लभ जाण ॥ तेथें इंदिरेसहित जनार्दन ॥ तप गहन आचरत ॥६८॥
कोटिसूर्याची प्रभा ॥ मृडानीसहित शिव उभा ॥ कैवल्यगर्भीचा पूर्ण गाभा ॥ तेथींची शोभा न वर्णवे ॥६९॥
इंद्र सनकादिक ब्रह्मपुत्र ॥ तेथेंचि वस्ती अहोरात्र ॥ जेथींचे पाषाण तरूवर ॥ समग्र निर्जर अवतरले ॥७०॥
सत्यवतीहृदयरत्न ॥ जेथें करी अनुष्ठान ॥ वसिष्ठ भृग जामदग्न्य ॥ गोकर्णक्षेत्रीं सदा वसती ॥७१॥
पहावया मृडानीनायक ॥ मंडपघसणी होतसे देख ॥ नारद तुंबरु गायक ॥ जेथें गाती शिवलीला ॥७२॥
गोकर्णाभोवतें समग्र ॥ उभे अखंड देवांचे भार ॥ मुखें गर्जती शिवहरहर ॥ आनंद थोर होतसे ॥७३॥
ऋषि करिती वेदघोष ॥ अष्टनायिकांचें नृत्य विशेष ॥ किन्नरगंधर्व गायक सुरस ॥ तोषविती महेशातें ॥७४॥
तें अति उत्तम स्थान ॥ तेजोमय प्रकाश गहन ॥ नाना वृक्ष लागले सघन ॥ कैलासभुवन प्रत्यक्ष ॥७५॥
शुभ्र सिंहासन लखलखित ॥ चारी द्वारें मणिमयखचित ॥ ऐरावतारूढ अमरनाथ ॥ पूर्वद्वारी तिष्ठतसे ॥७६॥
दक्षिणेस रक्षी सूर्यनंदन ॥ पश्चिमेसी वारूणीरमण ॥ उत्तरेसी वैश्रवण ॥ प्राणमित्र शिवाचा ॥७७॥
कर्पूरगौर भवानीसहित घवघवीत तेजें विराजित ॥ भूकैलास साक्षात माहेर संतसाधकांचें ॥७८॥
त्या मूर्तींचे करावे ध्यान ॥ त्याभोवतें महासिध्दीचें पूजन ॥ त्याभोंवतें कात्यायनी आवरण ॥ अष्टभैरव पूजिजे ॥७९॥
द्वादश मित्र एकादश रुद्र ॥ तेथेंचि वसती अहोरात्र ॥ अष्टवसु दिक्पाळ समग्र ॥ जोडोनि कर उभे तेथें ॥८०॥
अष्टसिध्दि नवनिधि कर जोडूनी ॥ अखंड आराधिति पिनाकपाणी ॥ रायास म्हणे गौतममुनी ॥ मीही वसतों सदा तेथें ॥८१॥
वरकड क्षेत्रीं लक्ष वरुषें जाण ॥ तप आचरला निर्वाण ॥ गोकर्णी एकदिन ॥ होय प्रसन्न सदाशिव ॥८२॥
अमावास्या संक्रांति सोमवार ॥ प्रदोष पर्वकाळ शिववासर ॥ समुद्रस्नान करितां समग्र ॥ फळ होय सकळ तीर्थाचें ॥८३॥
रावण कुंभकर्ण बिभिषण ॥ याहीं पूर्वी केले तेथें अनुष्ठान ॥ तें निर्वाणलिंग दशानने जाण ॥ कैलासाहूनि आणिलें ॥८४॥
गणेशें स्थापिलें तें लिंग ॥ ऋषि म्हणती सूतातें कथा सांग ॥ ऐकावया लीला सुरंग ॥ श्रवण वाट पाहती ॥८५॥
यावरी सूत वक्ता निपुण ॥ रावणमातेसी कैकसी अभिधान ॥ ती नित्य लिंगपूजनाविण जाण ॥ उदक प्राशन न करीच ॥८६॥
पंचधान्यांचें पिष्ट करून ॥ लिंग करी कामना धरून ॥ व्हावें रावणाचें कल्याण ॥ जय संपूर्ण प्राप्त व्हावा ॥८७॥
शक्रें तिचें लिंग नेऊन ॥ समुद्रीं टाकिलें द्वेषेंकरून ॥ त्यालागी रात्रंदिन ॥ रावणमाता अन्न न घे ॥८८॥
रावण म्हणें मातेलागून ॥ मी मुख्य आत्मलिंग आणितों जाऊन ॥ कैलासाप्रती द्विपंचवदन ॥ जाता झाला साक्षेपें ॥८९॥
तप आचरला दारुण ॥ जो चतु:षष्टिकलाप्रवीण ॥ जेणें वेदांची खंडे करून ॥ सारासार निवडिलें ॥९०॥
चतु:र्दशविद्यापारंगत ॥ शिवासी आवडे अत्यंत ॥ दशमुखें गायन अद्भुत ॥ केलें त्याणें स्वामीपुढें ॥९१॥
आपुलें शिर छेदूनि स्वहस्तें ॥ शिरांच्या तंती करूनि स्वरयुक्त ॥ दशमुख गात प्रेमभरित ॥ उमानाथ संतोषे जेणें ॥९२॥
राग उपराग भार्यासहित ॥ मूर्च्छना शरीर कंपित ॥ सप्तस्वर ताल संगीत ॥ शास्त्रप्रमाण गातसे ॥९३॥
गद्यपद्यरचना नाना कळा ॥ गीत प्रबंध अखंड नाममाळा ॥ गातां प्रीतीनें शिवलिला ॥ शंभु तोषला अद्भुत ॥९४॥
म्हणे प्रसन्न झालों दशमुखा ॥ इच्छित माग तुज प्रिय जें कां ॥ दशकद्वयनयन म्हणे कामांतका ॥ आत्मलिंग मज देई ॥९५॥
या त्रिभुवनांत जे सुंदर ॥ ऐसी ललना देई सुकुमार ॥ ऐकून संतोषला कर्पूरगौर ॥ भोळा उदारचक्रवर्ती ॥९६॥
कोटि चंद्रसूर्याची प्रभा पूर्ण ॥ ऐसें लिंग कांढिलें हृदयांतून ॥ कीं ब्रह्मानंदरस मुरोन ॥ दिव्य लिंग ओतिलें ॥९७॥
सहस्त्र बालसूर्य न पवती सरी ॥ ऐसी प्रभा पडली दशदिशांतरीं ॥ दिधलें रावणाचे करीं ॥ जें अतर्क्य ब्रह्मादिकां ॥९८॥
जें मुनिजनांचें ध्येय ध्यान ॥ जें सनकादिकांचें देवतार्चन ॥ वेद शास्त्र पुराण ॥ दिव्यलिंग वर्णिती ॥९९॥
जें त्रिगुणातीत परब्रह्म ॥ जें अर अजित अनाम ॥ सच्चिदानंद निर्वाणधाम ॥ योगी आराम पावती जेथें ॥१००॥
अनंत ब्रह्मांडे विचित्रें ॥ जेणें रचिलीं इच्छामात्रें ॥ ज्याकारणें भांडती वेदशास्त्रें ॥ तें दिव्य लिंग पुरातन ॥१॥
तें लिंग रावणे हातीं घेऊन ॥ म्हणे हे त्रिलोचन त्रिदोषशमन ॥ लावण्यसागरींचें निधान ॥ त्रिभुवनसुंदर ललना दे ॥२॥
जी अपर्णेची अपरप्रतिमा ॥ ऐसी देई मज सर्वोत्तमा ॥ सच्चिदानंद पूर्णब्रह्मा ॥ नामाअनामातीत तूं ॥३॥
शिव म्हणे इची प्रतिमा विशेष ॥ निर्मू न शके विधीश ॥ भोळा चक्रवतीं महेश ॥ म्हणे हेचि नेई अपर्णा तूं ॥४॥
रावणें अवश्य म्हणोनी ॥ स्कंधीं घेतली स्कंदजननी ॥ दिव्यलिंग हातीं घेऊनी ॥ लंकानाथ चालिला ॥५॥
दक्षिणपंथें जातां सत्वर ॥ गजबजिले सकळ सुरवर ॥ गजानन स्कंद वीरभद्र ॥ नंदिकेश्वर तळमळती ॥६॥
म्हणती हे सदाशिव त्रिनयन ॥ हें कैसें तुझें उदारपण ॥ भवानी बैसलासी देऊन ॥ पंचवदन हांसतसे ॥७॥
म्हणे तियेचा कैवारी वैकुंठनाथ ॥ तो धांवेल आतां स्नेहभरित ॥ इकडे भवानी स्तवन करीत ॥ हे पद्मजतांत धांव वेगीं ॥८॥
वारिजनयना इंदिरावरा ॥ निगमागमवंद्या सुहास्यवक्रा ॥ हे नीलपयोधरगात्रा ॥ धांव वेगीं सोडवी मज ॥९॥
हे मधुकैटभनरकमुरभंजना ॥ हे दशावतारधरा पीतवसना ॥ हे मदनांतकमानसरंजना ॥ जनार्दना जगद्गुरू ॥११०॥
हे कोटिमनोजतात श्रीधर ॥ असुरमर्दन परम उदार ॥ ऐसें स्तवन ऐकतां सर्वेश्वर ॥ विप्ररूपें आडवा आला ॥११॥
म्हणे धन्य धन्य द्विपंचवदना ॥ कोठें मिळविली ऐसी ललना ॥ दशमुख म्हणे हे अपर्णा ॥ सदाशिवें दिधली ॥१२॥
विप्र म्हणे खालीं उतरून ॥ न्याहाळूनि पाहें इचें वदन ॥ रावण पाहें तव ते कुलक्षण ॥ अत्यंत कुरूप देखिली ॥१३॥
भंवयांस आंठी अमंगळ पूर्ण ॥ वृद्ध गाल बैसले दंतहीन ॥ गदगदां विप्र हांसे देखून ॥ टाकोनि रावण चालिला ॥१४॥
मग रमाधवें तये स्थळीं ॥ स्थापिली माता भद्रकाळी ॥ इकडे असुर शिवाजवळी ॥ म्हणे स्त्री अमंगळ कैसी दिधली ॥१५॥
शिव म्हणे सत्य वचन ॥ ते तुज नाटोपे कौटाळीण ॥ अनंत ब्रह्मांडे दावून ॥ सवेंचि लपवील तत्वतां ॥१६॥
मग श्रीधरें आंगींची मळी काढून ॥ स्वहस्तें निर्मिली रूपसंपन्न ॥ मयासूराचे उदरीं जाण ॥ उत्पन्न झाली तेचि पै ॥१७॥
तिच्या स्वरूपाची प्रती ॥ नाहीं नाहीं त्रिजगतीं अंगीच्या सुवासें धांवती ॥ काद्रवेयचक्रें प्रीतीनें ॥१८॥
तिचें नाम मंदोदरी ॥ तिची प्रतीमा नाहीं उर्वीवरी ॥ विंशातिनेत्राचे चत्वरीं ॥ पट्टमहिषी पतिव्रता ॥१९॥
मयासुर करील कन्यादान ॥ वरी एक शक्ति देईल आंदण ॥ सप्तकोटी मंत्राचें गहन ॥ सामर्थ्य असे जियेमाजी ॥१२०॥
ते निर्वाण सांगातीण शक्ति ॥ तुज प्राप्त होईल लंकापती ॥ महाशत्रूवरी निर्वाणीं ती ॥ प्रेरावी त्वां सत्य पै ॥२१॥
ऐसें ऐकताचि रावण ॥ परतला लिंग घेऊन ॥ पूर्वस्थळासी आला जाण ॥ तों गजानन गाई राखी ॥२२॥
गजाननाचें स्तवन ॥ देव करिती कर जोडून ॥ म्हणती दिव्यलिंग सोडवून ॥ स्थापी अक्षयीं गणपती ॥२३॥
ऐसा देवीं प्रार्थिला एकदंत ॥ तंव रावणासी मूत्र लागलें बहुत ॥ पुढें पाऊल न घालवत ॥ चरफडीत मूत्रभरें ॥२४॥
भूमीवरी लिंग न ठेवावें ॥ ऐसें पूर्वी सांगीतलें उमाधवें ॥ हातीं घेऊनि लघुशंकेसी बैसावें ॥ हेही कर्म अनुचित ॥२५॥
तंव तो सिध्दिबुध्दींचा दाता ॥ विप्रवेषें गाई राखितां ॥ त्यासी लंकानाथ म्हणे तत्वतां ॥ लिंग हातीं धरीं हे ॥२६॥
विप्र म्हणे लंकापती ॥ माझ्या गाई रानोरानी पळती ॥ तुझ्या मुत्रशंकेसी वेळ किती ॥ लागेल हें न कळे मज ॥२७॥
रावण म्हणे न लगतां क्षण ॥ येतों मूत्रशंका करून ॥ विप्र म्हणे तीन वेळां बांहीन ॥ न येसी तरी लिंग टाकीन भूमीवरी ॥२८॥
अवश्य म्हणे लंकापती ॥ लिंग देत विप्राच्या हातीं ॥ दूर जाऊनि एकांतक्षितीं ॥ लघुशंकेस बैसला ॥२९॥
अगाध गजमुखाचें चरित्र ॥ जो साक्षात अवतरला इंदिरावर ॥ शिवउपासना करावया पवित्र ॥ जाहला पुत्र शंभूचा ॥१३०॥
असो रावणासी मूत्राचे पूर ॥ लोटले न सांवरती अनिवार ॥ एक घटिका लोटतां इभवक्र ॥ हांक फोडी गर्जोनी ॥३१॥
माझ्या गाई गेल्या दूरी ॥ हें आपलें लिंग घेईं करीं ॥ रावण न बोलेचि निर्धारीं ॥ हस्तसंकेतें थांब म्हणे ॥३२॥
दुसरी घटिका झाली पूर्ण ॥ हांक फोडी गजानन ॥ एवं घटिका झाल्या तीन ॥ कदापि रावण न उठेचि ॥३३॥
जैसें पाखंडियाचें कुमत ॥ न सरेचि वारितां पंडित ॥ तैसें रावणाचें मूत्र न सरे सत्य ॥ पुनः एकदंत हांक फोडी ॥३४॥
राक्षसा आपुलें लिंग सांभाळीं ॥ म्हणोनि ठेविलें भूमंडळीं ॥ अक्षय स्थापिलें कदाकाळीं ॥ ब्रह्मादिकां उपटेना ॥३५॥
पृथ्वीसहित अभंग ॥ एकचि झालें दिव्य लिंग ॥ रावण धांवें सवेग ॥ अशौच अपवित्र क्रोधभरें ॥३६॥
लिंग उपटितां डळमळी कुंभिनी ॥ महाबळें दशमुख पाहे उपटोनी ॥ परी न उपडे तयालागुनी ॥ अखंड अभंग जाहलें ॥३७॥
गुप्त जाहला गजानन ॥ गाई पृथ्वींत जाती लपोन ॥ रावणें एक गाईचा कर्ण ॥ धांवोनियां धरियेला ॥३८॥
तोही न उपडे तयालागून ॥ मग तेथेंचि केलें लिंगपूजन ॥ गोकर्णमहाबळेश्वर तेथून ॥ नाम जाण पडियेलें ॥३९॥
रावणमाता तेथें येऊन ॥ ते नित्य करी शिवपूजन ॥ आदिलिंग हें जाणोन ॥ करिती अर्चन सुरऋषी ॥१४०॥
रावण कुंभकर्ण बिभीषण ॥ तेथेंच करिती अनुष्ठान ॥ त्याच्या बळेंकरून ॥ देव जिंकिले रावणें ॥४१॥
मयासूर मंदोदरी आणि शक्ति ॥ देता झाला रावणाप्रती ॥ लक्ष पुत्र नातू गणती ॥ सवा लक्ष जयाचें ॥४२॥
इंद्रजिताऐसा पुत्र ॥ अष्टादशाक्षौहिणी वाद्यभार ॥ जेथींच्या अनुष्ठानें अपार ॥ रावण पावला संपत्ती ॥४३॥
गौतम म्हणे राजोत्तमा ॥ ऐसा गोकर्णीचा थोर महिमा ॥ वर्णू न शके मघवा ब्रह्मा ॥ येणें आम्हां तेथूनि जाहलें ॥४४॥
मिथुलेश्वराच्या यागाकारणें ॥ आम्ही येत असतां त्वरेनें ॥ अद्भुत एक वर्तले तुजकारणें॥ कथा तेचि सांगतो ॥४५॥
एक वृक्ष न्यग्रोध विशाळ ॥ त्याखाली आम्ही बैसलों सकळ ॥ तों एक चांडाळीण अमंगळ ॥ अति अपवित्र देखिली ॥४६॥
सर्वरोगवेष्टित पूर्ण ॥ जन्मांध गलितकुष्ठ भरलें जाण ॥ किडे पडले सर्वांगी व्रण ॥ दुर्गंधी उठली चहूंकडे ॥४७॥
रक्तपिती भरोन ॥ हस्तपाद बोटें गेली झडोन ॥ परम कुश्चित कुलक्षणा ॥ कैचें अन्न उदक तियेतें ॥४८॥
दंतहीन कर्णहीन ॥ गर्भीच तियेचे गेले लोचन ॥ कर्ण नासिक झडोन ॥ किडे पडले बुचबुचित ॥४९॥
अंगींचें चर्म गेलें झडोन ॥ वस्त्र पडलें गळोन ॥ धुळींत लोळे चांडाळीण ॥ पाप पूर्वीचें भोगीत ॥१५०॥
तिचा मरणकाळ जवळी आला जाण ॥ वरतें पाहिलें आम्हीं विलोकून ॥ तों शिवें धाडिलें दिव्य विमान ॥ तियेलागीं न्यावया ॥५१॥
दशभुज पंचवदन ॥ शिवदूत बैसले चौघे जण ॥ कोटिसूर्यतेज विराजमान ॥ प्रभा शशिसमान एकाची ॥५२॥
कोणी अग्नितेजें विराजत ॥ भालचंद्र शोभिवंत ॥ दिव्य विमान लखलखित ॥ वाद्यें वाजती चतुर्विध ॥५३॥
अष्टनायिका नृत्य करिती ॥ किन्नर गंधर्व शिवलीला गाती ॥ गौतम म्हणे ऐकें नृपती ॥ मग तयांप्रती पूसिलें ॥५४॥
हें दिव्य विमान घेऊन ॥ कोणाचें करूं जातां उद्धरण ॥ ते म्हणत तिये चांडाळणीलागून ॥ शिवें आणूं पाठविलें निजपद ॥५५॥
मग म्यां तयांसी पुसिलें ॥ इणें पूर्वी काय तप केलें ॥ मग ते शिवदूत बोलिले ॥ पूर्वजन्मींचा वृत्तांत ॥५६॥
पूर्वी केकय नामा ब्राह्मण ॥ त्याची कन्या सुमित्रा जाण ॥ आपुल्या सौंदर्यगर्वेकरून ॥ कोणासही मानीना ॥५७॥
ही बाळपणीं विधवा झाली ॥ तारुण्यमदें स्वधर्म विसरली ॥ जारकर्म करूं लागली ॥ बापें शिकविल्या नायके ॥५८॥
तों हे जाहली गरोदर ॥ लोक निंदा करिती समग्र ॥ मग बापें केश धरूनि सत्वर ॥ बाहेर घातलें इयेसी ॥५९॥
मग ही हिंडतां देशांतर ॥ कोणी एक सभाग्य शुद्र ॥ त्याणें इतें स्त्री करून सत्वर ॥ समग्र द्रव्य ओपिलें ॥१६०॥
तेथें अपत्यें झालीं बहुत ॥ ही अत्यंत मद्यमांसी रत ॥ पुष्ट जाहली बहुत ॥ घूर्णित लोचन उघडीना ॥६१॥
शुद्र घेवोनि दासीदास ॥ गेला क्षेत्रीं कृषिकर्मास ॥ हे क्षुधिंत आठवूनि मांसास ॥ शस्त्र घेवोनि चालिली ॥६२॥
मद्यें माजली नुघडी लोचन ॥ हा बस्तचि आहे म्हणोन ॥ गोवत्साचे कंठी जाण ॥ पापिणी सुरी घालीतसे ॥६३॥
तें अट्टाहासें ओरडत ॥ गाई हंबरोनि अनर्थ करीत ॥ इणे कंठ छेदोनि गृहांत ॥ वत्स नेलें त्वरेनें ॥६४॥
डोळे उघडूनि पाहे पापिणी ॥ मग गोवत्स ओळखिलें ते क्षणीं ॥ तेव्हा तिणें शिव शिव उच्चारूनी ॥ म्हणे करणी न कळतां केली ॥६५॥
मग अर्धवत्समांस भक्षून ॥ उरलें टाकी बाहेर नेऊन ॥ लोकांत उठविलें पूर्ण ॥ गोवत्स मारिलें व्याघ्रानें ॥६६॥
त्यावरी ही काळें मृत्यु पावत ॥ तों येऊनियां यमदूत ॥ इयेसी नेलें मारीत ॥ जाचिती बहुत निर्दयपणें ॥६७॥
कुंभीपाकीं घालिती ॥ असिपत्रवनीं हिंडविती ॥ तप्तभूमीवरी लोळविती ॥ स्तंभ कवटाळविती तप्त जे कां ॥६८॥
चित्रगुप्तासी पुसे सूर्यनंदन ॥ इचें कांही आहे कीं नाहीं पुण्य ॥ तो म्हणे शिवनाम उच्चारून ॥ गोवत्सवध इणें केला ॥६९॥
मग यमें दिधलें लोटून ॥ चांडाळयोनींत पावली जनन ॥ गर्भांध कुश्चल कुलक्षण ॥ विष्ठामूत्रें भरली सदा ॥१७०॥
श्वानाचें उच्छिष्ट भक्षी जाण ॥ तंव मायबापें गेलीं मरोन ॥ मग ही हातीं काठी घेऊन ॥ गांवोगांवीं हिंडतसे ॥७१॥
तों शिवरात्र पर्वकाळ लक्षून ॥ गोकर्णक्षेत्रापति संपूर्ण ॥ यात्रा चालिली घोष गहन ॥ नानाविध वाद्यांचा होतसे ॥७२॥
शिवनामाचा घोष अपार ॥ शिवभक्त करिती वारंवार ॥ त्यांच्या संगें ही दुराचार ॥ चांडाळीही चालिली ॥७३॥
गोकर्णक्षेत्रा गेली चांडाळी ॥ पडली भद्रकाळीच्या देवळाजवळी ॥ म्हणे मज अन्न द्यावें ये वेळीं ॥ बहुत पापिणी मी आहें ॥७४॥
हांका फोडीत हात पसरून ॥ तों प्रदक्षिणा करिती भक्तजन ॥ एकें बिल्वपत्र नेऊन ॥ तिचे हातीं घातलें ॥७५॥
तें त्रिदळ चांचपोन पाहत ॥ मुखीं घालावयाची नाहीं वस्त ॥ म्हणोनि रागें भिरकावीत ॥ तें पडत शिवलिंगावरी ॥७६॥
शिवरात्रीस उपोषण ॥ बिल्वदळे घडले शिवपूजन ॥ शिवभक्तांसवें जागरण ॥ घडलें संपूर्ण चांडाळीस ॥७७॥
शिवनामें गर्जती जन ॥ हेही करीत तैसेंचि स्मरण ॥ ती ही वडाखालीं येऊन ॥ पडली आहे चांडाळी ॥७८॥
ऐसा तिचा पूर्ववृत्तांत ॥ गौतमें सांगितला समस्त ॥ मग ती दिव्य देह पावोनि बैसत ॥ शिवविमानीं तेधवां ॥७९॥
आपुलें पूर्वकर्म आठवून ॥ करूं लागली शिवस्मरण ॥ मग शिवगणीं नेऊन ॥ शिवपदीं स्थापिली ॥१८०॥
गौतम म्हणे ऐक राया सादर ॥ तूं गोकर्णाप्रति जाई सत्वर ॥ शिवरात्रीस पार्वतीपरमेश्वर ॥ त्रिदळेंकरूनि अचीं कां ॥८१॥
ऐसें बोलोनि गौतम मुनी ॥ गेला जनकाच्या यागालागुनी ॥ कल्माषपाद तेच क्षणीं ॥ गोकर्णक्षेत्रीं पातला ॥८२॥
शिवरात्रीस दिव्य लिंग ॥ मित्रसहरायें पूजिलें सांग ॥ अंतरी सप्रेम अनुराग ॥ उमारंग संतोषला ॥८३॥
ब्रह्महत्येचें पातक विशेष ॥ जाऊनि राव झाला निर्दोष ॥ तों कैलासाहूनि आदिपुरुष ॥ पाठवीत दिव्य विमान ॥८४॥
विमानीं बैसले शिवगण ॥ परम तेजस्वी दैदीप्यमान ॥ अनंत विजांचे रस पिळोन ॥ मूर्ती ओतिल्या वाटतें ॥८५॥
अनंत वाद्यें गर्जती एक वेळां ॥ तेणें रंगसुरंग दाटला ॥ दिव्यसुमनांच्या माळा ॥ वर्षती वरूनि वृंदारक ॥८६॥
मित्रसह दिव्य देह पावोन ॥ झाला दशभुज पंचानन ॥ इंद्रचंद्रादिपदें ओलांडून ॥ नेला मिरवत शिवपदा ॥८७॥
सरूपता मुक्ति पावोन ॥ शिवरूपीं मिळाला आनंदघन ॥ धन्य शिवरात्रिव्रत पावन ॥ धन्य गोकर्ण शिवमंदिर ॥८८॥
गौतम ऋषि परम धन्य ॥ तेणें इतिहास सांगितला पावन ॥ धन्य श्रोते तुम्हीं सज्जन ॥ श्रवणीं सादर बैसलां ॥८९॥
मानससरोवरवेष्टित ॥ मराळ जैसे विराजीत ॥ कीं निधानाभोंवते समस्त ॥ साधक जैसे बैसती ॥१९०॥
तरी पंडित तुम्ही चतुर ॥ तुमचे अवधान दिव्यालंकार ॥ देवोनि गौरवा श्रीधर ॥ ब्रह्मानंदेकरूनियां ॥९१॥
श्रीमद्भीमातटविलासा ॥ ब्रह्मानंदा आदिपुरुषा ॥ श्रीधरवरदा कैलासविलासा ॥ कथारस वदवीं पुढें ॥९२॥
श्रीशिवलीलामृत ग्रंथ प्रचंड ॥ स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ॥ परिसोत सज्ज्न अखंड ॥ तृतियाध्याय गोड हा ॥१९३॥
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥
श्री शिवलीलामृत अध्याय चौथा
श्रीगणेशाय नमः ॥
धराधरेंद्रनंदिनीमानससरोवर ॥ मराळ उदार कर्पूरगौर ॥ अगम्य गुण अपार ॥ तुझे वर्णिती सर्वदा ॥१॥
न कळे जयाचें मूळ मध्य अवसान ॥ आपणचि सर्वकर्ता कारण ॥ कोठें प्रगटेल ज्यांचें आगमन ॥ ठाई न पडे ब्रह्मादिकां ॥२॥
जाणोनि भक्तांचे मानस ॥ तेथेंचि प्रगटे जगन्निवास ॥ येचविषयीं सूतें इतिहास ॥ शौनकादिकांप्रति सांगितला ॥३॥
किरातदेशींचा राजा विमर्शन ॥ परम प्रतापी शत्रुभंजन ॥ मृगया करीत हिंसक दारूण ॥ मद्यमांसी रत सदा ॥४॥
चतुवर्णाच्या स्त्रिया भोगीत ॥ निर्दय अधमेंचि वर्तत ॥ परी शिवभजनीं असे रत ॥ विधीनें पूजित नित्य शिवासी ॥५॥
त्याचे स्त्रियेचें नाम कुमुद्वती ॥ परम चतुर गुणवती ॥ पतीप्रति पुसे एकांतीं ॥ कापट्यरीती टाकोनियां ॥६
म्हणे शिवव्रत आचरतां बहुवस ॥ शिवरात्रि सोमवार प्रदोष ॥ गीत नृत्य स्वयें करितां विशेष ॥ शिवलीलामृत वर्णितां ॥७॥
दोषही घडती तुम्हांपासून ॥ इकडे शिवभजनीं सावधान ॥ मग तो राजा विमर्शन ॥ वर्तमान सांगे पुरातन पैं ॥८॥
मी पूर्वी पंपानाम नगरीं ॥ सारमेय होतों सुंदरी ॥ तों माघ वद्य चतुर्दशी शिवरात्रीं ॥ शिवमंदिरासमोर आलों ॥९॥
शिवपूजा पाहिली समस्त ॥ द्वारीं उभे होते राजदूत ॥ तिंहीं दंड मारितां त्वरित ॥ सव्य पळत प्रदक्षिणा करीं ॥१०॥
आणीक आलों परतोनी ॥ बलिपिंड प्राप्त होईल म्हणोनी ॥ मागुती दाटावितां त्यांनी ॥ प्रदक्षिणा केल्या शिवसदना ॥११॥
मागुती बैसलों येऊन ॥ तंव तिंहीं क्रोधें मारिला बाण ॥ म्यां शिवलिंग पुढें लक्षून ॥ तेथेंचि प्राण सोडिला ॥१२॥
त्या पुण्यकर्मेकरून ॥ आतां राजदेह पावलों जाण ॥ परी श्वानाचे दुष्ट गुण ॥ नाना दोष आचरें ॥१३॥
कुमुद्वती म्हणे तुम्हांसी पूर्वज्ञान ॥ तरी मी कोण होतें सांगा मजलागून ॥ मग तो बोले विमर्शन ॥ कंपोती होतीस पूर्वी तूं ॥१४॥
मांस पिंड नेता मुखीं धरून ॥ पाठी लागला पक्षी श्येन ॥ शिवालयास प्रदक्षिणा तीन ॥ करून बैसलीस शिखरीं ॥१५॥
तूं श्रमलीस अत्यंत ॥ तुज श्येनपक्षी मारीत ॥ शिवसदनासमोर शरीर पडत ॥ ती राणी सत्य झालीसं तूं ॥१६॥
मग कुमुद्वती म्हणे रायास ॥ तूं त्रिकालज्ञानी पुण्यपुरुष ॥ तुम्ही आम्ही जाऊं कोण्या जन्मास ॥ सांगा समस्त वृत्तांत हा ॥१७॥
यावरी तो राव म्हणे ॥ ऐकें मृगनेत्रे इभगमने ॥ सिंधुदेशीचा नृप इंदुवदने ॥ होईन पुढिलिये जन्मीं मी ॥१८॥
तूं जयानामें राजकन्या होसी ॥ मजलागीं राजसे वरिसी ॥ तिसरे जन्मीं सौराष्ट्रराव नेमेंसी ॥ होईन सत्य गुणसरिते ॥१९॥
तूं कलिंगकन्या होऊन ॥ मज वरिसी सत्य जाण ॥ चौथे जन्मीं गांधारराव होईन ॥ तूं मागधकन्या होऊन वरिसी मज ॥२०॥
पांचवे जन्मी अवंतीराज ॥ दाशार्हकन्या तूं पावसी मज ॥ सहावे जन्मीं आनर्तपति सहज ॥ तूं ययातिकन्या गुणवती ॥२१॥
सातवे जन्मीं पांड्यराजा होईन ॥ तुं पद्मराजकन्या वसुमती पूर्ण ॥ तेथें मी बहुत ख्याती करून ॥ शत्रु दंडीन शिवप्रतापें ॥२२॥
महाधर्म वाढवीत ॥ जन्मोजन्मीं शिवभजन करीन ॥ मग त्या जन्मीं पुत्रास राज्य देऊन ॥ तपास जाईन महावना ॥२३॥
शरण रिघेन अगस्तीस ॥ शैवदीक्षा घेऊनि निर्दोष ॥ शुभवदने तुजसमवेत कैलास ॥ पद पावेन निर्धारें ॥२४॥
सूत म्हणे शौनकादिकांप्रती ॥ तितुकेही जन्म घेवोनि तो भूपती ॥ ब्रह्मवेत्ता होऊनि अंती ॥ अक्षय शिवपद पावला ॥२५॥
ऐसा शिवभजनाचा महिमा ॥ वर्णू न शके द्रुहिण सुत्रामा ॥ वेदशास्त्रांसी सीमा ॥ न कळे ज्याची वर्णावया ॥२६॥
ऐकूनि शिवगुणकीर्तन ॥ सद्गद न होय जयाचें मन ॥ अश्रुधारा नयन ॥ जयाचे कदा न वाहती ॥२७॥
धिक् त्याचें जिणें धिक्कर्म ॥ धिग्विद्या धिग्धर्म ॥ तो वांचोनि काय अधम ॥ दुरात्मा व्यर्थ संसारी ॥२८॥
ऐक शिवभजनाची थोरी ॥ उज्जयिनीनामें महानगरी ॥ राव चंद्रसेन राज्य करी ॥ न्यायनीतीकरूनियां ॥२९॥
ज्योतिर्लिंग महाकाळेश्वर ॥ त्याचे भजनीं रत नृपवर ॥ मित्र एक नाम मणिभद्र ॥ प्राणसखा रायाचा ॥३०॥
मित्र चतुर आणि पवित्र ॥ देशिक सर्वज्ञ दयासागर ॥ शिष्य भाविक आणि उदार ॥ पूर्वसुकृते प्राप्त होय ॥३१॥
गृहिणी सुंदर आणि पतिव्रता ॥ पुत्र भक्त आणि सभाग्यता ॥ व्युत्पन्न आणि सुरस वक्ता ॥ होय विशेष सुकृते ॥३२॥
दिव्य हिरा आणि परिस ॥ मुक्ताफळ सुढाळ सुरस ॥ पिता ज्ञानी गुरु तोचि विशेष ॥ हें अपूर्व त्रिभुवनीं ॥३३॥
ऐसा तो राव चंद्रसेन ॥ मित्र मणिभद्र अति सुजाण ॥ तेणें एक मणि दिधला आणोन ॥ चंडकिरण दुसरा ॥३४॥
अष्टधांतुंचा होतां स्पर्श ॥ होय चामीकर बावनकस ॥ सर्पव्याघ्रतस्करवास ॥ राष्ट्रांत नसे त्याकरितां ॥३५॥
त्या मण्याचें होतां दर्शन ॥ सर्व रोग जाती भस्म होऊन ॥ दुर्भिक्ष शोक अवर्षण ॥ दारिद्र्य नाहीं नगरांत ॥३६॥
तो कंठी बांधितां प्रकाशवंत ॥ राव दिसे जैसा पुरुहूत ॥ समरांगणी जय अद्भुत ॥ न ये अपयश कालत्रयीं ॥३७॥
जे करावया येती वैर ॥ ते आपणचि होती प्राणमित्र ॥ आयुरोग्य ऐश्वर्य अपार ॥ चढत चालिलें नृपाचें ॥३८॥
भूप तो सर्वगुणी वरिष्ठ ॥ कीं शिवभजनी गंगेचा लोट ॥ कीं विवेकभावरत्नांचा मुकुट ॥ समुद्र सुभट चातुर्याचा ॥३९॥
कीं वैराग्यसरोवरींचा मराळ ॥ कीं शांतिउद्यानींचा तपस्वी निर्मळ ॥ कीं ज्ञानामृताचा विशाळ ॥ कूपचि काय उचंबळला ॥४०॥
ऐश्वर्य वाढतां प्रबळ ॥ द्वेष करिती पृथ्वीचे भूपाळ ॥ मणि मागों पाठविती सकळ ॥ स्पर्धा बळें वाढविती ॥४१॥
बहुतांसि असह्य झालें ॥ अवनीचे भूभुज एकवटले ॥ अपार दळ घेवोनि आले ॥ वेढिलें नगर रायाचें ॥॥४२॥
इंदिरावर कमलदलनयन ॥ त्याचे कंठी कौस्तुभ जाण ॥ कीं मूडानीवरमौळी रोहिणीरमण ॥ प्रकाशघन मणी तैसा ॥४३॥
तो मणी आम्हांसि दे त्वरित ॥ म्हणोनि नृपांनीं पाठविले दूत ॥ मग राव विचारी मनांत ॥ कैसा अनर्थ ओढवला ॥४४॥
थोर वस्तूंचे संग्रहण ॥ तेंचि अनर्थासि कारण ॥ ज्याकारणें जें भूषण ॥ तेंचि विदूषणरूप होय ॥४५॥
अतिरूप अतिधन ॥ अतिविद्या अतिप्रीति पूर्ण ॥ अतिभोग अतिभूषण ॥ विघ्नासि कारण तेंचि होय ॥४६॥
बोले राव चंद्रसेन ॥ मणी जरी द्यावा यांलागून ॥ तरी जाईल क्षात्रपण ॥ युद्ध दारुण न करवे ॥४७॥
आतां स्वामी महाकाळेश्वर ॥ करुणासिंधु कर्पूरगौर ॥ जो दीनरक्षण जगदुद्धार ॥ वज्रपंजर भक्तांसी ॥४८॥
त्यासी शरण जाऊं ये अवसरीं ॥ जो भक्ताकाजकैवारी ॥ जो त्रिपुरांतक हिमनगकुमारी ॥ प्राणवल्लभ जगदात्मा ॥४९॥
पूजासामग्री सिद्ध करून ॥ शिवमंदिरीं बैसला जाऊन ॥ सकळ चिंता सोडून ॥ विधियुक्त पूजन आरंभिलें ॥५०॥
बाहेर सेना घेऊनि प्रधान ॥ युद्ध करिती शिव स्मरून ॥ महायंत्राचे नगरावरून ॥ मार होती अनिवार ॥५१॥
सर्व चिंता सोडूनि चंद्रसेन ॥ चंद्रचूड आराधी प्रीतीकरून ॥ करी श्रौतमिश्रित त्र्यंबकपूजन ॥ मानसध्यान यथाविधि ॥५२॥
बाहेर झुंजती पृथ्वीचे भूपाळ ॥ परी चिंतारहित भूपति प्रेमळ ॥ देवद्वारी वाद्यांचा कल्लोळ ॥ चतुर्विध वाद्यें वाजताती ॥५३॥
राव करीत महापूजन ॥ पौरजन विलोकिती मिळोन ॥ त्यांत एक गोपगृहिणी पतिहीन ॥ कुमार कडिये घेऊन पातली ॥५४॥
सहा वर्षाचा बाळ ॥ राजा करितां पूजा करितां पाहे सकळ ॥ निरखोनियां वाढवेळ ॥ गोपगृहिणी आली घरा ॥५५॥
कुमार कडेखालता उतरून ॥ आपण करी गृहींचे कारण ॥ शेजारी उद्वसतृणसदन ॥ बाळ जाऊन बैसला तेथें ॥५६॥
लिंगाकृति पाषाण पाहून ॥ मृतिकेची वेदिका करून ॥ दिव्य शिवप्रतिमा मांडून ॥ करी स्थापना प्रीतीनें ॥५७॥
कोणी दुजें नाहीं तेथ ॥ लघुपाषाण आणोनि त्वरित ॥ पद्मासनीं पूजा यथार्थ ॥ पाषाणचि वाहे प्रीतीनें ॥५८॥
राजपूजा मनांत आठवून ॥ पदार्थमात्राविषयीं वाहे पाषाण ॥ धूप दीप नैवेद्य पूर्ण ॥ तेणेंचिकरूनि करीतसे ॥५९॥
आर्द्रतृणपुष्प सुवासहीन ॥ तेंचि वाहे आवडीकरून ॥ नाहीं ठाउकें मंत्र ध्यान आसन ॥ प्रेमभावें पूजीतसे ॥६०॥
परिमळद्रव्यें कैंचीं जवळी ॥ शिवावरी मृत्तिका उधळी ॥ मृत्तिकाचि घेऊनि करकमळीं ॥ पुष्पांजुळी समर्पित ॥६१॥
एवं रायाऐसें केलें पूजन ॥ मग मानसपूजा कर जोडून ॥ ध्यान करी नेत्र झांकून ॥ शंकरी मन दृढ जडलें ॥६२॥
मातेंनें स्वयंपाक करून ॥ ये बा करीं पुत्रा भोजन ॥ बहुवेळां हांक फोडोन ॥ पाचारितां नेदी प्रत्युत्तर ॥६३॥
म्हणोनि बाहेर येवोनि पाहे ॥ तंव शून्यगृहीं बैसला आहे ॥ म्हणे अर्भका मांडिलें काये ॥ चाल भोजना झडकरी ॥६४॥
परी नेदी प्रत्युत्तर ॥ मातेनें क्रोधे करूनि सत्वर ॥ त्याचें लिंग आणि पूजा समग्र ॥ निरखुनियां झुगारिलीं ॥६५॥
चाल भोजना त्वरित ॥ म्हणोनि हस्तकीं धरूनि वोढीत ॥ बाळ नेत्र उघडोनि पाहत ॥ तंव शिवपूजा विदारिली ॥६६॥
अहा शिव शिव म्हणोन ॥ घेत वक्षः:स्थळ बडवून ॥ दुःखें पडला मूर्च्छा येऊन ॥ म्हणे प्राण देईन मी आतां ॥६७॥
गलिप्रदानें देऊन ॥ माता जाऊनि करी भोजन ॥ जीर्णवस्त्र पांघरून ॥ तृणसेजे पहुडली ॥६८॥
इकडे पूजा भंगली म्हणून ॥ बाळ रडे शिवनाम घेऊन ॥ तंव दयाळ उमारमण ॥ अद्भुत नवल पै केलें ॥६९॥
तृणगृह होतें जें जंर्जर ॥ झालें रत्नखचित शिवमंदिर ॥ हिर्यांचे स्तंभ वरी शिखर ॥ नानारत्नांचे कळस झळकती ॥७०॥
चारी द्वारें रत्नखचित ॥ मध्यें मणिमय दिव्यलिंग विराजित ॥ चंद्रप्रभेहूनि अमित ॥ प्रभा ज्योतिर्लिंगाची ॥७१॥
नेत्र उघडोनि बाळ पहात ॥ तंव राजोपचारें पूजा दिसत ॥ सिद्ध करोनि ठेविली समस्त ॥ बाळ नाचत ब्रह्मानंदें ॥७२॥
यथासांग महापूजन ॥ बाळें केलें प्रीतीकरोन ॥ षोडशोपचारें पूजा समर्पुन ॥ पुष्पांजुळी वाहतसे ॥७३॥
शिवनामावळी उच्चारीत ॥ बाळ कीर्तनरंगी नाचत ॥ शिव म्हणे माग त्वरित ॥ प्रसन्न झालों बाळका रे ॥७४॥
बाळक म्हणे ते वेळीं ॥ मम मातेनें तुझी पूजा भंगिली ॥ तो अन्याय पोटांत घालीं ॥ चंद्रमौळी अवश्य म्हणे ॥७५॥
मातेसि दर्शना आणितों येथ ॥ म्हणोनि गेला आपुले गृहांत ॥ तंव तें देखिलें रत्नखचित ॥ माता निद्रिस्त दिव्यमंचकीं ॥७६॥
पहिलें स्वरूप पालटून ॥ झाली ते नारी पद्मीण ॥ सर्वालंकारेंकरून शोभायमान पहुडली ॥७७॥
तीस बाळकें जागें करून ॥ म्हणे चाल घेई शिवदर्शन ॥ तंव ती पाहे चहूंकडे विलोकून ॥ अद्भुत करणी शिवाची ॥७८॥
हृदयीं धरूनि दृढ बाळ ॥ शिवालया आली तात्काळ ॥ म्हणे धन्य तूं शिव दयाळ ॥ धन्य बाळ भक्त हा ॥७९॥
गोपदारा गेली राजगृहा धांवून ॥ चंद्रसेना सांगे वर्तमान ॥ राव वेगें आला प्रीतीकरून ॥ धरी चरण बाळकाचे ॥८०॥
शंकराची अद्भुत करणी ॥ राव आश्चर्य करूनि पाहे नयनीं ॥ नागरिकजनांच्या श्रेणी ॥ धांवती बाळा पहावया ॥८१॥
दिगंतरीं गाजली हांक अहुत ॥ बाळकासी पावला उमानाथ ॥ अवंतीनगरा येती धांवत ॥ जन अपार पहावया ॥८२॥
चंद्रसेन रायाप्रती ॥ नृप अर्वनीचे सांगोनि पाठविती ॥ धन्य धन्य तुझी भक्ती ॥ गिरिजावर प्रसन्न तूतें ॥८३॥
आम्ही टाकूनि द्वेष दुर्वासना ॥ तुझ्या भेटीसी येऊं चंद्रसेना ॥ तो बाळ पाहूं नयना ॥ कैलासराणा प्रसन्न ज्यासी ॥८४॥
ऐसें ऐकतां चंद्रसेन ॥ प्रधानासमेत बाहेर येऊन ॥ सकळ रायांसी भेटून ॥ आला मिरवत घेऊनी ॥८५॥
अवंतीनगरींची रचना ॥ पाहतां आश्चर्य वाटे मना ॥ सप्तपुरींत श्रेष्ठ जाणा ॥ उज्जयिनी नाम तियेचें ॥८६॥
राजे सकळ कर जोडून ॥ शिवमंदिरापुढे घालिती लोटांगण ॥ त्या बाळकासी वंदून ॥ आश्चर्य करिती सर्वही ॥८७॥
म्हणती जैं शिव प्रसन्न ॥ तैं तृणकुटी होय सुवर्णसदन ॥ शत्रु ते पूर्ण मित्र होऊन ॥ वोळंगती सर्वस्वें ॥८८॥
गृहींच्या दासी सिद्धी होऊन ॥ न मागतां पुरविती इच्छिलें पूर्ण ॥ आंगणींचे वृक्ष कल्पतरु होऊन ॥ कल्पिलें फळ देती ते ॥८९॥
मुका होईल पंडित ॥ पांगुळ पवनापुढें धांवत ॥ जन्मांध रत्नें पारखीत ॥ मूढ अत्यंत होय वक्ता ॥९०॥
रंकभणंगा भाग्य परम ॥ तोचि होईल सार्वभौम ॥ न करितां सायास दुर्गम ॥ चिंतामणि येत हाता ॥९१॥
त्रिभुवनभरी कीर्ति होय ॥ राजे समग्र वंदिती पाय ॥ जेथें जेथें खणूं जाय ॥ तेथें तेथें निधाने सांपडता ॥९२॥
अभ्यास न करितां बहुवस ॥ सांपडे वेदांचा सारांश ॥ सकळ कळा येती हातास ॥ उमाविलास भेटे जेव्हां ॥९३॥
गोपिति म्हणें गोरक्षबाळा ॥ त्यासी गोवाहन प्रसन्न झाला ॥ गो विप्र प्रतिपाळीं स्नेहाळा ॥ धन्य नृपराज चंद्रसेन ॥९४॥
यात्रा दाटली बहुत ॥ सर्व राजे आश्चर्य करीत ॥ तों तेथें प्रगटला हनुमंत ॥ वायुसुत अंजनीप्रिय जो ॥९५॥
जो राघवचरणारविंदभ्रमर ॥ भूगर्भरत्नमानससंतापहर ॥ वृत्रारिशत्रुजनकनगर ॥ दहन मदनदमन जो ॥९६॥
द्रोणाचळौत्पाटण ॥ ऊर्मिलाजीवनप्राण रक्षण ॥ ध्वजस्तंभीं बैसोन ॥ पाळी तृतीयनंदन पृथेचा ॥९७॥
ऐसा प्रगटतां मारुती ॥ समस्त क्षोणीपाळ चरणीं लागती ॥ राघवप्रियकर बाळाप्रती ॥ हृदयीं धरूनि उपदेशी ॥९८॥
शिवपंचाक्षरी मंत्र ॥ उपदेशीत साक्षात रुद्र ॥ न्यास मातृका ध्यानप्रकार ॥ प्रदोष सोमवार व्रत सांगे ॥९९॥
हनुमंतें मस्तकीं ठेविला हात ॥ झाला चतुदर्शविद्यावंत ॥ चतुःषष्टिकळा आकळीत ॥ जैसा आमलक हस्तकीं ॥१००॥
त्याचें नाम श्रीकर ॥ ठेविता झाला वायुकुमर ॥ सकळ राव करिती जयजयकार ॥ पुष्पें सुरवर वर्षती ॥१॥
यावरी अंजनी हृदयाब्जमिलिंद ॥ श्रीकरास म्हणे तुजहो आनंद ॥ तुझे आठवे पिढीस नंद ॥ जन्मेल गोपराज गोकुळीं ॥२॥
त्याचा पुत्र पीतवसन ॥ होइल श्रीकृष्ण कंसदमन ॥ शिशुपालांतक कौरवमर्दन ॥ पांडवपाळक गोविंद ॥३॥
श्रीहरीच्या अनंत अवतारपंक्ती ॥ मागें झाल्या पुढेंही होती ॥ जेवीं जपमाळेचे मणी परतोनी येती ॥ अवतारस्थिती तैसीच ॥४॥
कीं संवत्सर मास तिथि वार ॥ तेच परतती वारंवार ॥ तैसा अवतार धरी श्रीधर ॥ श्रीकरासत्य जाण पां ॥५॥
ऐसें हरिकुळभूषण बोलून ॥ पावला तेथेंचि अंतर्धान ॥ सर्व भूभुज म्हणती धन्य धन्य ॥ सभाग्यपण श्रीकराचें ॥६॥
ज्याचा श्रीगुरु हनुमंत ॥ त्यासी काय न्यून पदार्थ ॥ श्रीकर चंद्रसेन नृपनाथ ॥ बोळवीत सर्व भूपांते ॥७॥
वस्त्रें भूषणें देऊनी ॥ बोळविले पावले स्वस्थानीं ॥ मग सोमवार प्रदोष प्रीतीकरूनी ॥ श्रीकर चंद्रसेन आचरती ॥८॥
शिवरात्रीउत्साह करिती ॥ याचकांचे आर्त पुरविती ॥ शिवलीलामृत श्रवण करिती ॥ अंती शिवपदाप्रती पावले ॥९॥
हा अध्याय करितां पठण ॥ संतति संपत्ति आयुष्यवर्धन ॥ शिवार्चनी रत ज्याचें मन ॥ विघ्नें भीति तयासी ॥११०॥
शिवलीलामृतग्रंथवासरमणी ॥ देखोनि विकासती सज्जनकमळिणी ॥ जीवशिव चक्रवाकें दोनी ॥ ऐक्या येती प्रीतीनें ॥११॥
निंदक दुर्जन अभक्त ॥ ते अंधारी लपती दिवांभात ॥ शिवनिंदकांसी वैकुंठनाथ ॥ महानरकांत नेऊनि घाली ॥१२॥
विष्णुनिंदक जे अपवित्र ॥ त्यांसी कुंभीपाकीं घाली त्रिनेत्र ॥ एवं हरिहरनिंदकांसी सूर्यपुत्र ॥ नानाप्रकारें जाच करी ॥१३॥
ब्रह्मानंदा यतिवर्या ॥ श्रीभक्तकैलासाचळनिवासिया ॥ श्रीधरवरदा मृडानीप्रिया ॥ तुझी लीला वदवीं तूं ॥१४॥
शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड ॥ स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ॥ परिसोत सज्जन अखंड ॥ चतुर्थाध्याय गोड हा ॥११५॥
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥
श्री शिवलीलामृत अध्याय पाचवा
श्रीगणेशाय नमः ॥
सदाशिव अक्षरें चारी ॥ सदा उच्चारी ज्याची वैखरी ॥ जो नित्य शिवार्चन करी ॥ तो उद्धरी बहुतां जीवा ॥१॥
बहुत प्रायश्चित्तांचे निर्धार ॥ शास्त्रवक्ते करिती विचार ॥ परी जे शिवनामें शुद्ध साचार ॥ कासया इतर साधनें त्यां ॥२॥
नामाचा महिमा परमाद्गत ॥ त्यावरी प्रदोषव्रत आचरत ॥ त्यासी सर्वसिध्दि प्राप्त होत ॥ सत्य सत्य त्रिवाचा ॥३॥
तुष्टि पुष्टि धृति आयुष्यवर्धन ॥ संतति संपत्ति दिव्यज्ञान ॥ पाहिजे तिंहीं प्रदोषव्रत पूर्ण ॥ यथासांग करावें ॥४॥
प्रदोषव्रत भावें आचरितां ॥ या जन्मीं प्रचीत पहावी तत्वतां ॥ दारिद्र्य आणि महद्य्वथा ॥ निःशेष पळती षण्मासांत ॥५॥
एकसंवत्सरें होय ज्ञान ॥ द्वादशवर्षी महद्भाग्य पूर्ण ॥ हें जो असत्य मानील व्यासवचन ॥ त्यासी बंधन कल्पांतवरी ॥६॥
त्याचा गुरु लटिकाच जाण ॥ त्याची दांभिक भक्ति लटिकेंच ज्ञान ॥ उमावल्लभचरणीं ज्याचे मन ॥ त्याहुनि पावन कोणी नाहीं ॥७॥
मृत्यु गंडांतरे दारूण ॥ प्रदोषव्रतें जाती निरसोन ॥ येविषयीं इतिहास जाण ॥ सूत सांगे शौनकां ॥८॥
विदर्भदेशींचा भूभुज ॥ सत्यरथ नामें तेजःपुंज ॥ सर्वधर्मरत पराक्रमी सहज ॥ बंदीजन वर्णिती सदा ॥९॥
बहु दिवस राज्य करीत ॥ परी शिवभजनीं नाहीं रत ॥ त्यावरी शाल्वदेशींचा नृपनाथ ॥ बळें आला चालूनियां ॥१०॥
आणीक त्याचे आप्त ॥ क्षोणीपाल साह्य झाले बहुत ॥ सप्त दिवसपर्यंत ॥ युद्ध अद्भुत जाहलें ॥११॥
हा एकला ते बहुत ॥ समरभूमीसी सत्यरत ॥ धारातीर्थी पावला मृत्यु ॥ शत्रु नगरांत प्रवेशले ॥१२॥
राजपत्नी गरोदर राजस ॥ पूर्ण झाले नव मास ॥ एकलीच पायीं पळतां वनास ॥ थोर अनर्थ ओढवला ॥१३॥
परम सुकुमार लावण्यहरिणी ॥ कंटक सरांटे रूतती चरणीं ॥ मुर्च्छना येऊनि पडे धरणीं ॥ उठोनि पाहे मागें पुढें ॥१४॥
शत्रु धरितील अकस्मात ॥ म्हणोनि पुढती उठोनि पळत ॥ किंवा ते विद्युल्लता फिरत ॥ अवनीवरी वाटतसे ॥१५॥
वस्त्रें अलंकारमंडित ॥ हिर्याऐसे दंत झळकत ॥ जिचा मुखेंदु देखतां रतिकांत ॥ तन्मय होवोनि नृत्य करी ॥१६॥
पहा कर्माची गती गहन ॥ जिच्या अंगुष्ठी न पडे सूर्यकिरण ॥ ते गरोदर हिंडे विपिन ॥ मृगनेत्री गजगामिनी ॥१७॥
वनीं हिंडे महासती ॥ जेवीं नैषरायाची दमयंती ॥ कीं भिल्लीरूपें हैमवती ॥ दुस्तरवनी तैसी हिंडे ॥१८॥
कर्मनदीच्या प्रवाही जाण ॥ पडली तीस काढील कोण ॥ असो एका वृक्षाखाली येऊन ॥ परम व्याकुळ पडियेली ॥१९॥
शतांचीं शतें दासी ॥ ओळंगती सदैव जियेपासीं ॥ इंदुमती नाम जियेसी ॥ ते भूमीवरी लोळत ॥२०॥
चहुंकडे पाहे दीनवदनीं ॥ जिव्हा मुख वाळलें न मिळे पाणी ॥ तों प्रसूत झाली तोचि क्षणीं ॥ दिव्य पुत्र जन्मला ॥२१॥
तृषेनें तळमळी अत्यंत ॥ कोण उदक देईल तेथ ॥ बाळ टाकूनि उठत बसत ॥ गेली एका सरोवरा ॥२२॥
उदकांत प्रवेशली तेच क्षणीं ॥ अंजुळी भरूनि घेततें पाणी ॥ तंव ग्राहें नेली ओढोनि ॥ विदारूनी भक्षिली ॥२३॥
घोर कर्मांचें विंदान ॥ वनीं एकला रडे राजनंदन ॥ तंव उमानामक विप्रपत्नी जाण ॥ विगंतधवा पातली ॥२४॥
माता पिता बंधु पाहीं ॥ तियेलागीं कोणी नाहीं ॥ एका वर्षाचा पुत्र तीसही ॥ कडिये घेवोनि आली तेथें ॥२५॥
तों नाहीं केलें नालच्छेदन ॥ ऐसें बाळ उमा देखोन ॥ म्हणे आहा रे ऐसें पुत्ररत्न ॥ कोणीं टाकिलें दुस्तर वनीं ॥२६॥
म्हणे कोण याती कोण वर्ण ॥ मी कैसें नेऊं उचलून ॥ जावें जरी टाकून ॥ वृक व्याघ्र भक्षितील कीं ॥२७॥
स्तनी दाटूनी फुटला पान्हा ॥ नेत्रीं ढाळीत अश्रुजीवना ॥ बाळ पुढें घेऊनी ते ललना ॥ मुखकमळीं स्तन लावी ॥२८॥
संशयसमुद्रीं पडली वेल्हाळ ॥ म्हणे नेऊ कीं नको बाळ ॥ तंव तो कृपाळु पयःफेनधवल ॥ यतिरूप धरूनि पातला ॥२९॥
उमेलागीं म्हणे त्रिपुरारी ॥ बाळ नेई संशय न धरी ॥ महद्भाग्य तुझें सुंदरी ॥ क्षत्रियराजपुत्र तुज सांपडला ॥३०॥
कोणासी न सांगे हे मात ॥ समान पाळीं दोघे सुत ॥ भणंगासी परीस होय प्राप्त ॥ तैसें तु जाहलें ॥३१॥
अकस्मात निधी जोडत ॥ कीं चिंतामणि पुढें येऊनि पडत ॥ कीं मृताच्या मुखांत ॥ पडे अमृत पूर्वदत्तें ॥३२॥
ऐसें बोलोनि त्रिपुरारी ॥ गुप्त झाला ते अवसरीं ॥ मग दोघे पुत्र घेवोनि ते नारी ॥ देशग्रामांतरीं हिंडत ॥३३॥
ब्रह्मपुत्राचें नाम शुचिव्रत ॥ राजपुत्राचें नाम ठेविले धर्मगुप्त ॥ घरोघरी भिक्षा मागत ॥ कडिये खांदी घेऊनिंया ॥३४॥
लोक पुसतां उमा सांगत ॥ माझे पोटीचे दोघे सुत ॥ ऐसी हिंडत हिंडत ॥ एकचक्रनगरा पातली ॥३५॥
घरोघरी भिक्षा मागत ॥ तों शिवालय देखिलें अकस्मात ॥ आंत द्विज दाटले बहुत ॥ शांडिल्य त्यांत मुख्य ऋषि ॥३६॥
शिवाराधना करिती विधियुक्त ॥ तों उमा आली शिवालयांत ॥ क्षण एक पूजा विलोकीत ॥ तों शांडिल्य ऋषी बोलिला ॥३७॥
अहा कर्म कैसें गहन ॥ हा राजपुत्र हिंडे दीन होऊन ॥ कैसें विचित्र प्राक्तन ॥ उमा वचन ऐकती झाली ॥३८॥
ऋषीचे चरण उमा धरीत ॥ म्हणे याचा सांगा पूर्ववृत्तांत ॥ त्रिकालज्ञानी महासमर्थ ॥ भूतभविष्यज्ञान तुम्हां ॥३९॥
याचीं माता पिता कोण ॥ आहेत कीं पावलीं मरण ॥ यावरी शांडिल्य सांगे वर्तमान ॥ याचा पिता जाण सत्यरथ ॥४०॥
तो पूर्वी होता नृप जाण ॥ प्रदोषसमयीं करी शिवार्चन ॥ तों शत्रु आले चहूंकडोन ॥ नगर त्याचें वेढिलें ॥४१॥
शत्रूची गजबज ऐकून ॥ उठिला तैसीच पूजा सांडोन ॥ तंव प्रधान आला पुढें धांवोन ॥ शत्रु धरोनि आणिले ॥४२॥
त्यांचा शिरच्छेद करून ॥ पूजा पूर्ण न करितां उन्मत्तपणें ॥ तैसाच जाऊनि करी भोजन ॥ नाहीं स्मरण विषयांधा ॥४३॥
त्याकरितां या जन्मीं जाण ॥ सत्यरथ अल्पायुषी होऊन ॥ अल्पवयांत गेला मरोन ॥ म्हणोनि पूजन न सोडावें ॥४४॥
याच्या मातेनें सवत मारिली ॥ ती जळीं विवशी झाली ॥ पूर्ववैरें वोढोनि नेली ॥ क्रोधे भक्षिली विदारूनी ॥४५॥
हा राजपुत्र धर्मगुप्त ॥ यानें कांहीच केलें नाहीं शिवव्रत ॥ म्हणोनि मातापितारहित ॥ अरण्यांत पडियेला ॥४६॥
याकरितां प्रदोषकाळीं ॥ अव्यग्र पूजावा इंदुमौळी ॥ पूजन सांडुनि कदाकाळीं ॥ सर्वथाही न उठावें ॥४७॥
भवानीसी बैसवूनि कैलासनाथ ॥ प्रदोषकाळी पुढें नृत्य करीत ॥ वाग्देवी वीणा वाजवीत ॥ वेणु पुरुहूत वाजवीतसे ॥४८॥
अंबुजसंभवताल सांवरी ॥ भार्गवी गातसे मधुरस्वरीं ॥ मृदंग वाजवी मधुकैटभारी ॥ नृत्यगती पाहूनियां ॥४९॥
यक्षपति शिवप्राणमित्र ॥ हस्त जोडोनि उभा समोर ॥ यक्षगण गंधर्व किन्नर ॥ सुरासुर उभे असती ॥५०॥
ऐसा प्रदोषकाळींचा महिमा ॥ अगोचर निगमागमां ॥ मग काय बोले उमा ॥ मम पुत्र दरिद्री कां झाला ॥५१॥
तुझ्या पुत्रें प्रतिग्रह बहुत ॥ पूर्वी घेतले दुष्ट अमित ॥ दान केलें नाहीं किंचित ॥ शिवार्चन न करी कदा ॥५२॥
परान्नें जिव्हा दग्ध यथार्थ ॥ दुष्ट प्रतिग्रहें दग्ध हस्त ॥ स्त्रीअभिलाषें नेत्र दग्ध होत ॥ मंत्रासी सामर्थ्य मग कैचें ॥५३॥
मग उमेनें पुत्र दोन्ही ॥ घातले ऋषीचे चरणीं ॥ तेणें पंचाक्षर मंत्र उपदेशुनी ॥ प्रदोषव्रत उपदेशिलें ॥५४॥
पक्षप्रदोष शनिप्रदोष ॥ महिमा वर्णिला अतिविशेष ॥ निराहार असावें त्रयोदशीस ॥ दिवसा सत्कर्म आचरावें ॥५५॥
तीन घटिका झालिया रजनी ॥ प्रदोषपूजा आरंभावी प्रीतीकरूनी ॥ गोमयें भूमी सारवूनी ॥ दिव्यमंडप उभारिजे ॥५६॥
चित्रविचित्र वितान ॥ कर्दळीस्तंभ इक्षुदंडेकरून ॥ मंडप कीजे शोभायमान ॥ रंगमाळा नानापरी ॥५७॥
शुभ वस्त्र नेसावें आपण ॥ शुभ गंध सुवाससुमन ॥ मग शिवलिंग स्थापून ॥ पूजा करावी विधियुक्त ॥५८॥
प्राणायाम करून देखा ॥ अंतर्बाह्य न्यास मातृका ॥ दक्षिणभागीं पूजावें मुरांतका ॥ सव्यभागीं अग्नि तो ॥५९॥
वीरभद्र गजानन ॥ अष्टमहासिध्दि अष्टभैरव पूर्ण ॥ अष्टदिक्पालपूजन ॥ सप्तावरणीं शिवपूजा ॥६०॥
यथासांग शिवध्यान ॥ मग करावें पूजन ॥ राजोपचारें सर्व समर्पून ॥ करावें स्तवन शिवाचें ॥६१॥
जयजय गौरीनाथ निर्मळ ॥ जय जय कोटिचंद्र सुशीतळ ॥ सच्चिदानंदघन अढळ ॥ पूर्णब्रह्म सनातन ॥६२॥
ऐसें प्रदोषव्रत ऐकवून ॥ बाळ उपदेशिले दोघेजण ॥ मग ते एकमनेंकरून ॥ राहते झाले एकचक्रीं ॥६३॥
चार महिनेपर्यंत ॥ दोघेही आचरतीप्रदोषव्रत ॥ गुरुवचने यथार्थ ॥ शिवपूजन करिती पै ॥६४॥
शिवपूजा न द्यावी सर्वथा ॥ न द्यावे प्रसादतीर्था ॥ शतब्रह्महत्यांचें पाप माथां ॥ होय सांगता शांडिल्य ॥६५॥
सर्व पापांहूनि पाप थोर ॥ शिवपूजेचा अपहार ॥ असो ते दोघे किशोर ॥ सदा सादर ॥ शिवभजनीं ॥६६॥
ब्रह्मपुत्र शुचिव्रत ॥ एकला नदीतीरीं क्रीडत ॥ दरडी ढांसळतां अकस्मात ॥ द्रव्यघट सांपडला ॥६७॥
घरासी आला घेऊन ॥ माता संतोषली देखोन ॥ म्हणे प्रदोषव्रताचा महिमा जाण ॥ ऐश्वर्य चढत चालिलें ॥६८॥
राजपुत्रास म्हणे ते समयीं ॥ अर्ध द्रव्यविभाग घेई ॥ थेरू म्हणे सहसाही ॥ विभाग न घेई अग्रजा ॥६९॥
या अवनींतील धन ॥ आमुचेंचि आहे संपूर्ण ॥ असो ते दोघे शिवध्यान शिवस्मरण ॥ न विसरती कदाही ॥७०॥
यावरी एकदां दोघेजण ॥ गेले वनविहारालागून ॥ तों गंधर्वकन्या येऊन ॥ क्रीडतां दृष्टीं देखिल्या ॥७१॥
दोघेपाहती दुरूनी ॥ परम सुंदर लावण्यखाणी ॥ शुचिव्रत म्हणे राजपुत्रालागुनी ॥ परदारा नयनी न पहाव्या ॥७२॥
दर्शने हरती चित्त ॥ स्पर्शनें बळ वीर्य हरीत ॥ कौटिल्यदंभसयुक्त ॥ महाअनर्थकारिणी ॥७३॥
ब्रह्मसुतासी तेथें ठेऊन ॥ राजपुत्र चालिला सुलक्षण ॥ स्वरूप सुंदर मन्मथाहून ॥ आकर्णनयन कोमलांग ॥७४॥
जवळी येवोनि पाहात ॥ तंव मुख्य नायिका विराजित ॥ अंशुमती नामें विख्यात ॥ गंधर्वकन्या पद्मिनी ॥७५॥
कोद्रविणनामा गंधर्वपती ॥ त्याची कन्या अंशुमती ॥ पिता पुसे महेषाप्रती ॥ हे कन्या अर्पू कोणातें ॥७६॥
मग बोले हिमनगजामात ॥ धर्मगुप्त सत्यरथाचा सुत ॥ तो माझा परम भक्त ॥ त्यासी देई अंशुमती ॥७७॥
हे पूर्वीचें शिववचन ॥ असो यावरी अंशुमती पाहे दुरोन ॥ न्याहाळीत राजनंदन ॥ वाटे पंचबाण दुसरा ॥७८॥
क्षीरसिंधूंत रोहिणीरमण ॥ काय आला कलंक धुवोन ॥ तैसें राजपुत्राचें वदन ॥ अंशुमती न्याहाळी ॥७९॥
बत्तिसलक्षण संयुक्त ॥ अजानुबाहू चापशरमंडित ॥ विशाळ वक्षःस्थळ चालत ॥ करिनायक ॥ ज्यापरी ॥८०॥
ऐसा तो गुणाढ्य देखूनि त्वरित ॥ अंशुमती सखयांप्रति सांगत ॥ तुम्ही दुज्या वनाप्रति जाऊनि समस्त ॥ सुमनें आणावी सुवासें ॥८१॥
अवश्य म्हणोनि त्या ललना ॥ जात्या झाल्या आणिका वना ॥ अंशुमती एकली जाणा ॥ राजपुत्रा खुणावीत ॥८२॥
भूरुहपल्लव पसरून ॥ एकांती घातलें आसन ॥ वरी वृक्षडाहाळिया भेदून ॥ भूमीवरी पसरिल्या ॥८३॥
असो तेथें बैसला येऊन ॥ राजपुत्र सुहास्यवदन ॥ विशाळ भाळ आकर्णनयन ॥ आरक्त ओष्ठ सुकुमार ॥८४॥
मंजुळभाषिणी नेत्रकटाक्षबाणीं ॥ विंधिली ते लावण्यहरिणी ॥ मनोजमूर्च्छना सांवरूनी ॥ वर्तमान पुसे तयातें ॥८५॥
श्रुंगारसहोवरा तुजपासीं ॥ मी वास करीन राजहंसी ॥ देखतां तव वदन दिव्यशशी ॥ मम मानसचकोर नृत्य करी ॥८६॥
तव मुखाब्ज देखतां आनंद ॥ झेंपावती मम नेत्रमिलिंद ॥ कीं तव वचन गर्जता अंबुद ॥ मम चित्तशिखी नृत्य करी ॥८७॥
कविगुरूंहुनि तेज विशाळ ॥ आत्मकंठीची काढिली मुक्ताफळमाळ ॥ कंठी सूदली तत्काळ ॥ चरणीं भाळ ठेवीत ॥८८॥
म्हणे मी कायावाचामनेंकरून ॥ तुझी ललना झालें पूर्ण ॥ यावरी धर्मगुप्त वचन ॥ काय बोलता जाहला ॥८९॥
मी जनकजननीविरहित ॥ राज्यभ्रष्ठ दरिद्री अत्यंत ॥ तव पित्यासी कळतां मात ॥ घडे कैसें वरानने ॥९०॥
यावरी म्हणे अंशुमती ॥ तीन दिवसां येईन या स्थळाप्रती ॥ तुम्हीं यावें शीघ्रगती ॥ लग्नसिध्दि साधावया ॥९१॥
ऐसें बोलून ते चातुर्यराशी ॥ वेगें आली पितयापाशीं ॥ झालें वर्तमान सांगे त्यासी ॥ तो परम मानसी संतोषला ॥९२॥
राजपुत्र गेला परतोन ॥ बंधुप्रती सांगे सर्व वर्तमान ॥ शांडिल्यगुरूचें वचन स्मरून ॥ म्हणती प्रसाद पूर्ण त्याचा हा ॥९३॥
गुरुचरणीं ज्याचें मन ॥ त्यासी ऐश्वर्यासी काय न्यून ॥ काळमृत्युभयापासून ॥ सर्वदा रक्षी देशिक तो ॥९४॥
यावरी ते दोघे बंधु येऊन ॥ मातेसी सांगती वर्तमान ॥ येरी म्हणे धन्य धन्य शिवभजन ॥ फळ देते चालिलें ॥९५॥
यावरी तिसरे दिवशीं ॥ दोघेही गेले त्या वनासी ॥ गंधर्वराज सहपरिवारेंसी ॥ सर्व सामग्री घेऊनि आला ॥९६॥
दृष्टी देखतां जामात ॥ गंधर्व आनंदसमुद्रीं पोहत ॥ छत्र सेना सुखासन त्वरित ॥ धाडूनि उमा आणविली ॥९७॥
यावरी यथासांग लग्न ॥ चारी दिवस पूर्ण ॥ कोणी एक पदार्थ न्यून ॥ पडिला नाहीं तेधवां ॥९८॥
स्वर्गीच्या दिव्य वस्तु अमोलिक सतेज ॥ विहिणीस देत गंधर्वराज ॥ लक्ष रथ दहा सहस्त्र गज ॥ तेजःपुंज एक लक्ष वाजी ॥९९॥
एक लक्ष दास दासी ॥ अक्षय कोश रत्नराशी ॥ अक्षय भाते देत शक्तिसी ॥ दिव्य चाप बहुसाल ॥१००॥
अपार सेना संगे देत ॥ एक सेनापतिगंधर्व बळिवंत ॥ उमा दोघां पुत्रांसववेत ॥ मान देवोनि बोलविली ॥१॥
सुखासनारूढ अंशुमती ॥ पतीसवें चालली शीघ्रगती ॥ कनकवेत्रपाणी पुढें धांवती ॥ वाहनासवें जियेच्या ॥२॥
चतुर्विध वाद्यांचे गजर ॥ चतुरंग चालिला दळभार ॥ येऊनि वेढिलें विदर्भनगर ॥ सत्यरथ पितयांचें ॥३॥
नगरदुर्गावरूनि अपार ॥ उल्हाटयंत्राचा होत भडिगार ॥ परीगंधर्वाचें बळ फार ॥ घेतलें नगर क्षणार्धे ॥४॥
जेणें पूर्वी पिता मारिला जाण ॥ त्याचें नाम दुर्मर्षण ॥ तो जिताचि धरूनि जाण ॥ आपला करून सोडिला ॥५॥
देशोदेशींचे प्रजाजन ॥ धांवती करभार घेऊन ॥ उत्तम मुहूर्त पाहू ॥ सिंहासनारूढ जाहला ॥६॥
माता उमा बंधौ शुचिव्रत ॥ त्यांसमवेत राज्य करीत ॥ दहा सहस्त्र वर्षेपर्यंत ॥ यशवंत राज्य केलें ॥७॥
शांडिल्य गुरु आणून ॥ शतपद्म अर्पिलें धन ॥ रत्नाभिषेक करून ॥ अलंकार वस्त्रे दीधलीं ॥८॥
दुर्भिक्ष जळशोष अवर्षण ॥ आधि व्याधि वैवध्य मरण ॥ दुःख शोक कलह विघ्न ॥ राज्यांतूनि पळालीं ॥९॥
प्रजा भूदेव दायाद ॥ देती रायासी आशिर्वाद ॥ कोणासही नाहीं खेद ॥ सदा आनंद घरोघरी ॥१०॥
ऐसा अंशुमती समवेत ॥ धर्मगुप्त राज्य करीत ॥ यौवराज्य शुचिव्रतातें देत ॥ पारिपत्य सर्व करी ॥११॥
ऐसें दहा सहस्त्र वर्षे राज्य करून ॥ सुदत्तपुत्रासी राज्य देऊन ॥ चिंतितां मनीं उमाधवचरण ॥ दिव्य विमान धाडिलें ॥१२॥
दिव्य देह पावोनि नृपती ॥ माताबंधुसमवेत अंशुमती ॥ शिवाविमानीं बैसती ॥ करीत स्तुति शिवाची ॥१३॥
कैलासपदासी जाऊन ॥ जगदात्मा शिव विलोकून ॥ जयजयकार करून ॥ लोटांगणे घालिती ॥१४॥
दीनबंधु जगन्नाथ ॥ पतितपावन कृपावंत ॥ हृदयीं धरूनी समस्त ॥ अक्षयपदीं स्थापिलीं ॥१५॥
हें धर्मगुप्तांचें आख्यान ॥ करिती श्रवण पठण ॥ लेखन रक्षण अनुमोदन ॥ तरी पंचवदन रक्षी तयां ॥१६॥
सकळ पापां होय क्षय ॥ जेथें जाय तेथें विजय ॥ धनधान्यवृध्दि होय ॥ ऋण जाय निरसुनी ॥१७॥
प्रदोषमहिमा अद्भुत ॥ जे आचरती ऐकूनि ग्रंथ ॥ तेथें कैचें दारिद्र मृत्य ॥ सत्यसत्य त्रिवाचा ॥१८॥
ज्याच्या घरीं शिवलीलामृत ग्रंथ ॥ त्याची शिव पाठी राखीत ॥ सदा हिंडे उमाकांत ॥ अंती शिवपद प्राप्त तया ॥१९॥
हा ग्रंथ आम्रवृक्ष सुरस ॥ पद्मरचनाफळें आलीं पाडास ॥ कुतर्कवादी जे वायस ॥ मुखरोग त्यांस नावडे ॥१२०॥
जयजय ब्रह्मानंदा विरूपक्षा ॥ श्रीधरवरद सर्वसाक्षा ॥ दुष्टकर्ममोचका कर्माध्यक्षा ॥ न येसी लक्षा निगमागमा ॥२१॥
शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड ॥ स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ॥ परिसोत सज्जन अखंड ॥ पंचमोध्याय गोड हा ॥१२२॥
इति पंचमोऽध्यायः ॥५॥
॥श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥
श्री शिवलीलामृत अध्याय सहावा
श्रीगणेशाय नम: ॥
जय जय मदनांतक मनमोहना ॥ मदमत्सरकाननदहना ॥ हे भवभयपाशनिकृंतना भवानीरंजना भयहारका ॥१॥
हिमाद्रिजामाता गंगाधरा ॥ सिंधुरवदनजनका कर्पुरगौरा ॥ पद्मनाभमनरंजना त्रिपुरहरा ॥ त्रिदोषशमना त्रिभुवनेशा ॥२॥
नीलग्रीवा सुहास्यवदना ॥ नंदीवहना अंधकमदना ॥ गजांतका दक्षक्रतुदलना ॥ दानवदमना दयानिधे ॥३॥
अमितभक्तप्रियकरा ॥ ताटिकांतकपूज्य त्रितापहरा ॥ तुझे गुण वर्णावया दशशतवक्रा ॥ शक्ति नव्हेचि सर्वथा ॥४॥
नित्य शांत निर्विकल्प निरंजना ॥ आशा पाशमरहित विरक्त पूर्णा ॥ निजभक्तपाशविमोचना ॥ जन्ममरणमोचक जो ॥५॥
जे विषय कामनायुक्त ॥ तुज स्वामी अनन्य भजत ॥ त्यांसी पुरविसी विषयपदार्थ ॥ जे जे इच्छित सर्वही ॥६॥
सकामासी कामना पुरवुन ॥ तुं निजध्यानीं लाविसी मन ॥ ते परम विरक्त होऊन ॥ पद निर्वाण पावती ॥७॥
सोमवार शिवरात्री प्रदोष ॥ आचरतां तरले असंख्य स्त्रीपुरुष ॥ येचविषयीं कथा निर्दोष ॥ सूत सांगे शौनकादिकां ॥८॥
आर्यावर्त देश पवित्र ॥ तेथींचा चित्रवर्मा नाम नृपवर ॥ जैसे पुर्वी नल हरिश्चंद्र ॥ तैसा पुण्यशील प्रतापी ॥९॥
जैसा जनक रक्षी बाळ स्नेहाळ ॥ तैसा गोविप्रपाळक नृपाळ ॥ दुष्ट दुर्जन शत्रु खळ ॥ त्यांसी काळ दंडावया ॥१०॥
प्रयत्नाविषयीं जैसा भगीरथ ॥ बळास उपमिजे वायुसुत ॥ समगभूमीस भार्गव अजित ॥ विरोचनात्मज दानाविषयीं ॥११॥
शिव आणि श्रीधर ॥ त्यांच्या भक्तिसी तत्पर ॥ त्यास झाले बहुत पुत्र ॥ पितयातुल्य प्रतापी ॥१२॥
बहुत नवस करितां पचवदन ॥ एक कन्या झाली शुभानना ॥ सुलोचना नैषधअंगना ॥ उपमेस तिच्या न पुसती ॥१३॥
तारकारिजनकशत्रुप्रिया ॥ वृत्रारिशत्रुजनकजाया ॥ उपमा देतां द्विजराजभार्या ॥ बहुत वाटती हळुवट ॥१४॥
ते अपर प्रतिम भार्गवीची ॥ उपमा साजे हैमवतीची ॥ कीं द्रुहिणजाया पुत्री मित्राची ॥ उपमा साच द्यावी तीतें ॥१५॥
कलंकरहित रोहिणीधव ॥ तैसा मुखशशि अभिनव ॥ त्रैलोक्यसौदर्य गाळूनि सर्व ॥ ओतिली वाटे कमलोद्भवे ॥१६॥
तिच्या जन्मकाळीं द्विज सर्व ॥ जातक वर्णिती अभिनव ॥ चित्रवर्मा रायासी अपूर्व ॥ सुख वाटलें बहुतचि ॥१७॥
एक द्विज वोले सत्य वाणी ॥ ही होईल पृथ्वीची स्वामिणी ॥ दहा सहस्त्र वर्षे कामिनी ॥ राज्य करील अवनीचें ॥१८॥
ऐकतां तोषला राव बहुत ॥ द्विजांस धन वस्त्रें अलंकार देत ज्याणें जें मागीतलें ते उरवीत ॥ नाहीं नेदीं न म्हणेचि ॥१९॥
तिचें नाम सीमंतिनी ॥ सीमा स्वरुपाची झाली तेथूनी ॥ लावण्यगंगा चातुर्यखाणी ॥ शारदेऐसी जाणिजे ॥२०॥
राव संतोषें कोंदला बहुत ॥ तों अमृतांत विषबिंदु पडत ॥ तैसा एक पंडित ॥ भविष्यार्थ बोलिला ॥२१॥
चवदावे वर्षी सीमंतिनीसी ॥ वैधव्य येईल निश्चयेसी ॥ ऐसें ऐकतां राव मानसीं ॥ उद्विग्न बहुत जाहला ॥२२॥
वाटे वज्र पडिलें अंगावरी ॥ कीं सौदामिनी कोसळली शिरीं ॥ किंवा काळिजी घातली सुरी ॥ तैसें झालें रायासी ॥२३॥
पुढती बोले तो ब्राह्मण ॥ राया शिवदयेंकरून ॥ होईल सौभाग्यवर्धन ॥ सत्य सत्य त्रिवाचा ॥२४॥
विप्र सदना गेले सवेग ॥ रायासी लागला चिंतारोग ॥ तंव ती शुभांगी उद्वेग ॥ रहित उपवर जाहली ॥२५॥
सकळकळाप्रवीण ॥ चातुर्यखाणीचें दिव्य रत्न ॥ तिचें ऐकतां सुस्वर गायन ॥ धरिती मौन कोकिळा ॥२६॥
अंगीचा सुवास पाहून ॥ कस्तूरीमृग घेती रान ॥ पितयास आवडे प्राणांहून ॥ पाहतां नयन न धाती ॥२७॥
वदन पाहूनि रतिपति लज्जित ॥ कटि देखोनि हरि वदन न दाखवीत ॥ गमन देखोनि लपत ॥ मराळ मानससरोवरीं ॥२८॥
क्षण एक चाले गजगती ॥ देखोनि शंकला करिपती ॥ कुरळ केश देखोनि भ्रमरपंक्ति ॥ रुंजी घालिती सुवासा ॥२९॥
कमळ मृग मीन खंजन ॥ लज्जित देखोनि जिचे नयन ॥ वेणीची आकृती पाहून ॥ भुजंग विवरी दडाले ॥३०॥
या वृक्षावरूनि त्या वृक्षीं देख ॥ शुक पळती पाहतां नासिक ॥ बिंबफळें अति सुरेख ॥ लज्जित अधर देखतां ॥३१॥
पक्वदाडिंबबीज सुरंग बहुत ॥ त्यांस लाजविती जिचे दंत ॥ कुच देखोनि कमंडलु शंकित ॥ स्वरूप अद्भुत वर्णू किती ॥३२॥
तनुचा सुवास अत्यंत ॥ जाय दशयोजनपर्यत ॥ सूर्यप्रभासम कांति भासत ॥ शशिसम मनोरमा ॥३३॥
झाली असतां उपवर ॥ तिच्या पद्मिणीसख्या सुंदर ॥ किन्नरकन्या मनोहर ॥ गायन करिती तिजपासीं ॥३४॥
त्यांच्या मुखेकरोनी वार्ता ऐके सीमंतिनी ॥ चतुर्दशवर्षी आपणालागुनी ॥ वैधव्य कथिलें ऋषीनें ॥३५॥
परम संताप पावली ते समयीं ॥ याज्ञवल्क्याची स्त्री मैत्रयी ॥ तिचे पाय धरूनि लवलाहीं ॥ पुसे सद्गद होवोनियां ॥३६॥
सौभाग्यवर्धव्रत ॥ माये कोणतें सांग त्वरित ॥ कोणतें पूजूं दैवत ॥ कोणत्या गुरूसी शरण जाऊं ॥३७॥
सांगीतला सकळ वृत्तांत ॥ चवदावे वर्षी वैधव्य यथार्थ ॥ मग मैत्रयी बोलत ॥ धरीं व्रत सोमवार ॥३८॥
सांगे शिवमंत्र पंचाक्षरी ॥ तांत्रिक क्रिया सर्व श्रुत करी ॥ निशी झालिया पूजावा त्रिप्ररारी ॥ षोडशोपचारे सप्रेम ॥३९॥
म्हणे तुज दु:ख झालें जरी प्राप्त ॥ तरी न सोडीं हें व्रत ॥ ब्राह्मणभोजन दंपत्य बहुत ॥ पूजीं माये अत्यादरें ॥४०॥
पडिले दु:खाचे पर्वत ॥ तरी टाकूं नको हें व्रत ॥ उबग न धरीं मनांत ॥ बोल न ठेवीं व्रतातें ॥४१॥
त्यावरी नैषधराज नळ जाण ॥ त्याचा पुत्र इंद्रसेन ॥ त्याचा तनय चित्रानंद सुजाण ॥ केवळ मदन दूसरा ॥४२॥
चतुःषष्टिकळायुक्त । जैसा पितामह नळ विख्यात ॥ सर्वलक्षणी दिसे मंडित ॥ चित्रांगद तैसाचि ॥४३॥
कुंभिनी शोधिली समग्र ॥ परी त्याहूनि नाही सुंदर ॥ तो तीस योजिला वर ॥ राशी नक्षत्र पाहूनी ॥४४॥
इकडे सीमंतिनी आचरे व्रत ॥ सांगितल्याहूनि विशेष करीत ॥ आठ दिवसा अकरा शत ॥ दंपत्ये पूजीत वस्त्रालंकारे ॥४५॥
आणीकही ब्राह्मणभोजन ॥ आल्या अतिथा देत अन्न ॥ सांग करी शिवपूजन जागरण सोमनिशी ॥४६॥
पंचसूत्री शिवलिंग ॥ मणिमय शिवसदन सुरंग ॥ कोणी एक न्यून प्रसंग ॥ न घडे सीमंतिनीपासूनी ॥४७॥
शिवास अभिषेकिता पापसंहार ॥ शिवपूजने साम्राज्य अपार ॥ गंधाक्षता माला परिकर ॥ सौभाग्यवर्धन त्याकरिता ॥४८॥
शिवापुढे धूप जाळिता बहुवस ॥ तेणे आंग होय सुवास ॥ दीप चालविता वंश ॥ वर्धमान होय पै ॥४९॥
आणीकही दीपाचा गुण ॥ कांति विशेष आयुष्यवर्धन ॥ नैवेद्ये भाग्य पूर्ण ॥ वर्धमान लक्ष्मी होय ॥५०॥
तांबूलदाने यथार्थ ॥ सिद्ध चारी पुरुषार्थ ॥ नमस्कारे आरोग्य होत ॥ प्रदक्षिणे भ्रम नासे ॥५१॥
जपे साधे महासिद्धी ॥ होमहवने होय कोशवृद्धी ॥ कीर्तन करिता कृपानिधी ॥ सांगे ठाके पुढे उभा ॥५२॥
ध्याने होय महाज्ञान ॥ श्रवणे आधिव्याधिहरण ॥ नृत्य करिता जन्ममरण ॥ घूर्जटी दूर करीतसे ॥५३॥
तंतवितंत घन सुस्वर ॥ शिवप्रीत्यर्थ करिता वाद्य समग्र ॥ तेणे कंठ सुरस कीर्ति अपार ॥ रत्नदाने नेत्र दिव्य होती ॥५४॥
एवं सर्व अलंकार वाहता ॥ सर्वांठाई जयलाभ तत्त्वता ॥ ब्राह्मणभोजन करिता ॥ वर्णिले सर्व प्राप्त होय ॥५५॥
मैत्रेयीने पूर्वी व्रत ॥ सीमंतिनीसी सांगितले समस्त ॥ त्याहूनि ते विशेष आचरत ॥ शिव पूजित आदरे ॥५६॥
त्यावरी नैषधाचा पात्र ॥ चित्रांगदनामे गुणगंभीर ॥ त्यासी आणोनिया सादर ॥ सीमंतिनी दीधली ॥५७॥
चारी दिवसपर्यंत ॥ सोहळा झाला जो अद्भुत ॥ तो वर्णिता ग्रंथ यथार्थ ॥ पसरेल समुद्राऐसा ॥५८॥
सहस्त्र अर्बुदे धन जाणा ॥ राये दिधले वरदक्षिणा ॥ वस्त्रे अलंकार नवरत्ना ॥ गणना कोण न करवे ॥५९॥
अश्वशाळा गजशाळा ॥ रत्नखचित याने विशाळा ॥ चित्रशाळा नृत्यशाळा ॥ आंदण दिधले जामाता ॥६०॥
चारी दिवसपर्यंत ॥ चारी वर्ण केले तृप्त ॥ विप्रा दक्षिणा दिधली अपरिमित ॥ नेता द्विज कंटाळती ॥६१॥
आश्रमा धन नेता ब्राह्मण ॥ वाटेस टाकिती न नेववे म्हणून ॥ याचका मुखी हेचि वचन ॥ पुरे पुरे किती न्यावे ॥६२॥
रायाचा औदार्यकृशान ॥ दारिद्र्यरान टाकिले जाळून ॥ दुराशा दुष्कंटकवन ॥ दग्ध झाले मुळीहूनी ॥६३॥
धनमेघ वर्षता अपार ॥ दारिद्र्यधुरोळा बैसला समग्र ॥ याचकतृप्तितुणांकुर ॥ टवटवीत विरूढले ॥६४॥
असो नैषधपुरींचे जन ॥ पाहाती सीमंतिनीचे वदन ॥ इंदुकळा षोडश चिरून ॥ द्विज ओतिले बत्तीस ॥६५॥
कलंक काढूनि निःशेष ॥ द्विजसंधी भरल्या राजस ॥ मुखींचे निघता श्वासोच्छ्वास ॥ सुगंधराज तोचि वाटे ॥६६॥
जलजमुखी जलजकंठ ॥ जलजमाला तेज वरिष्ठ ॥ जलजनिंबपत्रे करूनि एकवट ॥ ओवाळुनी टाकिती शशिमुखा ॥६७॥
असो साडे झालिया पूर्ण ॥ नैषधदेशा गेला इंद्रसेन ॥ सकळ वर्हाडी अनुदिन ॥ सौंदर्य वर्णिती सीमंतिनीचे ॥६८॥
विजयादशमी दीपावळी लक्षून ॥ जामात राहविला मानेकरून ॥ कितीएक दिवस घेतला ठेवून ॥ चित्रवर्माराजेंद्रे ॥६९॥
जैसा श्रीरंग आणि इंदिरा ॥ तैसा जोडा दिसे साजिरा ॥ नाना उपचार वधूवरा ॥ समयोचित करी बहू ॥७०॥
कोणे एके दिवसी चित्रांगद ॥ सवे घेऊनि सेवकवृंद ॥ धुरंधर सेना अगाध ॥ जात मृगयेलागुनी ॥७१॥
वनी खेळता श्रमला फार ॥ धर्म आला तप्त शरीर ॥ जाणोनि नौका सुंदर ॥ यमुनाडोही घातली ॥७२॥
त्यात मुख्य सेवक घेऊन ॥ बैसला चित्रांगद गुणनिधान ॥ आवले आवलिती चहूंकडून ॥ कौतुके भाषण करिताती ॥७३॥
कृतांतभगिनीचे उदक ॥ कृष्णवर्ण भयानक ॥ त्या उदकाचा अंत सम्यक ॥ कधी कोणी न घेतला ॥७४॥
तो प्रभंजन सुटला अद्बुत ॥ नौका तेथे डळमळीत ॥ आवले आक्रोश बोलत ॥ नौका बुडाली म्हणोनिया ॥७५॥
भयभीत झाले समस्त ॥ नौका बुडाली अकस्मात ॥ एकचि वर्तला आकांत ॥ नाही अंत महाशब्दा ॥७६॥
तीरी सेना होती अपार ॥ तिच्या दुःखासि नाही पार ॥ चित्रांगदाचे पाठिराखे वीर ॥ आकांत करिती एकसरे ॥७७॥
सेवक धावती हाक फोडीत ॥ चित्रवर्म्यासी जाणविती मात ॥ राव वक्षःस्थळ बडवीत ॥ चरणी धावत यमुनातीरी ॥७८॥
शिविकेमाजी बैसोनी ॥ मातेसमवेत सीमंतिनी ॥ धावत आली तेच क्षणी ॥ पडती धरणी सर्वही ॥७९॥
दुःखार्णवी पडली एकसरी ॥ तेथे कोणासी कोण सावरी ॥ सीमंतिनी पडली अवनीवरी ॥ पिता सावरी तियेसी ॥ ॥८०॥
माता धावोनि उठाउठी ॥ कन्येच्या गळा घाली मिठी ॥ शोक करी तेणे सृष्टी ॥ आकांत एकचि वर्तला ॥८१॥
सीमंत्रिनीचा शोक ऐकोनी ॥ डळमळू लागली कुंभिनी ॥ मेदिनीवसनाचे पाणी ॥ तप्त झाले एकसरे ॥८२॥
पशु पक्षी वनचरे समस्त ॥ वृक्ष गुल्म लता पर्वत ॥ त्यांसही शोक अत्यंत ॥ सीमंतिनीसी पाहता ॥८३॥
शोके मूर्च्छना येऊनी ॥ निचेष्टित पडली सीमंतिनी ॥ तो इंद्रसेनासहित गृहिणी ॥ आली वार्ता ऐकोनिया ॥८४॥
अवघी झाली एकत्र ॥ दुःखार्णवाचा न लागे पार ॥ स्नुषेते देखोनि श्वशुर ॥ शोकाग्नीने कवळिला ॥८५॥
चित्रांगदाची माता पडली क्षिती ॥ तिचे नाम लावण्यवती ॥ सकळ स्त्रिया सावरिती ॥ नाही मिती शोकासी ॥८६॥
मृत्तिका घेवोनि हस्तकी ॥ लावण्यवती घाली मुखी ॥ म्हणे गहन पूर्वकर्म की ॥ शोक झाला यथार्थ ॥८७॥
माझा एकुलता एक बाळ ॥ चित्रांगद परम स्नेहाळ ॥ पूर्वपापाचे हे फळ ॥ कालिंदी काळ झाली आम्हा ॥८८॥
माझी अंधाची काठी पाही ॥ कोणे बुडविली यमुनाडोही ॥ मज अनाथाची गाठी पाही ॥ कोणे सोडिली निर्दये ॥८९॥
माझा दावा गे राजहंस ॥ कोणे नेले गे माझे पाडस ॥ माझा चित्रांगद डोळस ॥ कोणे चोरून नेला गे ॥९०॥
म्हणे म्या पूर्वी काय केले ॥ प्रदोषव्रत मध्येच टाकिले ॥ की शिवरात्रीस अन्न घेतले ॥ की व्रतमोडिले सोमवार ॥९१॥
की रमाधव उमाधव ॥ यात केला भेदभाव ॥ की हरिहरकीर्तनगौरव ॥ कथारंग उच्छेदिला ॥९२॥
की पंक्तिभेद केला निःशेष ॥ की संतमहंता लाविला दोष ॥ की परधनाचा अभिलाष ॥ केला पूर्वी म्या वाटे ॥९३॥
की दान देते म्हणवून ॥ ब्राह्मणासी चाळविले बहुत दिन ॥ की दाता देता दान ॥ केले विघ्न म्या पूर्वी ॥९४॥
कोणाच्या मुखींचा घास काढिला ॥ की गुरुद्रोह पूर्वी मज घडला ॥ की पात्री ब्राह्मण बैसला ॥ तो बाहेर घातला उठवूनी ॥९५॥
की कुरंगीपाडसा विघडविले ॥ की परिव्राजकाप्रति निंदिले ॥ तरी ऐसे निधान गेले ॥ त्याच दोषास्तव वाटे ॥९६॥
असो प्रधानवर्गी सावरूनी ॥ सहपरिवारे चित्रवर्मा सीमंतिनी ॥ स्वनगरासी नेवोनी ॥ निजसदनी राहविली ॥९७॥
इंद्रसेन लावण्यवती ॥ शोके संतप्त नगरा जाती ॥ तव दायाद येऊनि पापमती ॥ राज्य सर्व घेतले ॥९८॥
मग इंद्रसेन लावण्यवती ॥ देशांतरा पळोनि जाती ॥ तेथोनिही शत्रु धरून आणिती ॥ बंदी घालिती दृढ तेव्हा ॥९९॥
इकडे सीमंतिनी व्रत ॥ न सोडी अत्यादरे करीत ॥ एकादशशत दंपत्य ॥ पूजी संयुक्त विधीने ॥१००॥
सर्वही भोग वर्जूनि जाण ॥ यामिनीदिनी नित्य करी शिवस्मरण ॥ तीन वर्षे झाली पूर्ण ॥ यावरी वर्तमान ऐका पुढे ॥१॥
इकडे चित्रांगद यमुनेत बुडाला ॥ नागकन्यांनी पाताळी नेला ॥ नागभुवनीची पाहता लीला ॥ तटस्थ झाला राजपुत्र ॥२॥
दिव्य नारी देखिल्या नागिणी ॥ पद्मिनी हस्तिनी चित्रिणी ॥ शंखिनी अतिचतुर भामिनी ॥ सुवास अंगी ज्याचिया ॥३॥
ज्यांच्या पदनखी निरंतर ॥ गुंजारव करिती भ्रमर ॥ ज्यांचा देखता वदनचंद्र ॥ तपस्वीचकोर वेधले ॥४॥
नवरत्नांचे खडे ॥ पसरले तेथे चहुकडे ॥ स्वर्गसुखाहूनि आवडे ॥ पाताळभुवन पाहता ॥५॥
तक्षक नागराज प्रसिद्ध ॥ त्यापुढे उभा केला चित्रांगद ॥ साष्टांग नमीत सद्गद ॥ होवोनि स्तुति करीतसे ॥६॥
निर्भय तेथे राजसुत ॥ तक्षक वर्तमान पुसत ॥ जे जे वर्तले समस्त ॥ केले श्रुत चित्रांगदे ॥७॥
मागुती नागराज झाला बोलता ॥ तुम्ही कोण्या दैवतासी भजता ॥ यावरी शिवमहिमा तत्त्वता ॥ झाला वर्णिता चित्रांगद ॥८॥
प्रकृति पुरुष दोघेजणे ॥ निर्मिली इच्छामात्रे जेणे ॥ अनंत ब्रह्मांडे प्रीतीने ॥ रचियेली हेळामात्रे ॥९॥
इच्छा परतता जाण ॥ अनंत ब्रह्मांडे टाकी मोडून ॥ प्रकृतिपुरुषात होती लीन ॥ पंचभूते तत्त्वांसहित ॥११०॥
मग दोघे एकप्रीती ॥ आदिपुरुषांमाजी सामावती ॥ तो सदाशिव निश्चिती ॥ आम्ही भजतो तयाते ॥११॥
ज्याच्या मायेपासून ॥ झाले हे त्रिमूर्ति त्रिगुण ॥ त्या सत्त्वांशेकरून ॥ विष्णु जेणे निर्मिला ॥१२॥
रजांशे केले विरंचीस ॥ तमांशे रुद्र तामस ॥ तो शिव पुराणपुरुष ॥ आम्ही भजतो सर्वदा ॥१३॥
पाताळ अंतरिक्ष दशदिशा त्रिभुवन ॥ पंचतत्त्व सरिता मेदिनीवर्सन ॥ भस्म लोष्ट अष्टधातु व्यापून ॥ उरला तो शिव भजतो आम्ही ॥१४॥
अष्टादश वनस्पति सर्व बीजे ॥ आकारा आली सहजे ॥ व्यापिले जेणे कैलासराजे ॥ त्याचे उपासक आम्ही असो ॥१५॥
ज्याचे नेत्र सूर्य जाण ॥ रोहिणीवर ज्याचे मन ॥ रमारमण ज्याचे अंतःकरण ॥ बुद्धि द्रुहिण जयाची ॥१६॥
अहंकार ज्याचा रुद्र ॥ पाणी जयाचे पुरंदर ॥ कृतांत दाढा तीव्र ॥ विराटपुरुष सर्वही जो ॥१७॥
एवं जितुके देवताचक्र ॥ ते शिवाचे अवयव समग्र ॥ एकादश रुद्र द्वादश मित्र ॥ उभे त्यापुढे कर जोडूनी ॥१८॥
ऐसे ज्याचे गुण अपार ॥ मी काय वर्णू मानव पामर ॥ त्याच्या दासांचे दास किंकर ॥ आम्ही असो कश्यपात्मजा ॥१९॥
ऐसे वचन ऐकूनि सतेज ॥ परम संतोषला दंदशूकराज ॥ क्षेमालिंगन देऊनि कद्रुतनुज ॥ नाना कौतुके दाखवी तया ॥१२०॥
म्हणे देवास जे दुर्लभ वस्त ॥ ते येथे आहे समस्त ॥ तू मज आवडसी बहुत ॥ राहावे स्वस्थ मजपासी ॥२१॥
चित्रांगद म्हणे महाराजा ॥ शिवकर्णभूषणा सतेजा ॥ जननीजनकांसी वेध माझा ॥ एवढाच मी पोटी तयांच्या ॥२२॥
चौदा वर्षांची सीमंतिनी ॥ गुणनिधान लावण्यखाणी ॥ प्राण देईल ते नितंबीनी ॥ बोलता नयनी अश्रु आले ॥२३॥
मातापित्यांचे चरण ॥ खंती वाटते कधी पाहीन ॥ माझी माता मजविण कष्टी जाण ॥ नेत्री प्राण उरला असे ॥२४॥
तरी मज घालवी नेऊन ॥ म्हणोनि धरिले नागेंद्राचे चरण ॥ तक्षक होऊनि प्रसन्न ॥ देत अपार वस्तुते ॥२५॥
म्हणे द्वादशसहस्त्र नागांचे बळ ॥ दिधले तुज होईल सुफळ ॥ तैसाचि झाला तात्काळ ॥ चित्रांगद वीर तो ॥२६॥
तु करशील जेव्हा स्मरण तेव्हा तुज संकटी पावेन ॥ मनोवेग वारू आणून ॥ चिंतामणी सवे दीधला ॥२७॥
दुर्लभ रत्ने भूमंडळी ॥ देत अमूल्य तेजागळी ॥ पर्वताकार मोट बांधिली ॥ शिरी दिधली राक्षसाच्या ॥२८॥
देत दिव्य वस्त्रे अलंकार ॥ सवे एक दिधला फणिवर ॥ मनोवेगे यमुनातीर ॥ क्रमूनि बाहेर निघाला ॥२९॥
झाले तीन संवत्सर ॥ चहूकडे पाहे राजपुत्र ॥ तेच समयी सीमंतिनी स्नानासी सत्वर ॥ कालिंदीतीरा पातली ॥१३०॥
एकाकडे एक पाहती ॥ आश्चर्य वाटे ओळख न देती ॥ दिव्यरत्नमंडित नृपती ॥ चित्रांगद दिसतसे ॥३१॥
फणिमस्तकींची मुक्ते सतेज विशेष ॥ भुजेपर्यंत डोले अवतंस ॥ गजमुक्तांच्या माळा राजस ॥ गळा शोभती जयाच्या ॥३२॥
पाचा जडल्या कटिमेखलेवरी ॥ तेणे हिरवी झाली धरित्री ॥ मृग पशु धावती एकसरी ॥ नवे तृण वाढले म्हणूनिया ॥३३॥
मुक्ताफळे देखोनि तेजाळ ॥ धावतचि येती मराळ ॥ देखोनि आरक्त रत्नांचे ढाळ ॥ कीर धावती भक्षावया ॥३४॥
अंगी दिव्यचंदनसुगंध ॥ देखोनि धावती मिलिंद ॥ दशदिशा व्यापिल्या सुबद्ध ॥ घ्राणदेवता तृप्त होती ॥३५॥
विस्मित झाली सीमंतिनी ॥ भ्रमचक्री पडली विचार मनी ॥ चित्रांगदही तटस्थ होऊनी ॥ क्षणक्षणा न्याहाळीत ॥३६॥
कंठभूषणेरहित मंगळसूत्र ॥ हरिद्राकुंकुमविरहित वक्र ॥ अंजनविवर्जित नेत्र ॥ राजपुत्र पाहातसे ॥३७॥
न्याहाळिता तटस्थ स्वरूपासी ॥ वाटती रंभा उर्वशी दासी ॥ कुचकमंडलु यासी ॥ उपमा नाही द्यावया ॥३८॥
तप्तचामीकरवर्ण डोळस ॥ चिंत्राक्रांत अंग झाले कृश ॥ की चंद्रकळा राजस ॥ ग्रहणकाळी झाकोळती ॥३९॥
मग तियेपाशी येऊन ॥ पुसे साक्षेपे वर्तमान ॥ म्हणे तू आहेस कोणाची कोण ॥ मुळापासून सर्व सांग ॥१४०॥
मग आपुल्या जन्मापासून ॥ सांगितले चरित्र संपूर्ण बोलता आसुवे नयन ॥ भरूनिया चालिले ॥४१॥
अश्रुधारा स्रवती खालत्या ॥ लाविल्या पयोधरलिंगास गळत्या ॥ दंत जियेचे बोलता ॥ नक्षत्रांऐसे लखलखती ॥४२॥
सीमंतिनीच्या सख्या चतुर ॥ राजपुत्रा सांगती समाचार ॥ तीन वर्षे झाली इचा भ्रतार ॥ बुडाला येथे यमुनाजळी ॥४३॥
इची सासूश्वशुर दोनी ॥ शत्रूंनी घातली बंदिखानी ॥ हे शुभांगी लावण्यखाणी ॥ ऐसी गती इयेची ॥४४॥
कंठ दाटला सद्गदित ॥ चित्रांनद खाली पाहात ॥ आरक्तरेखांकित नेत्र ॥ वस्त्रे पुशीत वेळोवेळा ॥४५॥
सीमंतिनी सख्यांस सांगे खूण ॥ कोण कोठील पुसा वर्तमान ॥ सख्या पुसती वेळोवेळा ॥४६॥
तो म्हणे आम्ही सिद्ध पुरुष ॥ जातो चिंतिलिया ठायास ॥ क्षणे स्वर्ग क्षणे पाताळास गमन आमुचे त्रिलोकी ॥४७॥
कळते भूतभविष्यवर्तमान ॥ मग सीमंतिनीस हाती धरून ॥ कानी सांगे अमृतवचन ॥ भ्रतार तुझा जिवंत असे ॥४८॥
आजि तीन दिवसा भेटवीन ॥ लटिके नव्हे कदापि जाण ॥ श्रीसदाशिवाची आण ॥ असत्य नव्हे कल्पांती ॥४९॥
सौभाग्यगंगे चातुर्यविलासिनी ॥ तुझे ऐश्वर्य चढेल येथूनी ॥ परी ही गोष्ट कोणालागूनी ॥ दिवसत्रयप्रगटवू नको ॥१५०॥
ऐसे सांगोनि परमस्नेहे ॥ येरी चोरदृष्टी मुख पाहे ॥ म्हणे वाटते चित्रांगद होय ॥ ऐसे काय घडू शके ॥५१॥
मृत्यु पावला तो येईल कैसा ॥ मग आठवी भवानी महेशा ॥ करुणाकरा पुराणपुरुषा ॥ न कळे लीला अगम्य तुझी ॥५२॥
हा परपुरुष जरी असता ॥ तरी मज का हाती धरिता ॥ स्नेह उपजला माझिया चित्ता ॥ परम आप्त वाटतसे ॥५३॥
काय प्राशूनि आला अमृत ॥ की काळे गिळोनि उगाळिया सत्य ॥ हे मदनांतक षडास्यतात ॥ तुझे कर्तृत्व न कळे मज ॥५४॥
जगन्निवासा हे करशील सत्य ॥ तरी अकरा लक्ष पूजीन दंपत्य ॥ तितक्याच वाती यथार्थ ॥ बिल्वदळे अर्पीन ॥५५॥
यावरी बोले राजपुत्र ॥ सुकुमारे सदनासी जाई सत्वर ॥ तुझी सासू आणि श्वशुर ॥ त्यासी सांगू जातो आता ॥५६॥
तुमचा पुत्र येतो म्हणोन ॥ शुभ समाचार त्यास सांगेन ॥ येरी करूनि हास्यवदन ॥ निजसदनाप्रति गेली ॥५७॥
सख्या बोलती आण वाहून ॥ तुझा भ्रतार होय पूर्ण ॥ ऐसा पुरुष आहे कोण ॥ तुझा हात धरू शके ॥५८॥
तुझी वचने ऐकून ॥ त्याच्या नेत्री आले जीवन ॥ सीमंतिनी म्हणे वर्तमान ॥ फोडू नका गे उग्या रहा ॥५९॥
सीमंतीनीच्या मुखकमळी ॥ सौभाग्यकळा दिसू लागली ॥ सुखासनारूढ सदना केली ॥ कोठे काही न बोले ॥१६०॥
मनोवेगाच्या वारूवरी त्वरित ॥ आरूढला सीमंतिनीकांत ॥ निजनगराबाहेर उपवनात ॥ जाऊनिया उतरला ॥६१॥
नाग मनुष्यवेष धरून ॥ शत्रूंस सांगे वर्तमान ॥ द्वादशसहस्त्र नागांचे बळ घेऊन ॥ चित्रांगद आला असे ॥६२॥
तुम्ही कैसे वाचाल सत्य ॥ तव ते समस्त झाले भयभीत ॥ येरू म्हणे इंद्रसेन लावण्यवती यथार्थ ॥ सिंहासनी स्थापा वेगी ॥६३॥
मग नाग जाऊन ॥ मातापितयांसी सांगे वर्तमान ॥ त्यासी आनंद झाला पूर्ण ॥ त्रिभुवनत न समाये ॥६४॥
तो शत्रु होवोनि शरणागत ॥ उभयतांसी सिंहासनी स्थापीत ॥ दायाद कर जोडोनि समस्त ॥ म्हणती आम्हा रक्षा सर्वस्वे ॥६५॥
मग सर्व दळभार सिद्ध करून ॥ भेटीस निघाला इंद्रसेन ॥ वाद्यनादे संपूर्ण ॥ भूमंडळ डळमळी ॥६६॥
माता पिता देखोन ॥ सप्रेम धावे चित्रांगद सुजाण ॥ धरूनि पितयाचे चरण ॥ क्षेमालिंगनी मिसळला ॥६७॥
मग लावण्यवती धावत चित्रांगदाच्या गळा मिठी घालीत ॥ जैसा कौसल्येसी रघुनाथ ॥ चतुर्दशवर्षांनंतरे ॥६८॥
हारपले रत्न सापडले ॥ की जन्मांधासी नेत्र आले ॥ की प्राण जाता पडले ॥ मुखामाजी अमृत ॥६९॥
करभार घेऊनि अमूप ॥ धावती देशोदेशींचे भूप ॥ पौरजनांचे भार समीप ॥ येऊनिया भेटती ॥१७०॥
हनुमंते आणिला गिरिद्रोण ॥ जेवी उठविला ऊर्मिलारमण ॥ आनंदमय झाले त्रिभुवन ॥ तैसेचि पूर्ण पै झाले ॥७१॥
मातापितयांसमवेत ॥ चित्रांगद चालिला मिरवत ॥ नैषधपुर समस्त ॥ श्रृंगारिले तेधवा ॥७२॥
चित्रवर्म्यासी सांगावया समाचार ॥ धावताती सेवकभार ॥ महाद्वारी येता साचार ॥ मात फुटली चहूकडे ॥७३॥
चार जाऊनि रायास वंदित ॥ उठा जी तुमचे आले जामात ॥ राव गजबजिला धावत ॥ नयनी लोटत आनंदाश्रु ॥७४॥
कंठ झाला सद्गदित ॥ रोमांच अंगी उभे ठाकत ॥ समाचार आणिला त्यांसि आलिंगित ॥ धनवस्त्रे देत सीमेहूनि ॥७५॥
अपार भरूनि रथ ॥ शर्करा नगरा वाटीत ॥ मंगळतुरे अद्भुत ॥ वाजो लागली एकसरे ॥७६॥
घावले अपार भृसुर ॥ राये कोश दाविले समग्र ॥ आवडे तितुके धन न्यावे सत्वर ॥ सुखासी पार नाही माझ्या ॥७७॥
जय जय शिव उमानाथ ॥ म्हणोनि राव उडत नाचत ॥ उपायने घेऊनि धावत ॥ प्रजाजन नगरीचे ॥७८॥
सीमंतिनीसी बोलावून ॥ दिव्य अलंकार लेववून ॥ जयजयकार करून ॥ मंगळसूत्र बांधिले ॥७९॥
दिव्य कुंकुम नेत्री अंजन ॥ हरिद्रा सुमनहार चंदन ॥ सौभाग्य लेवविती जाण ॥ त्रयोदशगुणी विडे देती ॥१८०॥
एक श्रृंगार सावरिती ॥ एक पिकपात्र पुढे करिती ॥ नगरीच्या नारी धावती ॥ सीमंतिनीसी पाहावया ॥८१॥
माता धावती सद्गदित ॥ सीमंतिनीस ह्रदयी धरीत ॥ माये तुझा सौभाग्यसमुद्र ॥ असंभाव्य उचंबळला ॥८२॥
ऐश्वर्यद्रुम गेला तुटून ॥ पुढती विरूढला भेदीत गगन ॥ तुझी सौभाग्यगंगा भरून ॥ अक्षय चालिली उतरेना ॥८३॥
धन्य धन्य सोमवारव्रत ॥ अकरा लक्ष पूजिली दंपत्य ॥ जितवन करावयास जामात ॥ बोलावू धाडिले त्वरेने ॥८४॥
मातापितयासमवेत ॥ चित्रांगद नगरा येत ॥ चित्रवर्मा नृपति त्वरित ॥ सामोरा येत तयासी ॥८५॥
जामाताच्या कंठी ॥ धावोनि श्वशुरे घातली मिठी ॥ ब्रह्मानंदे भरली सृष्टी ॥ पुष्पवृष्टी करिती देव ॥८६॥
नगरामाजी आणिली मिरवत ॥ पुनःविवाह केला अद्भुत ॥ मग एकांती चित्रांगद नृपनाथ ॥ बोलावीत सीमंतिनीस ॥८७॥
पाताळींचे अलंकार अद्भुत ॥ सीमंतिनीलागी लेववीत ॥ नवरत्नप्रभा फाकली अमित ॥ पाहता तटस्थ नारी नर ॥८८॥
पातळींचा सुगंधराज निगुती ॥ आत्महस्ते लेववी सीमंतिनीप्रती ॥ नाना वस्तु अपूर्व क्षिती ॥ श्वशुरालागी दीधल्या ॥८९॥
सासूश्वशुरांच्या चरणी ॥ मस्तक ठेवी सीमंतिनी ॥ माये तुझा सौभाग्योदधि उचंबळोनी ॥ भरला असो बहुकाळ ॥१९०॥
पुत्रसीमंतिनीसहित ॥ इंद्रसेन नैषधपुरा जात ॥ अवनीचे राजे मिळोनि समस्त ॥ छत्र देत चित्रांगदा ॥९१॥
समस्त राज्यकारभार समर्पून ॥ तपासी गेला इंद्रसेन ॥ तेथे करूनिया शिवार्चन ॥ शिवपदासी पावला ॥९२॥
आठ पुत्र पितयासमान ॥ सीमंतिनीसी झाले जाण ॥ दहा सहस्त्र वर्षे निर्विघ्न ॥ राज्य केले नैषधपुरी ॥९३॥
जैसा पितामह नळराज ॥ परम पुण्यश्लोक तेजःपुंज ॥ तैसाच चित्रांगद भूभुज ॥ न्यायनीती वर्ततसे ॥९४॥
शिवरात्रि सोमवार प्रदोषव्रत ॥ सीमंतिनी चढते करीत ॥ तिची ख्याति अद्भुत ॥ सूत सांगे शौनकादिका ॥९५॥
सीमंतिनी आख्यन सुरस ॥ ऐकता सौभाग्यवर्धन स्त्रियांस ॥ अंतरला भ्रतार बहुत दिवस ॥ तो भेटेल परतोनि ॥९६॥
विगतधवा ऐकती ॥ त्या जन्मांतरी दिव्य भ्रतार पावती ॥ शिवचरणी धरावी प्रीती ॥ सोमवार व्रत न सोडावे ॥९७॥
ऐसे ऐकता आख्यान ॥ अंतरला पुत्र भेटेल मागुतेन ॥ आयुरारोग्य ऐश्वर्य पूर्ण ॥ होय ज्ञान विद्या बहु ॥९८॥
गंडांतरे मृत्यु निरसोनि जाय ॥ गतधन प्राप्त शत्रुपराजय ॥ श्रवणे पठणे सर्व कार्य ॥ पावे सिद्धी येणेचि ॥९९॥
सीमंतिनीआख्यान प्रयाग पूर्ण ॥ भक्तिमाघमासी करिता स्नान ॥ त्रिविध दोष जाती जळोन ॥ शिवपद प्राप्त शेवटी ॥२००॥
सीमंतिनीआख्यान सुधारस ॥ प्राशन करिती सज्जनत्रिदश ॥ निंदक असुर तामस ॥ अहंकारमद्य सेविती ॥१॥
अपर्णाह्रदयारविंदमिलिंद ॥ श्रीधरस्वामी पूर्ण ब्रह्मानंद ॥ अभंग अक्षय अभेद ॥ न चळे ढळे कदाही ॥२॥
श्रीशिवलीलामृत ग्रंथ प्रचंड ॥ स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ॥ परिसोत सज्जन अखंड ॥ षष्ठोध्याय गोड हा ॥२०३॥
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥
श्री शिवलीलामृत अध्याय सातवा
श्रीगणेशाय नमः ॥
जय जय किशोरचंद्रशेखरा ॥ उर्वीघरेंद्रनंदिनीवरा ॥ भुजंगभूषणा सप्तकरनेत्रा ॥ लीला विचित्रा तुझिया ॥१॥
भानुकोटितेज अपरिमिता ॥ विश्वव्यापका विश्वनाथा ॥ रमाधवप्रिया भूताधिपते अनंता ॥ अमूर्तमूर्ता विश्वपते ॥२॥
परमानंदा पंचवक्रा ॥ परात्परा पंचदशनेत्रा ॥ परमपावना पयःफेनगात्रा ॥ परममंगला परब्रह्मा ॥३॥
मंदस्मितवदन दयाळा ॥ षष्ठाध्यायी अतिनिर्मळा ॥ सीमंतिनीआख्यानलीळा ॥ स्नेहाळा तू वदलासी ॥४॥
श्रीधरमुख निमित्त करून ॥ तूचि वदलासी आपुले गुण ॥ व्यासरूपे सूतास स्थापून ॥ रसिक पुराण सांगविसी ॥५॥
ऐसे ऐकता दयाळ ॥ वदता झाला श्रीगोपाळ ॥ विदर्भनगरी एक सुशीळ ॥ वेदमित्र नामे द्विज होता ॥६॥
तो वेदशास्त्र संपन्न ॥ त्याचा मित्र सारस्वत नामे ब्राह्मण ॥ वेदमित्रास पुत्र सगुण ॥ सुमेधा नामे जाहला ॥७॥
सारस्वतसुत सोमवंत ॥ उभयतांचे मित्रत्व अत्यंत ॥ दशग्रंथी ज्ञान बहुत ॥ मुखोद्गत पुराणे ॥८॥
संहिता पद क्रम अरण ब्राह्मण ॥ छंद निघंट शिक्षा जाण ॥ ज्योतिष कल्प व्याकरण ॥ निरुक्त पूर्ण दशग्रंथी ॥९॥
ऐसा विद्याभ्यास करिता ॥ षोडश वर्षै झाली तत्त्वता ॥ दोघांचे पिते म्हणती आता ॥ भेटा नृपनाथ वैदर्भासी ॥१०॥
विद्या दावूनि अद्भुत ॥ मेळवावे द्रव्य बहुत ॥ मग वधू पाहूनि यथार्थ ॥ लग्ने करू तुमची ॥११॥
यावरी ते ऋषिपुत्र ॥ विदर्भरायासी भेटले सत्वर ॥ विद्याधनाचे भांडार ॥ उघडोनि दाविती नृपश्रेष्ठा ॥१२॥
विद्या पाहता तोषला राव ॥ परी विनोद मांडिला अभिनव ॥ म्हणे मी एक सांगेन भाव ॥ धरा तुम्ही दोघेही ॥१३॥
नैषधपुरीचा नृपनाथ ॥ त्याची पत्नी सीमंतिनी विख्यात ॥ मृत्युंजयमृडानीप्रीत्यर्थ ॥ दंपत्यपूजा करी बहू ॥१४॥
तरी तुम्ही एक पुरुष एक नितंबिनी ॥ होवोनि जावे ये क्षणी ॥ दिव्य अलंकार बहुत धनी ॥ पूजील तुम्हाकारणे ॥१५॥
तेथोनि यावे परतोन ॥ मग मीही देईन यथेष्ट धन ॥ मातापितागुरुनृपवचन ॥ कदा अमान्य करू नये ॥१६॥
तव बोलती दोघे किशोर ॥ हे अनुचित कर्म निंद्य फार ॥ पुरुषास स्त्री देखता साचार ॥ सचैल स्नान करावे ॥१७॥
पुरुषासी नारीवेष देखता ॥ पाहणार जाती अधःपाता ॥ वेष घेणारही तत्त्वता ॥ जन्मोजन्मी स्त्री होय ॥१८॥
हेही परत्री कर्म अनुचित ॥ तैसेचि शास्त्र बोलत ॥ त्याहीवरी आम्ही विद्यावंत ॥ धम अमित मेळवू ॥१९॥
आमुची विद्यालक्ष्मी सतेज ॥ तोषवू अवनीचे भूभुज ॥ आमुचे नमूनि चरणांबुज ॥ धन देती प्रार्थूनिया ॥२०॥
पंडितांची विद्या माय सद्गुणी ॥ विद्या अकाळी फळदायिनी ॥ विद्या कामधेनु सांडुनी ॥ निंद्य कर्म न करू कदा ॥२१॥
मातापित्यांहूनि विद्या आगळी ॥ संकटी प्रवासी प्रतिपाळी ॥ पृथ्वीचे प्रभु सकळी ॥ देखोन्या जोडिती कर ॥२२॥
विद्याहीन तो पाषाण देख ॥ जिताची मृत तो शतमूर्ख ॥ त्याचे न पाहावे मुख ॥ जननी व्यर्थ श्रमविली ॥२३॥
राव म्हणे दोघांलागुनी ॥ माझे मान्य करावे एवढे वचन ॥ परम संकट पडले म्हणून ॥ अवश्य म्हणती तेधवा ॥२४॥
राये वस्त्र अलंकार आणून ॥ एकासी स्त्रीवेष देऊन ॥ सोमवारी यामिनीमाजी जाण ॥ पूजासमयी पातले ॥२५॥
जे सकळ प्रमदांची ईश्वरी ॥ जिची प्रतिमा नाही कुंभिनीवरी ॥ जीस देखोनि नृत्य करी ॥ पंचशर प्रितीने ॥२६॥
रंभा उर्वशी चातुर्यखाणी ॥ परी लज्जा पावती जीस देखोनी ॥ रेणुका जानकी श्रीकृष्णभगिनी ॥ उपमा शोभे जियेसी ॥२७॥
तिणे हे दंपत्य देखोनी ॥ कृतिम पाहूनि हासे मनी ॥ परी भावार्थ धरूनि चातुर्यखाणी ॥ हरभवानी म्हणोनि पूजित ॥२८॥
अलंकार वस्त्रे यथेष्ट धन ॥ षड्रस अन्ने देत भोजन ॥ शिवगौरी म्हणोन ॥ नमस्कार करूनि बोळवी ॥२९॥
जाता ग्रामपंथ लक्षूनी ॥ पुढे भ्रतार मागे कामिनी ॥ नाना विकार चेष्टा भाषणी ॥ बहुत बोले तयासी ॥३०॥
म्हणे आहे हे एकांतवन ॥ वृक्ष लागले निबिड सघन ॥ मी कामानळेकरून ॥ गेले आहाळून प्राणपति ॥३१॥
तू वर्षोनि सुरतमेघ ॥ शीतळ करी ममांग ॥ मी नितंबिनी झाले अभंग ॥ जवळी पाहे येऊनिया ॥३२॥
तो म्हणे का चेष्टा करिसी विशेष ॥ फेडी वस्त्र होय पुरुष ॥ विनोद करिसी आसमास ॥ हासती लोक मार्गीचे ॥३३॥
तव ते कामे होवोनि मूर्च्छित ॥ मेदिनीवरी अंग टाकीत ॥ म्हणे प्राणनाथा धाव त्वरित ॥ करी शांत कामज्वराते ॥३४॥
तव तो परतोनि आला सवेग ॥ म्हणे हे नसते काय मांडिले सोंग ॥ तुम्ही आम्ही गुरुबंधू निःसंग ॥ ब्रह्मचारी विद्यार्थी ॥३५॥
येरी म्हणे बोलसी काये ॥ माझे अवयव चाचपोनि पाहे ॥ गेले पुरुषत्व लवलाहे ॥ भोगी येथे मज आता ॥३६॥
हाती धरूनि तयासी ॥ आडमार्गे नेले एकांतासी ॥ वृक्ष गेले गगनासी ॥ पल्लव भूमीसी पसरले ॥३७॥
साल तमाल देवदार ॥ आम्र कदंबादि तरुवर ॥ त्या वनी नेऊनि सत्वर ॥ म्हणे शंका सांडी सर्वही ॥३८॥
मी स्त्री तू भ्रतार निर्धार ॥ नाही येथे दुसरा विचार ॥ येरु म्हणे हे न घडे साचार ॥ तुम्ही आम्ही गुरुबंधू ॥३९॥
शास्त्र पढलासी सकळ ॥ त्याचे काय हेचि फळ ॥ परत्रसाधन सुकृत ॥ निर्मळ विचार करूनि पाहे पा ॥४०॥
आधीच स्त्री वरी तारुण्य ॥ परम निर्लज्ज एकांतवन ॥ मिठी घाली गळा धावून ॥ देत चुंबन बळेचि ॥४१॥
घेऊनिया त्याचा हात ॥ म्हणे पाहे हे पयोधर कमंडलुवत ॥ तव तो झिडकारूनि मागे सारीत ॥ नसता अनर्थ करू नको ॥४२॥
धन्य धन्य ते पुरुष जनी ॥ परयोषिता एकांतवनी ॥ सभाग्य सधन तरुणी ॥ प्रार्थिता मन चळेना ॥४३॥
वृत्तीस नव्हे विकार ॥ तरी तो नर केवळ शंकर ॥ त्यापासी तीर्थै समग्र ॥ येवोनि राहती सेवेसी ॥४४॥
जनरहित घोर वनी ॥ द्रव्यघट देखिला नयनी ॥ देखता जाय वोसंडोनी ॥ तरी तो शंकर निर्धारे ॥४५॥
सत्यवचनी सत्कर्मी रत ॥ निगमागमविद्या मुखोद्गत ॥ इतुके आसोनि गर्वरहित ॥ तरी तो शंकर निर्धारे ॥४६॥
आपणा देखता वर्म काढूनी ॥ निंदक विंधिती वाग्बाणी ॥ परी खेदरहित आनंद मनी ॥ तरी तो शंकर निर्धारे ॥४७॥
दुसरियाचे कूटदोष गुण ॥ देखे ऐके जरी अनुदित ॥ परी ते मुखास नाणी गेलिया प्राण ॥ तरी तो शंकर निर्धारे ॥४८॥
न दिसे स्त्रीपुरुषभान ॥ गुरुरूप पाहे चराचर संपूर्ण ॥ न सांगे आपुले सुकृत तप दान ॥ तरी तो शंकर निर्धारे ॥४९॥
पैल मूर्ख हा पंडित ॥ निवडू नेणे समान पाहत ॥ कीर्ति वाढवावी नावडे मनात ॥ तरी तो शंकर निर्धारे ॥५०॥
अभ्यासिले न मिरवी लोकात ॥ शिष्य करावे हा नाहीच हेत ॥ कोणाचा संग नावडे आवडे एकांत ॥ तरी तो शंकर निर्धारे ॥५१॥
विरोनि गेल्या चित्तवृत्ती ॥ समाधी अखंड गेली भ्रांती ॥ अर्थ बुडालिया नाही खंती ॥ तरी तो शंकर निर्धारे ॥५२॥
श्रीधर म्हणे ऐसे पुरुष ॥ ते ब्रह्मानंद परमहंस ॥ त्यांच्या पायींच्या पादुका निःशेष ॥ होऊनि राहावे सर्वदा ॥५३॥
वेदमित्रपुत्र साधु परम ॥ धैर्यशस्त्रे निवटोनि काम ॥ म्हणे ग्रामास चला जाऊ उत्तम ॥ विचार करू या गोष्टीचा ॥५४॥
ऐसे बोलोनि सारस्वतपुत्र ॥ स्त्रीरूपे सदना आणिला सत्वर ॥ श्रुत केला समाचार ॥ गतकतार्थ वर्तला जो ॥५५॥
सारस्वते मांडिला अनर्थ ॥ रायाजवळी आला वृक्षःस्थळ बडवीत ॥ म्हणे दुर्जना तुवा केला घात ॥ हत्या करीन तुजवरी ॥५६॥
वेदशास्त्रसंपन्न ॥ येवढाचि पुत्र मजलागुन ॥ अरे तुवा निर्वंश केला पूर्ण ॥ काळे वदन झाले तुझे ॥५७॥
विदर्भ अधोगतमुख पाहात ॥ म्हणे कृत्रिम केवी झाले सत्य ॥ शिवमाया परम अद्भुत ॥ अघटित कर्तृत्व तियेचे ॥५८॥
राये मिळवूनि सर्व ब्राह्मण ॥ म्हणे सतेज करा अनुष्ठान ॥ द्यावे यासि पुरुषत्व आणून ॥ तरीच धन्य होईन मी ॥५९॥
विप्र म्हणती हे ईश्वरी कळा ॥ आमुचेनि न पालटे भूपाळा ॥ तेव्हा विदर्भराव तये वेळा ॥ आराधिता झाला देवीते ॥६०॥
हवन मांडिले दुर्धर ॥ राव सप्तदिन निराहार ॥ देवी प्रसन्न झाली म्हणे माग वर ॥ मग बोले विदर्भ तो ॥६१॥
म्हणे हा सोमवंत स्त्रीवेष ॥ यासी पुनः करी पुरुष ॥ देवी म्हणे ही गोष्ट निःशेष ॥ न घडे सहसा कालत्रयी ॥६२॥
निःसीम पतिव्रता सीमंतिनी ॥ परम भक्त सद्गुणखाणी ॥ तिचे कर्तृत्व माझेनी ॥ न मोडवे सहसाही ॥६३॥
या सारस्वतासी दिव्य नंदन ॥ होईल सत्य वेदपरायण ॥ ईस सुमेधा वर जाण ॥ लग्न करूनि देईजे ॥६४॥
देवीच्या आज्ञेवरून ॥ त्यासीच दिधले लग्न करून ॥ अंबिकेचे वचने जाण ॥ पुत्र जाहला ॥ सारस्वता ॥६५॥
धन्य सीमंतिनीची शिवभक्ती ॥ उपमा नाही त्रिजगती ॥ जिचे कर्तृत्व हैमवंती ॥ मोडू न शके सर्वथा ॥६६॥
सूत म्हणे ऐका सावधान ॥ अवंतीनगरी एक ब्राह्मण ॥ अत्यंत विषयी नाम मदन ॥ श्रृंगारसुगंधमाल्यप्रिय ॥६७॥
पिंगलानामे वेश्या विख्यात ॥ तिसी झाला सदा रत ॥ सांडूनि ब्रह्मकर्म समस्त ॥ मातापिता त्यागिली ॥६८॥
धर्मपत्नी टाकूनि दुराचारी ॥ तिच्याच घरी वास करी ॥ मद्यमांसरत अहोरात्री ॥ कामकर्दमी लोळत ॥६९॥
करावया जगदुद्धार ॥ आपणचि अवतरला शंकर ॥ ऋषभनामे योगीश्वर ॥ होवोनि विचरत महीवरी ॥७०॥
आपुले जे जे निर्वाणभक्त ॥ त्यांची दुःखे संकटे निवारीत ॥ पिंगलेच्या सदना अकस्मात ॥ पूर्वपुण्यास्तव पातला ॥७१॥
तो शिवयोगींद्र दृष्टी देखोन ॥ दोघेहि धावती धरिती चरण ॥ षोडशोपचारेकरून ॥ सप्रेम होऊन पूजिती ॥७२॥
शुष्क सुपक्व स्निग्ध विदग्ध ॥ चतुर्विध अन्ने उत्तम स्वाद ॥ भोजन देऊनि बहुविध ॥ अलंकार वस्त्रे दीधली ॥७३॥
करूनिया दिव्य शेज ॥ निजविला तो शिवयोगीराज ॥ तळहाते मर्दिती दोघे चरणांबुज ॥ सुपर्णाग्रजउदय होय तो ॥७४॥
एक निशी क्रमोनि जाण ॥ शिवयोगी पावला अंतर्धान ॥ दोघे म्हणती उमारमण ॥ देऊनि दर्शन गेला आम्हा ॥७५॥
मग पिंगला आणि मदन ॥ कालांतरी पावली मरण ॥ परी गाठीस होते पूर्वपुण्य ॥ शिवयोगीपूजनाचे ॥७६॥
दाशार्हदेशीचा नृपती ॥ वज्रबाहूनामे विशेषकीर्ती ॥ त्याची पट्टराणी नामे सुमती ॥ जेवी दमयंती नळाची ॥७७॥
तो मदननामे ब्राह्मण ॥ तिच्या गर्भी राहिला जाऊन ॥ सीमंतिनीच्या पोटी कन्यारत्न ॥ पिंगला वेश्या जन्मली ॥७८॥
कीर्तिमालिनी तिचे नाव ॥ पुढे कथा ऐका अभिनव ॥ इकडे सुमतीचे पोटी भूदेव ॥ असता विचित्र वर्तले ॥७९॥
तिच्या सवती होत्या अपार ॥ ही पट्टराणी ईस होईल पुत्र ॥ त्याही तीस विष दुर्धर ॥ गर्भिणी असता घातले ॥८०॥
तीस तत्काळ व्हावा मृत्यु ॥ परी लोग लागला झाली प्रसूत ॥ विष अंगावरी फुटले बहुत ॥ बाळकासहित जननीच्या ॥८१॥
क्षते पडली झाले व्रण ॥ रक्त पू गळे रात्रंदिन ॥ राये बहुत वैद्य आणून ॥ औषधे देता बरे नोहे ॥८२॥
रात्रंदिवस रडे बाळ ॥ सुमती राणी शोके विव्हळ ॥ मृत्युही नोहे व्यथा सबळ ॥ बरी नव्हेचि सर्वथा ॥८३॥
लेकरू सदा करी रुदन ॥ रायासी निद्रा न लागे रात्रंदिन ॥ कंटाळला मग रथावरी घालून ॥ घोर काननी सोडिली ॥८४॥
जेथे मनुष्याचे नाही दर्शन ॥ वसती व्याघ्र सर्प दारुण ॥ सुमता बाळक कडे घेऊन ॥ सव्यअपसव्य हिंडतसे ॥८५॥
कंटक पाषाण रुतती चरणी ॥ मूर्च्छा येऊनि पडे धरणी ॥ आक्रंदे रडे परी न मिळे पाणी ॥ व्रणेकरूनि अंग तिडके ॥८६॥
म्हणे जगदात्म्या कैलासपती ॥ जगद्वंद्या ब्रह्मानंदमूर्ती ॥ भक्तवज्रपंजरा तुझी कीर्ती ॥ सदा गाती निगमागम ॥८७॥
जय जय त्रिदोषशमना त्रिनेत्रा ॥ जगदंकुरकंदा पंचवक्त्रा ॥ अज अजिता पयःफेनगात्रा ॥ जन्मयात्रा चुकवी का ॥८८॥
अनादिसिद्धा अपरिमिता ॥ मायाचक्रचालका सद्गुणभरिता ॥ विश्वव्यापका गुणातीता ॥ धाव आता जगद्गुरो ॥८९॥
ऐसा धावा करिता सुमती ॥ तव वनी सिंह व्याघ्र गर्जती ॥ परम भयभीत होऊनि चित्ती ॥ बाळासहित क्षिती पडे ॥९०॥
श्रावणारितनये नेऊन ॥ वनी सांडिले उर्वीगर्भरत्न ॥ की वीरसेनस्नुषा घोर कानन ॥ पतिवियोगे सेवी जैसे ॥९१॥
सुमताची करुणा ऐकून ॥ पशु पक्षी करिती रुदन ॥ धरणी पडता मूर्च्छा येऊन ॥ वृक्ष पक्षी छाया करिताती ॥९२॥
चंचू भरूनिया जळ ॥ बाळावरी शिंपितो वेळोवेळ ॥ एकी मधुर रस आणोनि स्नेहाळ ॥ मुखी घालोनि तोषविती ॥९३॥
वनगाई स्वपुच्छेकरूनि ॥ वारा घालितो रक्षिती रजनी ॥ असो यावरी जे राजपत्नी ॥ हिंडता अपूर्व वर्तले ॥९४॥
तो वृषभभार वणिक घेवोनी ॥ पंथे जाता देख नयनी ॥ त्याचिया संगेकरूनी ॥ वैश्यनगरा पातली ॥९५॥
तेथील अधिपति वैश्य साचार ॥ त्याचे नाव पद्माकर ॥ परम सभाग्य उदार ॥ रक्षक नाना वस्तूंचा ॥९६॥
तेणे सुमतीस वर्तमान ॥ पुसिले तू कोठील कोण ॥ तिणे जे वर्तले मुळीहून ॥ श्रुत केले तयाते ॥९७॥
ते ऐकूनि पद्माकर ॥ त्याचे अश्रुधारा स्रवती नेत्र ॥ श्वासोच्छ्वास टाकूनि घोर ॥ म्हणे गतो थोर कर्माची ॥९८॥
वज्रबाहूची पट्टराणी ॥ पतिव्रता अवनीची स्वामिणी ॥ अनाथापरी हिंडे वनी ॥ दीनवदन आली येथे ॥९९॥
मग पद्माकर म्हणे सुमती ॥ तू माझी धर्मकन्या निश्चिती ॥ शेजारी घर देऊनि अहोराती ॥ परामर्श करी तियेचा ॥१००॥
बहुत वैद्य आणून ॥ देता झाला रसायन ॥ केले बहुत प्रयत्न ॥ परी व्याधी न राहेचि ॥१॥
सुमती म्हणे ताता ॥ श्रीशंकर वैद्य न होता ॥ कवणासही हे व्यथा ॥ बरी न होय कल्पांती ॥२॥
असो पुढे व्यथा होता कठीण ॥ गेला राजपुत्राचा प्राण ॥ सुमती शोक करी दीनवदन ॥ म्हणे रत्न गेले माझे ॥३॥
पद्माकर शांतवी बहुता रीती ॥ नगरजन मिळाले सभोवती ॥ तो निशांती उगवला गभस्ती ॥ तेवी शिवयोगी आला तेथे ॥४॥
जैसे दुर्बळाचे सदन शोधीत ॥ चिंतामणि ये अकस्मात ॥ की क्षुधेने प्राण जात ॥ तो क्षीराब्धि पुढे धाविन्नला ॥५॥
पद्माकरे धरिले चरण ॥ पूजिला दिव्यासनी बैसवून ॥ त्यावरी सुमतीप्रति दिव्य निरूपण ॥ शिवयोगी सांगता झाला ॥६॥
म्हणे वत्से सुमती ऐक ॥ का हो रडसी करिसी शोक ॥ तुझे पूर्वजन्मीचे पति पुत्र जनक ॥ कोठे आहेत सांग पा ॥७॥
आलीस चौर्यायशी लक्ष योनी फिरत ॥ तेथींचे स्वजन सोयरे आप्त ॥ आले कोठून गेले कोठे त्वरित ॥ सांग मजपाशी वृत्तांत हा ॥८॥
तू नाना योनी फिरसी ॥ पुढेही किती फेरे घेसी ॥ कोणाचे पुत्र तू का रडसी ॥ पाहे मानसी विचारूनी ॥९॥
शरीर धरावे ज्या ज्या वर्णी ॥ त्या त्या कुळाभिमाने नाचती प्राणी ॥ परी आपण उत्पन्न कोठूनी ॥ ते विचारूनी न पाहती ॥११०॥
त्वा पुत्र आणिला कोठून ॥ कोण्या स्थळा गेला मृत्यु पावोन ॥ तू आणि हे अवघे जन ॥ जातील कोठे कवण्या देहा ॥११॥
आत्मा शिव शाश्वत ॥ शरीर क्षणभंगुर नाशवंत ॥ तरी तू शोक करिसी व्यर्थ ॥ विचारूनि मनी पाहे पा ॥१२॥
आत्मा अविनाशी शाश्वत ॥ तो नव्हे कोणाचा बंधु सुत ॥ शरीरकारणे शोक करिसी व्यर्थ ॥ तरी पडले प्रेत तुजपुढे ॥१३॥
जळी उठती तरंग अपार ॥ सवेचु फुटती क्षणभंगुर ॥ मृगजळचि मिथ्या समग्र ॥ तरी बुडबुडेसत्य कैसेनी ॥१४॥
चित्रींच्या वृक्षछाये बैसला कोण ॥ चित्राग्नीने कोणाचे जाळिले सदन ॥ तेथे गंगा लिहिली सहितमीन ॥ कोण वाहोनि गेला तेथे ॥१५॥
वंध्यासुते द्रव्य आणून ॥ भीष्मकन्या मारुतीस देऊन ॥ गंधर्व नगरीचे वर्हाडी आणून ॥ लग्न कोणे लाविले ॥१६॥
वार्याचा मंडप शिवून ॥ सिकतादोरे बांधिला आवळून ॥ शुक्तिकारजताचे पात्र करून ॥ खपुष्पे कोणी भरियेले ॥१७॥
कासवीचे घालून घृत ॥ मृगजळीचे मीन पाजळती पोत ॥ ते चरणी नूपुरे बांधोनि नाचत ॥ जन्मांध पाहत बैसले ॥१८॥
अहिकर्णींची कुंडले हिरोनी ॥ चित्रींचे चोर आले घेवोनी ॥ हा प्रपंच लटिका मुळीहूनी ॥ तो साच कैसा जाणावा ॥१९॥
मुळीच लटके अशाश्वत ॥ त्याचा शोक करणे व्यर्थ ॥ केशतरूचे उद्यान समस्त ॥ शरीर हे उद्भवले ॥१२०॥
सकळ रोगाचे भांडार ॥ कृमिकीटकांचे माहेर ॥ की पापाचा समुद्र ॥ की अंबर भ्रांतीचे ॥२१॥
मूत्र श्लेष्म मांस रक्त ॥ अस्थींची मोळी चर्मवेष्टित ॥ मातेचा विटाळ पितृरेत ॥ अपवित्र असत्य मुळीच हे ॥२२॥
ऐसे हे शरीर अपवित्र ॥ ते पशुमूत्रे झाले पवित्र ॥ क्षुरे मूर्धज छेदिले समग्र ॥ इतुकेनि पावन केवी होय ॥२३॥
शरण न जाती देशिकाप्रति ॥ तरी कैसेनि प्राणी तरती ॥ कल्पकोटी फेरे घेती ॥ मुक्त होती कधी हे ॥२४॥
सुमती तू सांगे सत्वर ॥ तुझे जन्मोजन्मीचे कोठे आहेत भ्रतार ॥ अवघा हा मायापूर ॥ सावध सत्वर होई का ॥२५॥
जयाचे हे सकळ लेणे ॥ मागता देता लाजिरवाणे ॥ तनुघर बांधिले त्रिगुणे ॥ पाच वासे आणोनिया ॥२६॥
याचा भरवसा नाही जाण ॥ केधवा लागेल न कळे अग्न ॥ की हे झाले वस्त्र जीर्ण ॥ ऋणानुबंध तव तगे ॥२७॥
मिथ्या जैसे मृगजळ ॥ की स्वप्नीचे राज्य ढिसाळ ॥ अहा प्राणी पापी सकळ ॥ धन धान्य पुत्र इच्छिती ॥२८॥
गंगेमाजी काष्ठे मिळती ॥ एकवट होती मागुती बिघडती ॥ तैसी स्त्रीपुरुषे बोलिजेती ॥ खेळ मुळीच असत्य हा ॥२९॥
वृक्षापरी पक्षी येती ॥ कितीएक बैसती कितीएक जाती ॥ आणिक्या तरूवरी बैसती ॥ अपत्ये तैसी जाण पा ॥१३०॥
पथिक वृक्षातळी बैसत ॥ उष्ण सरलिया उठूनि जात ॥ सोयरे बंधू आप्त ॥ तैसेचि जाण निर्धारे ॥३१॥
मायामय प्रपंचवृक्षी ॥ जीव शिव बैसले दोन पक्षी ॥ शिव समाधान सर्वसाक्षी ॥ जीव भक्षी विषयफळे ॥३२॥
ती भक्षिताचि भुलोनि गेला ॥ आपण आपणासी विसरला ॥ ऐसा अपरिमित जीव भ्रमला ॥ जन्ममरण भोगीतसे ॥३३॥
त्यामाजी एखादा पुण्यवंत ॥ सद्गुरूसी शरण रिघत ॥ मग तो शिव होवोनि भजत ॥ शिवालागी अत्यादरे ॥३४॥
ऐसे ऐकता दिव्य निरूपण ॥ पद्माकर सुमती उठोन ॥ अष्टभावे दाटोन ॥ वंदिती चरण तयाचे ॥३५॥
म्हणती एवढे तुझे ज्ञान ॥ काय न करिसी इच्छेकरुन ॥ तू साक्षात उमारमण ॥ भक्तरक्षणा धावलासी ॥३६॥मग मृत्युंजयमंत्र राजयोगी ॥ सुमतीस सांगे शिवयोगी ॥ मंत्रून भस्म लाविता अंगी ॥ व्यथारहित जाहली ते ॥३७॥
रंभा उर्वशीहून वहिले ॥ दिव्य शरीर तिचे झाले ॥ मृत्युंजयमंत्रे भस्म चर्चिले ॥ बाळ उठिले तत्काळ ॥३८॥
व्रणव्यथा जावोनि सकळ ॥ बत्तीसलक्षणी झाला बाळ ॥ मग शिवध्यान उपासना निर्मळ ॥ सुमतीबाळ उपदेशिले ॥३९॥
परिस झगडता पूर्ण ॥ लोह तत्काळ होय सुवर्ण ॥ तैसी दोघे दिव्यरूप जाण ॥ होती झाली ते काळी ॥१४०॥
आश्चर्य करी पद्माकर ॥ म्हणे धन्य धन्य गुरुमंत्र ॥ काळ मृत्युभय अपार ॥ त्यापासूनि रक्षी गुरुनाथ ॥४१॥
गुरुचरणी रत होती सदा ॥ त्यासी कैची भवभयआपदा ॥ धनधान्यांसी नाही मर्यादा ॥ भेद खेदा वारिले ॥४२॥
बाळ चरणावरी घालोनी ॥ सुमती लागे सप्रेम चरणी ॥ म्हणे सद्गुरु तुजवरूनी ॥ शरीर सांडणे हे माझे ॥४३॥
या शरीराच्या पादुका करून ॥ तुझिया दिव्यचरणी लेववीन ॥ तरी मी नव्हे उत्तीर्ण ॥ उपकार तुझे गुरुमूर्ती ॥४४॥
मग शिवयोगी बोलत ॥ आयुरारोग्य ऐश्वर्य अद्भुत ॥ तुझिया पुत्रासी होईल प्राप्त ॥ राज्य पृथ्वीचे करील हा ॥४५॥
त्रिभुवनभरी होईल कीर्ति ॥ निजराज्य पावेल पुढती ॥ भद्रायु नाम निश्चिती ॥ याचे ठेविले मी जाण ॥४६॥
थोर होय भद्रायु बाळ ॥ तववरी क्रमी येथेचि काळ ॥ मृत्युंजयमंत्रजप त्रिकाळ ॥ निष्ठा धरूनि करीत जा ॥४७॥
हा राजपुत्र निश्चित ॥ लोकांशी प्रगटो नेदी मात ॥ हा होईल विद्यावंत ॥ चतुःपष्टिकळाप्रवीण ॥४८॥
ऐसे शिवयोगी बोलोन ॥ पावला तेथेचि अंतर्धान ॥ गुरुपदांबुज आठवून ॥ सुमती सद्गद क्षणक्षणा ॥४९॥
पद्माकरासी सुख अत्यंत ॥ सुनय पुत्राहूनि बहुत ॥ भद्रायु त्यासी आवडत ॥ सदा पुरवीत लाड त्याचा ॥१५०॥
पद्माकरे आपुली संपत्ति वेचून ॥ दोघांचे केले मेखलाबंधन ॥ दोघांसी भूषणे समान ॥ केले संपन्न वेदशास्त्री ॥५१॥
द्वादश वर्षांचा झाला बाळ ॥ धीर गंभीर परम सुशीळ ॥ मातेच्या सेवेसी सदाकाळ ॥ जवळी तिष्ठत सादर ॥५२॥
पदरी पूर्वसुकृताचे पर्वत ॥ शिवयोगी प्रगटला अकस्मात ॥ सुमती भद्रायु धावत ॥ पाय झाडीत मुक्तकेशी ॥५३॥
नयनोदके चरणक्षालन ॥ केशवसने पुसिले पूर्ण ॥ जे सुगंधभरित जाण ॥ स्नेह तेचि लाविले ॥५४॥
वारंवार करिती प्रदक्षिणा ॥ दाटती अष्टभावेकरून ॥ षोडशोपचारी पूजन ॥ सोहळा करिती अपार ॥५५॥
स्तवन करीतसे तेव्हा सुमती ॥ प्रसादेकरून मी पुत्रवंती ॥ यावरी भद्रायूसी नीति ॥ शिवयोगी शिकवीतसे ॥५६॥
श्रुतिस्मृति पुराणोक्त पाही ॥ धर्मनीती वर्तत जाई ॥ मातापितागुरुपायी ॥ निष्ठा असो दे सर्वदा ॥५७॥
गोभूदेवप्रजापाळण ॥ सर्वाभूती पहावा उमारमण ॥ वर्णाश्रमस्वधर्माचरण ॥ सहसाहि न सांडावे ॥५८॥
विचार केल्यावाचूनिया ॥ सहसा न करावी आनक्रिया ॥ मागे पुढे पाहोनिया ॥ शब्द बोलावा कुशलत्वे ॥५९॥
काळ कोण मित्र किती ॥ कोण द्वेषी शत्रू किती ॥ आय काय खर्च किती ॥ पाहावे चित्ती विचारूनिया ॥१६०॥
माझे बळ किती काय शक्ती ॥ आपुले सेवक कैसे वर्तती ॥ यश की अपयश देती ॥ पहावे चित्ती विचारूनी ॥६१॥
अतिथी देव मित्र ॥ स्वामी वेद अग्निहोत्र ॥ पशु कृषि धन विद्या सर्वत्र ॥ घ्यावा समाचार क्षणाक्षणा ॥६२॥
लेकरू भार्या अरि दास ॥ सदन गृहवार्ता रोगविशेष ॥ येथे उपेक्षा करिता निःशेष ॥ हानि क्षणात होत पै ॥६३॥
ज्या पंथे गेले विद्वज्जन ॥ आपण जावे तोचि पंथ लक्षून ॥ मातापितायतिनिंदा जाण ॥ प्राणांतीही न करावी ॥६४॥
वैश्वदेवसमयी अतिथी ॥ आलिया त्यासी न पुसावी याती ॥ अन्नवस्त्र सर्वाभूती ॥ द्यावे प्रीत्यर्थ शिवाचिया ॥६५॥
परोपकार करावा पूर्ण ॥ परपीडा न करावी जाण ॥ करावे गोब्राह्मणरक्षण ॥ सत्य सुजाण म्हणती तया ॥६६॥
निंदा वाद टाकोन ॥ सर्वदा कीजे शिवस्मरण ॥ तेचि म्हणावे मौन ॥ शिवसेवन तप थोर ॥६७॥
परदारा आणि परधन ॥ हे न पहावे जेवी वमन ॥ करावे शास्त्रश्रवण ॥ शिवपूजन यथाविधि ॥६८॥
स्नान होम जपाध्ययन ॥ पंचयज्ञ गोविप्रसेवन ॥ श्रवण मनन निजध्यास पूर्ण ॥ अनालस्ये करावी ॥६९॥
सुरत निद्रा भोजन ॥ येथे असावे प्रमाण ॥ दान सत्कर्म अभ्यास श्रवण ॥ आळस येथे न करावा ॥१७०॥
काम पूर्ण धर्मपत्नीसी ॥ निषिद्ध जाण परियोषितेसी ॥ क्रोधे दंडावे शत्रूसी ॥ साधुविप्रांसी नमिजे सदा ॥७१॥
द्वेषियांसी धरावा मद ॥ संतभक्तांसी नम्रता अभेद ॥ संसाररिपूसी मत्सर प्रसिद्ध ॥ असावे निर्मत्सर सर्वाभूती ॥७२॥
दुर्जनासी दंभ दाविजे ॥ भल्याचे पदरज वंदिजे ॥ अहंकारे पृथ्वी जिंकिजे ॥ निरहंकार द्विजांसी ॥७३॥
वाचा सावध शिवस्मरणी ॥ पाणीसार्थक दानेकरूनी ॥ पाद पावन देवालययात्रागमनी ॥ नित्य शिवध्यानी बैसावे ॥७४॥
पुराणश्रवणी श्रोत्र सादर ॥ त्वचा संत आलिंगनी पवित्र ॥ सार्थक शिवध्यानी नेत्र ॥ जिव्हेने स्तोत्र वर्णावे ॥७५॥
शिवनिर्माल्यवास घेईजे घ्राणी ॥ ये रीती इंद्रिये लावावी भजनी ॥ दीन अनाथ अज्ञान देखोनी ॥ तयावरी कृपा कीजे ॥७६॥
ईश्वरी प्रेम संतांसी मैत्री ॥ देवाचे द्वेषी त्यांची उपेक्षा करी ॥ युक्तनिद्रा युक्ताहारी ॥ मृगया करी परम नीतीने ॥७७॥
अतिविद्या अतिमैत्री ॥ अतिपुण्य अतिस्मृती ॥ उत्साह धैर्य दान धृती ॥ वर्धमान असावी ॥७८॥
आपुले वित्त आयुष्य गृहच्छिद्र ॥ मैथुन औषध सुकृत मंत्र ॥ दान मान अपमान ही सर्वत्र ॥ गुप्त असावी जाणिजे ॥७९॥
नष्ट पाखंडी शठ धूर्त ॥ पिशुन तस्कर जार पतित ॥ चंचळ कपटी नास्तिक अनृत ॥ ग्राम्य सभेसी नसावे ॥१८०॥
निंदक शिवभक्तउच्छेदक ॥ मद्यपानी गुरुतल्पक ॥ मार्गपीडक कृतघ्न धर्मलोपक ॥ त्यांचे दर्शन न व्हावे ॥८१॥
दारा धन आणि पुत्र ॥ यांसी आसक्त नसावे अणुमात्र ॥ अलिप्तपणे संसार ॥ करोनि आसक्त असावे ॥८२॥
बंधु सोयरे श्वशुर स्वजन ॥ यांसी स्नेह असावा साधारण ॥ भलता विषय देखोन ॥ आसक्ति तेथे न करावी ॥८३॥
करावे रुद्राक्षधारण ॥ मस्तकी कंठी दंडी करभूषण ॥ गेलिया प्राण शिवपूजन ॥ सर्वथाही न सांडावे ॥८४॥
शिवकवच सर्वांगी ॥ लेऊ शिकवी शिवयोगी ॥ भस्म चर्चिता रणरंगी ॥ शस्त्रास्त्रबाधा न होय ॥८५॥
काळमृत्युभयापासून ॥ रक्षी मृत्युंजयऔपासन ॥ आततायी मार्गघ्न ब्रह्मघ्न ॥ यांसी जीवे मारावे ॥८६॥
सोमवारव्रत शिवरात्र प्रदोष ॥ विधियुक्त आचरावे विशेष ॥ शिवहरिकीर्तन निर्दोष ॥ सर्व सांडूनि ऐकावे ॥८७॥
महापर्व कुयोग श्राद्धदिनी ॥ व्यतीपत वैघृति संक्रमणी ॥ न प्रवर्तावे मैथुनी ॥ ग्रहणी भोजन न करावे ॥८८॥
सत्पात्री देता दान ॥ होय ऐश्वर्य वर्धमान ॥ अपात्री दाने दारिद्र्य पूर्ण ॥ शास्त्रप्रमाण जाणिजे ॥८९॥
वेद शास्त्र पुराण कीर्तन ॥ गुरुब्राह्मणमुखे करावे श्रवण ॥ दान दिधल्याचे पाळण ॥ करिता पुण्य त्रिगुण होय ॥१९०॥
अपूज्याचे पूजन ॥ पूज्य त्याचा अपमान ॥ तेथे भय दुर्भिक्ष मरण ॥ होते जाण विचारे ॥९१॥
महाडोही उडी घालणे ॥ महापुरुषासी विग्रह करणे ॥ बळवंतासी स्पर्धा बांधणे ॥ ही द्वारे अनर्थाची ॥९२॥
दाने शोभे सदा हस्त ॥ कंकणमुद्रिका भार समस्त ॥ श्रवणी कुंडले काय व्यर्थ ॥ श्रवणसार्थक श्रवणेचि ॥९३॥
ज्याची वाचा रसवंती भार्या रूपवती सती ॥ औदार्य गुण संपत्ती ॥ सफल जीवित्व तयाचे ॥९४॥
देईन अथवा नाही सत्य ॥ हे वाचेसि असावे व्रत ॥ विद्यापात्रे येती अमित ॥ सद्य; दान त्या दीजे ॥९५॥
विपत्तिकाळी धैर्य धरी ॥ वादी जयवंत वैखरी ॥ युद्धमाजी पराक्रम करी ॥ याचकांसी पृष्ठी न दाविजे ॥९६॥
ब्राह्मणमित्रपुत्रांसमवेत ॥ तेचि भोजन उत्तम यथार्थ ॥ गजतुरंगासहित पंथ ॥ चालणे तेचि श्रेष्ठ होय ॥९७॥
ज्या लिंगाचे नाही पूजन ॥ तेथे सांक्षेपे पूजा करावी जाऊन ॥ अनाथप्रेतसंस्कार जाण ॥ करणे त्या पुण्यासी पार नाही ॥९८॥
ब्रह्मद्वेषाएवढे विशेष ॥ मारक नाही कदा विष ॥ सत्यमागम रात्रंदिवस ॥ तुच्छ सुधारस त्यापुढे ॥९९॥
प्रतापे न व्हावे संतप्त ॥ परसौख्ये हर्षभरित ॥ सद्वार्ता ऐकता सुख अत्यंत ॥ तोचि भक्त शिवाचा ॥२००॥
पाषाण नाम रत्ने व्यर्थ ॥ चार रत्ने आहेत पृथ्वीत ॥ अन्न उदक सुभाषित ॥ औदार्य रत्न चौथे पै ॥१॥
वर्म कोणाचे न बोलावे ॥ सद्भक्तांचे आशीर्वाद घ्यावे ॥ भाग्याभाग्य येत स्वभावे ॥ स्वधर्म ध्रुव न ढळावा ॥२॥
पूर्वविरोधी विशेष ॥ त्याचा न धरावा विश्वास ॥ गर्भिणी पाळी गर्भास ॥ तेवी प्रजा पाळी का ॥३॥
गुरु आणि सदाशिव ॥ यासी न करावा भेदभाव ॥ भाग्यविद्या गर्व सर्व ॥ सोडोनि द्यावा जाण पा ॥४॥
नराची शोभा स्वरूप पूर्ण ॥ स्वरूपाचे सद्गुण आभरण ॥ गुणाचे अलंकार ज्ञान ॥ ज्ञानाचे भूषण क्षमा शांती ॥५॥
कुलशील विद्याधन ॥ राज्य तप रूप यौवन ॥ या अष्टमदेकरून ॥ मन भुलो न द्यावे ॥६॥
ऐसा नानापरी शिवयोगी ॥ बोधिता झाला भद्रायूलागी ॥ हे नीति ऐकता जगी ॥ साकडे न पडे सर्वथा ॥७॥
सातवा अध्याय गिरीकैलास ॥ यावरी वास्तव्य करी उमाविलास ॥ पारायणप्रदक्षिना करिती विशेष ॥ निर्दोष यश जोडे तया ॥८॥
की हा अध्याय हिमाचळ ॥ भक्तिभवानी कन्या वेल्हाळ ॥ तीसी वरोनि पयःफेनधवल ॥ श्वशुरगृही राहिला ॥९॥
पुढील अध्यायी कथा सुरस ॥ शिवयोगी दया करील भद्रायूस ॥ ब्रह्मानंदे निशिदिवस ॥ श्रवण करोत विद्वज्जन ॥२१०॥
भवगजविदारक मृगेंद्र ॥ श्रीधरवरद आनंअसमुद्र ॥ तो शिव ब्रह्मानंद यतींद्र ॥ जो सद्गुरु जगदात्मा ॥११॥
शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड ॥ स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ॥ परिसोत सज्जन अखंड ॥ सप्तमाऽध्याय गोड हा ॥२१२॥
इति सप्तमोऽध्यायः ॥७॥
॥श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥
श्री शिवलीलामृत अध्याय आठवा
श्रीगणेशाय नमः ॥
जय जय शिव ब्रह्मानंदमूर्ती ॥ वेदवंद्य तू भोळाचक्रवर्ती ॥ शिवयोगीरूपे भद्रायूप्रती ॥ अगाध नीती प्रगटविली ॥१॥
तुझिया बळे विश्वव्यापका ॥ सूत सांगे शौनकादिका ॥ भद्रायूसी शिवकवच देखा ॥ श्रीगुरूने शिकविले ॥२॥
मृत्युंजयमंत्र उत्तम व सर्वांगी चर्चिले भस्म ॥ रुद्राक्षधारण सप्रेम ॥ करी भद्रायु बाळ तो ॥३॥
एक शंख उत्तम देत ॥ ज्याच्या नादे शत्रु होती मूर्च्छित ॥ खङ्ग दिधले अद्भुत ॥ त्रिभुवनात ऐसे नाही की ॥४॥
ते शस्त्र शत्रूते दाविता नग्न ॥ जाती एकदाच भस्म होऊन ॥ द्वादश सहस्त्रइभबळ गहन ॥ तत्काळ दिधले कृपेने ॥५॥
देणे शिवाचे अद्भुत ॥ म्हणे होई ऐश्वर्यवंत ॥ आयुरारोग्य विख्यात ॥ सर्व रायात श्रेष्ठ तू ॥६॥
चिरकाल विजयी होऊनी ॥ संतोषरूपे पाळी मेदिनी ॥ निष्कामदानेकरूनी ॥ माजेल त्रिभुवनी कीर्तिघोष ॥७॥
भाग्यलक्ष्मी असो तव सदनी ॥ भूतकारुण्यलक्ष्मी ह्रदयभवनी ॥ दानलक्ष्मी येवोनी ॥ करकमळी राहो सदा ॥८॥
सर्वांगी असो लक्ष्मीसौम्य ॥ दौर्दंडी वीरलक्ष्मी उत्तम ॥ दिगंतरी किर्ति परम ॥ सर्वदाही वसो तुझी ॥९॥
शत्रुलक्ष्मी खङ्गाग्री वसो ॥ साम्राज्यलक्ष्मी सदा असो ॥ विद्यालक्ष्मी विलसो ॥ सर्वदाही तुजपाशी ॥१०॥
ऐसे शिवयोगी बोलोन ॥ तेथेचि पावला अंतर्धान ॥ भद्रायु सुमती गुरुचरण ॥ सर्वदाही न विसंबती ॥११॥
इकडे भद्रायूचा पिता निरुती ॥ दशार्णदेशींचा नृपती ॥ वज्रबहु महामती ॥ शत्रू त्यावरी पातले ॥१२॥
मगधदेशाधिपति हेमरथ ॥ तेणे देश नागविला समस्त ॥ धनधान्य हरूनि नेत ॥ सर्व करीत गोहरण ॥१३॥
स्त्रिया पुरुष धरोनि समस्त ॥ बळे नेऊनि बंदी घालित ॥ मुख्य राजग्राम वेष्टित ॥ बाहेर निघत वज्रबाहू ॥१४॥
युद्ध झाले दशदिनपर्यंत ॥ हा एकला शत्रू बहुत ॥ त्यासी धरोनिया जित ॥ रथी बांधिती आकर्षोनी ॥१५
वज्रबाहूचे अमात्य धरोन ॥ तेही चालविले बांधोन ॥ सर्व ग्राम प्रजा लुटून ॥ राजस्त्रिया धरियेल्या ॥१६॥
ऐसे हरोनि समस्त ॥ घेवोनि चालिला हेमरथ ॥ वज्रबाहू सचिवासहित ॥ मागे पुढे पाहतसे ॥१७॥
पुत्र ना बंधु आम्हास ॥ कोण कैवारी या समयास ॥ आम्ही पहावी कवणाची आस ॥ सोडवील कोण दुःखार्णवी ॥१८॥
तो समाचार कळला भद्रायूसी ॥ की शत्रु नेती पितयासी ॥ गुरुस्मरण करूनि मानसी ॥ अंगी कनच लेईले ॥१९॥
मृत्युंजयमंत्र परम ॥ सर्वांगी चर्चिले भस्म ॥ शंख खङ्ग घेऊनी उत्तम ॥ मातेलागी नमस्कारी ॥२०॥
म्हणे माते शत्रू बहुत ॥ ग्राम हरूनि पितयास नेत ॥ तरी मी गुरुदास तुझा सुत ॥ संहारीन समस्ताते ॥२१॥
माते तुझ्या सुकृतेकरून ॥ कृतांत समरी करीन चूर्ण ॥ पृथ्वीचे राजे जितचि धरून ॥ आणीन तुझिया दर्शना ॥२२॥
निर्दोष यशाचा ध्वज ॥ उभवीन आज तेजःपुंज ॥ शरत्काळींचा द्विजराज ॥ सोज्वळ जैसा शोभत ॥२३॥
पद्माकरपुत्र सुनय वीर ॥ सवे घेतला सत्वर ॥ सर्पाचा मग काढी विनतापुत्र ॥ तैसे दोघे धावती ॥२४॥
इभ आहे कोणते कांतारी ॥ शोधीत धावती दोघे केसरी ॥ क जनकजेचे कैवारी ॥ लहु कुश पुत्र जैसे ॥२५॥
पायी क्रमिती भूमी सत्वर ॥ शोभती धाकुटे वय किशोर ॥ जवळी देखोनि शत्रूंचे भार ॥ सिंहनादे गर्जिन्नले ॥२६॥
म्हणति उभे रहा रे तस्कर समस्त ॥ वज्रबाहुऐसी दिव्य वस्त ॥ चोरोनि नेता त्वरित ॥ शिक्षा लावू तुम्हाते ॥२७॥
तस्करांसी हेचि शिक्षा जाण ॥ छेदावे कर्ण नासिक कर चरण ॥ एवढा अन्याय करून ॥ कैसे वाचून जाल तुम्ही ॥२८॥
अवघे माघारी जव पाहती ॥ तव दोघे किशोर धावती ॥ म्हणती एक रमापती एक उमापती ॥ येती निजभक्तकैवारे ॥२९॥
एक मृगांक एक मित्र ॥ वसिष्ठ एक विश्वामित्र ॥ एक वासुकी एक भोगींद्र ॥ तेवी दोघे भासती ॥३०॥
असंख्यत सोडिती बाण ॥ जैशा धारा वर्षे धन ॥ वीर खिळिले संपूर्ण ॥ मयूराऐसे दीसति ॥३१॥
परतले शत्रूंचे भार ॥ वर्षती शस्त्रास्त्रे समग्र ॥ वाद्ये वाजती भयंकर ॥ तेणे दिशा व्यापिल्या ॥३२॥
तो जलज वाजविला अद्भुत ॥ धाके उर्वी डळमळित ॥ पाताळी फणिनाथ ॥ सावरीत कुंभिनीते ॥३३॥
दिशा कोंदल्या समस्त ॥ दिग्गज थरथरा कापत ॥ शत्रु पडिले मूर्च्छित ॥ रिते रथ धावती ॥३४॥
त्यातील दिव्य रथ घेवोनि दोनी ॥ दोघे आरूढले तेचि क्षणी ॥ चापी बाण लावूनी ॥ सोडिती प्रलयविद्युद्वत ॥३५॥
वज्रबाहूचे वीर बहुत ॥ भारासमवेत गजरथ ॥ भद्रायुभोवते मिळत ॥ कैवारी आपला म्हणवूनी ॥३६॥
वाद्ये वाजवूनिया दळ ॥ भद्रायूभोवते मिळाले सकळ ॥ म्हणती हा कैवारी या वेळ ॥ आला न कळे कोठोनी ॥३७॥
पाठिराखा देखोनि समर्थ ॥ वीरांस बळ चढले अद्भुत ॥ हेमरथाची सेना बहुत ॥ संहारिली ते काळी ॥३८॥
वज्रबाहूसहित प्रधान ॥ रथी बांधिले पाहती दुरून ॥ म्हणती त्रिपुरारि मुरारि दोघे जण ॥ किशोरवेषे पातले ॥३९॥
एका गुरुने शिकविले पूर्ण ॥ दिसे दोघांची विद्या समान ॥ त्यात मुख्य राजनंदन ॥ देखोनि स्नेह वाटतो ॥४०॥
कोण आहेत न कळे सत्य ॥ मज वाटती परम आप्त ॥ ह्रदयी धरूनि यथार्थ ॥ द्यावे चुंबन आवाडीने ॥४१॥
मांडिले घोरांदर रण ॥ रक्तपूर चालिले जाण ॥ वज्रबाहु दुरून ॥ प्रधानासहित पाहतसे ॥४२॥
अनिवार भद्रायूचा मार ॥ शत्रु केले तेव्हा जर्जर ॥ समरभूमी माजली थोर ॥ बाणे अंबर कोंदले ॥४३॥
ऐसे देखोनि हेमरथ ॥ लोटला तेव्हा कृतांतवत ॥ दोघांसी युद्ध अद्भुत ॥ चार घटिका जाहले ॥४४॥
शत्रू थरथरा कापत ॥ म्हणती भीम की हनुमंत ॥ किंवा आला रेवतीनाथ ॥ मुसळ नांगर घेऊनी ॥४५॥
शत्रूचा देखोनी उत्कर्ष बहुत ॥ भद्रायूने शिवयोगिदत्त ॥ खङ्ग काढिले तेज अद्भुत ॥ सहस्त्रमार्तंडासमान ॥४६॥
काळाग्नीची जिव्हा कराळ ॥ की प्रळयविजांचा मेळ ॥ की काळसर्पाची गरळ ॥ तेवी खङ्ग झळकतसे ॥४७॥
ते शस्त्र झळकता तेजाळ ॥ मागधदळ भस्म झाले सकळ ॥ मागे होता हेमरथ तत्काळ ॥ समाचार श्रुत जाहला ॥४८॥
की काळशस्त्र घेता हाती ॥ देखतांचि दळ संहारिती ॥ मग पळू लागला पवनगती ॥ उरल्या दळासमवेत ॥४९॥
प्रधानांसह वज्रबाहूसी टाकून ॥ पळती शत्रु घेतले रान ॥ ते भद्रायूने देखोन ॥ धरिला धावून हेमरथ ॥५०॥
धरिल तो दृढ केशी ॥ ओढूनि पाडिला भूमीसी ॥ लत्ताप्रहार देता ह्रदयदेशी ॥ अशुद्ध ओकीत भडभडा ॥५१॥
रथी बांधिला आकर्षून ॥ मंत्रिप्रधानांसहित जाण ॥ खुरमुखशर घेऊन ॥ पाच पाट काढिले ॥५२॥
अर्धखाड अर्धमिशी भादरून ॥ माघारे चालवी संपूर्ण ॥ राजस्त्रिया अपार कोश धन ॥ घेत हिरोन तेधवा ॥५३॥
देश नागविला होता सकळ ॥ वस्तुमात्र आणविल्या तत्काळ ॥ गोमार परतविला सकळ ॥ जेथींचा तेथे स्थापिला ॥५४॥
अमात्यासमवेत पिता ॥ सोडवूनि पायी ठेविला माथा ॥ वज्रबाहु होय बोलता ॥ त्याजकडे पाहूनी ॥५५॥
नयनी लोटल्या अश्रुधारा ॥ तू कोण आहेस सांग कुमारा ॥ मज अपयशसमुद्रातूनि त्वरा ॥ काढिले उडी घालूनी ॥५६॥
जळत शत्रुद्रावाग्नीत ॥ वर्षलासी जलद अद्भुत ॥ मज वाटे तू कैलासनाथ ॥ बाळवेषे आलासी ॥५७॥
की वाटे वैकुंठनायके ॥ रूपे धरिली बाळकांची कौतुके ॥ की सहस्त्राक्षे येण एके ॥ केले धावणे वाटतसे ॥५८॥
सकळ राजस्त्रिया धावोन ॥ उतरिती मुखावरूनि निंबलोण ॥ म्हणती बाळा तुजवरून ॥ जाऊ ओवाळून सर्वही ॥५९॥
भद्रायु म्हणे नगरात ॥ चला शत्रु घेवोनि समस्त ॥ बंदी घालूनि रक्षा बहुत ॥ परम यत्ने करोनिया ॥६०॥
नगरात पिता नेऊनी ॥ बैसविला दिव्य सिंहासनी ॥ जयवाद्यांचा ध्वनी ॥ अपार वाजो लागला ॥६१॥
नगर श्रृंगारिले एकसरा ॥ रथी भरूनि वाटती शर्करा ॥ नगरजन धावती त्वरा ॥ वज्रबाहूसी भेटावया ॥६२॥
वज्रबाहु म्हणे सद्गद होऊन ॥ जेणे मज सोडविले धावून ॥ त्या कैवारियाचे चरण धरा जाऊन ये वेळा ॥६३॥
भद्रायु म्हणे पितयालागून ॥ शत्रूस करा बहुत जतन ॥ तीन दिवसां मी येईन ॥ परतोनि जाणा तुम्हापासी ॥६४॥
मी आहे कोणाचा कोण ॥ कळेल सकळ वर्तमान ॥ ऐसे बोलोनि दोघेजण ॥ रथारूढ पै झाले ॥६५॥
मनोवेगेकरून ॥ येऊन वंदिले मातेचे चरण ॥ मग तिणे करूनि निंबलोण ॥ सुखावे पूर्ण पद्माकर ॥६६॥
असो यावरी शिवयोगी दयाघन ॥ चित्रांगदसीमंतिनीसी भेटोन ॥ जन्मादारभ्य वर्तमान ॥ त्यासी सांगे भद्रायूचे ॥६७॥
पिता सोडवूनि पुरुषार्थ ॥ केला तो ऐकिली की समस्त ॥ तरी तो तुम्ही करावा जामात ॥ कीर्तिमालिनी देऊनिया ॥६८॥
ऐकता ऐसा मधुर शब्द ॥ सीमंतिनी आणि चित्रांगद ॥ दृढ धरिती चरणारविंद ॥ पूजिती मग षोडशोपचारे ॥६९॥
म्हणती तुझे वचन प्रमाण ॥ वर आणावा आताचि आहे लग्न ॥ मग दळभार वाहने पाठवून ॥ दिधली वैश्यनगराप्रती ॥७०॥
सुनयपुत्रासहित समग्र ॥ नाना संपत्ति घेऊन अपार ॥ लग्नासी चालिला पद्माकर ॥ वाद्ये अपार वाजिती ॥७१॥
भद्रायु बैसला सुखासनी ॥ तैसीच माता शिबिकायानी ॥ चित्रांगद सामोरा येवोनी ॥ घेवोनि गेला मिरवीत ॥७२॥
वर पाहूनि जन तटस्थ ॥ म्हणती कायसा यापुढे रतिनाथ ॥ पृथ्वीचे राजे समस्त ॥ आणविले लग्नासी ॥७३॥
त्यात वज्रबाहु सहपरिवारे ॥ लग्नालागी पातला त्वरे ॥ वराकडे पाहे सादरे ॥ तव तो कैवारी ओळखिला ॥७४॥
पाय त्याचे धरावया धाविन्नला ॥ भद्रायुने वरच्यावरी धरिला ॥ आलिंगन देता वेळोवेळा ॥ कंठ दाटले उभयतांचे ॥७५॥
नयनी चालिल्या विमलांबुधारा ॥ अभिषेक करिती येरयेरा ॥ मग वज्रबाहु पुसे वरा ॥ देश तुझा कवण सांग ॥७६॥
फेडी संशय तत्त्वता ॥ सांग कवण माता पिता ॥ गोत्र ग्राम गुरु आता ॥ सर्व सांग मजप्रती ॥७७॥
चित्रांगदे एकांती नेउन ॥ सांगितले साद्यंत वर्तमान ॥ हा शिवयोगियाचा महिमा पूर्ण ॥ उपासना शिवाची ॥७८॥
अनंत पुण्य कोट्यनुकोटी ॥ तै शिवयोगियाची होय भेटी ॥ तो साक्षात धूर्जटी त्याचे चरित्र जाण हे ॥७९॥
मग ते सुमती पट्टराणी ॥ भेटविली एकांती नेऊनी ॥ वज्रबाहु खालते पाहूनी ॥ रुदन करी तेधवा ॥८०॥
म्हणे ऐसीनिधाने वरिष्ठे ॥ म्या घोर वनी टाकिली नष्टे ॥ मजएवढ अन्यायी कोठे ॥ पृथ्वी शोधिता नसेल ॥८१॥
सुमती मागील दुःख अद्भुत ॥ आठवूनि रडे सद्गदित ॥ म्हणे शिवयोगी गुरुनाथ ॥ तेणे कृतार्थ केले आम्हा ॥८२॥
मग सीमंतिनी चित्रांगद ॥ उभयतांचा करूनि ऐक्यवाद ॥ वज्रबाहु बोले सद्गद ॥ धन्य सुमती राणी तू ॥८३॥
बिंदूचा सिंधु करून ॥ मज त्वा दाविला आणोन ॥ सर्षप कनकाद्रीहून ॥ श्रेष्ठ केला गुणसरिते ॥८४॥
त्वा माझा केला उद्गार मज अभाग्यासी कैचा पुत्र ॥ हे राज्य तुझेचि समग्र ॥ सुतासहित त्वा दीधले ॥८५॥
ऐसे बोलोनि त्वरित ॥ वज्रबाहु बाहेर येत ॥ भद्रायु धावोनि सद्गदित ॥ साष्टांगे नमित पितयाते ॥८६॥
वज्रबाहु देत आलिंगन ॥ जेवी भेटती शिव आणि षडानन ॥ की वाचस्पति आणि कचनिधान ॥ संजीवनी साधिता आलिंगी ॥८७॥मस्तक अवघ्राणूनि झडकरी ॥ सप्रेम बैसव्ला अंकावरी ॥ कार्तिमालिनी स्नुषा सुंदरी ॥ दक्षिणांकी बैसविली ॥८८॥
तव राजे समस्त आश्चर्य करिती ॥ धन्य वज्रबाहु नृपती ॥ मग पद्माकर सुनय याप्रती ॥ भद्रायु भेटवी पितयाते ॥८९॥
गगनी न समाये ब्रह्मानंद ॥ ऐसा झाला सकळा मोद ॥ मग चारी दिवस सानंद ॥ यथासांग लग्न झाले ॥९०॥
आंदण दिधले अपार ॥ दोन लक्ष वाजी अयुत कुंजर ॥ दास दासी भांडार ॥ भरूनि द्रव्य दिधले ॥९१॥
सवे घेऊनि कीर्तिमालिनी ॥ पद्माकरासहित जनकजननी ॥ निजनगर तेचि क्षणी ॥ जाते झाले तेधवा ॥९२॥
गगनगर्भी न समाये हरिख ॥ ऐसे मातापितयांसी झाले सुख ॥ पट्टराणी सुमती देख ॥ केले आधीन सर्व तिच्या ॥९३॥
मग सकळ शत्रु सोडोन ॥ प्रतिवर्षी करभार नेमून ॥ करूनि आपणाआधीन ॥ जीवदान दीधले तया ॥९४॥
भद्रायु ऐसा पुत्र प्राप्त ॥ होय असल्या पुण्य बहुत ॥ तरी जन्मोजन्मी हिमनगजामात ॥ पूजिला असेल प्रेमभरे ॥९५॥
स्त्री पतिव्रता चतुर सुंदर ॥ पुत्र पंडित सभाग्य पवित्र ॥ गुरु सर्वज्ञ उदार थोर ॥ पूर्वदत्ते प्राप्त होय ॥९६॥
मग त्या भद्रायूवरी छत्र ॥ वज्रबाहु उभवूनि सत्वर ॥ स्त्री सुमतीसहित तप अपार ॥ हिमकेदारी करिता झाला ॥९७॥
करिता शिवआराधन ॥ त्रिकाळज्योतिर्लिंगाचे पूजन ॥ मागे भद्रायु बहुत दिन ॥ राज्य करीत पृथ्वीचे ॥९८॥
शिवकवच भस्मधारण ॥ रुद्राक्षमहिमा अपार पूर्ण ॥ धन्य गुरु शिवयोगी सुजाण ॥ शिष्य भद्रायु धन्य तो ॥९९॥
असो भद्रायु नृपनाथ ॥ कीर्तिमालिनीसमवेत ॥ चालिला वनविहारार्थ ॥ अवलोकीत वनश्रियेते ॥१००॥
छाया सघन शीतळ ॥ पाट वाहती जळ निर्मळ ॥ तेथे बैसता सूर्यमंडळ ॥ वरी कदापि दिसेना ॥१॥
नारळी केळी पोफळी रातांजन ॥ मलयागर सुवास चंदन ॥ अशोकवृक्ष खर्जूरी सघन ॥ आंबे जांभळी खिरणिया ॥२॥
वट पिंपळ कडवे निंब ॥ डाळिंब सेवरी मंदार कदंब ॥ अंजीर औदुंबर पारिभद्र नभ ॥ भेदीत गेले गगनमार्गे ॥३॥
चंपक मोगरे जाई जुई ॥ मालती शेवंती बकुळ ठायी ठायी ॥ शतपत्र जपा अगस्तिवृक्ष पाही ॥ वेष्टोनि वरी चालिले ॥४॥
कनकवेली नागवेली परिकर ॥ पोवळवेली नाना लता सुवासकर ॥ द्राक्षद्वीप द्राक्षतरु सुंदर ॥ जायफळी डोलती फळभारे ॥५॥
बदके चातक मयूर ॥ कस्तूरीमृग जवादी मार्जार ॥ चक्रवाक नकुळ मराळ परिकर ॥ सरोवरतीरी क्रीडती ॥६॥
असो तया वनात ॥ कीर्तिमालिनीसमवेत ॥ क्रीडत असता अकस्मात ॥ एक अपूर्व वर्तले ॥७॥
दूरवरी भद्रायु विलोकीत ॥ तो स्त्री पुरुष येती धावत ॥ ऊर्ध्व करोनिया हस्त ॥ दीर्घस्वरे बोभाती ॥८॥
पाठी लागला महाव्याघ्र ॥ आक्रोशे बोभात विप्र ॥ म्हणे नृपा स्त्री पतिव्रता थोर ॥ मागे सुकुमार राहिली ॥९॥
गजबजोनि धाविन्नला नृप ॥ शर लावूनि ओढिले चाप ॥ तव तो व्याघ्र काळरूप ॥ स्त्रियेसी नेत धरूनिया ॥११०॥
राये शर सोडिले बहुत ॥ परी तो न गणी तैसाचि जात ॥ विजूऐसे शर अद्भुत ॥ अंगी भेदले तयाच्या ॥११॥
गिरिकंदरे ओलांडून ॥ व्याघ्र गेला स्त्रीस घेऊन ॥ विप्र रायापुढे येऊन ॥ शोक करी आक्रोशे ॥१२॥
अहा ललने तुजविण ॥ गृह वाटते महा अरण्य ॥ रायास म्हणे ब्राह्मण ॥ धिक् क्षत्रियपण धिक् जिणे ॥१३॥
तुज देखता सत्य ॥ माझ्या स्त्रीने केला आकांत ॥ अहा कांत पडले व्याघ्रमुखांत ॥ सोडवी मज यापासूनी ॥१४॥
तुजही हाका फोडिल्या बहुत ॥ धाव धाव हे जगतीनाथ ॥ धिक् तुझी शस्त्रे समस्त ॥ खङ्ग व्यर्थ गुरूने दीधले ॥१५॥
द्वादशसहस्त्र नागांचे बळ ॥ धिक् मंत्र अस्त्रजाळ ॥ क्षतापासोनि सोडवी तत्काळ ॥ शरणागता रक्षी तोचि पार्थिव ॥१६॥
धिक् आश्रम धिक् ग्राम ॥ जेथे नाही सत्समागम ॥ धिक् श्रोता धिक् वक्ता ॥ सप्रेम नाही किर्तन शिवाचे ॥१७॥
धिक् संपत्ति धिक् संतती ॥ द्विज न रक्षी न भेजे उमापती ॥ ते धिक् नारी पापमती ॥ पतिव्रता जे नव्हे ॥१८॥
मातापितयांसी शिणवीत ॥ धिक् पुत्र वाचला व्यर्थ ॥ धिक् शिष्य जो गुरुभक्त ॥ नव्हेचि मतवादी पै ॥१९॥
गुरूची झाकोनि पदवी ॥ आपुला महिमा विशेश मिरवी ॥ धिक् पार्थिव जो न सोडवी ॥ संकटी प्राण गेलिया ॥१२०॥
भद्रायु बोले उद्विग्न ॥ मी तु इछिले देईन । करी पुढती उत्तम लग्न ॥ अथवा राज्य दान घे माझे ॥२१॥
विप्र म्हणे कासया लग्न ॥ स्त्रीहीनास कासया धन ॥ जन्मांधासी दर्पण ॥ व्यर्थ काय दाऊनी ॥२२॥
मूढासी कासया उत्तम ग्रंथ ॥ तरुणासी संन्यास देणे हे अनुचित ॥ जरेने कवळिला अत्यंत ॥ त्याचे लग्न व्यर्थ जैसे ॥२३॥
तृषाक्रांतासी पाजिले धृत ॥ क्षुधातुरासी माळा गंधाक्षत ॥ चिंतातुरापुढे व्यर्थ ॥ गायन नृत्य कासया ॥२४॥
यालागी नलगे तुझे राज्य धन ॥ दे माझी स्त्री आणोन ॥ राव म्हणे जा कीर्तिमालिनी घेवोन ॥ दिधली म्या तुजप्रती ॥२५॥
रायाचे सत्त्व पाहे ब्राह्मण ॥ म्हणे दे कीर्तिमालिनी मज दान ॥ माझे तप मेरुपर्वताहून ॥ उंच असे न सरे कधी ॥२६॥
मी पापासी भीत नाही जाण ॥ अंगिकारिले तुझे स्त्रीरत्न ॥ सागरी ढेकुळ पडले येऊन ॥ तरी सागर काय डहुळेल ॥२७॥
धुळीने न मळे आकाश तैसा मी सदा निर्दोष ॥ राव म्हणे हे अपयश ॥ थोर आले मजवरी ॥२८॥
माझे बळ गेले तेज क्षणा ॥ व्याघ्रे नेली विप्रललना ॥ आता स्त्री देवोनि ब्राह्मणा ॥ अग्निकाष्ठे भक्षीन मी ॥२९॥
विप्रापुढे संकल्प करूनी ॥ दान दिधली कीर्तिमालिनी ॥ विप्र गुप्त झाला तेचि क्षणी ॥ राये अग्नि चेतविला ॥१३०॥
ज्वाळा चालिल्या आकाशपंथे ॥ मग स्नान केले नृपनाथे ॥ भस्म चर्चिले सर्वांगाते ॥ रुद्राक्षधारण पै केले ॥३१॥
आठवूनि गुरुचरण ॥ शिवमंत्र शिवध्यान ॥ प्रदक्षिणा करूनि तीन ॥ अग्निकुंडाभोवत्या ॥३२॥
जय जय शंकर उमारंगा ॥ मदनांतका भक्तभवभंगा ॥ विश्वव्यापका आराध्यलिंगा ॥ नेई वेगे तुजपाशी ॥३३॥
उडी टाको जाता ते वेळी ॥ असंभाव्य चेतला ज्वाळामाळी ॥ तव त्यामधून कपालमौली ॥ अपर्णेसहित प्रकटला ॥३४॥
दशभुज पंचवदन ॥ कर्पूरगौर पंचदशनयन ॥ पंचविंशतितत्त्वाहून ॥ पंचभूतावेगळा जो ॥३५॥
भद्रायूस ह्रदयी धरूनि सत्वर ॥ म्हणे सखया इच्छित माग वर ॥ तुझी भक्ति निर्वाण थोर ॥ देखोनि प्रकट झालो मी ॥३६॥
भद्रायु बोले सद्गदित ॥ म्हणे विप्रस्त्री आणून दे त्वरित ॥ ते ऐकोनि हासिन्नला गजमुखतात ॥ विप्र तो मीच झालो होतो ॥३७॥
व्याघ्रही मीच होऊन ॥ गेलो भवानीस घेऊन ॥ तुझी भक्ति पहावया निर्वाण ॥ दोघेही आम्ही प्रगटलो ॥३८॥
तुझी हे घे कीर्तिमालिनी ॥ म्हणोनि उभी केली तेचि क्षणी ॥ देव सुमने वर्षती गगनी ॥ राव चरणी लागतसे ॥३९॥
शिव म्हणे रे गुणवंता ॥ अपेक्षित वर मागे आता ॥ येरू म्हणे वज्रबाहु पिता ॥ सुमती माता महासती ॥१४०॥
पद्माकर गुणवंत ॥ कैलासी न्यावा स्त्रीसमवेत ॥ इतुक्यांसी ठाव यथार्थ ॥ तुजसमीप देईजे ॥४१॥
तुझिया पार्श्वभागी सकळ ॥ असोत स्वमी अक्षयी अढळ ॥ यावरी बोले पयःफेनधवल ॥ कीर्तिमालिनी तू माग आता ॥४२॥
ती म्हणे माता सीमंतिनी ॥ पिता चित्रांगद पुण्यखाणी ॥ तुजसमीप राहोत अनुदिनी ॥ शूळपाणी तथास्तु म्हणे ॥४३॥
तुम्ही उभयतानी मागितले ॥ ते म्या सर्व दिधले ॥ माझे चित्त गुंतले ॥ तुम्हापासी सर्वदा ॥४४॥
मग कीर्तिमालिनीसमवेत ॥ दहा सहस्त्र वर्षेपर्यंत ॥ भद्रायु राजा राज्य करीत ॥ हरिश्चंद्रासारिखे ॥४५॥
मग त्यावरी सकळी ॥ दिव्यदेह अवघी झाली ॥ दिव्य विमानी कपालमौली ॥ नेता झाला संनिध ॥४६॥
चित्रांगद सीमंतिनी ॥ वज्रबाहु सुमती राणी ॥ अवघी विमानारूढ होवोनी ॥ पावली शिवपद शाश्वत ॥४७॥
स्त्रीपुत्रांसमवेत पद्माकर ॥ भद्रायु कीर्तिमालिनी सुकुमार ॥ त्यासी विमान धाडूनि श्रीशंकर ॥ आपुल्या स्वरूपी मेळविले ॥४८॥
हे भद्रायुआख्यान ॥ परम यशदायक आयुष्यवर्धन ॥ ऐकता लिहिता जाण ॥ विजय कल्याण सर्वदा ॥४९॥
हे आख्यान जे म्हणत ॥ ते सर्वदा वादी अयवंत ॥ विजय धैर्य अत्यंत ॥ कीर्तिवंत सर्वांठायी ॥१५०॥
भद्रायुआख्यान पुण्य आगळे ॥ पद रचना ही बिल्वदळे ॥ उमावल्लभा वाहती भावबळे ॥ ते तरती संसारी ॥५१॥
भद्रायुआख्यान कैलासगिरी ॥ जो का पारायण प्रदक्षिणा करी ॥ त्याचा बंद तोडोनि मदनारी ॥ निष्पाप करी सर्वदा ॥५२॥
ब्रह्मानंदा सुखदायका ॥ श्रीधरवरदा कैलासनायका ॥ भक्तकामकल्पद्रुम गजांतका ॥ न येसी तर्का निगमागमा ॥५३॥
शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड ॥ स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ॥ परिसोत श्रोते अखंड ॥ अष्टमाध्याय गोड हा ॥१५४॥
॥श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु॥
श्री शिवलीलामृत अध्याय नववा
श्रीगणेशाय नमः ॥
जेथे शिवनामघोष निरंतर ॥ तेथे कैचे जन्ममरणसंसार ॥ तिही कळिकाळ जिंकिला समग्र ॥ शिवशिवछंदेकरूनिया ॥१॥
पाप जळावया निश्चिती ॥ शिवनामी आहे ज्याची आसक्ती ॥ त्यासी नाही पुनरावृत्ती ॥ तो केवळ शिवरूप ॥२॥
जैसे प्राणियाचे चित्त ॥ विषयी गुंतले अत्यंत ॥ तैसे शिवनामी होता रत ॥ तरी बंधन कैचे तया ॥३॥
धन इच्छा धरूनि चित्ती ॥ धनाढ्याची करिती स्तुती ॥ तैसे शिवनामी प्रवर्तती ॥ तरी जन्ममरण कैचे तया ॥४॥
राजभांडारीचे धन ॥ साधावया करिती यत्न ॥ तैसे शिवचरणी जडले मन ॥ तरी संकट विघ्न कैचे तया ॥५॥
धन्य ते शिवध्यानी रत ॥ येचिविषयी कथा अद्भुत ॥ नैमिषारण्यी सांगत ॥ सूत शौनकादिकांप्रती ॥६॥
वामदेव नामे महाज्ञानी ॥ शिवध्यानी रत विचरे काननी ॥ एकाकी निर्माय शांत दांत जनी ॥ त्रिविधभेदरहित जो ॥७॥
दिशा जयाचे अंबर ॥ भस्मचर्चित दिगंबर ॥ निराहार निरंतर ॥ एकलाचि हिंडतसे ॥८॥
काय करावे कोठे जावे ॥ काय घेवोनि काय त्यजावे ॥ विश्व शिवमय आघवे ॥ खेद मोह भेद नाही ॥९॥
अक्रोध वैराग्य इंद्रियदमन ॥ क्षमा दया कृपा समान ॥ निर्लोभ दाता भय शोक मान ॥ काळत्रयी न धरीच ॥१०॥
गृहापत्यदारावर्जित ॥ कोणी एक परिग्रह नाही सत्य ॥ कायावाचामनोदंडयुक्त ॥ मौनी न बोले इतरांसी ॥११॥
ज्ञानचरा शिवस्मरण ॥ त्याविण नेणेचि भाषण ॥ या नाव बोलिजे मौन ॥ भेदाभेदरहित जो ॥१२॥
सर्वांच्या अनुग्रहास्तव ॥ ते स्वरूप धरोनि विचरे शिव ॥ जडजीव तारावया सर्व ॥ विचरे सृष्टी स्वइच्छे ॥१३॥
कार्याकार्य सारूनि कारण ॥ आत्मस्वरूपी पावला समाधान ॥ देहत्रयरहित विधिनिषेधहीन ॥ प्रवृत्तिनिवृत्तिवेगळा ॥१४॥
निरंकुश जो निःसंग ॥ जैसा ब्रह्मारण्यी विचरे मातंग ॥ तयाची रीती अभंग ॥ वेदशास्त्रे वर्णिती ॥१५॥
तो स्वरूपी सदा समाधिस्थ ॥ गगन तेही अंगासी रुतत ॥ म्हणूनि तेही परते सारीत ॥ हेतुदृष्टांतवर्जित जो ॥१६॥
तेणे तेजाचे दाहकत्व जाळिले ॥ उर्वीचे कठिणत्व मोडिले ॥ चंचलत्व हिरोनि घेतले ॥ प्रभंजनाचे तेणे पै ॥१७॥
आर्द्रत्व निरसोन ॥ धुवोनि शुद्ध केले जीवन ॥ एवं पिंडब्रह्मांड जाळून ॥ भस्म अंगी चर्चिले ॥१८॥
ऐसा तो अमूर्तामूर्त ॥ केवळ शुक्र की जडभरत ॥ कौचारण्यी विचरत ॥ सर्वही देखत शिवरूप ॥१९॥
तो एक ब्रह्मराक्षस धावत ॥ महाभयानक शरीर अद्भुत ॥ कपाळी शेंदूर जिव्हा लळलळीत ॥ भयानक मुखाबाहेरी ॥२०॥
खदिरांगार तैसे नेत्र ॥ बहुत जीव भक्षिले अपरिमित ॥ क्षुधित तृषित पापी कुपात्र ॥ अकस्मात पातला ॥२१॥
महाहिंसक सर्वभक्षक ॥ तेणे वामदेव देखिला पुण्यश्लोक ॥ धावोनिया एकाएक ॥ कंठी घालीत मिठी त्याच्या ॥२२॥
लोह परिसासी झगटता पूर्ण ॥ तत्काळ होय दिव्य सुवर्ण ॥ तेवी त्याच्या अंगस्पर्शेकरून ॥ मति पालटली तयाची ॥२३॥
वामदेवांगीचे भस्म ॥ त्याच्या अंगी लागले उत्तम ॥ सत्त्ववृत्ति झाली परम ॥ असुरभाव पालटला ॥२४॥
आपुल्या अंगी झगटोन ॥ उद्धरिला पिशिताशन ॥ हे त्यासी नाहीच भान ॥ समाधिस्थ सर्वदा ॥२५॥
नेणे सुखदुःख शीतोष्ण ॥ लोक निंदिती की वंदिती पूर्ण ॥ शरीरी भोग की रोग दारुण ॥ हेही नेणे कदा तो ॥२६॥
मी हिंडतो देशी की विदेशी ॥ हेही स्मरण नाही त्यासी ॥ तो ब्रह्मानंद सौख्यराशी ॥ विधिनिषेधी स्पर्शेना ॥२७॥
ऐसा तो योगींद्र निःसीम ॥ त्याच्या अंगस्पर्शे पापे झाली भस्म ॥ दिव्यरूप होवोनि सप्रेम ॥ चरणी लागला तयाच्या ॥२८॥
सहस्त्र जन्मीचे झाले ज्ञान ॥ त्यासी आठव झाला संपूर्ण ॥ मानससरोवरी उदकपान ॥ करिता काक हंस होय ॥२९॥
की हाटकनदीतीरी देख ॥ पडता पाषाण काष्ठादिक ॥ दिव्य कार्तस्वर होय सुरेख ॥ तेवी राक्षस पै झाला ॥३०॥
की करिता सुधारसपान ॥ तेथे सहजचि आले देवपण ॥ की शशिकिरणस्पर्शेकरून ॥ द्रवे जैसा चंद्रकांत ॥३१॥
की रवि उगवता निःशेष ॥ निशा सरे प्रगटे प्रकाश ॥ तैसा उद्धरला राक्षस ॥ स्तवन करी तयाचे ॥३२॥
म्हणे गुरुवर्या ऐक पूर्ण ॥ मी तव दर्शने झालो पावन ॥ तुजसी करिता संभाषण ॥ वाटते पावेन शिवपदा ॥३३॥
मज सहस्त्रजन्मीचे झाले ज्ञान ॥ परी पंचवीस जन्मांपासून ॥ पापे घडली जी दारुण ॥ ती अनुक्रमे सांगतो ॥३४॥
पूर्वी मी राजा दुर्जय ॥ यौवनमदे अति निर्दय ॥ परम दुराचारी होय ॥ ब्राह्मण प्रजा पीडीत ॥३५॥
प्रजेसी नित करी मार ॥ आवडे तैसा विचारे स्वेच्छाचार ॥ वेद पुराण शास्त्र ॥ कैसे आहे मी नेणे ॥३६॥
स्वप्नीही नेणे कदा धर्म ॥ ब्रह्महत्यादि पापे केली परम ॥ नारी अपूर्व आणूनि उत्तम ॥ नित्य नूतन भोगी मी ॥३७॥
ऐशा स्त्रिया असंख्य भोगून ॥ बंदी घालूनि केले रक्षण ॥ सर्व देश धुंडोन॥ स्त्रिया नूतन आणवी ॥३८॥
एकदा भोग देऊन ॥ दुसर्याने तिचे न पाहावे वदन ॥ त्या बंदी रडती आक्रंदून ॥ शाप देती मजलागी ॥३९॥
विप्र पळाले राज्यांतून ॥ पट्टणे ग्रामे खेटके जाण ॥ इतुकीही धुंडोन ॥ स्त्रिया धरून आणिल्या ॥४०॥
भोगिल्या तीन शते द्विजनारी ॥ चार शते क्षत्रियकुमारी ॥ वैश्यस्त्रिया सुंदरी ॥ दहा शते भोगिल्या ॥४१॥
शूद्रांच्या सहस्त्र ललना ॥ चांडालनारी चार शते जाणा ॥ त्यावरी अपवित्र मांगकन्या ॥ सहस्त्र एक भोगिल्या ॥४२॥
चर्मककन्या पांच शत ॥ रजकांच्या चार शते गणित ॥ वारांगना असंख्यात ॥ मिती नाही तयाते ॥४३॥
पांच शते महारिणी ॥ तितुक्याच वृषली नितंबिनी ॥ यांवेगळ्या कोण गणी ॥ इतर वर्ण अष्टादश ॥४४॥
इतुक्या कामिनी भोगून ॥ तृप्त नव्हे कदा मन ॥ नित्य करी मद्यपान ॥ अभक्ष्य तितुके भक्षिले ॥४५॥
ऐसे भोगिता पापभोग ॥ मज लागला क्षयरोग ॥ मृत्यु पावलो सवेग ॥ कृतांतदूत धरोनि नेती ॥४६॥
यमपुरीचे दुःख अपार ॥ भोगिले म्यां अति दुस्तर ॥ तप्तताम्रभूमी तीवर ॥ मजलागी चालविले ॥४७॥
लोहस्तंभ तप्त करून ॥ त्यासी नेऊनि देवविती आलिंगन ॥ माझे घोर कर्म जाणून ॥ असिपत्रवनी हिंडविती ॥४८॥
कढईत तेल झाले तप्त ॥ त्यांत नेऊनि बुडवीत ॥ तोंडी घालिती नरक मूत ॥ पाप बहुत जाणोनी ॥४९॥
महाक्षार कटुरस आणोनी ॥ मुखी घालिती पासले पाडोनी ॥ तीक्ष्ण चंचूचे गृध्र येवोनी ॥ नेत्र फोडिती एकसरे ॥५०॥
कुंभीपात्री घालोनि शिजविती कर्णी तप्त लोहदंड दडपिती ॥ अहा तेथींची जाचणी किती ॥ सांगो आतां गुरुवर्या ॥५१॥
तेथे रक्तकुंड रेतकुंड दारुण ॥ त्यांत पचविती कित्येक दिन ॥ मांस तोडिती सांडसेकरून ॥ वरी शिंपिती क्षारोदक ॥५२॥
जिव्हा नासिक आणि कर्ण ॥ तीक्ष्ण शस्त्रे टाकिती छेदून ॥ हस्त पाद खंडून ॥ पोट फाडिती क्रूर शस्त्रे ॥५३॥
अंगाचा काढिती भाता ॥ तप्त शस्त्रे रोविती माथा ॥ शिश्न छेदून गुदद्वारी अवचिता ॥ तप्त अर्गळा घालिती ॥५४॥
सर्वांगासी टिपर्या लावून ॥ सवेंचि करिती पाशबंधन ॥ पृष्ठीकडे वाकवून ॥ चरणी ग्रीवा बांधिती ॥५५॥
बोटी बोटी सुया रोवून ॥ पाषाणे वृषण करिती चूर्ण ॥ हस्तपायी आणून ॥ पाषाणबेडी घालिती ॥५६॥
सहस्त्र वर्षै न लगे अंत ॥ ऐशिया नरकी बुडवीत ॥ एक येवोनि पाडिती दांत ॥ पाश घालिती ग्रीवेसी ॥५७॥
आपली विष्ठामूत्र ॥ बळेच भक्षविती यमदूत ॥ सवेचि अंगाचे तुकडे पाडीत ॥ दोष अमित जाणोनी ॥५८॥
श्यामशबलश्वान लावून ॥ चरचरा टाकिती फाडून ॥ एक शिरास्थि काढिती ओढून॥ एक मांस उकरिती ॥५९॥
लोहार्गळा उष्ण तीव्र ॥ पृष्ठी ह्रदयी करिती मार ॥ उखळी घालोनि सत्वर ॥ लोहतप्तमुसळे चेचिती ॥६०॥
तीक्श्ण औषधींचे रस आणिती ॥ नासिकद्वारे आत ओतिती ॥ सवेचि वृश्चिककूपी टाकिती ॥ बहुत विपत्ती भोगिल्या ॥६१॥
ज्यांचे विष परम दुर्धर ॥ ऐसे अंगासी डसविती विखार ॥ अग्निशिका लावोनि सत्वर ॥ हे शरीर भाजिले ॥६२॥
अंतरिक्ष असिधारे बैसवून ॥ पायी बांधिती जड पाषाण ॥ सवेंचि पर्वतावरी नेऊन ॥ ढकलूनि देती निर्दयपणे ॥६३॥
आतडी काढून निश्चिती ॥ ज्याची त्याजकडोन भक्षविती ॥ ऊर्ध्व नेवोनि टांगती ॥ आपटिती क्रोधभरे ॥६४॥
लोहकंटकी उभे करून ॥ करिती इंगळांचे आंथरूण ॥ मस्तकी घालूनिया पाषाण ॥ फोडोनि टाकिती मस्तक ॥६५॥
लौहचणक करूनि तप्त ॥ खा खा म्हणोनि दूत मारीत ॥ ओष्ठ धरोनि फाडीत ॥ तप्त सळ्या नाकी खोविती ॥६६॥
उफराटे टांगून ॥ ग्रीवेसी बांधोनि थोर पाषाण ॥ रीसव्याघ्रादिक आणोन ॥ विदारिती त्यांहाती ॥६७॥
गजपदाखाली चूर्ण ॥ करविती तप्तनीरप्राशन ॥ अष्टांगे कर्वतून ॥ वेगळाली टाकिती ॥६८॥
भयानक भूते भेडसाविती ॥ लिंग छेदूनि खा म्हणती ॥ सांधे ठायी ठायी मोडिती ॥ तीक्ष्ण शस्त्रेकरूनिया ॥६९॥
भूमीत रोवोनिया शरीर ॥ करिती बहुत शरमार ॥ सवेंचि शूळ परम तीव्र ॥ त्यावरी पालथे घालिती ॥७०॥
वरी मारिती मुसळघाये ॥ मग पाषाण बांधोनि लवलाहे ॥ नरकवापीत टाकिती पाहे ॥ अंत न लागे उतरता ॥७१॥
काचा शिसे यांचा रस करून ॥ बळेचि करविती प्राशन ॥ तेथे जात नाही कदा प्राण ॥ यातना दारुण भोगिता ॥७२॥
ऐशा तीन सहस्त्र वर्षैपर्यंत ॥ नरकयातना भोगिल्या बहुत ॥ त्यावरी मज ढकलोनि देत ॥ व्याघ्रजन्म पावलो ॥७३॥
दुसरे जन्मी झालो अजगर ॥ तिसरे जन्मी वृक भयंकर ॥ चौथे जन्मी सूकर ॥ सरडा झालो पाचवा ॥७४॥
सहावे जन्मी सारमेय सबळ ॥ सातवे जन्मी श्रृगाल ॥ आठव्याने गवय विशाळ ॥ गुरुवर्या मी झालो ॥७५॥
नववे जन्मी मर्कट प्रसिद्ध ॥ दहावे जन्मी झालो गर्दभ निषिद्ध ॥ त्यावरी नकुळ मग वायस विविध ॥ तेरावे जन्मी बक झालो ॥७६॥
चौदावे जन्मी वनकुक्कुट ॥ त्यावरी गीध झालो पापिष्ट ॥ मग मार्जारयोनी दुष्ट ॥ मंडूक त्यावरी जाण पा ॥७७॥
अठरावे जन्मी झालो कूर्म ॥ त्यावरी मत्स्य झालो दुर्गम ॥ सवेचि पावलो मूषकजन्म ॥ उलूक त्यावरी झालो मी ॥७८॥
बाविसावे जन्मी वनद्विरद ॥ त्यावरी उष्ट्रजन्म प्रसिद्ध ॥ मग दुरात्मा निषाद ॥ आतां राक्षस जन्मलो ॥७९॥
सहस्त्रजन्मीचे ज्ञान ॥ झाले स्वामी मज पूर्ण ॥ तव दर्शनाच्या प्रतापेकरून ॥ पावन झालो स्वामिया ॥८०॥
गंगास्नाने जळे पाप ॥ अत्रिनंदन हरि ताप ॥ सुरतरु दैन्य अमूप ॥ हरीत दर्शनेकरूनिया ॥८१॥
पाप ताप आणि दैन्य ॥ संतसमागमे जाय जळून ॥ यावरी वामदेव योगींद्र वचन ॥ बोलता झाला तेधवा ॥८२॥
एक विप्र होता महा अमंगळ ॥ शूद्र स्त्रियेसी रतला बहुत काळ ॥ तिच्या भ्रतारे साधूनि वेळ ॥ जीवे मारिले द्विजाते ॥८३॥
ग्रामाबाहेर टाकिले प्रेत ॥ कोणी संस्कार न करीत ॥ तो यमदूती नेला मारीत ॥ जाच बहुत भोगीतसे ॥८४॥
इकडे शिवसदन उत्तम ॥ त्यापुढे पडिले असे भस्म ॥ महाशिवरात्रिदिवशी सप्रेम ॥ भक्त पूजना बैसले ॥८५॥
त्या भस्मात श्वान सवेग ॥ येऊनि बैसले पाहे शिवलिंग ॥ भस्मचर्चित त्याचे अंग ॥ जात मग त्वरेने ॥८६॥
पडिले होते विप्रप्रेत ॥ त्यावरी गेले अकस्मात ॥ कुणपास भस्म लागत ॥ पापरहित झाला तो ॥८७॥
तो यमदूती नरकातूनि काढिला ॥ शिवदूती विमानी वाहिला ॥ कैलासास जावोनि राहिला ॥ संहारिला पापसमूग ॥८८॥
ऐसे हे पवित्र शिवभूषण ॥ त्याचे न वर्णवे महिमान ॥ राक्षस पुसे कर जोडून ॥ भस्ममहिमा सांगा कैसा ॥८९॥
भस्म कोणते उत्तम ॥ शिवभक्ती लावावे कैसा नेम ॥ यावरी वामदेव उत्तम ॥ चरित्र सांगे शिवाचे ॥९०॥
मंदरगिरी परमपवित्र ॥ उंच योजने अकरा सहस्त्र ॥ त्यावरी एकदा त्रिनेत्र ॥ देवासहित पातला ॥९१॥
यक्षगण गंधर्व किन्नर ॥ चारण पिशाच गुह्यक समग्र ॥ देव उपदेव पवित्र ॥ महेशा वेष्टूनि बैसले ॥९२॥
मरुद्गण पितृगण समस्त ॥ एकादश रुद्र द्वादशादित्य ॥ अष्ट वसु अष्ट भैरव सत्य ॥ अष्ट दिक्पाळ पातले ॥९३॥
अठ्ययंशी सहस्त्र ऋषीश्वर ॥ साठ सहस्त्र वालखिल्य ब्रह्मपुत्र ॥ पाताळनाग पृथ्वीचे नृपवर ॥ शंकरा वेष्टित बैसले ॥९४॥
विष्णु विधि पुरंदर ॥ शिवध्यान पाहती समग्र ॥ भूतांचे मेळे अपार ॥ मंदराचळी मिळाले ॥९५॥
सिंधुरवदन वीरभद्रकुमार ॥ साठ कोटी गण समग्र ॥ पुढे विराजे नंदिकेश्वर ॥ दुसरा मांदार शुभ्र दिसे ॥९६॥
तेथे आले सनत्कुमार ॥ साष्टांग करूनि नमस्कार ॥ स्तवन करूनि अपार ॥ विभूतिधारणविधी पुसती ॥९७॥
यावरी बोले जाश्वनीळ ॥ विभूति जाण तेचि निर्मळ ॥ शुद्ध करूनि गोमयगोळ ॥ मृत्तिकाकणविरहित ॥९८॥
ते वाळवूनि उत्तम ॥ मग करावे त्यांचे भस्म ॥ शुद्ध विभूति मग परम ॥ शिवगायत्रीने मंत्रिजे ॥९९॥
आधी अंगुष्ठे लाविजे ऊर्ध्व ॥ मग मस्तकाभोवते वेष्टिजे शुद्ध ॥ तर्जनी न लाविजे निषिद्ध ॥ कनिष्ठिका वेगळी करी ॥१००॥
दो बोटांनी लाविजे भाळी ॥ अंगुष्ठे मध्यरेखा तेजागळी ॥ तैसे त्रिपुंड्रधारण चंद्रमौळी ॥ सनत्कुमारा सांगत ॥१॥
तर्जनी न लाविता सर्वांगी विभूती ॥ त्रिबोटी लाविजे निश्चिती ॥ येणे महत्पापे भस्म होती ॥ शिवभूषणप्रसादे ॥२॥
अगम्यागमन सुरापान ॥ ब्रह्महत्या गोहत्या अभक्ष्यभक्षणा ॥ महत्पापांचे पर्वत जाण ॥ भस्मचर्चने भस्म होती ॥३॥
ऐसा भस्माचा महिमा वामदेव ॥ ब्रह्मराक्षसा सांगे सर्व ॥ विमान आले अपूर्व ॥ दिव्यरूप असुर झाला ॥४॥
कैलासाप्रति जाऊन ॥ राहिला शिवरूप होऊन ॥ वामदेव पृथ्वीपर्यटन ॥ स्वेच्छे करीत चालिला ॥५॥
सत्संगाचा महिमा थोर ॥ वामदेवासंगे तरला असुर ॥ भस्मलेपने भाळनेत्र ॥ सदा सुप्रसन्न भक्तांसी ॥६॥
मंत्र तीर्थ द्विज देव ॥ गुरु यज्ञ ज्योतिषी औषधी सर्व ॥ येथे जैसा धरिती भाव ॥ सिद्धि तैसी तयांसी ॥७॥
पांचाळ देशी नृपनाथ ॥ नाम जयाचे सिंहेकत ॥ जैसा शक्रनंदन की तृतीय सुत ॥ पृथादेवीचा पुरुषार्थी ॥८॥
मृगयेस गेला तो भूपाळ ॥ मागे चालत धुरंधर दळ ॥ शबरांचेही मेळ ॥ बहुसाल निघती तयासवे ॥९॥
वनोवनी हिंडता भूपाळक ॥ शबर एक परम भाविक ॥ भग्न शिवालय एक ॥ गेला त्यात निषाद तो ॥११०॥
उन्मळोनि पडले दिव्य लिंग ॥ पंचसूत्री रमणीय़ अभंग ॥ सिंहकेतरायाते सवेग ॥ दाविता झाला तेधवा ॥११॥
राजा म्हणे लिंग चांगले ॥ परीपाहिजे भावे पूजिले ॥ उगेचि देवार्चन मांडिले ॥ दंभेकरूनि लौकिकी ॥१२॥
लौकिकी मिरवावया थोरपण ॥ प्रतिमा ठेविल्या सोज्वळ करून ॥ जेवी कांसारे मांडिले दुकान ॥ प्रतिमाविक्रय करावया ॥१३॥
ब्राह्मणवेष घेवोनि शुद्ध ॥ यात्रेत हिंडती जैसे मैंद ॥ की मार्गघ्न वाटेत साधुसिद्ध ॥ वेष धरूनि बैसले ॥१४॥
काळनेमी साधुवेष धरून ॥ वाटेत बैसला करावया विघ्न ॥ एवं भावेविण देवतार्चन ॥ व्यर्थ काय दांभिक ॥१५॥
शबरासी म्हणे नृपसत्तम ॥ तुज हे लिंग सांपडले उत्तम ॥ निषाद म्हणे पूजनक्रम ॥ कैसा आहे सांग पा ॥१६॥
विनोदे बोले नृपवर ॥ पूजेचे आहेत बहुत प्रकार ॥ परी चिताभस्म पवित्र ॥ नित्य नूतन आणावे ॥१७॥
चिताभस्माविण ॥ नैवेद्य करू नये समर्पण ॥ हेचि मुख्य वर्म जाण ॥ शैवलक्षण निष्ठेचे ॥१८॥
नृपवचन मानूनि यथार्थ ॥ शबर लिंग घरा आणीत ॥ शबरीस सांगे वृत्तांत ॥ हर्षभरित ते झाली ॥१९॥
सुमुहूर्तै शिवलिंग स्थापून ॥ दोघे पूजिती एकनिष्ठेकरून ॥ चिताभस्म नित्य नूतन ॥ आणिती मेळवून साक्षेपे ॥१२०॥
एकार्ती होताचि सुंदरी ॥ नैवेद्य आणीत झडकरी ॥ उभयता जोडल्या करी ॥ शिवस्तवनी सादर ॥२१॥
ऐसे नित्य करिता पूजन ॥ लोटले कित्येक दिन ॥ त्यांची निष्ठा पहावया पूर्ण ॥ केले नवल पंचवदने ॥२२॥
ऐसे एकदा घडोनि आले ॥ चिताभस्म कोठे न मिळे ॥ शबरे बहुत शोधिले ॥ अपार क्रमिले भूमंडळ ॥२३॥
परतोनि सदनासी येत ॥ शबरीस सांगे वृत्तांत ॥ तेही झाली चिंताक्रांत ॥ म्हणे पूजन केवी होय ॥२४॥
केले शिवपूजन उत्तम ॥ परी न मिळता चिताभस्म ॥ तो शबर भक्तराज परम ॥ नैवेद्य शिवासी अर्पीना ॥२५॥
शिवदीक्षा परम कठीण ॥ निष्ठा पाहे उमारमण ॥ शबरी म्हणे प्रियालागून ॥ मी आपुले भस्म करिते आता ॥२६
पाकसदनी बैसोन ॥ लावोनि घेते आता अग्न ॥ ते चिताभस्म चर्चून ॥ सांबपूजन करावे ॥२७॥
मग शुचिर्भूत होवोनी शबरी ॥ शिवध्यान स्मरण करी ॥ अग्नि लावोनी झडकरी ॥ भस्म करी कलेवर ॥२८॥
शबर घेवोनि ते भस्म ॥ चर्ची सदाशिवासी सप्रेम ॥ परी नैवेद्य आणावया उत्तम ॥ दुसरे कोणी नसेचि ॥२९॥
भोळा चक्रवर्ती उदार ॥ तारावया धैर्य पाहे शंकर ॥ आसन घालोनि शबर ॥ परम सादर शिवार्चनी ॥१३०॥
शबरी उत्तम पाक करून ॥ नित्य येत नैवेद्य घेवोन ॥ शबर एकार्ती करून ॥ पूर्वाभ्यासे बोलावीत ॥३१॥
एकार्ती होतांचि सदाशिवा ॥ त्रुटी न वाजता नैवेद्य दावावा ॥ विलंब होता महादेवा ॥ क्षोभ अत्यंत पै होय ॥३२॥
सर्व अन्याय क्षमा करी शंकर ॥ परी नैवेद्यासी होता उशीर ॥ क्षोभोनि जातो श्रीशंकर ॥ उशीर अणुमात्र सोसेना ॥३३॥
शबर आनंदमय शिवार्चनी ॥ स्त्रियेने शरीर जाळिले हे नाठवे मनी ॥ म्हणे ललने नैवेद्य आणी ॥ तव पाठीसी उभी घेवोनिया ॥३४॥
रंभा उर्वशी मेनका सुंदरी ॥ त्यांहूनि दिव्यरूप झाली शबरी ॥ चतुर्विध नैवेद्य करी ॥ देत पतीच्या तेधवा ॥३५॥
नैवेद्य अर्पूनि शबर ॥ पूजा झाली षोडशोपचार ॥ दोघे जोडोनिया कर ॥ स्तवन करी शिवाचे ॥३६॥
जय जय अनंतब्रह्मांडनायका ॥ जय जय शिव मायाचक्रचालका ॥ दुर्जनदमना मदनांदका ॥ भवहारका भवानीपते ॥३७॥
पूजन झाले संपूर्ण ॥ शबर पाहे स्त्री विलोकून ॥ अलंकारमंडित सद्गुण ॥ आपणही शिवरूप जाहला ॥३८॥
एक नीलकंठ वेगळा करून ॥ शिवभक्त शिवसमान ॥ तव आले दिव्य विमान ॥ वाद्ये अपार वाजती ॥३९॥
येत दिव्यसुमनांचे परिमळ ॥ आश्चर्य करी सिंहकेतनृपाळ ॥ विमानी बैसवूनि तत्काळ ॥ शिवपद पावली दोघेही ॥१४०॥
राव म्हणे विनोदेकरून ॥ म्यां सांगितले चिताभस्मपूजन ॥ परी धन्य शबराचे निर्वाण ॥ उद्धारोनि गेला कैलासा ॥४१॥
धन्य ते शबरी कामिनी ॥ देह समर्पिला शिवार्चनी ॥ एवं एकनिष्ठ देखिल्यावांचोनी ॥ पिनाकपाणी प्रसन्न नव्हे ॥४२॥
सिंहकेतासी लागला तोचि छंद ॥ सर्वदा शिवभजनाचा वेध ॥ शिवलीलामृत प्रसिद्ध ॥ श्रवण करी सर्वदा ॥४३॥
शिवरात्री प्रदोष सोमवार ॥ व्रते आचरे प्रीती नृपवर ॥ शिवप्रीत्यर्थ उदार ॥ धने वाटी सत्पात्री ॥४४॥
ऐसे करिता शिवभजन ॥ सिंहकेत शिवरूप होवोन ॥ शिवपदी राहिला जावोन ॥ धन्य भजन निष्ठेचे ॥४५॥
शिवलीलामृतमंडपी सुरवाडली ॥ चढत जात श्रीधरवाग्वल्ली ॥ अहळबहळ पसरली ॥ ब्रह्मानंदेकरूनिया ॥४६॥
ते छाया सघन अत्यंत ॥ तेथे बैसोत शिवभक्त ॥ प्रेमद्राक्षफळे पक्व बहुत ॥ सदा सेवोत आदरे ॥४७॥
श्रीधरवरदा ब्रह्मानंदा ॥ मृडानीह्रदयाब्जमिलिंदा ॥ कैवल्यपददायक अभेदा ॥ लीला अगाध बोलवी पुढे ॥४८॥
शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड ॥ स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ॥ परिसोत सज्जन अखंड ॥ नवमाध्याय गोड हा ॥१४९॥
इति नवमोऽध्यायः ॥९॥
॥श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु॥
श्री शिवलीलामृत अध्याय दहावा
श्रीगणेशाय नमः ॥
कामगजविदारकपंचानना ॥ क्रोधजलदविध्वंसप्रभंजना ॥ मदतमहारकाचंडकिरणा ॥ चंद्रशेखरा वृषभध्वजा ॥१॥
मत्सरदुर्धराविपिनदहना ॥ दंभनगच्छेदका सहस्त्रनयना ॥ अहंकार अंधकारसुरमर्दना ॥ धर्मवर्धना भालनेत्रा ॥२॥
आनंदकैलासनगविहारा ॥ निगमागमवंद्या सुहास्यवक्रा ॥ दक्षमखदलना आनंदसमुद्रा ॥ ब्रह्मानंदा दयानिधे ॥३॥
नवामाध्यायाचे अंती ॥ उद्धरिला शबर सिंहकेतनृपती ॥ यावरी सूत शौनकादिकांप्रती ॥ नैमिषारण्यी सांगत ॥४॥
आनर्तदेशी वास्तव्य करीत ॥ एक द्विज नामे देवरथ ॥ वेदाध्ययनी शास्त्ररत ॥ पंडित आणि वंशज होय ॥५॥
त्याची कन्या चातुर्यखाणी ॥ शारदा नामे कमलनयनी ॥ जिचे स्वरूप देखोनी ॥ जन होती तटस्थ ॥६॥
तव ते झाली द्वादशवर्षी ॥ पित्याने लग्न करूनि संभ्रमेसी ॥ पद्मनाभद्विजासी ॥ देता झाला विधियुक्त ॥७॥
तोही परम अधीत ब्राह्मण ॥ सभाग्य आणि वेदसंपन्न ॥ जयाची विद्या पाहोन ॥ राजे होती तटस्थ ॥८॥
लग्नसोहळा जाहलियावरी ॥ काही दिवस होता श्वशुरघरी ॥ सायंकाळी नदीतीरी ॥ संध्यावंदनासी तो गेला ॥९॥
परतोन येता अंधार ॥ पायास झोंबला दुर्धर विखार ॥ तेथेच पडिले कलेवर ॥ नगरात हाक जाहली ॥१०॥
मातापित्यासमवेत ॥ शारदा धावोनि आली तेथ ॥ गतप्राण देखोनि प्राणनाथ ॥ शरीर घालीत धरणीवरी ॥११॥
म्हणे विद्याधनाचे सतेज ॥ आजि बुडाले माझे जहाज ॥ वोस पडली सेज ॥ बोले गुज कोणासी ॥१२॥
माझे बुडाले भांडार ॥ सर्परूपे वरी पडला तस्कर ॥ दग्ध झाली आभरणे समग्र ॥ म्हणोनि टाकी तोडोनिया ॥१३॥
देखोनि शारदेची करूणा ॥ अश्रु आले जनांचिया नयना ॥ म्हणती अहा पशुपते भाललोचना ॥ हे आता करील काय ॥१४॥
मग त्या विप्राचे करूनि दहन ॥ माता पिता बंधु आप्तजन ॥ शारदेशी संगे घेऊन ॥ सदनाप्रति गेले ते ॥१५॥
कित्येक दिवस झालियावरी ॥ घरची कार्यास गेली बाहेरी ॥ शारदा एकली मंदिरी ॥ तव एक अपूर्व वर्तले ॥१६॥
नैध्रुव नामे ऋषीश्वर ॥ वृद्ध तपस्वी गेले नेत्र ॥ शिष्य हाती धरोनि पवित्र ॥ सदना आला शारदेच्या ॥१७॥
शारदा आसन देऊनि सत्वर ॥ पूजन करोनि करी नमस्कार ॥ नैध्रुव म्हणे सौभाग्य वाढो अपार ॥ हो तुज पुत्र वेदवक्ता ॥१८॥
विप्रास न दिसे केवळ अंध ॥ अमोघ वदला आशीर्वाद ॥ हासोनि शारदा करी खेद ॥ शोक करी दुःखभरे ॥१९॥
म्हणे हे अघटित घडे केवी पूर्ण ॥ सांगितले पूर्ववर्तमान ॥ नैध्रुव म्हणे माझे वचन ॥ असत्य नोहे कल्पांती ॥२०॥
माझे जिव्हेबाहेर आले ॥ ते माघारे न सरे कदाकाळे ॥ माझे तपानुष्ठान वेगळे ॥ अघटित तेचि घडवीन ॥२१॥
घरची बाहेरूनि आली त्वरित ॥ माता पिता बंधु समस्त ॥ समूळ कळला वृत्तांत ॥ म्हणती विपरीत केवी घडे ॥२२॥
ऋषीचा आशीर्वाद अमोघ पवित्र ॥ क्षणे रंकाचा करी सहस्त्रनेत्र ॥ शापे न लागता क्षणमात्र ॥ कुळासहित संहारीत ॥२३॥
शापबळेचि विशेष ॥ सर्प केला राजा नहुष ॥ यादवकुळ निःशेष ॥ भस्म झाले ब्रह्मशापे ॥२४॥
ब्राह्मणी क्षोभोनि निर्धारी ॥ शुक्राची संपत्ति घातली सागरी ॥ ब्रह्मशापे मुरारी ॥ अंबऋषीचे जन्म घेत ॥२५॥
विधिहरिहर चित्ती ॥ ब्रह्मशापाचे भय वाहती ॥ विप्रशापे राव परिक्षिती ॥ भस्म झाला क्षणार्धे ॥२६॥
जमदग्नीचा क्रोध परम ॥ चौघे पुत्र केले भस्म ॥ स्त्रिया असता पांडुराजसत्तम ॥ भोग नाही सर्वदा ॥२७॥
विप्रशापाची नवलगती ॥ साठ सहस्त्र सागर जळती ॥ कुबेरपुत्र वृक्ष होती ॥ नारदशापेकरोनिया ॥२८॥
कृष्णासहित यादवकुळ ॥ ब्रह्मशापे भस्म झाले सकळ ॥ दंडकाऐसा नृपाळ ॥ क्षणमात्रे दग्ध केला ॥२९॥
ब्रह्मशाप परम दृढ ॥ नृगराज केला सरड ॥ धराधरशत्रु बळप्रचंड ॥ सहस्त्रभगे त्या अंगी ॥३०॥
क्षयरोगी केला अत्रिनंदन ॥ मेदिनीवसनाचे केले आचमन ॥ शाप देवोनि सूर्यनंदन ॥ दासीपुत्र केला पै ॥३१॥
पाषाणाचे करिती देव ॥ रंकाचेही करिती राव ॥ मंत्राक्षता टाकिता नवपल्लव ॥ कोरड्या काष्ठा फुटेल की ॥३२॥
ब्राह्मण थोर त्रिजगती ॥ हे ब्रह्मांड मोडोनि पुन्हा घडती ॥ यावरी नैध्रुव तियेप्रती ॥ बोलता झाला ते ऐका ॥३३॥
म्हणे ऐके शारदे यथार्थ ॥ तू धरी उमामहेशव्रत ॥ षडक्षरमंत्र विधियुक्त ॥ नित्य जप करावा ॥३४॥
म्हणे या व्रताचे फळ होय पूर्ण ॥ तववरी मी येथेचि राहीन ॥ मग त्याच्या अंगणात मठ करून ॥ राहाता झाला नैध्रुव तो ॥३५॥
म्हणे व्रताचा आरंभ प्रेमेसी ॥ करावा जाण चैत्रमासी ॥ अथवा मार्गशीर्षेसी ॥ शुक्लपक्षी करावा ॥३६॥
पाहोनि सुमुहूर्त सोमवर ॥ अष्टमी चतुर्दशी परिकर ॥ पूजावा उमामहेश्वर ॥ एक संवत्सर नेमेसी ॥३७॥
गुरुवचन शारदा ऐकोन ॥ तैसेचि करी न पडे न्यून ॥ नैधुवगुरूपासून ॥ षडक्षर मंत्र घेतला ॥३८॥
दिव्य शिवमंदिर करून ॥ वरी दिधले शुभ्र वितान ॥ चारी स्तंभ शोभायमान ॥ नानाफळे शोभताती ॥३९॥
अष्टगंधे सुवाससुमने ॥ भूमी शोधूनि रंगमाळा आस्तरणे ॥ षोडशवर्ण यंत्र करणे ॥ अष्टदळे तयामाजी ॥४०॥
तयामाजी चतुर्दळ ॥ त्यावरी घालोनि तांदूळ ॥ वरी घट स्थापूनि अढळ ॥ शोभा बहुत आणिजे ॥४१॥
उमामहेशप्रतिमा दोन्ही ॥ स्थापिजे सुवर्णाच्या करोनी ॥ मग एकनिष्ठा धरूनि ॥ षोडशोपचारी पूजिजे ॥४२॥
यथासांग ब्राह्मणसंतर्पण ॥ सुवासिनी पूजिजे प्रीतीकरून ॥ षड्रस चतुर्विध अन्न ॥ द्यावे भोजन तृप्तीवरी ॥४३॥
पुराणश्रवण कीर्तन ॥ येणेचि करावे जागरण ॥ गुरुवचनी विश्वास पूर्ण ॥ धरूनि वर्तणे सर्वदा ॥४४॥
कुंदेदुर्वण केवळ ॥ कर्पूरगौर पयःफेनधवल ॥ ज्योतिर्मय शुभ्र तेजाळ ॥ रजतवर्ण निर्मळ जो ॥४५॥
सूर्यकोटिसम तेज विरजित ॥ शुभ्र आभरणी भूषित ॥ जगदानंदकंद गुणातीत ॥ स्वर्धुनी विराजित मस्तकी ॥४६॥
शुभ्रजटामुकुटमंडित ॥ सर्प मणियुक्त विराजित ॥ किशोरचंद्र भाळी मिरवत ॥ भस्मचर्चित शुभ्र दिसे ॥४७॥
उन्मीलित भाललोचन ॥ केयूरांगद शुभ्र वीरकंकण ॥ मुंडमाळा शोभायमान ॥ दिसती लोचन सूर्येदुवत ॥४८॥
दिव्यगरुडपाचूहूनि वरिष्ठ ॥ विराजमान दिसेनीलकंठ ॥ दशभुज आयुधे सघट ॥ झळकती प्रळयचपळेऐसी ॥४९॥
खट्वांग त्रिशूळ कपाल डमरू ॥ अंकुश पाश घंटा नागधरू ॥ पिनाक पाशुपत कमलतेजाकारू ॥ शुभ्रवर्ण आयुधे ॥५०॥
शुभ्र तेजस्वी शार्दूलचर्मवसन ॥ शुभ्र स्फटिकवर्ण गजाजिन ॥ मणिमय शुभ्र सिंहासन ॥ नाना रत्ने विराजित ॥५१॥
कैलासगिरी शुभ्रवर्ण ॥ वरी मंडप शुभ्र सहस्त्रयोजन ॥ स्तंभविरहित सहस्त्रकिरण ॥ गगनी जेवी प्रकाशे पै ॥५२॥
ऐरावताहूनि विशाळ शुभ्र ॥ पुढे शोभे नंदिकेश्वर ॥ मणिमय कुंडले सुंदर ॥ शेष तक्षक झळकती ॥५३॥
ब्रह्मानंदसुख मुरोन ॥ ओतिले शिवस्वरूप सगुण आता भवानीचे ध्यान ॥ शारदा ध्यानी आणीत ॥५४॥
बाला तन्वंगी सुंदर ॥ विराजमान चंद्रशेखर ॥ चतुर्भुज पाशांकुशधर ॥ गदापद्मयुक्त जे ॥५५॥
सुरतरुसुमनमाळायुक्त ॥ मल्लिकाबकुळमळी विराजित ॥ इभमुक्तावतंस डोलत ॥ शोभा अद्भुत कोण वर्णी ॥५६॥
हरिमध्या भुजंगवेणी ॥ जलजवदना आकर्णनयनी ॥ द्वादशादित्यशोभा जघनी ॥ कांचीवरी झळकतसे ॥५७॥
मागे स्त्रिया वर्णिल्या बहुत ॥ निःसीमरूपलक्षणयुक्त ॥ ओवाळूनि टाकाव्या समस्त ॥ जिच्या पादांगुष्ठावरूनी ॥५८॥
कोटिमन्मथशोभा साजिरी ॥ त्रिभुवनजननी त्रिपुरसुंदरी ॥ ब्रह्मांड फोडोनिया वरी ॥ आंगींचा सुवास धावत ॥५९॥
पदमुद्रा जेथे उमटती ॥ तेथे आरक्तकमळे उगवती ॥ द्विजपंक्तीचा रंग पडता क्षिती ॥ खडे होती दिव्यमणि ॥६०॥
या ब्रह्मांडमंडपात देख ॥ ऐसे स्वरूप नाही आणिक ॥ शशि मित्र द्विमुख ॥ जिच्या तेजे शोभती ॥६१॥
विधिशक्रादि बाळे अज्ञान ॥ स्नहे निजगर्भी करी पाळण ॥ समस्त त्रिभुवनलावण्य ॥ ओतिले स्वरूप देवीचे ॥६२॥
विशाल ताटके प्रभा घन ॥ ओतिली शशिमित्रतेज गाळून ॥ गंडस्थळी प्रभा पूर्ण ॥ पडली झळके अत्यंत ॥६३॥
बिंबाधर अतिरिक्त ॥ नासिकींचे वरी डोलता मुक्त ॥ प्रवाळचि केवळ भासत ॥ तेज अमित न वर्णवे ॥६४॥
नेत्रांजनप्रभा पडली मुक्तशिरी ॥ तो गुंजेऐसे दिसे क्षणभरी ॥ जगन्माता हास्य करी ॥ तो रंग दिसे शुभ्र मागुती ॥६५॥
ओळीने बैसल्या हंसपंक्ती ॥ तैसे द्विज हासता झळकती ॥ मुक्तशुभ्रवर्ण मागुती ॥ हैमवतीचे झळकती ॥६६॥
दंतपंक्ती शुभ्र अत्यंत ॥ अधरप्रभेने आरक्त भासत ॥ डाळिंबबीज पक्व शोभत ॥ क्षणैक तैसे दीसती ॥६७॥
कंठीचे मुक्ताहार संपूर्ण ॥ दिसती इंद्रनीळासमान ॥ श्यामलांगप्रभा दैदीप्यमान ॥ मुक्तामाजी बिंबली ॥६८॥
कमंडलु तेजस्वी सुंदर ॥ तेवी विश्वजननिचे पयोधर ॥ कुमार आणि इभवक्र ॥ ज्यातील अमृत प्राशिती ॥६९॥
प्रळयचपळा गाळोनि समग्र ॥ रंगविले वाटे देवीचे अंबर ॥ मुक्तालग कंचुकी प्रभाकर ॥ बाहुभूषणे झळकती ॥७०॥
इंद्रनीलकीलवर्णी ॥ लीलावेषधारिणी ॥ भक्तानुग्रहकारिणी ॥ प्रलयरूपिणी आदिमाता ॥७१॥
आदिपुरुषाची ज्ञानकळा ॥ घडी मोडी ब्रह्मांडमाळा ॥ जिचे स्वरूप पाहता डोळा ॥ जाश्वनीळा धणी न पुरे ॥७२॥
कृत्तिकापुंज झळके गगनी ॥ तैसे जलजघोस डोलती कर्णी ॥ अरुणसंध्यारागा उणे आणी ॥ कुंकुमरेखा आरक्तपणे ॥७३॥
विश्वप्रलयी शिव सगुणपण ॥ टाकोनि होता तत्काळ निर्गुण ॥ परी तिचे सौभाग्य गहन ॥ ताटंककुंकुममहिमा हा ॥७४॥
दोन वेळा वरिले कर्पूरगौरा ॥ भवानीने लाविला कपाळी बिजवरा ॥ तांबूलरेखांकितवदनचंद्रा ॥ अपार कवी वर्णिती ॥७५॥
प्रयागी त्रिवेणी जैसी ॥ अंबेची वेणी शोभे तैसी ॥ कृष्णवर्ण कुरळ निश्चयेसी ॥ आदित्यनंदिनी होय ते ॥७६॥
शुभ्र हार गुंफिला दिव्यसुमनी ॥ तेचि ब्रह्मांडावरूनि स्वर्धुनी ॥ माजी आरक्तपुष्पे दिसती नयनी ॥ पद्मजनंदिनी ॥ गुप्त ते ॥७७॥
मूदराखडी मच्छकच्छादि अलंकार ॥ हे प्रयागी तळपती जलचर ॥ केशाग्री गुच्छ विशाळ थोर ॥ सागराकार शोभती ॥७८॥
काय ब्रह्मांडे गुंफिली सकळ ॥ तेचि डोलत मोहनमाळ ॥ जीवशिव दोन्ही तेजाळ ॥ आवरोनि धरिले दोन पक्षी ॥७९॥
अक्षय सौभाग्य नव्हे खंडन ॥ म्हणून वज्रचूडेमंडित कर जाण ॥ दशांगुळी मुद्रिका बंधु जनार्दन ॥ दशावतार नटलासे ॥८०॥
पायी नुपुरे पैंजण ॥ गर्जता शिव समाधि विसरून ॥ पाहे मुखचंद्र सावधान ॥ नेत्रचकोरे करोनिया ॥८१॥
भक्त जे का एकनिष्ठ ॥ पायी दोल्हारे जोडवी अनुवट ॥ ऐसे स्वरूप वरिष्ठ ॥ शारदा ध्यात ब्रह्मानंदे ॥८२॥
ऐसे एक संवत्सरपर्यंत ॥ आचरली उमामहेश्वरव्रत ॥ नैध्रुव उद्यापन करवित ॥ यथाविधिप्रमाणे ॥८३॥
अकरा शते दंपत्ये ॥ वस्त्र अलंकारदक्षिणायुक्त ॥ पूजोनि शारदा हर्षभरित ॥ तव रवि अस्त पावला ॥८४॥
जप ध्यान कीर्तन करीत ॥ शारदा गुरुजवळी बैसत ॥ अर्धयामिनी झालिया अकस्मात ॥ भवानी तेथे प्रगटली ॥८५॥
असंभाव्य तेज देखोनी ॥ नैध्रुवासी नेत्र आले तेचि क्षणी ॥ नैध्रुव शारदा लागती चरणी ॥ प्रेमभावेकरूनिया ॥८६॥
देवीचे करिती स्तवन ॥ उभे ठाकती कर जोडून ॥ परी त्या दोघांवाचून ॥ आणिक कोणी न देखती ॥८७॥
जय जय भवानी जगदंबे ॥ मूळप्रकृतिप्रणवस्वयंभे ॥ ब्रह्मानंदपददायिनी सर्वारंभे ॥ चिद्विलासिनी तू माये ॥८८॥
धराधरेंद्रनंदिनी ॥ सौभाग्यसरिते हेरंबजननी ॥ भक्तह्रदयारविंदचिन्मयखाणी ॥ वेदपुराणी वंद्य तू ॥८९॥
तुझिये कृपे निश्चिती ॥ गर्भांधासी नेत्र येती ॥ मागे सांडूनि पवनगती ॥ पांगुळ धावती कृपे तुझ्या ॥९०॥
मुके होतील वाचाळ ॥ मूर्ख पंडित होय तात्काळ ॥ रत्ने होती सिकताहरळ ॥ गारा होती चिंतामणी ॥९१॥
भवभयहारके भवानी ॥ भक्तपाळके मनोल्हासिनी ॥ वेदमाते द्विजजनरंजनी ॥ वेधले ध्यानी ब्रह्मादिक ॥९२॥
त्रिपुरसुंदरी त्रिभुवनजननी ॥ दोषत्रयहारके त्रितापशमनी ॥ त्रिकाळ जे सादर तव ध्यानी ॥ त्रिदेहविरहित ते ॥९३॥
शिवमानससरोवरमराळिके ॥ जय जय विज्ञानचंपककळिके ॥ सकळ ऐश्वर्यकल्याणदायके ॥ सर्वव्यापके मृडानी ॥९४॥
ऐसे ऐकता सुप्रसन्न ॥ देवी म्हणे माग वरदान ॥ नैध्रुवे वृत्तांत मुळींहून ॥ शारदेचा सांगितला ॥९५॥
मम मुखांतूनि वचन आले ॥ ते अंबे पाहिजे सत्य केले ॥ तुवा जरी मनी धरिले ॥ तरि काय एक न करिसी ॥९६॥
यावरी शिवजाया बोले वचना ॥ हे शारदा पूर्वी शुभानना ॥ द्रविडदेशी विप्रकन्या ॥ नाम भामिनी इयेचे ॥९७॥
इच्या भ्रतारासी स्त्रिया दोघीजणी ॥ ही धाकुटी प्रिया मृदुभाषिणी ॥ इणे वर वश करोनी ॥ वडील कामिनी विघडविली ॥९८॥
शेजारी एक जार होता ॥ तो ईस बहुत दिवस जपत असता ॥ एकांत पाहोन इच्या हाता ॥ धरिता झाला दुर्बुद्धि ॥९९॥
इणे नेत्र करोनि आरक्त ॥ झिटकाविला तो जार पतित ॥ मग तो होवोनि खेदयुक्त ॥ गृहासी गेला दुरात्मा ॥१००॥
इचे त्यासी लागले ध्यान ॥ सुरतआलिंगन आठवून ॥ इच्या ध्यासेकरून ॥ तो जार मृत्यु पावला ॥१॥
ईस विधवा हो म्हणून ॥ इच्या सवतीने शापिले दारुण ॥ मग तीही पावली मरण ॥ इच्या दुःखेकरूनिया ॥२॥
मग हेही काळे मृत्यु पावली ॥ तेचि शारदा हे जन्मली ॥ पूर्वीच्या जारे ईस वरिली ॥ ये जन्मी जाण निर्धारे ॥३॥
तोचि पद्मनाभ ब्राह्मण ॥ गेला इसी दावा साधून ॥ इचा पूर्वजन्मींचा भ्रतार जाण ॥ द्रविडदेशी आहे आता ॥४॥
तीनशेसाठ योजन ॥ येथोनि दूर आहे ब्राह्मण ॥ स्त्रीहीन इचे स्वरूप आठवून ॥ तळमळीत सर्वदा ॥५॥
तो ईस स्वप्नामध्ये नित्य येवोन ॥ भोग देईल प्रीतीकरून ॥ जागृतीहूनि विशेष जाण ॥ सुख होईल इयेते ॥६॥
ऐसे लोटता बहुत दिवस ॥ पुत्र एक होईल शारदेस ॥ शारदानंदन नाम तयास ॥ लोकी विख्यात जाण पा ॥७॥
ईस नित्य भोगी होईल जो हरिख ॥ तैसाच विप्र पावेल सुख ॥ स्वप्नानंदे विशेष देख ॥ तृप्ति होईल निर्धारे ॥८॥
ऐसे तयासी सागोन ॥ अंबा पावली अंतर्धान ॥ त्यावरी शारदा नित्य स्वप्न ॥ देखती झाली तैसेचि ॥९॥
तव ती झाली गरोदर ॥ जन निंदा करितीसमग्र ॥ दीर भावे सासू श्वशुर ॥ आप्त सोयरे सर्व आले ॥११०॥
देवीचे करणे अघटित ॥ खदखदा जन हासत ॥ म्हणती हे केवी घडे विपरीत ॥ अंबा ईस भेटली कधी ॥११॥
एक म्हणती कर्ण नासिक छेदून ॥ बाहेर घाला खरारोहण करून ॥ तो आकाशवाणी बोले गर्जोन ॥ सत्य गर्भ शारदेचा ॥१२॥
जन परम अमंगळ ॥ म्हणती हे कापट्यवाणी सकळ ॥ त्यात एक वृद्ध होता पुण्यशीळ ॥ वदता झाला ते ऐका ॥१३॥
ईश्वरी मायेचे अगम्य चरित्र ॥ अघटित घडवी निर्धार ॥ स्तंभेविण धरिले अंबर ॥ कुंभिनी तरे जळावरी ॥१४॥
ग्रहगण भगणे विधु मित्र ॥ यास आहे कोणाचा आधार ॥ सर्वदेही व्यापक परमेश्वर ॥ परी शोधिता ठायी न पडे ॥१५॥
परस्परे पंचभूतांसी वैर ॥ ती एकरूपे चालती कौतुक थोर ॥ जननीगर्भी जीव समग्र ॥ रक्षितो कैसा पहा हो ॥१६॥
काय एक न करी जगन्नाथ ॥ राजा पूर्वी यूपकेत ॥ त्याचे जळी पडले रेत ॥ ते जळ प्राशित वेश्या एक ॥१७॥
तितुकेनि झाली ते गर्भिणी ॥ पुत्र प्रसवली उत्तमगुणी ॥ विभांडकाचे रेत जळी पडोनी ॥ ते जळ हरिणी प्राशीत ॥१८॥
तोचि झाला ऋषिश्रृंगी ॥ तेणे ख्याती केली दशरथयागी ॥ सौराष्ट्रराजा स्पर्शता करे मृगी ॥ दिव्य पुत्र प्रसवली ॥१९॥
सत्यवती मत्स्यगर्भसंभूत ॥ तो मत्स्य राजपुत्र होत ॥ महिषासुर दैत्य ॥ महिषीगर्भी जन्मला ॥१२०॥
कित्येक ऋषि करुणावंत ॥ वचनमात्रे गर्भ राहत ॥ रेवतीरमण जन्मत ॥ रोहिणीपोटी कैसा पा ॥२१॥
सांबाचे पोटी मुसळ झाले ॥ ते कोणी कैसे घातले ॥ कुंतीपोटी पांडव जन्मले ॥ पाच देवांसमागमे ॥२२॥
ऐसे बोलती वृद्धजन ॥ तरी निंदा करिती दुर्जन ॥ मागुती देववाणी झाली पूर्ण ॥ ऐका वचन मूर्ख हो ॥२३॥
शारदेस कोणी असत्य म्हणती ॥ तरी जिव्हा चिरोनी किडे पडती ॥ ऐसे ऐकता सात्त्विक सुमती ॥ सत्य सत्य म्हणती त्रिवाचा ॥२४॥
कित्येक दुर्जन पुन्हा बोलत ॥ हे सर्वही कापट्य असत्य ॥ तो जिव्हा चिरोनि अकस्मात ॥ किडे गळो लागले ॥२५॥
हे देखोनि सर्व जन ॥ शारदेसी घालिती लोटांगण ॥ म्हणती माते तू सत्य पूर्ण ॥ जाणकीरेणुकेसारखी ॥२६॥
मग तीस पुत्र झाला सतेज ॥ लोक म्हणती शारदात्मज ॥ वाढत जैसा द्विजराज ॥ शुद्धद्वितीयेपासुनी ॥२७॥
उपनयन झालिया पूर्ण ॥ आठवे वर्षी वेदाध्ययन ॥ चारी वेद षट्शास्त्रे जाण ॥ मुखोद्गत पुराणे ॥२८॥
नवग्रहात जैसा वासरमणी ॥ तेवी पंडितात अग्रगणी ॥ जेणे अनुष्ठाने पिनाकपाणी ॥ प्रसन्न केला सर्वस्वे ॥२९॥
यावरी शारदा पुत्रसमवेत ॥ लक्षूनि शिवरात्रिव्रत अद्भुत ॥ गोकर्णक्षेत्राप्रति जात ॥ यात्रा बहुत मिळाली ॥१३०॥
तो द्रविडदेशींचा ब्राह्मण ॥ तोही आला यात्रेलागून ॥ परस्परे पाहून ॥ कष्टी होती अंतरी ॥३१॥
परस्परा कळली खूण ॥ पूर्वी देवी बोलिली वचन ॥ उमामहेश्वर व्रताचे पुण्य ॥ अर्ध देई पतीसी ॥३२॥
पुत्र देई त्याचा त्यास ॥ तू त्यापासी राहे चार मास ॥ समागम न करी निःशेष ॥ शिवपदासी पावसी ॥३३॥
मग शिवरात्रियात्रा करून ॥ भ्रतारासी केले नमन ॥ म्हणे हा घ्या आपुला नंदन ॥ म्हणोनि करी दीधला ॥३४॥
उमामहेश्वरव्रत ॥ त्याचे अर्धपुण्य देत ॥ मग शारदा सवे जात ॥ द्रविडदेशाप्रति तेव्हा ॥३५॥
शारदा व्रतस्थ पूर्ण ॥ दुरून पतीचे घे दर्शन ॥ विख्यात झाला शारदानंदन ॥ महापंडित पृथ्वीवरी ॥३६॥
तप आचरला अपार ॥ मातृपितृभजनी सादर ॥ माता भवानी पिता शंकर ॥ हेचि भावना तयाची ॥३७॥
जो न करी जनकजननीचे भजन ॥ धिक् त्याचे तप ज्ञान ॥ धिक् विद्या धिक् थोरपण ॥ धिक् भाग्य तयाचे ॥३८॥
घरी साठवी स्त्रियेचे गोत ॥ आणि मायबापा शिणवीत ॥ अन्न नेदी बाहेर घालीत ॥ शब्दबाणे ह्रदय भेदी ॥३९॥
तो जरी पढला षट्शास्त्र ॥ परी अनामिकाहूनि अपवित्र ॥ त्याचे न पहावे वक्र ॥ विटाळ कदान व्हावा ॥१४०॥
यद्यपि झाला स्पर्श जाण ॥ तरी करावे सचैल स्नान ॥ महादोषी तो कृतघ्न ॥ यम दारुण गांजीत ॥४१॥
यावरी शारदेचा भ्रतार ॥ महातपस्वी योगीश्वर ॥ शरीर ठेवोनि परत्र ॥ पावला तो शिवपदा ॥४२॥
शारदाही चिंतूनि मदनदहन ॥ करी विधियुक्त सहगमन ॥ पतीसमवेत कैलासभुवन ॥ पावोन सुखे राहिली ॥४३॥
शिवलीलामृत सुरस पूर्ण ॥ किंवा हे दिव्य रसायन ॥ भवरोगी सेविता जाण ॥ आरोग्य होऊन शिव होती ॥४४॥
जे मृत्यूने कवळिले सहज ॥ त्यांसी नावडे हा रसराज ॥ ज्यांची सुकृते तेजःपुंज ॥ तेचि अधिकारी येथींचे ॥४५॥
ब्रह्मानंदे श्रीधर ॥ श्रोतया विनवी जोडोनि कर ॥ शिवलीलाम्रुत निर्जर ॥ तुम्ही सेवा आदरे ॥४६॥
पुढील अध्यायी सुरस कथा ॥ पावन होय श्रोता वक्ता ॥ मृडानीसहित शिव तत्त्वता ॥ पाठीराखी सर्वार्थी ॥४७॥
शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड ॥ स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ॥ परिसोत सज्जन अखंड ॥ दशमाध्याय गोड हा ॥१४८॥
इति दशमोऽध्यायः समाप्तः ॥१०॥
॥श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु॥
श्री शिवलीलामृत अध्याय अकरावा
श्रीगणेशाय नमः ॥
धन्य धन्य तेचि जन ॥ जे शिवभजनी परायण ॥ सदा शिवलीलामृत श्रवण ॥ अर्चन सदा शिवाचे ॥१॥
सूत म्हणे शौनकादिकांप्रति ॥ जे रुद्राक्षधारण भस्म चर्चिती ॥ त्यांच्या पुण्यास नाही मिती ॥ त्रिजगती तेचि धन्य ॥२॥
जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण ॥ त्यासी वंदिती शक्रादि सुरगण ॥ तो शंकरचि त्याचे दर्शन ॥ घेता तरती जीव बहू ॥३॥
अथवा षोडश षोडश दंडी जाण ॥ बांधावे रुद्राक्ष सुलक्षण ॥ शिखेमाजी एक बांधावा पूर्ण ॥ शिवस्वरूप म्हणवुनी ॥४॥
त्यावरोनि करिता स्नान ॥ तरी त्रिवेणीस्नान केल्यासमान ॥ असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण ॥ रुद्राक्ष बांधिजे आदरे ॥५॥
कंठी बांधावे बत्तीस ॥ मस्तकाभोवते चोवीस ॥ सहा सहा कर्णी पुण्य विशेष ॥ बांधिता निर्दोष सर्वदा ॥६॥
अष्टोत्तरशत माळ ॥ सर्वदा असावी गळा ॥ एकमुखी रुद्राक्ष आगळा ॥ पूजिता भाग्य विशेष ॥७॥
पंचमुख षण्मुख अष्टमुख ॥ चतुर्दशमुख लक्ष्मीकारक ॥ सकळ मंत्र सुफळ देख ॥ रुद्राक्षजप नित्य करिता ॥८॥
नित्य रुद्राक्षपूजन ॥ तरी केले जाणिजे शिवार्चन ॥ रुद्राक्षमहिमा परम पावन ॥ इतिहास ऐका येविषयी ॥९॥
काश्मीर देशींचा नृप पावन ॥ नामाभिधान भद्रसेन ॥ विवेकसंपन्न प्रधान ॥ परम चतुर पंडित ॥१०॥
प्रजा दायाद भुसुर ॥ धन्य म्हणती तोचि राजेश्वर ॥ लाच न घे न्याय करी साचार ॥ अमात्य थोर तोचि पै ॥११॥
सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी ॥ पूर्वदत्ते ऐसी लाधिजे कामिनी ॥ सुत सभाग विद्वान गुणी ॥ विशेष सुकृते पाविजे ॥१२॥
गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर ॥ शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार ॥ वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार ॥ विशेष सुकृते लाहिजे ॥१३॥
श्रोता सप्रेम चतुर सावधान ॥ यजमान साक्षेपी उदार पूर्ण ॥ काया आरोग्य सुंदर कुलीन ॥ पूर्वसुकृते प्राप्त होय ॥१४॥
असो तो भद्रसेन आणि प्रधान ॥ बहुत करिता अनुष्ठान ॥ दोघांसी झाले नंदन ॥ शिवभक्त उपजतांचि ॥१५॥
राजपुत्र नाम सुधर्म ॥ प्रधानात्मज तारक नाम ॥ दोघे शिवभक्त निःसीम ॥ सावधान शिवध्यानी ॥१६॥
बाळे होऊनि सदा प्रेमळ ॥ अनुराग चित्ती वैराग्यशीळ ॥ लौकिकसंगे ध्रुव अमंगळ ॥ त्यांची संगती नावडे त्या ॥१७॥
पंचवर्षी दोघे कुमर ॥ लेवविती वस्त्रे अलंकार ॥ गजमुक्तमाळा मनोहर ॥ नाना प्रकारे लेवविती ॥१८॥
तव ते बाळ दोघेजण ॥ सर्वालंकारउपाधी टाकून ॥ करिती रुद्राक्ष धारण ॥ भस्म चर्चिती सर्वांगी ॥१९॥
आवडे सर्वदा एकांत ॥ श्रवण करिती शिवलीलामृत ॥ बोलती शिवनामावळी सत्य ॥ पाहाणे शिवपूजा सर्वदा ॥२०॥
आश्चर्य करिती राव प्रधान ॥ यासी का नावाडे वस्त्रभूषण ॥ करिती रुद्राक्षभस्मधारण ॥ सदा स्मरण शिवाचे ॥२१॥
विभूति पुसोनि रुद्राक्ष काढिती ॥ मागुती वस्त्रे भूषणे लेवविती ॥ ते सवेचि ब्राह्मणांसी अर्पिती ॥ घेती मागुती शिवदीक्षा ॥२२॥
शिक्षा करिता बहुत ॥ परी ते न सांडिती आपुले व्रत ॥ राव प्रधान चिंताग्रस्त ॥ म्हणती करावे काय आता ॥२३॥
तो उगवला सुकृतमित्र ॥ घरासी आला पराशर ॥ सवे वेष्टित ऋषींचे भार ॥ अपर सूर्य तेजस्वी ॥२४॥
जो कृष्णद्वैपायनाचा जनिता ॥ त्रिकाळज्ञानी प्रतिसृष्टिकर्ता ॥ जो वसिष्ठाचा नातू तत्त्वता ॥ राक्षससत्र जेणे केले ॥२५॥
जेवी मनुष्ये वागती अपार ॥ तैसेचि पूर्वी होते रजनीचर ॥ ते पितृकैवारे समग्र ॥ जाळिले सत्र करूनिया ॥२६॥
जनमेजये सर्पसत्र केले ॥ ते आस्तिके मध्येचि राहविले ॥ पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले ॥ मग वाचले रावणादिक ॥२७॥
विरंचीस दटावूनि क्षणमात्रे ॥ प्रतिसृष्टि केली विश्वामित्रे ॥ तेवी पितृकैवारे पराशरे ॥ वादी जर्जर पै केले ॥२८॥
ते सांगावी समूळ कथा ॥ तरी विस्तार होईल ग्रंथा ॥ यालागी ध्वनितार्थ बोलिला आता ॥ कळले पाहिजे निर्धारे ॥२९॥
ऐसा महाराज पराशर ॥ ज्याचा नातू होय शुक योगींद्र ॥ तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार ॥ घरा आला जाणोनी ॥३०॥
राव प्रधान सामोरे धावती ॥ साष्टांग नमूनि घरासी आणिती ॥ षोडशोपचारी पूजिती ॥ भाव चित्ती विशेष ॥३१॥
समस्ता वस्त्रे भूषणे देऊन ॥ राव विनवी कर जोडून ॥ म्हणे दोघे कुमर रात्रंदिन ॥ ध्यान करिती शिवाचे ॥३२॥
नावडती वस्त्रे अलंकार ॥ रुद्राक्षभस्मावरी सदा भर ॥ वैराग्यशील अणुमात्र ॥ भाषण न करिती कोणासी ॥३३॥
इंद्रियभोगावरी नाही भर ॥ नावडे राजविलास अणुमात्र ॥ गजवाजियानी समग्र ॥ आरूढावे आवडेना ॥३४॥
पुढे हे कैसे राज्य करिती ॥ हे आम्हांसी गूढ पडले चित्ती ॥ मग ते दोघे कुमर आणोनि गुरूप्रती ॥ दाखविले भद्रसेने ॥३५॥
गुरूने पाहिले दृष्टीसी ॥ जैसे मित्र आणि शशी ॥ तैसे तेजस्वी उपमा तयांसी ॥ नाही कोठे शोधिता ॥३६॥
यावरी बोले शक्तिसुत ॥ म्हणे हे का झाले शिवभक्त ॥ यांची पूर्वकथा समस्त ॥ ऐक तुज सांगतो ॥३७॥
पूर्वी काश्मीर देशात उत्तम ॥ महापट्टण नंद्रिग्राम ॥ तेथील वारांगना मनोरम ॥ महानंदा नाम तियेचे ॥३८॥
त्या ग्रामीचा तोचि भूप ॥ पृथ्वीमाजी निःसीम स्वरूप ॥ ललिताकृति पाहोनि कंदर्प ॥ तन्मय होवोनि नृत्य करी ॥३९॥
जैसा उगवला पूर्णचंद्र ॥ तैसे तिजवरी विराजे छत्र ॥ रत्नखचित याने अपार ॥ भाग्या पार नाही तिच्या ॥४०॥
रत्नमय दंडयुक्त ॥ चामरे जीवरी सदा ढळत ॥ मणिमय पादुका रत्नखचित ॥ चरणी जिच्या सर्वदा ॥४१॥
विचित्र वसने दिव्य सुवास ॥ हिरण्मयरत्नपर्यंतक राजस ॥ चंद्ररश्मिसम प्रकाश ॥ शय्या जिची अभिनव ॥४२॥
दिव्याभरणी संयुक्त ॥ अंगी सुगंध विराजित ॥ गोमहिषीखिल्लारे बहुत ॥ वाजी गज घरी बहुवस ॥४३॥
दास दासी अपार ॥ घरी माता सभाग्य सहोदर ॥ जिचे गायन ऐकता किन्नर ॥ तटस्थ होती कोकिळा ॥४४॥
जिच्या नृत्याचे कौशल्य देखोन ॥ सकळ नृप डोलविती मान ॥ तिचा भोगकाम इच्छून ॥ भूप सभाग्य येती घरा ॥४५॥
वेश्या असोन पतिव्रता ॥ नेमिला जो पुरुष तत्त्वता ॥ त्याचा दिवस न सरता ॥ इंद्रासही वश्य नव्हे ॥४६॥
परम शिवभक्त विख्यात ॥ दानशील उदार बहुत ॥ सोमवार प्रदोषव्रत ॥ शिवरात्र करी नेमेसी ॥४७॥
अन्नछत्र सदा चालवीत ॥ नित्य लक्षत्रिदळे शिव पूजित ॥ ब्राह्मणहस्ते अद्भुत ॥ अभिषेक करवी शिवासी ॥४८॥
याचक मनी जे जे इच्छीत ॥ ते ते महानंदा पुरवीत ॥ कोटि लिंगे करवीत ॥ श्रावणमासी अत्यादरे ॥४९॥
ऐक भद्रसेना सावधान ॥ कुक्कुट मर्कट पाळिले प्रीतीकरून ॥ त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधोन ॥ नाचू शिकविले कौतुके ॥५०॥
आपुले जे का नृत्यागार ॥ तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर ॥ कुक्कुट मर्कट त्यासमोर ॥ तेथेंचि बांधी प्रीतीने ॥५१॥
करी शिवलीलामृतपुराणश्रवण ॥ तेही ऐकती दोघेजण ॥ सवेंचि महानंदा करी गायन ॥ नृत्य करी शिवापुढे ॥५२॥
महानंदा त्यांसी सोडून ॥ नृत्य करवी कौतुकेकरून ॥ त्यांच्या गळा कपाळी जाण ॥ विभूति चर्ची स्वहस्ते ॥५३॥
एवं तिच्या संगतीकरून ॥ त्यांसही घडतसे शिवभजन ॥ असो तिचे सत्त्व पाहावयालागोन ॥ सदाशिव पातला ॥५४॥
सौदागराचा वेष धरिला ॥ महानंदेच्या सदना आला ॥ त्याचे स्वरूप देखोनि ते अबला ॥ तन्मय झाली तेधवा ॥५५॥
पूजा करोनि स्वहस्तकी ॥ त्यासी बैसविले रत्नमंचकी ॥ तो पृथ्वीमोलाचे हस्तकी ॥ कंकण त्याच्या देखिले ॥५६॥
देखता गेली तन्मय होऊन ॥ म्हणे स्वर्गीची वस्तु वाटे पूर्ण ॥ विश्वकर्म्याने निर्मिली जाण ॥ मानवी कर्तृत्व हे नव्हे ॥५७॥
सौदागरे ते काढून ॥ तिच्या हस्तकी घातले कंकण ॥ येरी होवोनि आनंदघन ॥ नेम करी तयासी ॥५८॥
पृथ्वीचे मोल हे कंकण ॥ मीहि बत्तीस लक्षणी पद्मिण ॥ तीन दिवस संपूर्ण ॥ दासी तुमची झाले मी ॥५९॥
तयासी ते मानले ॥ सवेंचि त्याने दिव्यलिंग काढिले ॥ सूर्यप्रभेहूनि आगळे ॥ तेज वर्णिले नवजाय ॥६०॥
लिंग देखोनि ते वेळी ॥ महानंदा तन्मय झाली ॥ म्हणे जय जय चंद्रमौळी ॥ म्हणोनी वंदी लिंगाते ॥६१॥
म्हणे या लिंगाच्या प्रभेवरूनी ॥ कोटि कंकणे टाकावी ओवाळूनी ॥ सौदागर म्हणे महानंदेलागूनी ॥ लिंग ठेवी जतन हे ॥६२॥
म्हणे या लिंगापाशी माझा प्राण ॥ भंगले की गेले दग्ध होऊन ॥ तरी मी अग्निप्रवेश करीन ॥ महाकठीण व्रत माझे ॥६३॥
येरीने अवश्य म्हणोन ॥ ठेविले नृत्यागारी नेऊन ॥ मग दोघे करिती शयन ॥ रत्नखचित मंचकी ॥६४॥
तिचे कैसे आहे सत्त्व ॥ धैर्य पाहे सदाशिव ॥ भक्त तारावया अभिनव ॥ कौतुकचरित्र दाखवी ॥६५॥
त्याच्या आज्ञेकरून ॥ नृत्यशाळेस लागला अग्न ॥ जन धावो लागले चहूकडोन ॥ एकचि हांक जाहली ॥६६॥
तीस सावध करी मदनारी ॥ म्हणे अग्नि लागला ऊठ लवकरी ॥ येरी उठली घाबरी ॥ तव वातात्मज चेतला ॥६७॥
तैशामाजी उडी घालून ॥ कंठपाश त्यांचे काढून ॥ कुक्कुट मर्कट दिधले सोडून ॥ गेले पळोन वनाप्रती ॥६८॥
नृत्यशाळा भस्म झाली समग्र ॥ मग शांत झाला सप्तकर ॥ यावरी पुसे सौदागर ॥ महानंदेप्रति तेधवा ॥६९॥
माझे दिव्यलिंग आहे की जतन ॥ महानंदा घाबरी ऐकोन ॥ वक्षःस्थळ घेत बडवून ॥ म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले ॥७०॥
सौदागर बोले वचन ॥ नेमाचा आजि दुसरा दिन ॥ मी आपुला देतो प्राण ॥ लिंगाकारणे तुजवरी ॥७१॥
मग त्रिचरण चेतविला ॥ आकाशपंथे जाती ज्वाळा ॥ सौदागर सिद्ध झाला ॥ समीप आला कुंडाच्या ॥७२॥
अतिलाघवी उमारंग ॥ जो भक्तजनभवभंग ॥ उडी घातली सवेग ॥ ॐनमःशिवाय म्हणवुनी ॥७३॥
ऐसे देखता महानंदा ॥ बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा ॥ लुटविली सर्व संपदा ॥ कोशसमवेत सर्वही ॥७४॥
अश्वशाळा गजशाळा संपूर्ण ॥ सर्व संपत्तिसहित करी गृहदान ॥ महानंदेने स्नान करून ॥ भस्म अंगी चर्चिले ॥७५॥
रुद्राक्ष सर्वांगी लेऊन ॥ ह्रदयी चिंतिले शिवध्यान ॥ हर हर शिव म्हणवून ॥ उडी निःशंक घातली ॥७६॥
सूर्यबिंब निघे उदयाचळी ॥ तैसा प्रगटला कपाळमौळी ॥ दशभुज पंचवदन चंद्रमौळी ॥ संकटी पाळी भक्तांते ॥७७॥
माथा जटांचा भार ॥ तृतीयनेत्री वैश्वानर ॥ शिरी झुळझुळ वाहे नीर ॥ भयंकर महाजोगी ॥७८॥
चंद्रकळा तयाचे शिरी ॥ नीळकंठ खट्वांगधारी ॥ भस्म चर्चिले शरीरी ॥ गजचर्म पांघुरला ॥७९॥
नेसलासे व्याघ्रांबर ॥ गळा मनुष्यमुंडाचे हार ॥ सर्वांग वेष्टित फणिवर ॥ दशभुजा मिरविती ॥८०॥
वरचेवरी कंदुक झेलीत ॥ तेवी दहा भुजा पसरोनी अकस्मात ॥ महानंदेसी झेलूनि धरीत ॥ ह्रदयकमली परमात्मा ॥८१॥
म्हणे जाहलो मी सुप्रसन्न ॥ महानंदे माग वरदान ॥ ती म्हणे हे नगर उद्धरून ॥ विमानी बैसवी दयाळा ॥८२॥
माताबंधूसमवेत ॥ महानंदा विमानी बैसत ॥ दिव्यरूप पावोनि त्वरित ॥ नगरासमवेत चालली ॥८३॥
पावली सकळ शिवपदी ॥ जेथे नाही आधिव्याधी ॥ क्षुधातृषाविरहित त्रिशुद्धी ॥ भेदबुद्धि कैची तेथे ॥८४॥
नाही काम क्रोध द्वंद्व दुःख ॥ मद मत्सर नाही निःशंक ॥ जेथींचे गोड उदक ॥ अमृताहूनि कोटिगुणे ॥८५॥
जेथे सुरतरूंची वने अपारे ॥ सुरभींची बहुत खिल्लारे ॥ चिंतामणींची धवलागारे ॥ भक्ताकारणे निर्मिली ॥८६॥
जेथे वोसणता बोलती शिवदास ॥ ते ते प्राप्त होय तयास ॥ शिवपद सर्वदा अविनाश ॥ महानंदा तेथे पावली ॥८७॥
हे कथा परम सुरस ॥ पराशर सांगे भद्रसेनास ॥ म्हणे हे कुमर दोघे निःशेष ॥ कुक्कुट मर्कट पूर्वींचे ॥८८॥
कंठी रुद्राक्षधारण ॥ भाळी विभूति चर्चून ॥ त्याचि पूर्वपुण्येकरून ॥ सुधर्म तारक उपजले ॥८९॥
हे पुढे राज्य करतील निर्दोष ॥ बत्तीस लक्षणी डोळस ॥ शिवभजनी लाविती बहुतांस ॥ उद्धरितील तुम्हांते ॥९०॥
अमात्यसहित भद्रसेन ॥ गुरूसी घाली लोटांगण ॥ म्हणे इतुकेन मी धन्य ॥ सुपुत्र उदरी जन्मले ॥९१॥
भद्रसेन बोलत पुढती ॥ हे राज्य किती वर्षै करिती ॥ आयुष्यप्रमाण किती ॥ सांगा यथार्थ गुरुवर्या ॥९२॥
बहुत करिता नवस ॥ एवढाचि पुत्र आम्हांस ॥ परम प्रियकर राजस ॥ प्राणांहूनि आवडे बहु ॥९३॥
तुमच्या आगमनेकरून ॥ स्वामी मज समाधान ॥ तरी या पुत्राचे आयुष्यप्रमाण ॥ सांगा स्वामी मज तत्त्वता ॥९४॥
ऋषि म्हणे मी सत्य बोलेन देख ॥ परी तुम्हांसी ऐकता वाटेल दुःख ॥ हे सभा सकळिक ॥ दुःखार्णवी पडेल पै ॥९५॥
प्रत्ययसदृश बोलावे वचन ॥ ना तरी आंगास येते मूर्खपण ॥ तुम्हा वाटेल विषाहून ॥ विशेष ऐसी ते गोष्टी ॥९६॥
भद्रसेन म्हणे सत्य वचन ॥ बोलावया न करावा अनमान ॥ तरी तुझ्या पुत्रासी बारा वर्षे पूर्ण ॥ झाली असता जाणपा ॥९७॥
आजपासोनि सातवे दिवशी ॥ मृत्यु पावेल या समयासी ॥ राव ऐकता धरणीसी ॥ मूर्च्छा येऊनि पडियेला ॥९८॥
अमात्यासहित त्या स्थानी ॥ दुःखाग्नीत गेले आहाळोनी ॥ अंतःपुरी सकळ कामिनी ॥ आकांत करिती आक्रोशे ॥९९॥
करूनिया हाहाकार ॥ वक्षःस्थळ पिटी नृपवर ॥ मग रायासी पराशर ॥ सावध करोनि गोष्ट सांगे ॥१००॥
नृपश्रेष्ठा न सोडी धीर ॥ ऐक एक सांगतो विचार ॥ जै पंचभूते नव्हती समग्र ॥ शशिमित्र नव्हते तै ॥१॥
नव्हता मायामय विकार ॥ केवळ ब्रह्ममय साचार ॥ तेथे झाले स्फुरणजागर ॥ अहं ब्रह्म म्हणोनिया ॥२॥
ते ध्वनि माया सत्य ॥ तेथोनि जाहले महत्तत्त्व ॥ मग त्रिविध अहंकार होत ॥ शिवइच्छेकरूनिया ॥३॥
सत्त्वांशे निर्मिला पीतवसन ॥ रजांशे सृष्टिकर्ता द्रुहिण ॥ तमांशे रुद्र परिपूर्ण ॥ सर्गस्थित्यंत करविता ॥४॥
विधीसी म्हणे सृष्टि रची पूर्ण ॥ येरू म्हणे मज नाही ज्ञान ॥ मग शिवे तयालागून ॥ चारी वेद उपदेशिले ॥५॥
चहू वेदांचे सार पूर्ण ॥ तो हा रुद्राध्याय परम पावन ॥ त्याहूनि विशेष गुह्य ज्ञान ॥ भुवनत्रयी असेना ॥६॥
बहुत करी हा जतन ॥ त्याहूनि आणिक थोर नाही साधन ॥ हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून ॥ श्रीशंकर स्वये बोले ॥७॥
जे रुद्राध्याय ऐकती पढती ॥ त्यांच्या दर्शने जीव उद्धरती ॥ मग कमलोद्भव एकांती ॥ सप्तपुत्रा सांगे रुद्र हा ॥८॥
मग सांप्रदाये ऋषीपासोन ॥ भूतली आला अध्याय जाण ॥ थोर जप तप ज्ञान ॥ त्याहूनि अन्य नसेचि ॥९॥
जो हा अध्याय जपे संपूर्ण ॥ त्याचेनि दर्शने तीर्थे पावन ॥ स्वर्गीचे देव दर्शन ॥ त्याचे घेऊ इच्छिती ॥११०॥
जप तप शिवार्चन ॥ याहूनि थोर नाही जाण ॥ रुद्रमहिमा अगाध पूर्ण ॥ किती म्हणोनि वर्णावा ॥११॥
रुद्रमहिमा वाढला फार ॥ ओस पडिले भानुपुत्रनगर ॥ पाश सोडोनि यमकिंकर ॥ रिते हिंडो लागले ॥१२॥
मग यमे विधिलागी पुसोन ॥ अभक्तिकृत्या निर्मिली दारुण ॥ तिणे कुतर्कवादी भेदी लक्षून ॥ त्यांच्या ह्रदयी संचरली ॥१३॥
त्यांसी मत्सर वाढविला विशेष ॥ वाटे करावा शिवद्वेष ॥ तेणे ते जावोनि यमपुरीस महानरकी पडले सदा ॥१४॥
यम सांगे दुतांप्रती ॥ शिवद्वेषी जे पापमती ॥ ते अल्पायुषी होती ॥ नाना रीती जाचणी करा ॥१५॥
शिव थोर विष्णु लहान ॥ हरि विशेष हर गौण ॥ ऐसे म्हणती जे त्यालागून ॥ आणोनि नरकी घालावे ॥१६॥
रुद्राध्याय नावडे ज्यासी ॥ कुंभीपाकी घालावे त्यासी ॥ रुद्रानुष्ठाने आयुष्यासी ॥ वृद्धि होय निर्धारे ॥१७॥
याकरिता भद्रसेन अवधारी ॥ अयुत रुद्रावर्तने करी ॥ शिवावरी अभिषेकधार धरी ॥ मृत्यु दूरी होय साच ॥१८॥
अथवा शतघट स्थापून ॥ दिव्यवृक्षांचे पल्लव आणून ॥ रुद्रे उदक अभिमंत्रून ॥ अभिषिंचन पुत्रा करी ॥१९॥
नित्य दहा सहस्त्र आवर्तने पूर्ण ॥ क्षोणीपाळा करी सप्तदिन ॥ राये धरिले दृढ चरण ॥ सद्गद होवोनि बोलत ॥१२०॥
सकळऋषिरत्नमंडितपदक ॥ स्वामी तू त्यात मुख्य नायक ॥ काळ मृत्यु भय शोक ॥ गुरु रक्षी त्यांपासूनि ॥२१॥
तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण ॥ तुजसवे जे आहेत ब्राह्मण ॥ आणीक सांगती ते बोलावून ॥ आताचि आणितो आरंभी ॥२२॥
मग सहस्त्र विप्र बोलावून ॥ ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्ति पूर्ण ॥ न्यासध्यानयुक्त पढून ॥ गुरूपासून जे आले ॥२३॥
परदारा आणि परधन ॥ ज्यांची वमनाहूनि नीच पूर्ण ॥ विरक्त सुशील गेलिया प्राण ॥ दुष्ट प्रतिग्रह न घेती ॥२४॥
जे शापानुग्रहसमर्थ ॥ सामर्थ्यो चालो न देती मित्ररथ ॥ किंवा साक्षात उमानाथ ॥ पुढे आणोनि उभा करिती ॥२५॥
ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण ॥ बैसला व्यासपिता घेऊन ॥ सहस्त्र घट मांडून ॥ अभिमंत्रोनि स्थापिले ॥२६॥
स्वर्धुनीचे सलिल भरले पूर्ण ॥ त्यांत आम्रपल्लव घालून ॥ रुद्रघोषे गर्जिन्नले ब्राह्मण ॥ अनुष्ठान दिव्य मांडिले ॥२७॥
शास्त्रसंख्या झाले दिवस ॥ सातवे दिवशी मध्याह्नी आला चंडांश ॥ मृत्युसमय येता धरणीस ॥ बाळ मूर्च्छित पडियेला ॥२८॥
एक मुहूर्त निचेष्टित ॥ चलनवलन राहिले समस्त ॥ परम घाबरला नृपनाथ ॥ गुरु देत नाभीकारा ॥२९॥
रुद्रोदक शिंपून ॥ सावध केला राजनंदन ॥ त्यासी पुसती वर्तमान ॥ वर्तले तेचि सांगत ॥१३०॥
एक काळपुरुष भयानक थोर ॥ ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर ॥ विक्राळ दाढा भयंकर ॥ नेत्र खादिरांगासारखे ॥३१॥
तो मज घेऊनि जात असता ॥ चौघे पुरुष धावोनि आले तत्त्वता ॥ पंचवदन दशभुज त्यांची साम्यता ॥ कमळभवांडी दुजी नसे ॥३२॥
ते तेजे जैसे गभस्ती ॥ दिगंततम संहारिती ॥ भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती ॥ दश हस्ती आयुधे ॥३३॥
ते महाराज येऊन ॥ मज सोडविले तोडोनि बंधन ॥ त्या काळपुरुषासी धरून ॥ करीत ताडण गेले ते ॥३४॥
ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर ॥ भद्रसेन करी जयजयकार ॥ ब्राह्मणांसी घाली नमस्कार ॥ आनंदाश्रु नेत्री आले ॥३५॥
अंगी रोमांच दाटले ॥ मग विप्रचरणी गडबडा लोळे ॥ शिवनाम गर्जत तये वेळे ॥ देव सुमने वर्षती ॥३६॥
अनेक वाद्यांचे गजर ॥ डंक गर्जे अवघ्यात थोर ॥ मुखद्वयांची महासुस्वर ॥ मृदंगवाद्ये गर्जती ॥३७॥
अनेक वाद्यांचे गजर ॥ शिवलीला गाती अपार ॥ श्रृंगेभृंगे काहाळ थोर ॥ सनया अपार वाजती ॥३८॥
चंद्रानना धडकती भेरी ॥ नाद न माये नभोदरी ॥ असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीतसे ॥३९॥
षड्रस अन्ने शोभिवंत ॥ अलंकार दिव्य वस्त्रे देत ॥ अमोलिक वस्तु अद्भुत ॥ आणोनि अर्पी ब्राह्मणांसी ॥१४०॥
दक्षिणेलागी भांडारे ॥ मुक्त केली राजेंद्रे ॥ म्हणे आवडे तितुके भरा एकसरे ॥ मागे पुढे पाहू नका ॥४१॥
सर्व याचक केले तृप्त ॥ पुरे पुरे हेचि ऐकिली मात ॥ धनभार झाला बहुत ॥ म्हणोनि सांडिती ठायी ठायी ॥४२॥
ब्राह्मण देती मंत्राक्षता ॥ विजय कल्याण हो तुझिया सुता ॥ ऐसा अति आनंद होत असता ॥ तो अद्भुत वर्तले ॥४३॥
वसंत येत सुगंधवनी ॥ की काशीक्षेत्रावरी स्वर्धुनी ॥ की श्वेतोत्पले मृडानी ॥ रमण लिंग अर्जिचे ॥४४॥
की निर्दैवासी सापडे चिंतामणी ॥ की क्षुधितापुढे क्षीराब्धि ये धावूनी ॥ तैसा कमलोद्भवनंदन ते क्षणी ॥ नारदमुनी पातला ॥४५॥
वाल्मीक सत्यवतीनंदन ॥ औत्तानपादीकयाधुह्रदयरत्न ॥ हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण ॥ वंद्य जे का सर्वांते ॥४६॥
जो चतुःषष्टिकळाप्रवीण निर्मळ ॥ चतुर्दशीचा करतळामळ ॥ ज्याचे स्वरूप पाहता केवळ ॥ नारायण दुसरा की ॥४७॥
हे कमळभवांड मोडोनी ॥ पुनःसृष्टि करणार मागुतेनी ॥ अन्याय विलोकिता नयनी ॥ दंडे ताडील शक्रादिका ॥४८॥
तो नारद देखोनि तेचि क्षणी ॥ कुंडांतूनि मूर्तिमंत निघे अग्नी ॥ दक्षिणग्नि गार्हपत्य आहवनी ॥ उभे ठाकले देखता ॥४९॥
पराशरादि सकळ ब्राह्मण ॥ प्रधानासहित भद्रसेन ॥ धावोनि धरिती चरण ॥ ब्रह्मानंदे उचंबळले ॥१५०॥
दिव्य गंध दिव्य सुमनी ॥ षोडशोपचारे पूजिला नारदमुनी ॥ राव उभा ठाके कर जोडोनी ॥ म्हणे स्वामी अतींद्रियद्रष्टा तू ॥५१॥
त्रिभुवनी गमन सर्व तुझे ॥ काही देखिले सांग अपूर्व ॥ नारद म्हणे मार्गी येता शिव ॥ दूत चौघे देखिले ॥५२॥
दशभुज पंचवदन ॥ तिही मृत्यु नेला बांधोन ॥ तुझ्या पुत्राचे चुकविले मरण ॥ रुद्रानुष्ठाने धन्य केले ॥५३॥
तव पुत्ररक्षणार्थ ते वेळा ॥ शिवे वीरभद्रमुख्य पाठविला ॥ मज देखता मृत्यूसी पुसू लागला ॥ शिवसुत ऐका ते ॥५४॥
तू कोणाच्या आज्ञेवरून ॥ आणीत होतासी भद्रसेननंदन ॥ त्यासी दहा सहस्त्र वर्षे पूर्ण ॥ आयुष्य असे निश्चये ॥५५॥
तो सार्वभौम होईल तत्त्वता ॥ रुद्रमहिम तुज ठाऊक अस्ता ॥ शिवमर्यादा उल्लंघूनि तत्त्वता ॥ कैसा आणीत होतासी ॥५६॥
मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन ॥ पत्रिका पाहिली वाचून ॥ तव द्वादशवर्षी मृत्युचिन्ह ॥ गंडांतर थोर होते ॥५७॥
ते महत्पुण्ये निरसूनि सहज ॥ दहा सहस्त्र वर्षे करावे राज्य ॥ मग तो सूर्यनंदन महाराज ॥ स्वापराधे कष्टी बहू ॥५८॥
मग उभा ठाकूनि कृतांत ॥ कर जोडोनि स्तवन करीत ॥ हे अपर्णाधव हिमनगजामात ॥ अपराध न कळत घडला हा ॥५९॥
ऐसे नारद सांगता ते क्षणी ॥ राये पायावरी घातली लोळणी ॥ आणीक सहस्त्र रुद्र करूनी ॥ महोत्साह करीतसे ॥१६०॥
शतरुद्र करिता निःशेष ॥ शतायुषी होय तो पुरुष ॥ हा अध्याय पढता निर्दोष ॥ तो शिवरूप याचि देही ॥६१॥
तो येथेचि झाला मुक्त ॥ त्याच्या तीर्थे तरती बहुत ॥ असो यावरी ब्रह्मसुत ॥ अंतर्धान पावला ॥६२॥
आनंदमय शक्तिनंदन ॥ राये शतपद्म धन देऊन ॥ तोषविला गुरु संपूर्ण ॥ ऋषींसहित जाता झाला ॥६३॥
हे भद्रसेन आख्यान जे पुढती ॥ त्यासी होय आयुष्य संतती ॥ त्यांसी काळ न बाधे अंती ॥ वंदोनि नेती शिवपदा ॥६४॥
दशशत कपिलादान ॥ ऐकता पढता घडे पुण्य ॥ केले असेल अभक्ष्यभक्षण ॥ सुरापान ब्रह्महत्या ॥६५॥
एवं महापापपर्वत तत्त्वता ॥ भस्म होती श्रवण करिता ॥ हा अध्याय त्रिकाळ वाचिता ॥ गंडांतरे दूर होती ॥६६॥
यावरी कलियुगी निःशेष ॥ शिवकीर्तनाचा महिमा विशेष ॥ आयुष्यहीन लोकांस ॥ अनुष्ठान हेचि निर्धारे ॥६७॥
मग तो राव भद्रसेन ॥ सुधर्म पुत्रासी राज्य देऊन ॥ युवराज्य तारकालागून ॥ देता झाला ते काळी ॥६८॥
मग प्रधानासमवेग राव जाणा ॥ जाता झाला तपोवना ॥ शिवअनुष्ठान रुद्राध्याना ॥ करिता महारुद्र तोषला ॥६९॥
विमानी बैसवूनि त्वरित ॥ राव प्रधान नेले मिरवित ॥ विधिलोकी वैकुंठी वास बहुत ॥ स्वेच्छेकरूनि राहिले ॥१७०॥
शेवटी शिवपदासी पावून ॥ राहिले शिवरूप होऊन ॥ हा अकरावा अध्याय जाण ॥ स्वरूप एकादश रुद्रांचे ॥७१॥
हा अध्याय करिता श्रवण ॥ एकादश रुद्र समाधान ॥ की हा कल्पद्रुम संपूर्ण ॥ इच्छिले फळ देणार ॥७२॥
मृत्युंजयजप रुद्रानुष्ठन ॥ त्यासी न बाधी ग्रहपीडा विघ्न ॥ पिशाचबाधा रोग दारुण ॥ न बाधीच सर्वथाही ॥७३॥
येथे जो मानील अविश्वास ॥ तो होईल अल्पायुषी तामस ॥ हे निंदी तो चांडाळ निःशेष ॥ त्याचा विटाळ न व्हावा ॥७४॥
त्यासी प्रसवोनि वांझ झाली माता ॥ त्याची संगती न धरावी तत्त्वता ॥ त्यासी संभाषण करिता ॥ महापातक जाणिजे ॥७५॥
ते आपुल्या गृहासी न आणावे ॥ आपण त्यांच्या सदनासी न जावे ॥ ते त्यजावे जीवेभावे ॥ जेवी सुशील हिंसकगृह ॥७६॥
जो प्रत्यक्ष भक्षितो विष ॥ जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस ॥ त्यांसी मृत्यु आला या गोष्टीस ॥ संदेह काही असेना ॥७७॥
असो सर्वभावे निश्चित ॥ अखंड पहावे शिवलीलामृत ॥ हे न घडे तरी त्वरित ॥ हा अध्याय तरी वाचावा ॥७८॥
या अध्यायाचे करिता अनुष्ठान ॥ तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य ॥ त्याचे घरी अनुदिन ॥ ब्रह्मानंद प्रगटेल ॥७९॥
अपर्णाह्रदयाब्जमिलिंद ॥ श्रीधरस्वामी तो ब्रह्मानंद ॥ जो जगदानंदमूळकंद ॥ अभंग न विटे कालत्रयी ॥१८०॥
शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड ॥ स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ॥ परिसोत सज्जन अखंड ॥ एकादशाध्याय गोड हा ॥१८१॥
इति एकादशोऽध्यायः समाप्तः ॥११॥
॥श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु॥
श्री शिवलीलामृत अध्याय बारावा
श्रीगणेशाय नमः ॥
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रवर्ण ॥ ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ पूर्ण ॥ स्त्री बाल वृद्ध तरुण ॥ सर्वी शिवकीर्तन करावे ॥१॥
शिवस्मरण नावडे अणुमात्र ॥ तो अत्यंजाहूनि अपवित्र ॥ तो लेइला वस्त्रे अलंकार ॥ जेवी प्रेत श्रृंगारिले ॥२॥
तेणे भक्षिले जे अन्न ॥ जैसे पशु भक्षिती यथेष्ट तृण ॥ जैसे मयूराअंगी नयन ॥ तैसेचि नेत्र तयाचे ॥३॥
वल्मीकछिद्रवत कर्ण ॥ द्रुमशाखावत हस्त चरण ॥ त्याची जननी व्यर्थ जाण ॥ विऊनी वांझ जाहली ॥४॥
जो शिवभजनाविण ॥ तो जावो समुद्रांत बुडोन ॥ अथवा भस्म करो वडवाग्न ॥ का सर्प डंखो तयासी ॥५॥
तरी श्रवणी धरावी आवडी ॥ जैसी पिपीलिका गुळासी न सोडी ॥ अर्ध तुटे परी न काढी ॥ मुख तेथूनि सर्वदा ॥६॥
की चुकला बहुत दिवस सुत ॥ तेवढाचि पोटी प्रीतिवंत ॥ त्याची शुभवार्ता ऐकता अकस्मात ॥ धावती जेवी मातापिता ॥७॥
अमृताहूनि व्राड ॥ गोष्टी लागती कर्णासी गोड ॥ तैसे कथाश्रवणी ज्याचे न पुरे कोड ॥ सर्व टाकोनि जाईजे ॥८॥
गावासी गेला प्राणनाथ ॥ प्रिया पतिव्रता वाट पाहात ॥ तो पत्र आले अकस्मात ॥ धावे श्रवण करावया ॥९॥
निर्धनासी सापडे धन ॥ की जन्मांधासी आले नयन ॥ की तृषेने जाता प्राण ॥ शीतळ जीवन मिळाले ॥१०॥
ऐसे ऐकावया कथा पुराण ॥ धावावे सर्व काम टाकून ॥ चिंता निद्रा दूर करून ॥ श्रवणी सादर बैसावे ॥११॥
वक्ता पंडित चातुर्यखाणी ॥ नमावा तो सद्गुरु म्हणोनी ॥ की हा शंकरचि मानूनी ॥ धरिजे पूजनी आदर ॥१२॥
सुरभीच्या स्तनांतूनि अवधारा ॥ सुटती जैशा सुधारसधारा ॥ तैसा वक्ता वदता शिवचरित्रा ॥ कर्णद्वारे प्राशिजे ॥१३॥
वक्ता श्रेष्ठ मानावा अत्यंत ॥ न पुसावे भलते पाखंडमत ॥ नसते कुतर्क घेवोनि चित्त ॥ न शिणवावे सर्वथा ॥१४॥
न कळे तरी पुसावे आदरे ॥ सांगेल ते श्रवण करावे सादरे ॥ उगेच छळिता पामरे ॥ तरी ते पिशाचजन्म पावती ॥१५॥
वक्त्यासी छळिता अवधारा ॥ तरी दोष घडे त्या नरा ॥ पुराणिकावेगळे नमस्कारा ॥ न करावे सभेत कोणासी ॥१६॥
मध्येचि टाकूनि कथाश्रवण ॥ उगाचि गर्वै जाय उठोन ॥ तरी अल्पायुषी जाण ॥ संसारी आपदा बहु भोगी ॥१७॥
कुटिल खळ पापी धूर्त ॥ तो मुख्य श्रोता न करावा यथार्थ ॥ दुग्ध पिता सर्वांगी पुष्ट होत ॥ परी नवज्वरिता विषवत ते ॥१८॥
तैसा श्रवणी बैसोन ॥ कुतर्क घेवोनि करी कथाखंडण ॥ त्याचे व्यर्थ गेले श्रवण ॥ नरकासी कारण पुढे केले ॥१९॥
कथेत न बोलावे इतर ॥ मन करावे एकाग्र ॥ कथेची फलश्रुति साचार ॥ तरीच पावती बैसता ॥२०॥
वस्त्रे अलंकार दक्षिणासहित ॥ वक्ता पूजावा प्रीती अत्यंत ॥ धन देता कोश बहुत ॥ भरे आपुला निर्धारे ॥२१॥
रत्ने देता बहुत ॥ नेत्र होती प्रकाशवंत ॥ अलंकारे प्रतिष्ठा अत्यंत ॥ श्रोतयांची वाढतसे ॥२२॥
एवं पूजिता षोडशोपचार ॥ तेणे तुष्टमान होय उमावर ॥ जे जे पदार्थ अर्पावे साचार ॥ त्यांचे कोटिगुणे प्राप्त होती ॥२३॥
त्यासी कदा नाही दरिद्र ॥ शेवटी स्वपदा नेईल भालचंद्र ॥ कुथेसी येता पाउले टाकी निर्धार ॥ पापसंहार पदोपदी ॥२४॥
मस्तकी उष्णीष घालूनि ऐकती ॥ तरी जन्मांतरी बाळपक्षी होती ॥ म्हणाल उष्णीष काढिता नये सभेप्रती ॥ तरी मुख्य पल्लव सोडावा ॥२५॥
जे विडा घेवोनी ऐकती ॥ तरी यमकिंकर त्यांसी जाचिती ॥ नाना यातना भोगविती ॥ मूळ व्यासवचन प्रमाण हे ॥२६॥
एक बैसती उगेचि श्रवणी ॥ निद्रा मोडावी बहुत प्रकारेकरूनी ॥ अंतर सद्गद नेत्री यावे पाणी ॥ मग निद्रा कैची स्पशेल ॥२७॥
वरी जीवन काय व्यर्थ लावून ॥ जैसे एकांती द्रव्य आपुले पूर्ण ॥ तेथे घडता जागरण ॥ निद्रा न ये प्राणिया ॥२८॥
निद्रा लागली दारुण ॥ तरी उभे ठाकावे कर जोडून ॥ निद्रा न ये तो उपाय करून ॥ मुख्य श्रवण करावे ॥२९॥
वक्त्याहूनि उंच आसन तत्त्वता ॥ तेथे न बसावे धरूनि अहंता ॥ हे न मानिती ते काग तत्त्वता ॥ जगपुरीष भक्षिती ॥३०॥
जे बैसती वीरासन घालून ॥ ते होती वृक्ष अर्जुन ॥ पाय पसरिती त्यांसी सूर्यनंदन॥ शुष्ककाष्ठे झोडी बळे ॥३१॥
जे सांगताही न ऐकती ॥ बळेचि जेठा घालूनि बैसती ॥ त्यांसी यमदूत बांधोनि नेती ॥ नेऊनि टाकिती नरककुंडी ॥३२॥
जो श्रवणी निजे दाटून ॥ तो उपजे अजगर होऊन ॥ बैसे नमस्कार केलियावाचून ॥ वंशवृक्ष होय तो ॥३३॥
कथेत बोले भलत्या गोष्टी ॥ तो मंडूक होय सदा वटवटी ॥ हर्षे टाळिया न वाजवी हटी ॥ होय कष्टी संसारी ॥३४॥
जे शिवकीर्तन हेळसिती ॥ ते शतजन्मी सारमेय होती ॥ दुरुत्तरे बोलती निश्चिती ॥ जन्मायेती सरड्याच्या ॥३५॥
जे श्रवणी न होती सादर ॥ ते अन्य जन्मी होती सूकर ॥ जे इच्छेदिती शिवचरित्र ॥ ते वृकयोनी पावती ॥३६॥
वक्त्यासी देता आसन ॥ शिवसन्निध बैसे जावोन ॥ वस्त्रे देता अन्न ॥ प्राप्त होय तयाते ॥३७॥
करिता कथापुराणश्रवण ॥ भक्ति वैराग्य ये आंगी पूर्ण ॥ यदर्थी कथा सुगम जाण ॥ जेण अनुताप उपजे मनी ॥३८॥
दक्षिणेकडे ग्राम एक अमंगळ ॥ त्याचे नाव मुळीच बाष्कळ ॥ सर्वधर्मविवर्जित केवळ ॥ स्त्रीपुरुष जारकर्मी ॥३९॥
धर्म नाहीच अणुमात्र ॥ अनाचारी परम अपवित्र ॥ जपतपविवर्जित अग्निहोत्र ॥ वेदशास्त्र कैचे तेथे ॥४०॥
वेद आणि शास्त्र ॥ हे विप्राचे उभय नेत्र ॥ एक नाही तरी साचार ॥ एकाक्ष तयासी बोलिजे ॥४१॥
वेदशास्त्र उभयहीन ॥ तो केवळ अंधचि जाण ॥ असो त्या नगरीचे लोक संपूर्ण ॥ सर्वलक्षणी अपवित्र ॥४२॥
तस्कर चाहाड आणि जार ॥ मद्यपी मार्गघ्न दुराचार ॥ मातापितयांचा द्रोह करणार ॥ एवं सर्वदोषयुक्त जे ॥४३॥
त्या ग्रामींचा एक विप्र ॥ नाम तयांचे विदुर ॥ वेश्येसी रत अहोरात्र ॥ कामकर्दमी लोळत ॥४४॥
त्याची स्त्री बहुला नाम ॥ तीही जारिणी अपवित्र परम ॥ एके जारासी असता सकाम ॥ भ्रतारे जपोनि धरियेली ॥४५॥
जार पळाला सत्वर ॥ तीस भ्रतारे दिधला मार ॥ यथेष्ट लत्ता मुष्टिप्रहार ॥ देता बोले काय ते ॥४६॥
म्हणे तू झालासी जार ॥ मीही तेचि करिते निरंतर ॥ मग बोले तो विप्र विदुर ॥ तुवा द्रव्य अपार मिळविले ॥४७॥
ते द्रव्य दे मजलागून ॥ मी देईन वारांगनेसी नेऊन ॥ ती म्हणे मी देऊ कोठून ॥ ऐकता मारी पुढती तो ॥४८॥
मग तिचे अलंकार हिरोनी घेत ॥ घरची सर्व संपत्ति नेता ॥ ते वारांगनेसी देत ॥ तेही समर्पी जाराते ॥४९॥
ऐसे दोघेही पाप आचरत ॥ तो विदुर विप्र पावला मृत्यु ॥ यमदूती नेला मारीत ॥ बहुत जाचिती तयाते ॥५०॥
कुंभीपाकादि परम दुःख ॥ भोगूनिया तो शतमूर्ख ॥ मग विंध्याचळाच्या दरीत देख ॥ भयानक पिशाच जाहला ॥५१॥
आळेपिळे आंगासी देत ॥ हिंडे क्षुधातृषापीडित ॥ रक्तवर्ण अंग त्याचे समस्त ॥ जेवी शेंदूर चर्चिला ॥५२॥
वृक्षासी घेत टांगून ॥ सवेंचि हात देत फिरे वन ॥ रक्तपिती भरोन ॥ सर्वांग त्याचे नासले ॥५३॥
कंटकवन परम दुर्धर ॥ न मिळे कदा फळमूळ आहार ॥ आपुल्या पापाचे भोग समग्र ॥ भोगी विदुर विप्र तो ॥५४॥
इकडे बहुला धवरहित ॥ एक होता तियेसी सुत ॥ तो कोणापासोनि झाला त्वरित ॥ ते स्मरण नाही तियेसी ॥५५॥
तव आले शिवरात्रिपर्व ॥ गोकर्णयात्रेसी चालिले सर्व ॥ नानावाद्ये वाजती अभिनव ॥ ध्वज पताका मिरविती ॥५६॥
शिवनामे गर्जती दास ॥ वारंवार करिती घोष ॥ कैचा उरेल पापलेश ॥ सर्वदा निर्दोष सर्व जन ॥५७॥
त्यांच्या संगती बहुला निघत ॥ सवे घेवोनि धाकटा सुत ॥ गोकर्णक्षेत्र देखिले पुण्यवंत ॥ झाले पुनीत सर्व जन ॥५८॥
बहुलेने स्नान करून ॥ घेतले महाबळेश्चराचे दर्शन ॥ पुराणश्रवणी बैसली येऊन ॥ तो निरूपण निघाले ॥५९॥
जी वनिता जारीण ॥ तीस यमदूत नेती धरोन ॥ लोहपरिघ तप्त करून ॥ स्मरगृहामाजी घालिती ॥६०॥
ऐसे बहुला ऐकोनी ॥ भयभीत झाली तेचि क्षणी ॥ अनुताप अंगी भरोनी ॥ रडो लागली अट्टाहासे ॥६१॥
मग पुराणिकासी समस्त ॥ आपुला सांगे वृत्तांत ॥ झाले जे जे पापाचे पर्वत ॥ ते निजमुखे उच्चारी ॥६२॥
अंतकाळी यमकिंकर ॥ ताडण करितील मज अपार ॥ ते वेळी मज कोण सोडविणार ॥ दुःख अपार सोसू किती ॥६३॥
स्वामी माझे कापते शरीर ॥ काय करू सांगा विचार ॥ गळा पाश घालूनि यमकिंकर ॥ करिती मार तप्तशास्त्रे ॥६४॥
नानापरी विटंबिती ॥ असिपत्रवनी हिंडविती ॥ उफराटे बांधोनि टांगिती ॥ नरककुंडी अधोमुख ॥६५॥
ताम्रभूमी तापवून ॥ त्यावरी लोळविती नेऊन ॥ तीक्ष्ण शस्त्रे आणोन ॥ पोटामाजी खोविती ॥६६॥
तीक्ष्ण धूम्र करून ॥ वरी टांगिती नेऊन ॥ भूमीत मज रोवून ॥ तप्तशरे मार करिती ॥६७॥
तप्तशूळावरी घालिती ॥ पायी चंडशिळा बांधिती ॥ महानरकी बुडविती ॥ सोडवी कोण तेथूनी ॥६८॥
बहुलेसी गोड न लागे अन्न ॥ दुःखे रडे रात्रंदिन ॥ म्हणे मी कोणासी जाऊ शरण ॥ आश्रय धरू कोणाचा ॥६९॥
कोण्या नरकी पडेन जाऊन ॥ मग त्या ब्राह्मणाचे धरी चरण ॥ सद्गुरु मज तारी येथून ॥ आले शरण अनन्य मी ॥७०॥
मग गुरु पंचाक्षर मंत्र ॥ सांगे बहुलेप्रति सत्वर ॥ शिवलीलामृत सुरस फार ॥ श्रवणी करवी शिवद्वारी ॥७१॥
मग तिणे सर्व ग्रंथ ॥ गुरुमुखे ऐकिला प्रेमयुक्त ॥ श्रवणभक्ति अवध्यात ॥ श्रेष्ठ ऐसे जाणिजे ॥७२॥
सत्संगे होय निःसंगे ॥ निःसंगे निर्मोह सहज मग ॥ निर्मोहत्वे निश्चित उद्वेग ॥ कैचा मग तयासी ॥७३॥
बहुला झाली परम पवित्र ॥ शिवनाम जपे अहोरात्र ॥ दोष न उरे तिळमात्र ॥ शुचिर्भूत सर्वदा ॥७४॥
तव्याचा जाय बुरसा ॥ मग तो सहजचि होय आरसा ॥ की लोह लागता परिसा ॥ चामीकर सहजचि ॥७५॥
की अग्नीत काष्ठ पडले ॥ मग सहजचि अग्निमय झाले ॥ गंगेसी वोहळ मिळाले ॥ गंगाजळ सहजचि ॥७६॥
जप करिता पाप जाय निःशेष ॥ ज्ञानाहूनि ध्यान विशेष ॥ श्रवणाहूनि मननास ॥ सतेजता सहजचि ॥७७॥
मननाहूनि निदिध्यास ॥ त्याहूनि साक्षात्कार समरस ॥ मग तो शिवरूप निर्दोष ॥ संशय नाही सर्वथा ॥७८॥
बहुला निर्दोष होऊन ॥ श्रवणे झाली सर्वपावन ॥ जिव्हेने करू लागली शिवकीर्तन ॥ मग कैचे बंधन तियेसी ॥७९॥
श्रवणे थोर पावन होते ॥ श्रवणे याचि जन्मी मुक्त ॥ नलगे तीर्थाटण श्रम बहुत ॥ श्रवणे सार्थक सर्वही ॥८०॥
ज्यासी न मिळे सत्समागम श्रवण ॥ त्याणे करू जावे तीर्थाटण ॥ नलगे अष्टांगयोगसाधन ॥ करावे श्रवण अत्यादरे ॥८१॥
योग याग व्रत साधन ॥ नलगे काहीच करावे जाण ॥ नवविद्या भक्ति पूर्ण ॥ श्रवणेचि हाता येतसे ॥८२॥
चारी वर्ण चारी आश्रम ॥ श्रवणेचि पावन परम ॥ असो बहुलेसी संतसमागम ॥ सर्वांहूनि थोर वाटे ॥८३॥
गुरूची सेवा अखंड करी ॥ त्यावरी राहिली गोकर्णक्षेत्री ॥ जटावल्कलाजिनधारी ॥ तीर्थी करी नित्यस्नान ॥८४॥
सर्वांगी भस्मलेपन ॥ करी पुण्यरुद्राक्षधारण ॥ सर्व प्राप्त सोडोनिया जाण ॥ गुरुसेवा केली तिणे ॥८५॥
नित्य गोकर्णलिंगाचे दर्शन ॥ गोकर्णक्षेत्र पुण्यपावन ॥ तेथींचा महिमा विशेष पूर्ण ॥ तृतीयाध्यायी वर्णिला ॥८६॥
स्वयातिकीर्तिपुष्टिवर्धन ॥ बहुलेने तिन्ही देह जाळून ॥ तेचि भस्म अंगी चर्चून ॥ झालीपावन शिवरूपी ॥८७॥
शंकरे विमान धाडिले ते काळी ॥ बहुला शिवपदाप्रती नेली ॥ एवढी पापीण उद्धरिली ॥ चतुर्दश लोक नवल करिती ॥८८॥
सदाशिवापुढे जाऊन ॥ बहुलेने केले बहुत स्तवन ॥ मग अंबेची स्तुति करिता पावन ॥ झाली प्रसन्न हिमनगकन्या ॥८९॥
म्हणे इच्छित वर माग त्वरित ॥ येरी म्हणे पति पडला अधोगतीत ॥ कोठे आहे न कळे निश्चित ॥ पावन करोनि आणी येथे ॥९०॥
मग ते त्रिजगज्जननी ॥ अंतरी पाहे विचारूनि ॥ तो विंध्याचळी पिशाच होऊनी ॥ रडत हिंडे पापिष्ट ॥९१॥
मग बहुलेसी म्हणे भवानी ॥ जाई सवे तुंबर घेऊनी ॥ पतीस आणी विंध्याद्रीहूनी ॥ श्रवण करवी शिवकथा ॥९२॥
मग गेली विंध्याचळा ॥ तव पिशाच नग्न देखिला ॥ धरोनि वृक्षासी बांधिला ॥ तुंबरे बळे करोनिया ॥९३॥
मग वल्लकी काढून ॥ सप्तस्वर मेळवून ॥ आरंभिले शिवकीर्तन ॥ ऐकता पशुपक्षी उद्धरती ॥९४॥
शिवकीर्तनरसराज ॥ तुवरे मात्रा देता सतेज ॥ सावध झाला विदुरद्विज ॥ म्हणे मज सोडा आता ॥९५॥
मग सोडिताचि धावोन ॥ धरिले तुंवराचे चरण ॥ म्हणे स्वामी धन्य धन्य ॥ केले पावन पापियाते ॥९६॥
स्त्रियेसी म्हणे धन्य तू साचार ॥ केला माझा आजि उद्धार ॥ मग तुवरे शिवपंचाक्षर ॥ त्यासी मंत्र उपदेशिला ॥९७॥
त्याचा करिता जप ॥ तव विमान आले सतेजरूप ॥ विदुर झाला दिव्यरूप ॥ स्त्रीसहित विमानी बैसला ॥९८॥
आणिली शिवापाशी मिरवत ॥ दोघेही शिवचरणी लागत ॥ लवण जळी विरत ॥ तैसी मिळत शिवरूपी ॥९९॥
जळी विराली जळगार नभी नाद विरे सत्वर ॥ तैसी बहुला आणि विदुर ॥ शिवस्वरूप जाहली ॥१००॥
ज्योती मिळाली कर्पूरी ॥ गंगा सामावली सागरी ॥ ब्रह्मस्वरूपी निर्धारी ॥ विराली ऐक्य होऊनिया ॥१॥
शिवमंत्र शिवकथाश्रवण ॥ शिवदीक्षा रुद्राक्षधारण ॥ भस्मलेपने उद्धरोन ॥ गेली किती संख्या नाही ॥२॥
भस्मांतूनि निघाला भस्मासुर ॥ शिवद्रोही परम पामर ॥ त्याचा कैसा केला उद्धार ॥ ते चरित्र सांग कैसे ॥३॥
हे शिवपुराणी कथा सुरस ॥ श्रोती ऐकावी सावकाश ॥ कैलासी असता महेश ॥ प्रदोषकाळी एकदा ॥४॥
भस्म स्वकरी घेऊन ॥ आंगी चर्चा उमारमण ॥ तव एक खडा लागला तो शिवे जाण ॥ भूमीवरी ठेविला ॥५॥
नवल शिवाचे चरित्र ॥ तेथेचि उत्पन्न झाला असुर ॥ नाम ठेविले भस्मासूर ॥ उभा सदा कर जोडूनी ॥६॥
म्हणे वृषभध्वजा सदाशिवा ॥ मज काही सांगिजे सेवा ॥ शंभु म्हणे मज नित्य येधवा ॥ चिताभस्म आणोनि देइजे ॥७॥
नित्य नूतन आणी भस्म ॥ हीच सेवा करी उत्तम ॥ ऐसी आज्ञा होता परम ॥ भस्मासुर संतोषला ॥८॥
कर्मभूमीस नित्य येवोन ॥ वसुंधरा शोधी संपूर्ण ॥ जो शिवभक्तपरायण ॥ लिंगार्चन घडले ज्यासी ॥९॥
शिवरात्री सोमवार प्रदोष ॥ सदा ऐके शिवकीर्तन सुरस ॥ त्याचेचि भस्म भवानीश ॥ अंगीकारी आदरे ॥११०॥
जे का भक्त अभेद प्रेमळ ॥ त्यांच्या मुंडांची करी माळ ॥ स्मशानी वैराग्य वाढे प्रबळ ॥ म्हणोनि दयाळ राहे तेथे ॥११॥
लोक स्मशानाहूनि घरा येती ॥ वैराग्य जाय विषयी जडे प्रीती ॥ म्हणोनि उमावल्लभे वस्ती ॥ केली महास्मशानी ॥१२॥
पंचभूते तत्त्वांसहित ॥ पिंडब्रह्मांड जाळोनि समस्त ॥ सर्व निरसूनि जे उरत ॥ स्वात्मसुख भस्म तेचि ॥१३॥
तेचि ब्रह्मानंदसुख सोज्ज्वळ ॥ ते भस्म चर्ची दयाळ ॥ तो अमूर्तमूर्त कृपाळ ॥ षड्विकाररहित जो ॥१४॥
अस्ति जायते वर्धते विपरिणमते ॥ अपक्षीयते निधन षड्विकार समस्त ॥ शिव परब्रह्म शाश्वत ॥ विकाररहित निर्विकार जो ॥१५॥
जो षडगुणैश्वर्यसंपन्न ॥ यशःश्रीकीर्तिविज्ञान ॥ औदार्य वैराग्य संपूर्ण ॥ ऐसे कोठे असेना ॥१६॥
आणिक षट्चिन्ह मंडित ॥ ती ऐका सर्वज्ञ पंडित ॥ कर्तृत्व नियंतृत्व भोक्तृत्व ॥ विभुत्व साक्षित्व सर्वज्ञत्व पै ॥१७॥
या चिन्ही मंडित शुद्ध ॥ शंकर परिपूर्ण ब्रह्मानंद ॥ मायाचक्रचाळक शुद्ध ॥ त्रिविधभेदरहित जो ॥१८॥
भक्तरक्षणार्थ सगुण ॥ शंभु झाला चैतन्यघन ॥ तेणे भस्मासुर निर्मून ॥ धाडिला भस्म आणावया ॥१९॥
ऐसे नित्य आणिता चिताभस्म ॥ असुर मातला मदे परम ॥ गो ब्राह्मण देखे मनुष्य उत्तम ॥ म्हणे संहारूनिया टाकू हे ॥१२०॥
हे संहारूनिया सकळ ॥ असुराराज्य करावे सबळ ॥ जाऊनिया निर्जरमंडळ ॥ शक्र कमलोद्भव जिंकावे ॥२१॥
विष्णु आणि धूर्जटी ॥ हेही संहारावे शेवटी ॥ त्रिभुवन जिंकिल्यापाठी ॥ मीच इंद्र होईन ॥२२॥
ऐसी मनी बांधोनी गाठी ॥ कैलासा गेला तो कपटी ॥ म्हणे ऐकतोस धूर्जटी ॥ भस्म सृष्टी न मिळे कोठे ॥२३॥
चार लक्ष मनुष्य योनी पाहे ॥ नित्य सवा लक्ष घडामोड होये ॥ शोधिली सर्व अवनी हे ॥ परी भस्म शुद्ध न मिळेचि ॥२४॥
ऐसी कपटभक्ति दावी परम ॥ म्हणे माझा टळतो नित्यनेम ॥ तुज अर्पावे चिताभस्म ॥ तरी एक वर्म सुगम असे ॥२५॥
म्हणे हरा पंचवदना ॥ विरूपाक्षा त्रिपुरच्छेदना ॥ उमावल्लभा नागभूषणा ॥ वरप्रदान दे माते ॥२६॥
मज देई एक वर ॥ ज्याच्या माथा ठेवीन कर ॥ तो भस्म व्हावा निर्धार ॥ कार्य फार साधे येणे ॥२७॥
म्हणोनि लोटांगण घालित ॥ इतुके माझे चालवी व्रत ॥ निष्कपट शिव भोळानाथ ॥ वर द्यावया सिद्ध झाला ॥२८॥
मग बोले हिमनगराजकुमारी ॥ हा नष्ट परम दुराचारी ॥ यासी वर देता धरित्री ॥ भस्म करील निर्धारे ॥२९॥
महाशब्द करावयाची हौस ॥ तो पातला फाल्गुनमास ॥ आधीच वाटपाड्या चोरास ॥ निरोप दिधला भूभुजे ॥१३०॥
आधीच जारकर्मी रत ॥ त्यासी प्रभुत्व दिधले स्त्रीराज्यात ॥ की मद्यपियासी दावीत ॥ सिंदीवन साक्षेपे ॥३१॥
मर्कटासी मद्यपान ॥ त्यात झाले वृश्चिकदंशन ॥ त्याहीवरी भूत संचरले दारुण ॥ मग अन्योन्य वते जेवी ॥३२॥
यालागी हा तामसी असुर ॥ यास न द्यावा कदापि वर ॥ षडास्य गजास्य वीरभद्र ॥ नंदिकेश्वर हेचि सांगे ॥३३॥
परम भोळा शंकर ॥ आमचे लेकरू भस्मासुर ॥ यासी द्यावा अगत्य वर ॥ तो अन्यत्र रहाटी न करीच ॥३४॥
म्हणे बाळका तुज दिधला वर ॥ ऐसे ऐकतचि असुर ॥ उडे नाचे आनंदे थोर ॥ त्रिभुवनामाजी न समाये ॥३५॥
मृत्युलोकासी आला सत्वर ॥ मग करीत चालिला संहार ॥ संत भक्त गो विप्र ॥ शोधून भस्म करीतसे ॥३६॥
मस्तकी हस्त ठेविता तत्काळ ॥ भस्म होय न लगे वेळ ॥ ऋषिचक्र शोधूनि सकळ ॥ भस्म करी एकदांचि ॥३७॥
छपन्न देश शोधीत ॥ चमूसहित भूभुज समस्त ॥ भस्म करी क्षणात थोर अनर्थ ओढवला ॥३८॥
कुटुंबासहित ब्राह्मण ॥ गिरिविवरी बैसती लपोन ॥ पृथ्वी उध्वस संपूर्ण ॥ बाहेर कोण न फिरेचि ॥३९॥
जैसा श्येनपक्षी अकस्मात ॥ पक्षी धरोन संहारीत ॥ तैसा अंतरिक्ष येवोनि त्वरित ॥ मस्तकी हस्तस्पर्श करी ॥१४०॥
महायोद्धा रणपंडित समरी जिंकी कृतांत ॥ परी भस्मासुरापुढे बलहत ॥ काहीच न चले युक्ती त्या ॥४१॥
जैसा पाखांडी खळ तत्वता ॥ तो नावरे बहुता पंडिता ॥ तैसी त्या असुरापुढे पाहता ॥ न चले युक्ति कवणाची ॥४२॥
असुर करितो नित्य संहार ॥ शिवासी न कळे समाचार ॥ भस्म नेऊनि दे सत्वर ॥ महानम्र होय तेथ ॥४३॥
सवेचि ये मृत्युलोका ॥ मनी धरिला ऐसा आवाका ॥ त्रिदशांसहित शचीनायका ॥ भस्म करावे यावरी ॥४४॥
मग कमलोद्भव कमलाकर ॥ शेवटी भस्म करावा गंगाधर ॥ उमा त्रिभुवनांत सुंदर ॥ हिरोनि घ्यावी वृद्धाची ॥४५॥
पृथ्वी पडली उद्वस ॥ मिळाल्या प्रजा ऋषि आसमास ॥ सर्वांचे भय पावले मानस ॥ पुरुहुतास शरण आले ॥४६॥
मग मघवा सकळांसहित ॥ पद्मजाप्रति गार्हाणे सांगत ॥ तो म्हणे क्षीराब्धिजामात ॥ त्यास सांगू चला आता ॥४७॥
अक्षज नाम इंद्रियज्ञान ॥ ते ज्याने केले आधी दमन ॥ म्हणोनि अधोक्षज नाम त्यालागून ॥ अतींद्रियद्रष्टा तो ॥४८॥
ऐसा जो अधोक्षज ॥ जवळी केला वैकुंठराज ॥ गार्हाणे सांगती प्रजा द्विज ॥ भस्मासुराचे समस्त ॥४९॥
मग समस्तासहित नारायण ॥ शिवाजवळी सांगे वर्तमान ॥ भस्मासुरे जाळून ॥ भस्म केले सर्वही ॥५०॥
उरलो आम्ही समस्त ॥ इतुक्यांचाही करील अंत ॥ सदाशिवा तुझाही प्रांत बरा न दिसे आम्हांते ॥५१॥
हैमवती करी जतन ॥ ऐकोनि हासला भाललोचन ॥ म्हणे भस्मासुरासी मरण ॥ जवळ आले यावरी ॥५२॥
तुम्ही जावे स्वस्थाना सत्वर ॥ ऐसे बोले जो कर्पूरगौर ॥ तो अकस्मात आला असुर ॥ भस्म घेऊन तेधवा ॥५३॥
आपुले गार्हाणे आणिले येथ ॥ मिळाले ते देखिले समस्त ॥ असुर मान तुकावीत ॥ सरड्याऐसी तयांवरी ॥५४॥
म्हणे जे आले येथ ॥ उद्या भस्म करीन समस्त ॥ मग क्रोधे बोले उमानाथ ॥ भस्मासुरासी तेधवा ॥५५॥
अरे तू अधम असुर ॥ केला पृथ्वीचा संहार ॥ तुज आम्ही दिधला वर ॥ परिणाम त्याचा बरा केला ॥५६॥
असुर क्रोधे बोले ते समयी ॥ तुझी सुंदर दारा मज देई ॥ नातरी तव मस्तकी लवलाहि ॥ हस्त आताचि ठेवितो ॥५७॥
भवानी उठोनि गेली सदनात ॥ असुर ग्रीवा तुकावीत ॥ शिवाच्या माथा ठेवोनि हस्त ॥ तुज नेईन क्षणार्धे ॥५८॥
शिवमस्तकी ठेवावया कर ॥ वेगे धाविन्नला भस्मासुर ॥ प्रजा आणि ऋषीश्वर ॥ पळू लागले दशदिशा ॥५९॥
जो भक्तजनभवभंग ॥ मायालाघवी उमारंग ॥ पळता झाला सवेग ॥ घोरांदर वन घेतले ॥१६०॥
पाठी लागला भस्मासुर ॥ म्हणे जोगाड्या उभा धरी धीर ॥ आजि तुझा करीन संहार ॥ रक्षा लावीन अंगासी ॥६१॥
वेदशास्त्रा न कळे पार ॥ मायाचक्रचाळक अगोचर ॥ त्यासी पामर भस्मसुर ॥ धरीन म्हणे निजबळे ॥६२॥
जो ब्रह्मादिक देवांचे ध्यान ॥ सनकादिकांचे देवतार्चन ॥ त्यासी भस्मासुर आपण ॥ धरीन म्हणे पुरुषार्थे ॥६३॥
त्यासी वाटे धरीन मी आता ॥ दिसे जवळी परी नाटोपे सर्वथा ॥ ऐसा कोटिवर्षे धावता ॥ न लगे हाता सर्वेश्वर ॥६४॥
उणेपुरे शब्द बोलत ॥ शब्दा नातुडे गिरिजाकांत ॥ तर्क कुतर्क करिता बहुत ॥ हाक फोडिता नातुडे ॥६५॥
वेदशास्त्रांचा तर्क चाचरे ॥ घोकिता शास्त्रज्ञ झाले म्हातारे ॥ सकळ विद्या घेता एकसरे ॥ मदनांतक नाटोपे ॥६६॥
जे प्रेमळ शुद्ध भाविक ॥ त्यांचा विकला कैलासनायक ॥ उमेसहित त्यांचे घरी देख ॥ वास करी सर्वदा ॥६७॥
तप बल विद्या धन ॥ या बळे धरू म्हणता ते मूर्ख पूर्ण ॥ कल्पकोटि जन्ममरण ॥ फिरता गणित न होय ॥६८॥
असो अहंकारे भस्मासुर ॥ धावता नाटोपे शंकर ॥ इकडे भवानी इंदिरावर बंधु आपुला स्तवी तेव्हा ॥६९॥
म्हणे कमलोद्भवजनका कमलनयना ॥ कमलनाभा मुरमर्दना ॥ कमलधारका कमलशयना ॥ कमलाभरणा कमलाप्रिया ॥१७०॥
जगद्वंद्या जगद्व्यापका ॥ जनजराजन्ममोचका ॥ जनार्दना जगरक्षका ॥ जगदुद्धारा जलाब्धिशयना ॥७१॥
ऐसे ऐकता माधव मोहिनीरूप धरोनि अभिनव ॥ शिवमनरंजना केशवा ॥ आडवा आला असुराते ॥७२॥
शिव न्यग्रोध होऊनि देख ॥ दुरून पाहता झाला कौतुक ॥ मोहिनी देखता असुर निःशंक ॥ भुलोनि गेला तेधवा ॥७३॥
विमानी पहाती समस्त देव ॥ म्हणती हे कैचे रूप अभिनव ॥ अष्टनायिकांचे भैरव ॥ चरणांगुष्ठी न तुळेचि ॥७४॥
नृत्य करीत मोहिनी ॥ असुर तन्मय झाला देखोनी ॥ म्हणे ललने तुजवरूनी ॥ कमला अपर्णा ओवाळिजे ॥७५॥
तुझे देखत वदन ॥ वाटे ओवाळूनि सांडावा प्राण ॥ तुवा नयनकटाक्षबाणेकरून ॥ मनमृग माझा विंधिला ॥७६॥
तुझे पदकमळ जेथे उमटले ॥ तेथे सुवास घ्यावया वसंत लोळे ॥ तुवा पसरोनि श्रृंगारजाळे ॥ आकळिले चित्तमीना ॥७७॥
मज माळ घाली सत्वर ॥ तुझे दास्य करीन निरंतर ॥ मायावेषधारी मुरहर ॥ हास्यवदने बोलतसे ॥७८॥
म्हणे मी तुज वरीन त्वरित पैल तो न्यग्रोधतरु दिसत ॥ माझे त्यात आहे आराध्य दैवत ॥ नवस तेथे केला म्या ॥७९॥
लग्नाआधी पतिसहित ॥ तेथे करावे गायन नृत्य ॥ परी मी जेथे ठेवीन हस्त ॥ तुवा तेथेचि ठेवावा ॥१८०॥
मी जे दावीन हावभाव ॥ तूही तैसेच दावी सर्व ॥ तेथे अणुमात्र उणे पडता देव ॥ क्षोभेल मग तुजवरी ॥८१॥
महाखडतर माझे दैवत ॥ सकळ ब्रह्मांड जाळील क्षणात ॥ असुर तियेसी अवश्य म्हणत ॥ सांगसी तैसा वर्तेन मी ॥८२॥
ऐसा भुलवूनि तयासी ॥ आणिला तो वटच्छायेसी ॥ मग नमूनि दैवतासी ॥ आरंभी नृत्य मोहिनी ॥८३॥
मोहिनी नृत्य करीत ॥ अष्टनायिका तटस्थ पाहत ॥ किन्नर गंधर्व तेथ ॥ गायन ऐकता भुलले ॥८४॥
देव सर्व षट्पद होऊनी ॥ सुवासा तिच्या वेधूनी ॥ गुप्तरूपे गुंजारव करिती वनी ॥ परि ते कामिनी कोणानेणवे ॥८५॥
तिचे सुस्वर ऐकता गायन ॥ विधिकुरंग गेला भुलोन ॥ कुंभिनी सोडूनि करावया श्रवण ॥ कद्रूतनय येऊ पाहे ॥८६॥
मोहिनी जेथे ठेवी हस्त ॥ असुरही तैसेच करीत ॥ आपुले मस्तकी ठेवीत ॥ आत्मकर मोहिनी ॥८७॥
मग असुरेही शिरी हात ॥ ठेविता भस्म झाला तेथ ॥ मोहिनीरूप त्यागूनि भगवंत ॥ चतुर्भुज जाहला ॥८८॥
वटरूप सोडोनि देख ॥ प्रगट झाला तेथे मदनांतक ॥ हरिहर भेटले झाले एक ॥ देव वर्षती सुमनमाळा ॥८९॥
मोहिनीरूप जेव्हा धरिले ॥ पाहोनि शिवाचे वीर्य द्रवले ॥ भूमीवरी पडता अष्टभाग झाले ॥ अष्टभैरव अवतार ते ॥१९०॥
असितांग रुरु चंड क्रोध ॥ उन्मत्त कपाल भीषण प्रसिद्ध ॥ संहारभैरव आठवा सुसिद्ध ॥ अंशावतार शिवाचे ॥९१॥
भस्मासुर वधिला हे मात ॥ प्रगटता त्रैलोक्य आनंदभरित ॥ हस्त धरोनि रमाउमानाथ ॥ येते झाले कैलासा ॥९२॥
अंबिका तात्काळ प्रगटोन ॥ करी हरिहराते वंदन ॥ दोनी मूर्ति बैसवून ॥ करी पूजन हैमवती ॥९३॥
हरिहर नारायण नागभूषण ॥ शिव सीतावल्लभ नाम सगुण ॥ पंचवदन पन्नगशयन ॥ कर्पूरगौर कमलोद्भवपिता ॥९४॥
पिनाकपाणि पीतांबरधर ॥ नीलकंठ नीरदवर्णशरीर ॥ वृंदारकपति वृंदावनासी मधुहर ॥ गोवाहन हर गोविंद ॥९५॥
चंद्रशेखर शंखचक्रधर ॥ विश्वनाथ विश्वंभर ॥ कपालनेत्र कमनीयगात्र ॥ लीला विचित्र दोघांची ॥९६॥
मुरहर मायामल्लहर ॥ व्यालभूषण मोहहर्ता श्रीधर ॥ अंधक मर्दन अघबकहर ॥ असुरमर्दन दोघेही ॥९७॥
सिद्धेश्वर सिंधुजावर ॥ निःसार निरहंकार ॥ नगतनयावर नंदकिशोर ॥ ईशान ईश्वर इंदिरापती ॥९८॥
क्षारवर्णतनु क्षीराब्धिशयन ॥ एक ब्रह्मादिवंद्य एक ब्रह्मानंदपूर्ण ॥ त्या दोघांसी पूजोन ॥ आनंदमय जगदंबा ॥९९॥
आता श्रोते सावधान ॥ पुढे सुरसकथा अमृताहून ॥ वीरभद्रजन्म शिवपार्वतीलग्न ॥ आणि षडाननजन्म असे ॥२००॥
शिवलीलामृत ग्रंथ सिंहस्थ ॥ गौर्तमी स्वधुनी भेटो येत ॥ या अध्यायी कैलासवैकुंठनाथ ॥ एके ठायी मिळाले ॥१॥
तरी ह्या सिंहस्थी भाविक जन ॥ ग्रंथगौतमी करिती स्नान ॥ अर्थजीवनी बुडी देवोन ॥ अघमर्षणी निमग्न जे ॥२॥
श्रीधरस्वामी ब्रह्मानंद ॥ सुखावला तेथेचि प्रसिद्ध ॥ जेथे नाही भेदाभेद ॥ अक्षय अभंग सर्वदा ॥३॥
शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड ॥ स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ॥ परिसोत श्रोतेअखंड ॥ द्वादशाध्याय गोड हा ॥२०४॥
इति द्वादशोऽध्यायः ॥१२॥
॥श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु॥
श्री शिवलीलामृत अध्याय तेरावा
श्रीगणेशाय नमः ॥
जो सद्गुरु ब्रह्मानंद ॥ अपर्णाह्रदयाब्जमिलिंद ॥ स्मरारि गजास्यजनक प्रसिद्ध ॥ चरणारविंद नमू त्याचे ॥१॥
स्कंदपुराणी सूत ॥ शौनकादिकांप्रति सांगत ॥ त्रतोयुगी अद्भुत ॥ कथा एक वर्तली ॥२॥
दक्षप्रजापति पवित्र ॥ आरंभिता झाला महासत्र ॥ निंदोनि स्वामी त्रिनेत्र ॥ सर्व निर्जर बोलाविले ॥३॥
जगदात्मा सदाशिव ॥ जयासी वंदिती पद्मज रमाधव ॥ आम्नाय आणि वासव ॥ स्तविती ज्यासी सर्वदा ॥४॥
शिवमहिमा नेणोनि अद्भुत ॥ दिवसनिशी दक्ष निंदीत ॥ नरमुंडमाळा अपवित्र बहुत ॥ गळा घालित कैसा हा ॥५॥
करी ओले गजचर्म प्रावरण ॥ न कंटाळे दुर्गंधीने मन ॥ भिक्षा मागे नरकपाळ घेऊन ॥ वसे स्मशानी सर्वदा ॥६॥
चिताभस्म अंगी चर्चिले ॥ विखार ठायी ठायी वेष्टिले ॥ भ्रष्ट तितुके अंगिकारिले ॥ सवे पाळे भूतांचे ॥७॥
अभद्र तितुके अंगिकारिले ॥ यासी कोण म्हणतील भले ॥ ज्यासी जे योग्य नाही बोलिले ॥ ते दिल्हे येणे सर्वस्वे ॥८॥
यासी देव म्हणेल कोण ॥ क्रोधे संतप्त अनुदिन ॥ तृतीय नेत्री प्रळयाग्न ॥ वाटे त्रिभुवन जाळील ॥९॥
मस्तकी वाहे सदा पाणी ॥ नाचत जाऊन निजकीर्तनी ॥ भक्त देखता नयनी ॥ बैसे अवघे देवोनि ॥१०॥
दैत्यांसी देवोनिया वर ॥ येणेचि माजविले अपार ॥ न कळे यासी लहान थोर ॥ वाहन ढोर तयाचे ॥११॥
शिवनिंदा करावया कारण ॥ एकदा दक्ष गेला कैलासालागून ॥ शिवे नाही दिधले अभ्युत्थान ॥ तेणे दुःखे क्षोभला ॥१२॥
ऐसा दक्ष शिवासी निंदी ॥ यज्ञी न पूजी विभाग नेदी ॥ पुरली आयुष्याची अवघी ॥ तरीच हे बुद्धि उपजली ॥१३॥
शिवभजन न करी जो पतित ॥ त्यावरी विघ्न पडती असंख्यात ॥ याग जप तप दान व्यर्थ ॥ उमानाथ नावडे जया ॥१४॥
जेणे निंदिला शिवदयाळ ॥ परम निर्दय तो दुर्जन खळ ॥ मनुष्यांमाजी तो चांडाळ ॥ त्याचा विटाळ न व्हावा ॥१५॥
असो दक्षकन्या दाक्षायणी ॥ कैलासी वाट पाहे भवानी ॥ म्हणे याग मांडिला पितृसदनी ॥ मज बोलावू नये का ॥१६॥
अपर्णा म्हणे त्रिनेत्रा ॥ मी जाईन पित्याच्या सत्रा ॥ तेणे सर्व कन्या पंचवक्रा ॥ सन्मानेसी बोलाविल्या ॥१७॥
मज विसरला काय म्हणोनि ॥ तरी मी तेथवरी जाईन ॥ यावरी बोले भाललोचन ॥ मृडानीप्रति तेधवा ॥१८॥
म्हणे मृगलोचने ऐक गौरी ॥ पद्मजजनकसहोदरी ॥ लावण्यामृतसरिते अवधारी ॥ कदाही तेथे न जावे ॥१९॥
तव पिता निंदक कुटिल ॥ मम द्वेषी दुर्जन खळ ॥ तू जाताचि तात्काळ ॥ अपमानील शुभानने ॥२०॥
ज्याच्या अंतरी नाही प्रीती ॥ त्याचे वदन न पहावे कल्पांती ॥ ऐसे त्र्यंबक बोले अंबिकेप्रती ॥ नारद तेथे पातला ॥२१॥
म्हणे पितृसदना जावयालागून ॥ न पहावा कदाही मान ॥ नंदीवरी आरूढोन ॥ दाक्षायणी चालिली ॥२२॥
सवे घेतले भूतगण ॥ मनोवेगे पातली दक्षसदन ॥ तव मंडप शोभायमान ॥ ऋषी सुरवरी भरला असे ॥२३॥
आपुलाल्या पूज्यस्थानी ॥ देव बैसविले सन्मानेकरूनी ॥ एक सदाशिव वेगळा करूनी ॥ पूजीले ऋषि सुरवर ॥२४॥
जैसा उडुगणात मिरवे अत्रिसुत ॥ तैसा दक्ष मध्ये विराजत ॥ शिवद्वेषी परम अभक्त ॥ कुंडी टाकीत अवदाने ॥२५॥
भवानी जवळी आली ते वेळे ॥ देखोनि सुरवर आनंदले ॥ परी दक्षाचे धुरे डोळे भरले ॥ कन्येकडे न पाहेचि ॥२६॥
नंदिवरूनि उतरूनी ॥ पितयासमीप आली भवानी ॥ दक्ष मुख मुरडोनी ॥ घाली ग्रंथी भ्रूमंडळा ॥२७॥
जगन्माता गुणनिधान ॥ न्याहाळूनि पाहे पितृवचन ॥ म्हणे धुरे भरले नयन ॥ म्हणोनि न पाहे मजकडे ॥२८॥
सकळ भगिनींचा सन्मान बहुत ॥ दाक्षायणी तेव्हा देखत ॥ जननीकडे विलोकीत ॥ तेही न पाहे तियेते ॥२९॥
मनात दक्ष भावीत ॥ ईस कोणे बोलाविले येथ ॥ कन्या आणि जामात ॥ दृष्टी मज नावडती ॥३०॥
आदिमाया प्रवणरूपिणी ॥ अनंतब्रह्मांडांची स्वामिणी ॥ तिचा अपमान देखोनि ॥ भ्याले सकळ सुरवर ॥३१॥
म्हणती दक्ष भुलला यथार्थ ॥ हे ब्रह्मांड जाळील निमिषांत ॥ अपमान देखोनि उमा तेथ ॥ क्रोधे संतप्त जाहली ॥३२॥
प्रळयवीज पृथ्वीवरी पडत ॥ तैसी उडी घातली कुंडात ॥ उर्वीमंडळ डळमळत ॥ होय कंपित भोगींद्र ॥३३॥
वैकुंठ कैलास डळमळी ॥ कमळभवांडी हाक वाजली ॥ कृतांत काप चळचळी ॥ म्हणे बुडाली सृष्टि आता ॥३४॥
हाक घेवोनी शिवगण ॥ गेले शिवापाशी धावोन ॥ सांगती सर्व वर्तमान ॥ जे जे जाहले दक्षगृही ॥३५॥
ऐकता क्षोभला उमाकांत ॥ जेवी महाप्रळयींचा कृतांत ॥ हाक देवोनि अद्भुत ॥ जटा आपटीत आवेशे ॥३६॥
तो अकस्मात वीरभद्र ॥ प्रगटला तेथे प्रळयरुद्र ॥ वाटे प्रलयाग्नि आणि द्वादश मित्र ॥ एकत्र होवोनि प्रगटले ॥३७॥
वाटे त्याचिया तेजांत ॥ चंद्रसूर्य बुचकळ्या देत ॥ आकाश असे आसुडत ॥ सडा होत नक्षत्रांचा ॥३८॥
कुंभिनी बुडाली देख ॥ चतुर्दश लोकी गाजली हाक ॥ दक्षगृही बलाहक ॥ रक्तवर्षाव करीतसे ॥३९॥
अवचित उकलली क्षिती ॥ दिवसा दिवाभीते बोभाती ॥ दक्षअंगीची सर्व शक्ती ॥ निघोनी गेली तेधवा ॥४०॥
इकडे वीरभद्र शिवस्तवन ॥ करोनि निघाला क्रोधायमान ॥ एकवीस पद्मे दळ घेऊन ॥ मनोवेगे धांविन्नला ॥४१॥
साठ कोटि गण घेऊन ॥ मागूनि धांविन्नला अपर्णाजीवन ॥ पुढे शिवपुत्र धावोन ॥ ख्याती केली दक्षयागी ॥४२॥
वारणचक्र असंभाव्य ॥ त्यावरी एकला लोटे कंठीरव ॥ की विनायके घेतली धाव ॥ अपार अही पाहोनी ॥४३॥
आला देखोनि वीरभद्र ॥ पळो लागले देव समग्र ॥ अवदाने सांडोनि सत्वर ॥ ऋत्विज पळाले तेथोनिया ॥४४॥
आकांतला त्रिलोक ॥ प्रळयकाळींचा पावक ॥ दुमदुमिला ब्रह्मांडगोळक ॥ शक्रादिदेव कापती ॥४५॥
एक मलमूत्र भये विसर्जिती ॥ धोत्रे गळाली नेणती क्षिती ॥ कुक्कुटरूपे रोहिणीपती ॥ पळता झाला तेधवा ॥४६॥
शिखी होवोनिया शिखी ॥ पळता झाला एकाएकी ॥ यम आपुले स्वरूप झाकी ॥ बकवेष घेवोनिया ॥४७॥
नैऋत्यपति होय काक ॥ शशक होय रसनायक ॥ कपोत होवोनिया अर्क ॥ पळता झाला तेधवा ॥४८॥
कीर होवोनि वृत्रारी ॥ पळता भय वाटे अंतरी ॥ नाना पक्षिरूपे झडकरी ॥ नवग्रह पळाले ॥४९॥
मिंधियावरी वीज पडत ॥ दक्षावरी तेवी अकस्मात ॥ महावीर शिवसुत ॥ वीरभद्र पातला ॥५०॥
षड्बाहु वीर दैदीप्यमान ॥ असिलता खेटक धनुष्य बाण ॥ त्रिशूळ डमरू शोभायमान ॥ सायुध ऐसा प्रगटला ॥५१॥
पूषाचे पाडिले दात ॥ भगदेवाचे नेत्र फोडीत ॥ खांड मिशा उपडीत ॥ ऋत्विजांच्या तेधवा ॥५२॥
चरणी धरूनि आपटिले ॥ बहुतांचे चरण मोडिले ॥ कित्येकांचे प्राण गेले ॥ वीरभद्र देखता ॥५३॥
मागूनि पातला शंकर ॥ तेणे दक्षपृतना मारिली सत्वर ॥ कुंडमंडप समग्र ॥ विध्वंसूनि जाळिला ॥५४॥
देखोनिया विरूपाक्ष ॥ भयभीत झाला दक्ष ॥ पद्मज आणि सहस्त्राक्ष ॥ पूर्वीच तेथोनि पळाले ॥५५॥
वीरभद्र म्हणे शतमूर्खा दक्षा ॥ त्वा निंदिले कैसे विरूपाक्षा ॥ तुज लावीन आता शिक्षा ॥ शिवद्वेषिया पाहे पा ॥५६॥
विद्युत्प्राय असिलता तीव्र ॥ ऊर्ध्वहस्ते महावीर ॥ छेदिता झाला दक्षशिर ॥ प्रळय थोर जाहला ॥५७॥
दक्षशिर गगनी उसळले ॥ वीरभद्रे पायातळी रगडिले ॥ मग उमाधवापाशी ते वेळे ॥ देव पातले चहूकडोनी ॥५८॥
सकळ सुरांसहित कमळासन ॥ करीत उमावल्लभाचे स्तवन ॥ म्हणे वृषभध्वजा कृपा करून ॥ दक्षालागी उठवी ॥५९॥
संतोषोनि कर्पूरगौर ॥ म्हणे आणोनि लावा दक्षाचे शिर ॥ परी ते नेदी वीरभद्र ॥ पायातळी रगडिले ॥६०॥
म्हणे शिवद्वेषी दुराचार ॥ त्याचा करीन ऐसा संहार ॥ जो शिवनाम न घे अपवित्र ॥ जिव्हा छेदीन तयाची ॥६१॥
जो न करी शिवार्चन ॥ त्याचे हस्त चरण छेदीन ॥ जो न पाहे शिवस्थान ॥ त्याचे नयन फोडीन मी ॥६२॥
विष्णु थोर शिव लहान ॥ हर विशेष विष्णु सान ॥ ऐसे म्हणे जो खळ दुर्जन ॥ संहारीन तयाते ॥६३॥
सर्वथा नेदी मी दक्षशिर ॥ काय करितील विधिहरिहर ॥ मग मेषशिर सत्वर ॥ दक्षालागी लाविले ॥६४॥
सजीव करोनिया दक्ष ॥ तीर्थाटन गेला विरूपाक्ष ॥ द्वादश वर्षे निरपेक्ष ॥ सेवीत वने उपवने ॥६५॥
महास्मशान जे आनंदवन ॥ तेथे शंकर राहिला येऊन ॥ मग सहस्त्र वर्षे संपूर्ण ॥ तपासनी बैसला ॥६६॥
पुढे हिमाचलाचे उदरी ॥ अवतरली त्रिपुरसुंदरी ॥ शिवआराधना नित्य करी ॥ हिमाचळी सर्वदा ॥६७॥
हिमनगाची स्त्री मेनका ॥ तीस पुत्र झाला मैनाकपर्वत देखा ॥ पार्वती कन्या जगदंबिका ॥ आदिमाया अवतरली ॥६८॥
ब्रह्मांडमंडपामाझारी ॥ जिची प्रतिमा नाही दूसरी ॥ कमळजन्मा वृत्रारी ॥ त्यांसही दुजी करवेना ॥६९॥
तिचे स्वरुप पहावया ॥ येती सुर भुसुर मिळोनिया ॥ जिचे स्वरूप वर्णावया ॥ सहस्त्रवदना शक्ति नव्हे ॥७०॥
मृग मीन कल्हार खंजन ॥ कुरवंडी करावे नेत्रांवरून ॥ अष्टनायिकांचे सौंदर्य पूर्ण ॥ चरणांगुष्ठी न तुळे जिच्या ॥७१॥
आकर्णनेत्र निर्मळ मुखाब्ज ॥ देखोनि लज्जित होय द्विजराज ॥ कंठीरव देखोनि जिचा माज ॥ मुख न दावी मनुष्या ॥७२॥
परम सुकुमार घनश्यामवर्णी ॥ ओतिली इंद्रनीळ गाळुनी ॥ दंततेज पडता मेदिनी ॥ पाषाण महामणी पै होती ॥७३॥
आदिमाया प्रणवरूपिणी ॥ ते झाली हिमनगनंदिनी ॥ अनंतशक्तींची स्वामिणी ॥ वेदपुराणी वंद्य जे ॥७४॥
कोट्यानुकोटी मीनकेतन ॥ सांडणी करावी नखांवरून ॥ आंगींचा सुवास संपूर्ण ॥ ब्रह्मांड फोडोन वरी जाय ॥७५॥
ब्रह्मादिदेव मुळीहूनी ॥ गर्भी पाळी बाळे तिन्ही ॥ बोलता प्रकाश पडे सदनी ॥ निराळवर्णी कोमलांगी ॥७६॥
सहज बोलता क्षिती ॥ वाटे रत्नराशी विखुरती ॥ पदमुद्रा जेथे उमटती ॥ कमळे उठती दिव्य तेथे ॥७७॥
त्या सुवासासी वेधोनि वसंत ॥ भोवता गडबडा लोळत ॥ केवळ कनकलता अद्भुत ॥ कैलासाहुनी उतरली ॥७८॥
नंदीसहित त्रिपुरारी ॥ येवोनि हिमाचळी तप करी ॥ शिवदर्शना झडकरी ॥ हिमनग येता जाहला ॥७९॥
घालोनिया लोटांगण ॥ करीत तेव्हा बहुत स्तवन ॥ यावरी पार्वती येऊन ॥ करीत भजन शिवाचे ॥८०॥
साठ सहस्त्र लावण्यखाणी ॥ सवे सवे सखिया जैशा पद्मिणी ॥ तयांसहित गजास्यजननी ॥ सेवा करी शिवाची ॥८१॥
द्वारी सुरभीपुत्र रक्षण ॥ ध्यानस्थ सदा पंचवदन ॥ लाविले पंचदशलोचन ॥ सदा निमग्न स्वरूपी ॥८२॥
तारकासुराचे पुत्र तिघेजण ॥ तारकाक्ष विद्युन्माली कमललोचन ॥ तिही घोर तप आचरोन ॥ उमारमण अर्चिला ॥८३॥
सहस्त्रदळकमळेकरून ॥ त्रिवर्ग पूजिती त्रिनयन ॥ सहस्त्रांत एक न्यून ॥ कमळ झाले एकदा ॥८४॥
तिघेही काढूनि नेत्रकमळे ॥ शिवार्चन करिते झाले ॥ मागुती एक न्यून आले ॥ मग स्वशिरकमळे अर्पिली ॥८५॥
प्रसन्न होवोनि त्रिनेत्र ॥ तिघे उठविले तारकापुत्र ॥ तिघांसी दीधले अपेक्षित वर ॥ झाले अनिवार त्रिभुवनी ॥८६॥
तिघांसी चतुर्मुख प्रसन्न होऊनि ॥ त्रिपुरे दिधली अंतरिक्षगमनी ॥ दिव्य सहस्त्र वर्षे पाहता शोधोनी ॥ निमिषार्धे एक होती ॥८७॥
इतुक्यात जो धनुर्धर ॥ मारील लक्ष्य साधुनि शर ॥ त्रिपुरांसहित संहार ॥ तुमचा करील निर्धारे ॥८८॥
यावरी त्या तिघाजणी ॥ त्रिभुवन त्रासिले बळेकरूनी ॥ देव पळविले स्वस्थानाहूनी ॥ पीडिली धरणी बहु पापे ॥८९॥
मग देव ऋषि सकळ मिळोन ॥ वैकुंठपतीस गेले शरण ॥ गरुडध्वज सर्वांसी घेऊन ॥ शिवापाशी पातला ॥९०॥
करिता अद्भुत स्तवन ॥ परम संतोषला पंचवदन ॥ म्हणे मी झालो प्रसन्न ॥ मागा वरदान अपेक्षित ॥९१॥
म्हणती त्रिपुरे पीडिले बहुत ॥ देव ऋषि झाले पदच्युत ॥ शिव म्हणे पाहिजे रथ ॥ त्रिपुरमर्दनाकारणे ॥९२॥
तव देव बोलती समस्त ॥ आम्ही सजोनि देतो दिव्य रथ ॥ मग कुंभिनी स्यंदन होत ॥ चक्रे निश्चित शशिमित्र ॥९३॥
मंदरगिरी अक्ष होत ॥ स्तंभ झाले चारी पुरुषार्थ ॥ चारी वेद तुरंग बळवंत ॥ मूर्तिमंत पै झाले ॥९४॥
सारथी विधिहोत सत्वर ॥ लाविले शास्त्रांचे वाग्दोर ॥ पुराणे तटबंध साचार ॥ उपपुराणे खिळे बहु ॥९५॥
कनकाद्रि धनुष्य थोर ॥ धनुर्ज्या होत भोगींद्र ॥ वैकुंठीचा सुकुमार ॥ झाला शर तेजस्वी ॥९६॥
रथी चढता उमानाथ ॥ रसातळी चालिला रथ ॥ कोणासी न उपडे निश्चित ॥ मग नंदी काढीत श्रृंगाने ॥९७॥
मग स्यंदनी एक चरण ॥ दुजा नंदीवरी ठेवून ॥ अपार युद्ध करून ॥ त्रिपुरदळे संहारिली ॥९८॥
होता युद्धाचे घनचक्र ॥ वीरभद्रे संहारिले असुर ॥ परि अमृतकुंडे समग्र ॥ दैत्यांकए असती पै ॥९९॥
अमृत शिंपिता अमित ॥ सजीव होती सवेचि दैत्य ॥ शिवे मेघास्त्र घालूनि समस्त ॥ अमृतकुंडे बुडविली ॥१००॥
अंतराळी त्रिपुरे भ्रमती ॥ लक्ष साधी मृडानीपती ॥ दिव्य सहस्त्र वर्षे झाली येचि रीती ॥ न लागती पाती कदापि ॥१॥
आंगी लोटला धर्मपूर ॥ ते हे भीमरथ गंगा थोर ॥ नेत्रींचे जलबिंदु पडता अपार ॥ रुद्राक्ष तेथे जाहले ॥२॥
दैत्यस्त्रिया पतिव्रता थोर ॥ तेणे असुरांसी जय अपार ॥ मग बौद्धरूपे श्रीकरधर ॥ दैत्यस्त्रियांत प्रवेशला ॥३॥
वेदबाह्य अपवित्र ॥ प्रगट केले चार्वाकशास्त्र ॥ पतिव्रताधर्म मोडोनि समग्र ॥ व्यभिचारकर्मे करविली ॥४॥
तेणे दैत्यांसी झाले अकल्याण ॥ तव इकडे शिवे लक्ष्य साधून ॥ धनुष्यी योजिला विष्णुबाण ॥ पाशुपतास्त्र स्थापुनी ॥५॥
उगवले सहस्त्र मार्तंड ॥ तैसे अस्त्र चालिले प्रचंड ॥ की उभारिला कालदंड ॥ संहारावया विश्वाते ॥६॥
की प्रळयाग्नीची शिखा सबळ ॥ की कृतांताची जिव्हा तेजाळ ॥ की ते प्रळयमेघांतील ॥ मुख्य चपळा निवडिली ॥७॥
की सप्तकोटीमंत्रतेज पाही ॥ एकवटले त्या अस्त्राठायी ॥ देव दैत्य भयभीत ह्रदयी ॥ म्हणती कल्पान्त मांडिला ॥८॥
न्याससहित जपोनि मंत्र ॥ सोडोनि दिधले दिव्यास्त्र ॥ नवखंडधरणी आणि अंबर ॥ तडाडले ते काळी ॥९॥
सहस्त्र विजा कडकडती ॥ तैसी धाविन्नली अस्त्रशक्ती ॥ भये व्यापिला सरितापती ॥ आंग टाकू पहाती दिग्गज ॥११०॥
देव विमाने पळविती ॥ गिरीकंदरी असुर दडती ॥ एक मूर्च्छना येवोनि पडती ॥ उठती ना मागुते ॥११॥
त्या अस्त्रे न लागता क्षण ॥ त्रिपुरे टाकिली जाळून ॥ त्यात तृतीय नेत्रींचा प्रळयाग्न ॥ साह्य झाला तयाते ॥१२॥
तीन्ही ग्राम सेनेसहित ॥ त्रिपुरे भस्म झाली तेथ ॥ देव शिवस्तवन करीत ॥ चरण धरीत सप्रेमे ॥१३॥
त्यावरी त्रिपुरपिता तारकासुर ॥ तेणे प्रळय मांडिला थोर ॥ देव पळविले समग्र ॥ चंद्र सूर्य धरूनि नेले ॥१४॥
भागीरथी आदि गंगा पवित्र ॥ धरूनि नेत तारकासुर ॥ देवांगना समग्र ॥ दासी करोनि ठेविल्या ॥१५॥
ब्रह्मा विष्णु शचीवर ॥ करिती एकांती विचार ॥ म्हणती शिव उमा करावी एकत्र ॥ होईल पुत्र षण्मुख ॥१६॥
त्याचे हस्ते मरेल तारकासुर ॥ मग बोलावूनि पंचशर ॥ म्हणती तुवा जावोनि सत्वर ॥ शिवपार्वतीऐक्य करी ॥१७॥
हिमाचळी तप करी व्योमकेश ॥ मन्मथा तू भुलवी तयास ॥ मग रतीसहित कुसुमेश ॥ शिवाजवळी पातला ॥१८॥
पार्वतीच्या स्वरूपात ॥ रती जेव्हा प्रवेशत ॥ वसंते वन समस्त ॥ श्रृंगारिले तेधवा ॥१९॥
शिवाच्या मानसी सतेज ॥ प्रवेशला शफरीध्वज ॥ पाखरे करिती बहु गजबज ॥ शिवध्यान विक्षेपिती ॥१२०॥
ते पक्षी हाकावया नंदिकेश्वर ॥ गेला होता तेव्हा दूर ॥ तो पार्वती होवोनि कामातुर ॥ पाठीसी उभी मन्मथाच्या ॥२१॥
शिवे उघडिले नयन ॥ तो पुढे देखिला मीनकेतन ॥ म्हणे माझ्या तपासी केले विघ्न ॥ मग भाललोचन उघडिला ॥२२॥
निघाला प्रळयवैश्वानर ॥ भस्म केला कुसुमशर ॥ फाल्गुनी पौर्णिमा साचार ॥ काम जाळिला ते दिनी ॥२३॥
शिवदूत भूतगण ॥ महाशब्दे हाक देऊन ॥ स्मरगृहशब्द उच्चारून ॥ नानापरी उपहासिती ॥२४॥
शिवाची आज्ञा तैपासून ॥ फाल्गुनमासी हुताशनी करून ॥ जो हे व्रत न पाळी पूर्ण ॥ अवदसा जाण त्या बाधी ॥२५॥
ऐसा संहारून पंचशर ॥ विचार करूनि पंचवक्र ॥ तत्काळ उठोनि कर्पूरगौर ॥ गेला कैलाससदनासी ॥२६॥
रती शोक करी बहुत ॥ मग समाधान करी निर्जरनाथ ॥ म्हणे कृष्णावतारी तुझा कांत ॥ रुक्मिणीउदरी अवतरेल ॥२७॥
कमलासने कन्येसी भोगिता ॥ कंदर्पासी शाप दिधला होता ॥ की शिवदृष्टीने तत्त्वता ॥ भस्म होसील कामा तू ॥२८॥
असो इकडे हिमनगकुमारी ॥ शिवप्राप्तीलागी तप करी ॥ सप्तऋषि प्रार्थिती त्रिपुरारी ॥ वरी कन्या हिमनगाची ॥२९॥
पार्वती तप करी जे वनी ॥ शिव तेथे गेला बटुवेष धरूनि ॥ गायनाच्या छंदेकरूनी ॥ पुसे भवानीप्रति तेव्हा ॥१३०॥
कासया तप करिसी येथ ॥ येरी म्हणे जो कैलासनाथ ॥ पति व्हावा एतदर्थ ॥ आचरे तप येथे मी ॥३१॥
बटु बोले ते अवसरी ॥ तू तव हिमनगराजकुमारी ॥ शंकर केवळ भिकारी ॥ महाक्रोधी दारुण ॥३२॥
ओले गजचर्म प्रावरण ॥ शार्दूलचर्म नेसला सर्पभूषण ॥ वसविले महास्मशान ॥ भूतगण सभोवते ॥३३॥
तरी विष्णु विलासी सगुण ॥ त्यासी वरी तू ऐक वचन ॥ तुजयोग्य पंचवदन ॥ वर नव्हे सर्वथा ॥३४॥
ऐकता क्षोभली जगन्माता ॥ म्हणे शिवनिंदका होय परता ॥ वदन न दाखवी मागुता ॥ परम खळा द्वेषिया ॥३५॥
शिवनिंदक जो दुराचार ॥ त्याचा विटाळ न व्हावा साचार ॥ तुज शिक्षा करीन निर्धार ॥ विप्र म्हणोनि राहिले ॥३६॥
देखोनि दुर्गेचा निर्धार ॥ स्वरूप प्रगट करी कर्पूरगौर ॥ पार्वतीने करून जयजयकार ॥ चरण दृढ धरियेले ॥३७॥
शिव म्हणे ते समयी ॥ प्रसन्न झालो माग लवलाही ॥ अंबिका म्हणे ठाव देई ॥ अर्धांगी तुझ्या जगदात्म्या ॥३८॥
अवश्य म्हणोनि त्रिपुरारी ॥ कैलासासी गेला ते अवसरी ॥ पितृसदना झडकरी ॥ गेली तेव्हा जगदंबा ॥३९॥
मग सप्तऋषि ते वेळे ॥ शिवे हिमाचळा पाठविले ॥ हिमनगे ते आदरे पूजिले ॥ षोडशोपचारेकरूनिया ॥१४०॥
अरुंधतीने येऊन ॥ भवानी पाहिली अवलोकून ॥ म्हणे शिव आणि भवानी पूर्ण ॥ जोडा होय निर्धारे ॥४१॥
मन्मथसंवत्सर चैत्रमासी ॥ लग्न नेमिले शुद्ध अष्टमीसी ॥ निश्चय करूनि सप्तऋषि ॥ स्वस्थानासी पातले ॥४२॥
कधी होईल शिवगौरीलग्न ॥ इच्छिती ब्रह्मेंद्रादि सुरगण ॥ तारकासुराचा तो प्राण ॥ शिवपुत्र घेईल कधी ॥४३॥
इकडे नंदीसी पाठवूनि ते वेळे ॥ सर्व देव शिवे बोलाविले ॥ घेवोनि त्रिदशांचे पाळे ॥ पाकशासन पातला ॥४४॥
इंदिरेसहित इंदिरावर ॥ सावित्रीसहित चतुर्वक्र ॥ अठ्यायशी सहस्त्र ऋषीश्वर ॥ शिष्यांसहित निघाले ॥४५॥
सिद्ध चारण गुह्यक ॥ पितृगण मरुद्गण वसुअष्टक ॥ एकादशरुद्र द्वादशार्क ॥ यक्षनायक पातला ॥४६॥
आपुल्याला वाहनी बैसोन ॥ नवग्रह अष्टनायिका आदिकरून ॥ किन्नर गंधर्व सर्वही ॥४७॥
एवं सर्वांसहित शंकर ॥ हिमाचलासी आला सत्वर ॥ नगेंद्र येवोनि समोर ॥ पूजोनि नेत सकळाते ॥४८॥
दशसहस्त्र योजने मंडप ॥ उभविला ज्याचे तेज अमूप ॥ सुवर्णसदने देदीप्य ॥ जानवशासी दीधली ॥४९॥
शिवस्वरूप पाहता समस्त ॥ वर्हाडी होती विस्मित ॥ एक म्हणती वृद्ध बहुत ॥ पुराणपुरुष अनादि ॥१५०॥
हा आहे केवळ निर्गुण ॥ नवरी स्वरुपे अति सगुण ॥ असो देवकप्रतिष्ठा करून ॥ मूळ आला हिमाद्रि ॥५१॥
आद्यंत अवघे साहित्य ॥ कमलोद्भव स्वये करीत ॥ नवनिधी अष्ट महासिद्धी राबत ॥ न्यून तेथे नसे काही ॥५२॥
असो नवरा मिरवीत ॥ नेला आपुल्या मंडपात ॥ मधुपर्कादि पूजाविधि समस्त ॥ हिमाचळ करीतसे ॥५३॥
लग्नघटिका आली जवळी ॥ तव ते श्रृंगारसरोवरमराळी ॥ बाहेर आणिली हिमनगबाळी ॥ उभी केली पटाआड ॥५४॥
लग्नघटिका पाहे दिनपती ॥ मंगळाष्टके म्हणे बृहस्पती ॥ ॐपुण्याह निश्चिती ॥ कमलासन म्हणतसे ॥५५॥
असो यथाविधि संपूर्ण दोघा झाले पाणिग्रहण ॥ होमासी करिति प्रदक्षिण ॥ शिवशक्ती तेधवा ॥५६॥
इतुके याज्ञिक झाले सर्वही ॥ परी नोवरी कोणी देखिली नाही ॥ प्रदक्षिणा करिता ते समयी ॥ पदनख देखिले विधीने ॥५७॥
कामे व्यापिला सूर्यजामात ॥ पटपटा वीर्यबिंधु पडत ॥ साठीसहस्त्र वालखिल्य तेथ ॥ जन्मले क्षण न लागता ॥५८॥
अन्याय देखोनि थोर ॥ मदनांतक कोपला अनिवार ॥ ब्रह्मयाचे पाचवे शिर ॥ छेदून टाकिले तेधवा ॥५९॥
झाला एकचि हाहाकार ॥ त्यावरी वैकुंठीचा सुकुमार ॥ समाधान करी अपार ॥ चतुर्वक्र नाम तैपासुनी ॥१६०॥
असो यथाविधि सोहळे ॥ चारी दिवस संपूर्ण जाहले ॥ सकळ देव गौरविले ॥ वस्त्रालंकारी हिमनगे ॥६१॥
सवे पार्वती घेऊनी ॥ कैलासा आला शूलपाणी ॥ यावरी सर्व देव मिळोनी ॥ प्रार्थिते झाले विश्वनाथा ॥६२॥
खुंटली विश्वाची उत्पत्ती ॥ मन्मथ उठवी उमापती ॥ मग तो मीनध्वज पुढती ॥ अनंग करोनि जीवविला ॥६३॥
अंधकपुत्र तारकासुर ॥ तेणे पळविले देव समग्र ॥ शिवासी होईल कधी पुत्र ॥ देव समग्र वांछिती ॥६४॥
चारी युगेपर्यंत ॥ शिव उमा एकांती रमत ॥ परी नोहे वीर्यपात ॥ नव्हे सुत याकरिता ॥६५॥
तो तारकासुरे केला आकांत ॥ स्वर्ग जाळिले समस्त ॥ देवललना धरूनि नेत ॥ दासी बहुत पै केल्या ॥६६॥
देव शिवासी शरण जाती ॥ तव ती दोघे एकांती रमती ॥ देव ऋषि बाहेर तिष्ठती ॥ प्रवेश कोणा नव्हेचि ॥६७॥
मग अग्नि आत पाठविला ॥ अतीतवेष तेणे धरिला ॥ तो तृतीय नेत्री शिवाच्या राहिला ॥ देवी पाठविला मित्र म्हणोनी ॥६८॥
हाक फोडोनि भिक्षा मागत ॥ शिव पार्वतीस आज्ञापित ॥ माझे वीर्य धरोनि अद्भुत ॥ भिक्षा देई अतीताते ॥६९॥
मग अमोघ वीर्य धरून ॥ अग्नीसी देत अंबिका आणोन ॥ सांडले जेथे वीर्य जाण ॥ रेतकूप झाला तो ॥१७०॥
तोचि पारा परम चंचळ ॥ न धरवे वीर्य कोणा हाती तेजाळ असो कृशानने वीर्य तत्काळ ॥ प्राशन केले तेधवा ॥७१॥
अग्नि झाला गरोदर ॥ परम लज्जित हिंडत कांतार ॥ तो साही कृत्तिका परम सुंदर ॥ ऋषिपत्न्या देखिल्या ॥७२॥
त्या गंगेत स्नान करूनी ॥ तापत बैसल्या साहीजणी ॥ तव अग्नीने गर्भ काढूनि ॥ पोटात घातला साहींच्या ॥७३॥
साहीजणी झाल्या गर्भिणी ॥ परम आश्चर्य करिती मनी ॥ मग लज्जेने गर्भ काढूनि ॥ साहीजणींनी त्यागिला ॥७४॥
साहींचे रक्त एक झाले ॥ दिव्य शरीर तत्काळ घडले ॥ सहा मुखे हस्त शोभले ॥ द्वादश सरळ तेजस्वी ॥७५॥
कार्तिक मासी कृत्तिकायोगी ॥ कुमार जन्मला महायोगी ॥ मयूर वाहन भस्म अंगी ॥ उपासित शिवाते ॥७६॥
शिवे निजपुत्र जाणोनी ॥ नेवोनि लाविला अपर्णास्तनी ॥ सप्त वर्षे मृडानी ॥ लालन पालन करी त्याचे ॥७७॥
देवांसी सांगे वैश्वानर ॥ शिवासी झाला स्कंद पुत्र ॥ ऐकता देव समग्र ॥ तारकावरी चालिले ॥७८॥
सेना जयाची बहात्तर अक्षोहिणी ॥ त्याचे नगर वेढिती सुधापानी ॥ पृतनेसहित तेच क्षणी ॥ तारकासुर बाहेर निघे ॥७९॥
इंद्रे स्वामीकार्तिकापासी जाऊन ॥ सेना पतित्व दिधले संपूर्ण ॥ दिव्यरथी बैसवून ॥ अभिषेकिला कुमार ॥१८०॥
इकडे तारका सुर सुधापानी ॥ युद्ध करिती झोटधरणी ॥ देव त्रासविले दैत्यांनी ॥ आले पळोनि कुमाराकडे ॥८१॥
स्कंदापुढे कर जोडून ॥ देव करिती अपार स्तवन ॥ रक्षी तारकासुरापासून ॥ शिवनंदन तोषला ॥८२॥
देवांचा वृत्तांत जाणोनि सकळ ॥ कुमारे धरिले रूप विशाळ ॥ तो तारकासुर धाविन्नला प्रबळ ॥ शिवकुमार लक्षुनी ॥८३॥
तेहतीस कोटी सुरवत ॥ उभे स्वामीचे पाठी भार ॥ तारकाअंगी बळ अपार ॥ दशसहस्त्र कुंजरांचे ॥८४॥
तारकासुर अनिवार ॥ वर्षे सायकांचे संभार ॥ स्वामीचे पाठीसी सुर ॥ लपती सत्वर जाऊनी ॥८५॥
लक्षूनिया पाकशासन ॥ तारके शक्ति दिधली सोडून ॥ प्रळयचपळेसी मागे टाकून ॥ मनोवेगे चालली ॥८६॥
भयभीत शक्र होऊन ॥ करी हरिस्मरण कर जोडून ॥ म्हणे हे इंदिरामानसरंजन ॥ निवारी येवोनि शक्ति हे ॥८७॥
ब्रह्मानंदा विश्वव्यापका ॥ दशावतारचरित्रचाळका ॥ मधुमुरनरकांतका ॥ निवारी प्रळयशक्ती हे ॥८८॥
वैकुंठीहूनि योगमाया ॥ हरीने धाडिली लवलाह्या ॥ तिणे ते शक्ती परतोनिया ॥ एकीकडे पाडिली ॥८९॥
यावरी तारके बाणांचे पूर ॥ स्वामीवरी सोडिले अपार ॥ मुख पसरोनि शिवकुमार ॥ तितुके गिळिता जाहला ॥१९०॥
नाना शस्त्रे अस्त्रशक्ती ॥ तारके सोडिल्या अनिवारगती ॥ तितुक्या गिळिल्या सहजस्थिती ॥ शास्त्रसंख्यावदनाने ॥९१॥
कल्पांतरुद्रासमान ॥ भयानक दिसे मयूरवाहन ॥ तारके ब्रह्मास्त्र दिधले सोडून ॥ तेही गिळी अवलीळे ॥९२॥
जितुके शस्त्रमंत्र निर्वाण ॥ तितुके प्रेरीतसे चहूकडून ॥ प्रळयकाळासम शिवनंदन ॥ गिळी क्षण न लागता ॥९३॥
मग निःशस्त्र तारकासुर ॥ स्यंदनाहूनि उतरला सत्वर ॥ स्वामीवरी धावे अनिवार ॥ सौदामिनीसारिखा ॥९४॥
ऐसे देखोनि षडानन ॥ कृतांता ऐसी हाक देऊन ॥ रथाखाली उतरून ॥ मल्लयुद्ध आरंभिले ॥९५॥
सप्तदिवसपर्यंत ॥ युद्ध झाले परम अद्भुत ॥ तारकासुर अत्यंत ॥ जर्जर केला आपटोनी ॥९६॥
पायी धरोनि अवलीला ॥ चक्राकार भोवंडिला ॥ मग धरणीवरी आपटिला ॥ चूर्ण झाला मृद्धटवत ॥९७॥
निघोनिया गेला प्राण ॥ दुंदुभी वाजवी शचीरमण ॥ पुष्पे वर्षती सुरगण ॥ कर जोडोनी स्तुति करिती ॥९८॥
मारिला जेव्हा तारकासुर ॥ तेव्हा सात वर्षाचा शिवकुमार ॥ मग सेनापतित्व समग्र ॥ इंद्रे त्यासी दीधले ॥९९॥
तारकासुराचे नगर ॥ इंद्र लुटिले समग्र ॥ देवस्त्रिया सोडविल्या सत्वर ॥ सर्व देव मुक्त झाले ॥२००॥
लागला तेव्हा जयवाद्यांचा घोष ॥ कुमार गेला वाराणसीस ॥ नमूनि शिवमृडानिस ॥ सुख अपार दीधले ॥१॥
मग झाले मौजीबंधन ॥ सर्व तीर्थे करी षडानन ॥ मग कपाटी बैसला जाऊन ॥ अनुष्ठान करी सुखे ॥२॥
षडाननास भवानी म्हणत ॥ ब्रह्मचर्य केले आजपर्यंत ॥ आता स्त्री करूनि यथार्थ ॥ गृहस्थाश्रम करी की ॥३॥
षडानन म्हणे अंबेप्रती ॥ सांग स्त्रिया कैशा असती ॥ म्या देखिल्या नाहीत निश्चिती ॥ कैसी आकृति सांगे मज ॥४॥
अपर्णा म्हणे सुकुमारा ॥ मजसारिख्या स्त्रिया सर्वत्रा ॥ ऐकता हासे आले कुमारा ॥ काय उत्तरा बोलत ॥५॥
तुजसारिख्या स्त्रिया जरी ॥ तुजसमान मज निर्धारी ॥ तुझ्या वचनासी मातुश्री ॥ अंतर पडो नेदी मी ॥६॥
ऐसे कुमार बोलोन ॥ महाकपाटात जाय पळोन ॥ मग ते जगन्माता आपण ॥ धरू धाविन्नली तयाते ॥७॥
नाटोपे कुमार ते क्षणी ॥ अंबा दुःखे पडे धरणी ॥ जे त्रिभुवनपतीची राणी ॥ वेदपुराणी वंद्य जे ॥८॥
अरे तू कुमारा दावी वदना ॥ आला माझ्या स्तनासी पान्हा ॥ कोणासी पाजू षडानना ॥ निजवदना दाखवी ॥९॥
घेई तुझे दूधलोणी ॥ म्हणोनि कुमार वर्मी ते क्षणी ॥ बोले तेव्हा शापवाणी ॥ क्रोधेकरूनि कुमार तो ॥२१०॥
माझे दर्शना जी स्त्री येईल ॥ ती सप्तजन्म विधवा होईल ॥ स्वामीदर्शना पुरुष येईल ॥ कार्तिक मासी कृत्तिकायोगी ॥११॥
तो जन्म सभाग्य ॥ होईल धनाढ्य वेदपारंग ॥ अनामिक हो अथवा मातंग ॥ दर्शने लाभ समानचि ॥१२॥
ऋषि विनविती समस्त ॥ भवानी तुजलागी तळमळत ॥ भेटोनि येई त्वरित ॥ वाराणसीस जाऊनी ॥१३॥
मग स्वामी आनंदवना जाऊनी ॥ आनंदविली शिवभवानी ॥ उभयतांचे समाधान करूनी ॥ मागुती गेला पूर्व स्थळा ॥१४॥
स्कंदपुराणी कथा सूत ॥ शौनकादिकांप्रति सांगत ॥ ऐकता विघ्ने समस्त ॥ क्षणमात्रे दग्ध होती ॥१५॥
अपर्णाह्र्दयाब्जमिलिंदा ॥ श्रीधरवरदा ब्रह्मानंदा ॥ पूर्णब्रह्मा अनादिसिद्धा ॥ आनंदकंदा जगद्गुरु ॥१६॥
शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड ॥ स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ॥ परिसोत सज्जन अखंड ॥ त्रयोदशोध्याय गोड हा ॥२१७॥
॥इति त्रयोदशोऽध्यायः समाप्तः ॥
॥श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु॥
श्री शिवलीलामृत अध्याय चौदावा
श्रीगणेशाय नमः ॥
भस्मासुरहरणा भाललोचना ॥ भार्गववरदा भस्मलेपना ॥ भक्तवत्सला भवभयहरणा ॥ भेदातीता भूताधिपते ॥१॥
भवानीवरा भक्ततारका ॥ भोगिभूषणा भूतपालका ॥ भाविकरक्षका भवभयहारका ॥ भक्तरक्षका भवशोषणा ॥२॥
त्रितापशमना त्रिदोषहारका ॥ त्रिगुणातीता त्रिपुरांतका ॥ त्रिभुवनजनका त्र्यंबका ॥ त्रयीरक्षका त्रिकांडवेद्या ॥३॥
तुझ्या कृपाबळे समस्त ॥ त्रयोदश अध्यायपर्यंत ॥ कथिले शिवलीलामृत ॥ आता कळसाध्याय चौदावा ॥४॥
तेराव्या अध्यायी शिवगौरीलग्न ॥ सांगितले स्वामीकार्तिकाचे जनन ॥ यावरी शौनकादिकालागून ॥ सूत सांगे नैमिषारण्यी ॥५॥
सिंहावलोकने तत्त्वता ॥ परिसा गजास्यषडास्यांची कथा ॥ दोघेही धाकुटे असत ॥ जगदंबा खेळवी प्रीतीने ॥६॥
गजतुंडा ओसंगा घेऊन ॥ विश्वजननी देत स्तनपान ॥ शुंडादंडेकरून ॥ दुग्ध ओढीत गजास्य ॥७॥
अंबेच्या पृष्ठीवरी प्रीती ॥ शुंडा फिरवीत गणपती ॥ शुंडेत पाय साठवूनि षण्मुखाप्रती ॥ बोलतसे तेधवा ॥८॥
म्हणे हे घेई का अमृत ॥ ब्रह्मादिका जे अप्राप्त ॥ स्कंद बोले क्रोधयुक्त ॥ उच्छिष्ट तुझे न घे मी ॥९॥
षडानन म्हणे चराचरजननी ॥ लंबनासिक मजलागूनी ॥ उच्छिष्ट दुग्ध देतो पाहे लोचनी ॥ सांग मृडानी काही याते ॥१०॥
शुंडेसी धरूनिया खाले ॥ पाडू काय ये वेळे ॥ माते याचे नासिक विशाळ आगळे ॥ का हो ऐसे केले तुवा ॥११॥
इंद्र चंद्र मित्र निर्जर व मूर्ति प्रसवलीस मनोहर ॥ परी हा लंबनासिक कर्ण थोर ॥ दंत एक बाहेर दिसतसे ॥१२॥
ऐसा का प्रसवलीस बाळ ॥ ऐकता हासे पयःफेनधवल ॥ धराधरेंद्रनंदिनी वेल्हाळ ॥ तिसीही हास्य नाटोपे ॥१३॥
स्कंद म्हणे जननी पाही ॥ यासी उतरी मज स्तनपान देई ॥ मग जगदंबेने लवलाही ॥ विघ्नेशा खाली बैसविले ॥१४॥
षण्मुख आडवा घेवोनी ॥ स्तन जी घाली त्याच्या वदनी ॥ पाचही मुखे आक्रंदोनी ॥ रडो लागली तेधवा ॥१५॥
ते देखोनि गणनाथ ॥ पोट धरोनि गदगदा हासत ॥ म्हणे अंबे तुझा हा कैसा सुत ॥ हाक फोडीत आक्रोशे ॥१६॥
एक स्तन घातला याचे वदनी ॥ आणीक पाच आणसी कोठूनी ॥ ऐसे ऐकत पिनाकपाणी ॥ काय हासोनि बोलत ॥१७॥
काय म्हणतो गजवदन ॥ ऐसा का प्रसवलीस नंदन ॥ यावरी अपर्णा सुहास्यवदन ॥ प्रतिउत्तर देतसे ॥१८॥
म्हणे हा तुम्हांसारिखा झाला नंदन ॥ तुम्ही पंचमुख हा षण्मुख पूर्ण ॥ ऐकता हासला त्रिनयन ॥ पुत्र पाहोन सुखावे ॥१९॥
यावरी षण्मुख आणि गणपती ॥ लीलकौतुके दोघे क्रीडती ॥ विनोदे कलह करिती ॥ अंतरी प्रीती अखंड ॥२०॥
दोघेही रडता ऐकोनी ॥ धावोनी आली जगत्त्रयजननी ॥ वक्रतुंडासी ह्रदयी धरोनी ॥ म्हणे बाळका काय झाले ॥२१॥
तव तो म्हणे स्कंदे येवोन ॥ अंबे धरिले माझे कर्ण ॥ बोलिला एक कठीण वचन ॥ तुझे नयन सान का रे ॥२२॥
जगदंबा मग हासोन ॥ अग्निसंभूताप्रति बोले वचन ॥ गजवदनासी कठीण भाषण ॥ ऐसे कैसे बोललासी ॥२३॥
स्कंद म्हणे तर्जनी उचलोन ॥ येणे मोजिले माझे द्वादश नयन ॥ यावरी हैमवती हासोन ॥ एकदंताप्रति बोलत ॥२४॥
म्हणे हे तुव अनुचित केले ॥ कुमाराचे नयन का मोजिले ॥ यावरी नागानन बोले ॥ ऐक माते अन्याय याचा ॥२५॥
माझी शुंडा लंबायमान ॥ येणे मोजिली चवंगे घालून ॥ अन्याय हा थोर त्रिभुवनाहून ॥ करी ताडण अंबे यासी ॥२६॥
यावरी स्वामी कार्तिक बोलत ॥ अंबे येणे माझे मोजिले हस्त ॥ यावरी करिमुख बोलत ॥ मैनाकभगिनी ऐक पा ॥२७॥
याचा अन्याय एक सांगेन ॥ ऐकता तू यासी करिसील ताडण ॥ नगात्मजा आणि त्रिलोचन ॥ सावधान होऊन ऐकती ॥२८॥
इभमुख म्हणे भेडसावून ॥ मज बोलिला हा न साहवे वचन ॥ तुझे पोट का थोर पूर्ण ॥ मोदक बहू भक्षिले ॥२९॥
ऐसे ऐकता मृडानी ॥ दोघांसी ह्रदयी धरी प्रीतीकरूनी ॥ दोघांसी प्रियवस्तु देऊनी ॥ समजाविले तेधवा ॥३०॥
यावरी मदनांतक पाहे ॥ सिंहासनी बैसला आनंदमय ॥ जगदंबा मुखाकडे पाहे ॥ हास्यवदन करूनिया ॥३१॥
यावरी विरूपाक्ष बोलत ॥ का हो हास्य आले अकस्मात ॥ यावरी त्रैलोक्यमाता म्हणत ॥ नवल एक दिसतसे ॥३२॥
तुमच्या जटामुकुटात ॥ ललनाकृति काय दिसत ॥ तुमची करणी अद्भुत ॥ पद्मजबिडौजा समजेना ॥३३॥
कैलासपति म्हणे इभगमने ॥ हरिमध्ये मृगशावकनयने ॥ मस्तकी जळ धरिले वरानने ॥ बिंबाधरे पिकस्वरे ॥३४॥
यावरी चातुर्यसरोवरमराळी ॥ हेरंबजननी म्हणे कपाळमाळी ॥ जळांतरी स्त्रीचे वदन ये वेळी ॥ दिसते मज भालनेत्रा ॥३५॥
यावरी बोले कैलासराज ॥ विद्रुमाधरे मुख नव्हे ते वारिज ॥ शोभायमान सतेज ॥ टवटवित दिसतसे ॥३६॥
यावरी सजलजलदवर्ना ॥ स्कंदमाता म्हणे पंचदशनयना ॥ कुरळकेश व्याघ्रचर्मवसना ॥ कृष्णवर्ण दिसताती ॥३७॥
यावरी बोले पंचवदन ॥ कमळी मिलिंद घे सुगंध बैसोन ॥ नसतेचि पुससी छंद घेवोन ॥ रमारमणसहोदरी ॥३८॥
यावरी बोले भुजंगत्रिवेणी ॥ कमळासी भोवया का खट्वांगपाणी ॥ तुमच्या मायेची विचित्र करणी ॥ आम्नाय श्रुती नेणती ॥३९॥
यावरी बोले हिमनगजामात ॥ भ्रुकट्या नव्हे पाहे त्वरित ॥ सलिललहरी तळपत ॥ दृष्टि तरळली तुझि का हो ॥४०॥
यावरी सकळ प्रमादांची स्वामिनी ॥ बोले कंबुकंठी कमंडलुस्तनी ॥ म्हणे कैरवासम नेत्र पिनाकपाणी ॥ का हो दिसती आकर्ण ते ॥४१॥
यावरी शफरीध्वजदहन बोलत ॥ कमळाभोवते नीर बहुत ॥ नेत्र नव्हेत मीन तळपत ॥ हंसगमने निरखी बरे ॥४२॥
जे अनंतगुणपरिपूर्ण वेल्हाळ ॥ त्रिपुरहरसुंदरी बोले प्रेमळ ॥ म्हणे राजीवा स्तनयुगुळ ॥ कमंडलुऐसे दिसती का ॥४३॥
यावरी बोले त्रिशूळपाणी ॥ ऐके वसुधाधरनंदिनी ॥ ते स्तन नव्हेती दोन्ही ॥ विलोकोनि पाहे बरे ॥४४॥
गंगार्हदाचे दोन्ही तीरी ॥ चक्रवाके बैसली साजिरी ॥ दुर्गा म्हणे मदनारी ॥ बहुत साहित्य पुरवीतसा ॥४५॥
एकाचे अनेक करून ॥ दाविले हे त्रिभुवन ॥ तुमचे मौनेचि धरावे चरण ॥ बोलता अप्रमाण न म्हणावे ॥४६॥
मग मांडूनिया सारिपाट ॥ खेळती दाक्षायणी नीळकंठ ॥ ज्यांचे खेळ ऐकता वरिष्ठ ॥ भक्त होती त्रिजगती ॥४७॥
दोघे खेळता आनंदघन ॥ तो आला कमलोद्भवनंदन ॥ ब्रह्मवीणा वाजवून ॥ करी स्तवन अपार ॥४८॥
मग क्षण एक स्वस्थ होऊनी ॥ खेळ विलोकी नारदमुनी ॥ म्हणे पण केल्यावाचूनी ॥ रंग न ये खेळाते ॥४९॥
दोघांसी मानले ते बहुत ॥ मग पण करूनिया खेळत ॥ जिंकील त्यासी एक वस्त ॥ आपुली द्यावी निर्धार हा ॥५०॥
जो प्रथम डाव तेचि क्षणी ॥ जिंकीती झाली मेनकानंदिनी ॥ व्याघ्रांबर घेतले हिरोनी ॥ नारदमुनी हासतसे ॥५१॥
दुजाही डाव जिंकिता भवानी ॥ घेतले गजचर्म हिरोनी ॥ एकामागे एक तेचि क्षणी ॥ दहाही आयुधे घेतली ॥५२॥
जो तो डाव जिंकी भवानी ॥ सर्व भूषणे घेतली हिरोनी ॥ शेवटी कौपीनही सांडोनी ॥ शंकर झाला दिगंबर ॥५३॥
सुरभिपुत्र जिंकिला ॥ तोही देवीने आपुला केला ॥ नारद गदगदा हासिन्नला ॥ काय बोलिला शिवासी ॥५४॥
म्हणे स्त्रीने जिंकिले पण करून ॥ गेला तुझा महिमा पूर्ण ॥ सृष्टि अवघी मायाधीन ॥ तू निर्गुण निराकार ॥५५॥
चराचर आहे मायाधीन ॥ तुज इणे दिधले सगुणपण ॥ येरवी तू अव्यक्त पूर्ण ॥ तुज कोण पुसत होते ॥५६॥
एवं तू मायाधीन झालासी पूर्ण ॥ आता भक्तांसी कैसे दाविसी वदन ॥ ऐसे ऐकता भाललोचन ॥ गेला रुसून घोर वना ॥५७॥
इतुके कृत्य करून ॥ गेला तेथूनि ब्रह्मनंदन ॥ शंकरे सर्वसंग टाकून ॥ निरंजनी वास केला ॥५८॥
शोधिता न पडे कोणासी ठायी ॥ योगी ध्याती सर्वदा ह्रदयी ॥ न कळे मूळाग्र कोठे काही ॥ जाति कुळ नसेचि ॥५९॥
नामरूपगुणातीत ॥ गोत्रवर्ण आश्रमविरहित ॥ चहू देहांसीअतीत ॥ कोणा अंत न कळेचि ॥६०॥
असो जगदंबा सख्या घेऊनिया ॥ वनासी चालिली शोधावया ॥ गिरिकंदरी मठ गुहा शोधूनिया ॥ भागली बहुत जगदंबा ॥६१॥
सर्वही तीर्थे शोधिली सवेग ॥ बहुतांसी पुसिला त्याचा मार्ग ॥ जो शोधिता अष्टांगयोग ॥ योगिया ठायी पडे ना ॥६२॥
पंचाग्निसाधन धूम्रपान ॥ जटाधारी नग्न मौन ॥ एकी सदा झाकिले नयन ॥ एक गगन विलोकिती ॥६३॥
एक उभेचि निरंतर ॥ एक घेती वायूचा आहार ॥ त्यांसही पुसता श्रीशंकर ॥ कोठे आहे न बोलती ॥६४॥
एक करिती सदा यज्ञ ॥ करिती हिंसा बलिदान ॥ परी तेही धुरे डोळे भरून ॥ कष्टी होती सर्वदा ॥६५॥
एक चौसष्ट कळा दाविती ॥ एक चौदा विद्या मिरविती ॥ एक वादविवाद निगुती ॥ करिता बहुत भागले ॥६६॥
एक सांगती पुराण ॥ एक नाचती उड्या घेऊन ॥ लोकांसी सांगती उपदेशज्ञान ॥ परी उमारमण दुरावला ॥६७॥
एक नाशिती कुश मृत्तिका उदक ॥ म्हणती आम्ही इतुकेनि पावन देख ॥ त्यांसही पुसता कैलासनायक ॥ न पडे ठायी तत्त्वता ॥६८॥
जे आदिमाया विश्वजननी ॥ अनंतशक्तींची स्वामिनी ॥ ते श्रमली नाना साधनी ॥ इतरांची कहाणी काय तेथे ॥६९॥
ठायी पडावया शिवस्वरूप ॥ क्षीराब्धिजापति करी तप ॥ मघवा द्रुहिण करिती साक्षेप ॥ निशिदिनी याचिलागी ॥७०॥
ऋग्वेद स्थापित कर्म ॥ यजुर्वेद बोले ज्ञान निःसीम ॥ उपासनामार्ग उत्तम ॥ अथर्वण स्थापितसे ॥७१॥
सामवेद सांगे गायन ॥ न्यायशास्त्री भेद गहन ॥ म्हणती ईश्वर समर्थ जीव सान ॥ त्याचे पद न पावती ते ॥७२॥
मीमांसक स्थापिती कर्ममार्ग ॥ सांख्य प्रक्रुतिपुरुषविभाग ॥ पातंजली सांगती योग ॥ शब्दविभाग व्याकरणी ॥७३॥
सर्व निरसूनि उरले उत्तम ॥ वेदांती म्हणती तेचि ब्रह्म ॥ तो शिव ब्रह्मानंद परम ॥ वेदशास्त्रा अगम्य जो ॥७४॥
त्या शिवाचे नाम घेवोनी ॥ जगदंबा बाहे घोर वनी ॥ सकळ अभिमान टाकूनी ॥ वल्लभा मी शरण तूते ॥७५॥
सकळ तत्त्वे शोधिता साचार ॥ शेवटी होय साक्षात्कार ॥ तैसा हिमाचळी त्रिपुरहर ॥ विलोकिला जगदंबेने ॥७६॥
तो स्वात्ममुखी झाला तल्लीन ॥ झाकिले असती पंचदश नयन ॥ देवी म्हणे श्वशुरगृही येऊन ॥ रहिवास केला असे ॥७७॥
अपर्णा मनी विचारी ॥ याचि रूपे जवळी जाऊ जरी ॥ तरी मजवरी ये अवसरी ॥ क्रोधायमान होईल ॥७८॥
मग भिल्लीचा वेष धरून ॥ मयूरपिच्छांचे केले वसन ॥ अनुपम वेष धरून ॥ मुरहरभगिनी चालिली ॥७९॥
अनंतकमळभवांडमाळा ॥ त्रिभुवनसुंदरी गुंफी हेळा ॥ तिने स्मरहर मोहिला ॥ नृत्यगायनकरूनिया ॥८०॥
अनंत शक्ती भोवत्या विराजिती ॥ विमानी अष्टनायिका तन्मय होती ॥ किन्नर गंधर्व आश्चर्य करिती ॥ गायनरीती ऐकूनिया ॥८१॥
वैरभाव वनचरे विसरती ॥ आहार त्यजिला तन्मय होती ॥ नद्यांचे जलप्रवाह खुंटती ॥ पक्षी विसरती देहभाव ॥८२॥
निश्चळ झाला पवन ॥ विधुकुरंग गेला वेधोन ॥ कुंभिनीभार सांडोन ॥ फणिपति वरी येऊ पाहे ॥८३॥
आंगीचा सुटला दिव्य आमोद ॥ देव पाहती होवोनि षट्पद ॥ नृत्य करिता भाव विविध ॥ दावी नाना प्रकारींचे ॥८४॥
शीतलत्व दाहकत्व सांडून ॥ वाटे ताटंक झाले विधुचंडकिरण ॥ देवललना म्हणती ओवाळून ॥ इजवरून जावे समस्ती ॥८५॥
आदिजननीचे अपार लाघव ॥ नेणती शक्रादि कमलोद्भव ॥ दिव्य हिरेखाणींचे वैभव ॥ दंततेजे झाकिले ॥८६॥
दंतपंक्तींचा झळकता रंग ॥ खडे ते हिरे होती सुरंग ॥ तनूचा सुगंध अभंग ॥ नभ भेदूनि वरी जाय ॥८७॥
पदमुद्रा जेथे उमटत ॥ सुवासकमळे तेथे उगवत ॥ जेथींच्या परागासी वेधोनि वसंत ॥ प्रदक्षिणा करी प्रीतीने ॥८८॥
अनंतविद्युल्लताकल्लोळ ॥ तैसे स्वरूपतेज निर्मळ ॥ नेत्र उघडोनि जाश्वनीळ ॥ पाहता झाला तेधवा ॥८९॥
पायी पैंजण नूपुरे रुणझुणती ॥ त्यांत क्षुद्रघंटा रसाळ गर्जती ॥ करींची कंकणे झणत्कारती ॥ नृत्यगतीसरसीच ॥९०॥
भूलताचाप चढवूनी ॥ कामशत्रु विंधिला नयनकटाक्षबाणी ॥ मनकुरंग पाडिला धरणी ॥ सुरवरा करणी न कळेचि ॥९१॥
दिव्य स्वरूप विलोकिता पूर्ण ॥ पंचबाणे व्यापिला पंचवदन ॥ तप ध्यान विसरून वृत्तांत पुसे तियेते ॥९२॥
म्हणे तू नारी कोठील कोण ॥ कामानळ शांतवी वर्षोनि घन ॥ तुझे स्वरूपलावण्य ॥ त्रिभुवनी ऐसे दुजे नाही ॥९३॥
तुझा वदन इंदुविलोकून ॥ चकोर झाले माझे नयन ॥ आता वरी मजलागून ॥ तुजअधीन मी झालो ॥९४॥
यावरी बोले भिल्लिणी ॥ उमेऐसी ललना टाकूनी ॥ का बैसलासी घोर वनी ॥ कैलासभुवन त्यजोनिया ॥९५॥
मी तो परनारी निश्चित ॥ न वरी न घडे कदा सुरत ॥ तुवा मन जिंकिले नाही यथार्थ ॥ तरी तपस्वी कैसा तू ॥९६॥
यावरी बोले पिनाकपाणी ॥ मी दुर्गेवरी आलो रुसोनी ॥ तिचे मुख न पाहे परतोनी ॥ नाम स्वप्नी न घेचि ॥९७॥
यावरी भिल्लिणी बोलत ॥ पति माझा रागिष्ट अत्यंत ॥ हे त्रिभुवन जाळील क्षणात ॥ अणुमात्र गोष्ट कळताचि ॥९८॥
यावरीबोले जगन्नाथ ॥ ती बहुकाळाची कठिण अत्यंत ॥ दक्षयागी उडी घालीत ॥ क्रोध अद्भुत तियेचा ॥९९॥
पुढे गेली पर्वताचे पोटी ॥ मागुती तिसी वरी मी धूर्जटी ॥ परी ती कौटाळीण मोठी ॥ अतिकपटी मी जाणे ॥१००॥
भिल्लिणी म्हणे ऐकिले कानी ॥ तू कपटी आहेस तिजहूनी ॥ शिरी ठेविली स्वर्धुनी ॥ भोळी भवानी अत्यंत ॥१॥
दुर्गेऐसी पट्टराणी ॥ टाकूनि का हिंडसी वनी ॥ परललना देखोनि नयनी ॥ गळा येवोनि पडो पाहसी ॥२॥
मागुती बोले कैलासनाथ ॥ क्षणात सृष्टी घडामोड करीत ॥ शुंभनिशुंभादि दैत्य ॥ युद्ध करूनि मर्दिले तिणे ॥३॥
ती जरी येथे आली धावोन ॥ उदंड प्रार्थना केली पूर्ण ॥ तरी मी नव जाय परतोन ॥ कैलासासी निश्चये ॥४॥
तिसी न करी संभाषण ॥ तूचि वरी मी झालो तुजआधीन ॥ जिकडे नेशील तिकडे येईन ॥ वचनाधीन तुझ्या मी ॥५॥
यावरी बोले गोरटी ॥ भवानी बैसली तुझ्या पाठी ॥ दोन वेळा वरिला धूर्जटी ॥ तिची गति हे केली ॥६॥
मग माझा पाड काय तुज ॥ केव्हा टाकोनि जाशील न कळे मज ॥ द्यूती पण खेळता सहज ॥ तुझे त्वांचि हारविले ॥७॥
न बोलेचि मदनदहन ॥ भिल्लिणी मागुती करी नृत्य गायन ॥ मग उठिला पंचदशनयन ॥ तिसी आलिंगन द्यावया ॥८॥
अंबा चालिली सत्वर ॥ दीर्घशब्दे बोले त्रिपुहर ॥ मुखशशी दावी सुंदर ॥ भाक घेई पै माझी ॥९॥
तू मज माळ घाली येऊन ॥ मी न जाय तुज टाकोन ॥ मग जगदंबा बोले हासोन ॥ यावे भुवना माझिया ॥११०॥
मग मी तुमची होईन कामिनी ॥ अवश्य बोले खट्वांगपाणी ॥ मदनांतक वेधोनी ॥ कैलासासी नेला तेधवा ॥११॥
सिंहासनी बैसवून ॥ षोडशोपचारे केले पूजन ॥ देवीने दृढ धरिले चरण ॥ कंठी माळ घातली ॥१२॥
देवी आपुले स्वरूप प्रगट करी ॥ तटस्थ पाहे त्रिपुरारी ॥ मग हासती परस्परी ॥ एकमेका पाहोनी ॥१३॥
शिव म्हणे धन्य भवानी त्वांचि आणिले मज समजावोनी ॥ सूत शौनकादिकांलागोनी ॥ कथा सांगे विचित्र ॥१४॥
करी वीणा घेऊनि ब्रह्मसुत ॥ शिवाजवळी आला अकस्मात ॥ म्हणे हे विश्वंभरा विश्वनाथ ॥ तुझे भक्त देखिले बहू ॥१५॥
परी कांतिनगरी श्रियाळ ॥ धीर गंभीर उदार सुशीळ ॥ कीर्तीने भरले दिग्मंडळ ॥ सात्त्विक केवळ क्षमावंत ॥१६॥
तेणे घातले अन्नसत्र ॥ झाली वर्षे दहा सहस्त्र ॥ इच्छाभोजन दान पवित्र ॥ अतीताप्रति देतसे ॥१७॥
अवनी जे अगम्य वस्त ॥ भोजनी मागीतली अकस्मात ॥ ती प्रयत्ने आणोनि पुरवीत ॥ शिवभक्त थोर तो ॥१८॥
ऐसे नारद सांगता वर्तमान ॥ त्याच्या गृहाप्रति पंचवदन ॥ कुश्चळ अतीतवषे धरून ॥ येता झाला ते समयी ॥१९॥
आंगणी उभा ठाकला येऊन ॥ परम कोपी जेवी दावाग्न ॥ दुष्ट वचन बोले कठिण ॥ रूपही संपूर्ण कुश्चळचि ॥१२०॥
म्हणे मज देई इच्छा भोजन ॥ नातरी जातो सत्त्व घेवोन ॥ श्रियाळ चांगुणा येवोन ॥ पाय धरिती सद्भावे ॥२१॥
आणोनि बैसविला आसनी ॥ त्याची क्रोधवचने सोसूनी ॥ षोडशोपचारे पूजा करोनी ॥ कर जोडोनि ठाकती पुढे ॥२२॥
मागा स्वामी इच्छाभोजन ॥ येरू म्हणे नरमांस देई आणोन ॥ तू चोर हेर आणिसी धरून ॥ त्याचे मांस न घे मी ॥२३॥
धरूनि माझा उद्देश ॥ विकत आणिसील मनुष्य ॥ ते न घे मी निःशेष ॥ सत्य सत्य त्रिवाचा ॥२४॥
चांगुणा म्हणे कर जोडून ॥ मी आपुले मांस देते करी भोजन ॥ श्रियाळ म्हणे मानेल पूर्ण ॥ माझे मांस देतो मी ॥२५॥
येरू म्हणे तुम्ही पवित्र तत्त्वता ॥ परी सर्व याचकांचे मातापिता ॥ तुम्हा दोघांसी भक्षिता ॥ अन्नसत्र खंडेल ॥२६॥
तरी तुमचा एकुलता एक स्नेहाळ ॥ पांच वर्षांचा चिलया बाळ ॥ बत्तीसलक्षणी वेल्हाळ ॥ तो मज देई भोजना ॥२७॥
ऐसे ऐकता वचन ॥ मायामोहजाळ दूर करून ॥ म्हणती अवश्य जा घेवोन ॥ मग सदाशिव बोलत ॥२८॥
मी काय आहे वृक व्याघ्र रीस ॥ भक्षू तव पुत्राचे मांस ॥ उबग न मानूनि विशेष ॥ पचवूनि घाली मज आता ॥२९॥
मायामोह धरून ॥ कोणी करील जरी रुदन ॥ तरी मी जाईन उठोन ॥ सत्त्व घेवोनि तुमचे ॥१३०॥
अवश्य म्हणोनि पतिव्रता ॥ उभी ठाकोनि बाहे निजसुता ॥ म्हणे बाळा चिलया गुणवंता ॥ खेळावया कोठे गेलासी ॥३१॥
तुजलागी खोळंबला अतीत ॥ बाळा माया येई धावत ॥ ऐसे ऐकता अकस्मात ॥ बाळ आला धावोनी ॥३२॥
अतीतासी करूनि नमन ॥ मातापितयांचे धरी चरण ॥ माता म्हणे तुझे पिशितदान ॥ अतीत मागतो राजसा ॥३३॥
बाळ बोले स्नेहेकरून ॥ हा देह म्या केला शिवार्पण ॥ अतीत होता तृप्त पूर्ण ॥ उमारमण संतोषेल ॥३४॥
ऐसे ऐकता झडकरी ॥ बाळ घेतला कडियेवरी ॥ पाकशाळेभीतरी ॥ घेवोनि गेली वधावया ॥३५॥
चिलयासी चुंबन देऊन ॥ ह्रदयी धरिला प्रीतीकरून ॥ बाळ म्हणे पुढती येईन ॥ तुझ्या उदरा जननीये ॥३६॥
मायाजाळ सर्व सोडून ॥ मन केले वज्राहूनि कठिण ॥ चिलयाचे शिर छेदून ॥ काढिले मांस आंगीचे ॥३७॥
आपणांसी पुत्र नाही म्हणोनिया ॥ शिरकमळ ठेविले पहावया ॥ शरीराचा पाक करूनिया ॥ उठवी भोजना अतीताते ॥३८॥
अतींद्रियद्रष्टा श्रीशंकर ॥ अनंत ब्रह्मांडाचा समाचार ॥ सर्व ठाऊक सूत्रधार ॥ कळले शिर ठेविले ते ॥३९॥
उठोनि चालिला तात्काळ ॥ धावती चांगुणा श्रियाळ ॥ येरू म्हणे कळले सकळ ॥ शिरकमळ ठेविले ॥१४०॥
सर्व गात्रांत शिर प्रधान ॥ तेचि कैसे ठेविले वंचून ॥ तव ती दोघे धरिती चरण ॥ तेही पचवून घालितो ॥४१॥
क्षोभ न धरावा अंतरी ॥ नेणतपणे चुकलो जरी ॥ तरी सर्वज्ञा तू क्षमा करी ॥ सत्त्व आमुचे राखावे ॥४२॥
मग बैसला आसनी येऊन ॥ म्हणे शिर येई बाहेर घेऊन ॥ उखळात घालूनि कांडण ॥ मजदेखता करी आता ॥४३॥
अश्रु आलिया तुझ्या नयनी ॥ की कष्टी झालिया अंतःकरणी ॥ तरी पुत्र गेला सत्त्वासी हानी ॥ करून जाईन तुमच्या ॥४४॥
अवश्य म्हणे नृपललना ॥ शिर आणोनि करी कांडणा ॥ सत्त्व पाहे कैलासराणा ॥ अंतरी सद्गद होऊनी ॥४५॥
निजसत्त्वाचे उखळ ॥ धरिले धैर्याचे करी मुसळ ॥ कांडीत बैसली वेल्हाळ ॥ निर्धार अचळ धरूनिया ॥४६॥
अतीत म्हणे परम मंगळ ॥ गीत गाय रसिक सुढाळ ॥ खंती करिता पयःफेनधवल ॥ दुरावेल जाण पा ॥४७॥
ते सद्भावसरोवरविलासिनी ॥ कोमलह्रदय नृपकामिनी ॥ की निश्चळ गंगा भरूनी ॥ जात मर्यादा धरूनिया ॥४८॥
तिचे पाहता निजवदन ॥ काळवंडला रोहिणीरमण ॥ मृगशावाक्षी गुणनिधान ॥ उपमा नाही स्वरूपाते ॥४९॥
म्हणे कोमलांगा बाळा सुकुमारा ॥ सुलक्षणा सुशाला नृपकिशोरा ॥ सुहास्यवक्रा राजीवनेत्रा येवोनि उदरा धन्य केले ॥१५०॥
तू सुकुमार परम गुणवंता ॥ माझे निष्ठुर घाव लागती माथा ॥ तुजविण परदेशी आता ॥ दुबळि भणंग झाले मी ॥५१॥
कुचकमंडली अतिसुंदरा ॥ कुंचकीबाहेर फुटल्या दुग्धधारा ॥ की भूमिलिंगासी एकसरा ॥ गळत्या लाविल्या तियेने ॥५२॥
म्हणे अतीत जेवोनि अवधारी ॥ जाऊ दे राजद्वाराबाहेरी ॥ देह त्यागीन ये अवसरी ॥ यावरी धीर न धरवे पै ॥५३॥
कैलासपंथ लक्षून ॥ सखया एकला जातोसी मज टाकून ॥ तुझे संगती मी येईन ॥ उभा राहे क्षणभरी ॥५४॥
तू मोक्षद्वीपाचे केणे भरून ॥ जासी कैलासराजपेठ लक्षून ॥ तुझे संगती मी उद्धरेन ॥ मज टाकूनि जाऊ नको ॥५५॥
उदकाविन जैसा मीन ॥ तैसी मी तान्हया तुजविण ॥ माझे ह्रदय निर्दय कठीण ॥ लोकात वदन केवी दावू ॥५६॥
तुझी माउली मि म्हणता ॥ लाज वाटे रे गुणवंता ॥ तुवा आपुली सार्थकता ॥ करूनि गेलासी शिवपदा ॥५७॥
हे त्रिभुवन शोधिता सकळ ॥ तुजऐसा न दिसे बाळ ॥ मग ते पचवूनि तात्काळ ॥ उठा म्हणे अतीताते ॥५८॥
अतीत म्हणे अवनीपती ॥ उठा तुम्ही यजमान माझे पंक्ती ॥ ऐसे ऐकता श्रियाळनृपती ॥ झाला चित्ती संकोचित ॥५९॥
चांगुणा म्हणे नृपनाथा ॥ सत्त्व राखावे सत्वर आता ॥ विन्मुख जाऊ न द्यावे अतीता ॥ मनी चिंता न धरावी ॥१६०॥
नव मास वाहिला म्या उदरात ॥ तुम्हासी जड नव्हे चौप्रहरात ॥ पोटींचा पोटी घालिता सुत ॥ चिंता काय नृपश्रेष्ठा ॥६१॥
राव बैसला पंक्तीसी ॥ ताट वाढोनि आणिले वेगेसी ॥ अतीत म्हणे चांगुणेसी ॥ तुही येई सवेग ॥६२॥
अवश्य म्हणोनि झडकरी ॥ येवोनि बैसली नृपसुंदरी ॥ यावरी अतीत म्हणे तुमच्या मंदिरी ॥ अन्न न घ्यावे सर्वथा ॥६३॥
निपुत्रिकांचे न पहावे वदन ॥ मग तेथे कोण घेईल अन्न ॥ दीपेविण शून्य सदन ॥ पुत्राविण तेवी तुम्ही ॥६४॥
नासिकेवाचोनि वदन ॥ की वृक्ष जैसा फळाविण ॥ की बुबुळाविण जैसे नयन ॥ शून्य सदन तुमचे तेवी ॥६५॥
तव ती बोले सद्गदित ॥ एक होता तो अर्पिला सुत ॥ चांगुणा म्हणे गेले सत्त्व ॥ अतीत विन्मुख जाईल आता ॥६६॥
एक बाळ तो दिधला भोजनासी ॥ आता महाराजा सत्त्व किती पाहासी ॥ ऐसे बोलता चांगुणेसी ॥ अद्भुत गहिवर दाटला ॥६७॥
म्हणे सत्त्वही बुडाले सकळ ॥ वृथा गेले माझे बाळ ॥ मग कंठ मोकळा करूनि ते स्नेहाळ ॥ हाक फोडी चांगुणा ॥६८॥
नयनी चालिल्या प्रेमाश्रुधारा ॥ म्हणे अहा शिव कर्पूरगौरा ॥ दीर्घस्वरे बाहे उमावरा ॥ पाव सत्वरी या आकांती ॥६९॥
अहा झाले वंशखंडण ॥ न देखो पुढती पुत्रवदन ॥ ऐसे ऐकता अतीताचे नयन ॥ स्रवो लागले प्रेमभरे ॥१७०॥
बाहेर फुटली मात ॥ वळसा होत नगरांत ॥ लोक दुःखे वक्षस्थळ पिटीत ॥ राजकिशोर आठवूनी ॥७१॥
विमानी दाटले सुरवर ॥ म्हणती धन्य पतिव्रता सत्त्वधीर ॥ ईस प्रसन्न होवोनि श्रीशंकर ॥ काय देईल ते न कळेचि ॥७२॥
अतीत म्हणे चांगुणेसी ॥ जे प्रिय असेल तुझे मानसी ॥ ते मजसी माग सद्गुणराशी ॥ यावरी सती काय बोले ॥७३॥
मज निपुत्रिक म्हणतील लोक ॥ हा धुवोनि काढी कलंक ॥ ऐसे ऐकता कैलासनायक ॥ बोलवी म्हणे पुत्रासी ॥७४॥
सत्य मानूनि अतीतवचना ॥ दीर्घ हाका फोडीत चांगुणा ॥ म्हणे चिलया गुणनिधाना ॥ येई स्नेहाळ धावोनी ॥७५॥
अतीत तुजविण न घे ग्रास ॥ कोठे गुंतलासी खेळावयास ॥ माझे तान्हे तू पाडस ॥ सत्त्व राखे येवोनिया ॥७६॥
तू न येसी जरी धावोन ॥ तरी माझा जाऊ पाहे प्राण ॥ दशदिशा विलोकून ॥ चांगुणा पाहे तेधवा ॥७७॥
मागुती हाक फोडी वेल्हाळ ॥ तो जैसे उगवे मित्रमंडळ ॥ तैसा धावतचि आला बाळ ॥ पाहे श्रियाळ स्नेहभरे ॥७८॥
अतीतस्वरूप टाकून ॥ शिवप्रगटला निजरूप पूर्ण ॥ दशहस्त पंचवचन ॥ दीनोद्धारण जगद्गुरू ॥७९॥
चिलया शिवे ह्रदयी धरिला ॥ निजअंकावरी बैसविला ॥ श्रियाळचांगुणा ते वेळा ॥ पायावरी लोळती ॥१८०॥
सुरवर सुमने वर्षती अपार ॥ दुंदुभिनादे कोंदले अंबर ॥ आनंदमय झाले नगर ॥ धावती लोक पहावया ॥८१॥
शिवे आणविले दिव्य विमान ॥ श्रियाळचांगुणा दिव्यरूप होऊन ॥ चिलयासी सिंहासनी स्थापून ॥ छत्र धरिले तयावरी ॥८२॥
सचिवांसी निरवोनि राज्यभार ॥ विमानी बैसली सत्वर ॥ निजपदी जगदुद्धार ॥ श्रीशंकर स्थापी तया ॥८३॥
कांतिनगरी सौख्य अगाध ॥ त्रिभुवनी न माये आनंद ॥ श्रीधरस्वामी तो ब्रह्मानंद ॥ अभंग न विटे कालत्रयी ॥८४॥
शिवलीलामृत ग्रंथ ॥ झाला चतुर्दश अध्यायपर्यंत ॥ चौदा भुवनांचे सार यथार्थ ॥ चौदा अध्याय निर्मिले ॥८५॥
की चौदा विद्यांचे सार ॥ चौदा गाठींचा अनंत परिकर ॥ की चौदा पदे निरंतर ॥ गयावर्जन घड हे ॥८६॥
की चतुर्दश रत्नांचा प्रकाश ॥ येथेंचि झाला एकरस ॥ की चौदा चक्रे निःशेष ॥ प्रिय चौदाही लोकांते ॥८७॥
की चौदा कांडे वेद ॥ की चौदा कोहळी द्रव्य प्रसिद्ध ॥ की चौदा कोठड्या शुद्ध ॥ शिवमंदिर निर्मिले ॥८८॥
श्रवण पठण लेखन ॥ निदिध्यास अनुमोदन ॥ परम प्रीती करिता ग्रंथरक्षण ॥ फल समान सर्वांसी ॥८९॥
इतुक्यांशी शिव होऊनि माउली ॥ करील निजांगाची साउली ॥ आयुरारोग्य ऐश्वर्य सकळी ॥ ग्रंथश्रवणे प्राप्त होय ॥१९०॥
आधि व्याधि जाय निरसोन ॥ वंध्याही पावे पुत्रसंतान ॥ ग्रामा गेला बहुत दिन ॥ पिता बंधु भेटेल ॥९१॥
घरी संपत्ति दाटे बहुत ॥ ऋणमोचन होय त्वरित ॥ क्षत्रुक्षय यथार्थ ॥ दक्षिणमुखे वाचिता ॥९२॥
शत आवर्तने करिता भक्तियुक्त ॥ पोटी होय शिवभक्त सुत ॥ ज्याच्या घरी असेल हा ग्रंथ ॥ पिशाच भूत न रिघे तेथे ॥९३॥
त्रिमास करिता नित्य आवर्तन ॥ सर्व संकटे जाती निरसोन ॥ भावे प्रचीत पहावी वाचोन ॥ नाही कारण अभाविकांचे ॥९४॥
सोमवारी ग्रंथ पुजून ॥ अथवा प्रदोषकाळ शिवरात्रि लक्षून ॥ शुचिर्भूत होऊनि करावे शयन ॥ स्वप्नी प्रगटोन शिव सांगे ॥९५॥
जे जे पडेल संकट ॥ ते ते निवारील नीलकंठ ॥ चौदा अध्यायांचे फळ वरिष्ठ ॥ वेगळाले लिहिले असे ॥९६॥
प्रथमाध्यायी मंगलाचरण ॥ दाशार्हरायाचे आख्यान ॥ कलावतीने पति उद्धरिला पूर्ण ॥ हेचि कथन निर्धारे ॥९७॥
द्वितीयाध्यायी निरूपण ॥ शिवरात्रिकर्मविपाककथन ॥ तिसर्यात गौतम कथा सांगोन ॥ कल्पाषपाद उद्धरिला ॥९८॥
चौथ्यात महाकाळलिंगार्चन ॥ गोपबाळ गेला उद्धरून ॥ पाचव्यात उमेने पुत्र पाळून ॥ राज्यी स्थापिला शिवप्रसादे ॥९९॥
सहावा अध्याय अतिरसिक ॥ सीमंतिनी आख्यान पुण्यकारक ॥ सातवा आठवा सुरस कौतुक भद्रायुरायाचे कथन पै ॥२००॥
नवमात वामदेवाचे आख्यान सुरस ॥ दुर्जयराजा झाला राक्षस ॥ जन्मदुःखे कथिली बहुवस ॥ अतिसुरस अध्याय तो ॥१॥
दहाव्यात शारदा आख्यान ॥ अकराव्यात रुद्राक्षमहिमा पूर्ण ॥ महानंदा गेली उद्धरोन ॥ भद्रसेन राव तरला ॥२॥
बाराव्यात विदुरबहुलाद्धार ॥ विष्णूने मर्दिला भस्मासूर ॥ तेराव्या अध्यायात समग्र ॥ शिवगौरीविवाह पै ॥३॥
चौदाव्यात शिवअपर्णाविनोद ॥ गौरी भिल्लिणी झाली प्रसिद्ध ॥ पुढे श्रियाळचरित्र अगाध ॥ चौदावा अध्याय संपूर्ण हा ॥४॥
श्रीधरस्वामी ब्रह्मानंद ॥ आनंदसांप्रदाय परम अगाध ॥ क्षीरसागरी गोविंद ॥ आधी उपदेशी कमलोद्भवा ॥५॥
तेथूनी अत्रिऋषि प्रसिद्ध ॥ पुढे पूर्णब्रह्म दत्तात्रेय अगाध ॥ त्यापासूनि सदानंद ॥ रामानंद यती तेथोनि ॥६॥
तेथोनि अमलानंद गंभीर ॥ मग ब्रह्मानंद उदार ॥ त्यावरी कल्याणी राहणार ॥ सहजानंद यतींद्र पै ॥७॥
तेथूनि पूर्णानंद यती शुद्ध ॥ त्यापासाव पितामह दत्तानंद ॥ पिता तोचि सद्गुरु प्रसिद्ध ॥ ब्रह्मानंद यतींद्र जो ॥८॥
पंढरीहून चारी योजने दूरी ॥ नैऋत्यकोणी नाझरे नगरी ॥ तेथील देशलेखक निर्धारी ॥ पूर्वाश्रमी ब्रह्मानंद ॥९॥
पुढे पंढरीसी येऊन ॥ केले तेथे संन्यासग्रहण ॥ तेथेंच समाधिस्थ होऊन ॥ अक्षय वस्ती केली पै ॥२१०॥
तो ब्रह्मानंद माझा पिता ॥ सावित्री नामे माझी माता ॥ वंदूनि त्या उभयता ॥ शिवलीलामृत ग्रंथ संपविला ॥११॥
शके सोळाशे चाळीस ॥ विलंबीनाम संवत्सरास ॥ शुद्ध पौर्णिमा फाल्गुन मास ॥ रविवारी ग्रंथ संपविला ॥१२॥
ब्रह्मकमंडलूच्या तीरी ॥ द्वादशमती नाम नगरी ॥ आद्यंत ग्रंथ निर्धारी ॥ तेथेचि झाला जाणिजे ॥१३॥
शिवलीलामृत ग्रंथ आद्यंत ॥ चतुर्दश अध्यायापर्यंत ॥ जय जय शंकर उमानाथ ॥ तुजप्रीत्यर्थ हो का सदा ॥१४॥
अपर्णाजीवना कर्पूरगौरा ॥ ब्रह्मानंदा जगदुद्धारा ॥ श्रीधरह्रदयाब्जभ्रमरा ॥ अक्षय अभंगा दयानिधे ॥१५॥
शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड ॥ स्कंदपुराण ब्रह्मोत्तर खंड ॥ सदा परिसोत सज्जन अखंड ॥ चतुर्दशाध्याय गोड हा ॥२१६॥
अध्याय ॥१४॥ ओव्या एकंदर संख्य ॥२,४५२॥
॥श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु॥
॥शुभं भवतु॥
॥इति श्रीशिवलीलामृत समाप्त॥
श्री शिवलीलामृत अध्याय पंधरावा
॥श्रीगणेशाय नमः ॥
जयजयश्रीगंगाधरा ॥ त्रिशूळपाणी पंचवक्रा ॥ अर्धनारीनटेश्वरा ॥ श्रीशंकरा नीलकंठा ॥१॥
भस्मोद्धलना त्रिनयना ॥ कर्पूरगौरा नागभूषणा ॥ गजास्यजनका ॥ गौरीरमणा ॥ भक्तवत्सला दयानिधे ॥२॥
तू आदिमध्यांतरहित ॥ अज अव्यय मायातीत ॥ विश्वव्यापका विश्वनाथ ॥ विश्वंभर जगद्गुरो ॥३॥
तू नामगुणातीत असून ॥ स्वेच्छे मायेसी आश्रयून ॥ नानारूप नानाभिधान ॥ क्रीडार्थ होसी सर्वेशा ॥४॥
सत्त्व रज तम हे गुणत्रय ॥ तूचि नटलासी निःसंशय ॥ स्थिर चरात्मक भूतमय ॥ तद्रूपचि आहे बा ॥५॥
तू ब्रह्मांड आदिकारण ॥ विश्वसूत्र तव अधीन ॥ जैसे हालविसी स्वेच्छेकरून ॥ तैसे संपूर्ण नाचत ॥६॥
तुझिया इच्छेवाचुनी ॥ काहींच नोहे जीवांचेनी ॥ ऐसे जाणोनि अंतःकरणी ॥ तुज शरण रिघती जे ॥७॥
तया भक्तांसी तू शंकर ॥ पूर्ण काम करोनि साचार ॥ भवाब्धीतूनि नेऊनि पार ॥ स्वपदी स्थिर स्थापिसी ॥८॥
ऐसा तुझा अद्भुत महिमा ॥ नकळे त्याची कवणा सीमा ॥ म्हणोनि केवळ परब्रह्मा ॥ शरण आलो असे पा ॥९॥
तरी दयाब्धे मज पामरा ॥ न्यावे भवाब्धिपैलपारा ॥ तुजवाचूनि कोण दातारा ॥ अनाथासी उद्धरील ॥१०॥
असो आता बहु विनवणी ॥ आधी पुरवी मनाची धणी ॥ त्वद्रुण प्राकृतवाणी ॥ कीजे ऐसी असे जी ॥११॥
तुझिया कृपे शिवलीलामृ ॥ चवदा अध्याय वर्णिले यथार्थ ॥ वेदव्यासे स्कंदपुराणात ॥ ब्रह्मोत्तरखंडी कथिले जे ॥१२॥
परी माझ्या मनाची तृप्ती ॥ जाहली नाही बा पशुपती ॥ म्हणोनि आणिक ह्रदयी स्फूर्ती ॥ देऊनि कथा वर्णावी पा ॥१३॥
तू शंकर होता प्रसन्न ॥ हाता येते सर्व त्रिभुवन ॥ महाराज तू भक्तालागून ॥ वरप्रदाने तोषविसी ॥१४॥
तुज श्रीशंकरा समान ॥ वरदाना शक्त नसे कोण ॥ तुझे देखोनि उदारपण ॥ ब्रह्मा विष्णूही लाजती ॥१५॥
काय वर्णावी उदारता ॥ प्रत्यक्ष आपुली सुंदर कांता ॥ देऊनिया रावणभक्ता ॥ आत्मलिंग वोपिलेसी ॥१६॥
तेवीच दैत्येंद्र त्रिपुर ॥ तारक आणि भस्मासुर ॥ इत्यादि स्वभक्तालागी अपार ॥ अनिवार वर दिल्हेसी ॥१७॥
तू अत्यंत भोळा भगवान ॥ कपटेहि करिता तव सेवन ॥ देऊनि इच्छित वरदान ॥ आनंदविसी सेवका ॥१८॥
असो ऐका श्रोते सर्व ॥ ऐसा करिता म्या शिवस्तव ॥ ह्रदयी प्रगटोनि दयार्णव ॥ स्फूर्ति देत उत्तम ॥१९॥
अरे ह्या कलियुगामाझारी पाखंडी मातोनि पृथ्वीवरी ॥ श्रुति स्मृति पुरणोक्त सारी ॥ कर्मे बुडविते जाहले ॥२०॥
जैनमत ते आगळे ॥ सर्व भूमंडळी पसरले ॥ तेणे योगे वर्ण सगळे ॥ भूलोनि गेले साचार ॥२१॥
ते देखोनि म्या सत्वर ॥ तन्मतखंडनालागी भूवर ॥ शंकरनामे अति सुंदर ॥ जो अवतार धरियेला ॥२२॥
ते माझे अद्भुत चरित्र ॥ आधुनिकांसी न कळे पवित्र ॥ तरी तू प्राकृत भाषे विचित्र ॥ वर्णन करी श्रीधरा ॥२३॥
ऐसी शिवे केली प्रेरणा ॥ म्हणोनि पुराणार्थविवरणी ॥ एकीकडे ठेवूनि जणा ॥ जगद्गुरुचरित्र वर्णितो ॥२४॥
तरी सर्व तुम्ही श्रोते संत ॥ सावध एकीकडे ठेवूनि जाणा ॥ जगद्गुरुकथा ऐकता समस्त ॥ पापपर्वत भंगती ॥२५॥
कल्पारंभी कमळासने ॥ परब्रह्माच्या आज्ञेने ॥ महदादिकांच्या योगाने ॥ ही सर्व सृष्टी रचियेली ॥२६॥
इयेच्या कल्याणालागून ॥ सर्वमार्गदर्शक पूर्ण ॥ ऋग्यजुःसाम अथर्वण ॥ हे चार वेद जाहले ॥२७॥
परी त्या वेदांचे अर्थराशी ॥ स्पष्ट न होता सर्वांसी ॥ म्हणोनि परमात्म्याच्या मानसी ॥ कृपासमुद्र उचंबळला ॥२८॥
मग तो स्पष्ट व्हावयालागुनी ॥ पाणिन्यादि रूपे अवतरोनी ॥ व्याकरणादि षट्शास्त्रे झणी ॥ करिता जाहला परमात्मा ॥२९॥
आणि मन्वादि स्मृती ॥ करिता झाला तो विंशती ॥ तदभ्यासे सर्व जगती ॥ श्रुत्यर्थ जाणू लागले ॥३०॥
पुढे कलियुग होता प्राप्त ॥ भूमंडळ मानव समस्त ॥ अल्पायु मंदमती अत्यंत ॥ ऐसे जाण होतील ॥३१॥
आणि श्रुती स्मृति शास्त्रे केवळ ॥ गगनापरी अत्यंत विशाळ ॥ म्हणोनि त्यांचा मानवा सकळ ॥ अभ्यास नोहे कदापी ॥३२॥
तेणे ते सर्व अति अज्ञानी ॥ आणि सन्मार्गभ्रष्ट होऊनी जन्ममरणादि तीव्र दुःखांनी ॥ तडफडतील निश्चये ॥३३॥
ऐसे पूर्वी नारायणे ॥ जाणुनी मग दयार्द्रपणे ॥ कलिजनांच्या उद्धाराकारणे ॥ व्यासावतार धरियेला ॥३४॥
आणि त्या व्यासरूपे चांग ॥ चारी वेदांचे करूनि विभाग ॥ वेदार्थदर्शक ऐसे सवेग ॥ महाभारत रचियेले ॥३५॥
आणि विष्णु शिव नारद पद्म ॥ मार्कंडेय भागवत ब्राह्म ॥ अग्नि भविष्य वराह कूर्म ॥ मत्स्य लिंग ब्रह्मवैवर्त ॥३६॥
स्कंद वामन आणि गरुड ॥ तेवीच अठरावे ब्रह्मांड ॥ ऐसी अष्टादश पुराणे प्रचंड ॥ लोकोद्धारार्थ रचियेली ॥३७॥
मग मेदिनी एकैक ब्राह्मण ॥ व्यासकृत विभागातून ॥ यथामती एकैक भागालागून ॥ अभ्यासू लागले आनंदे ॥३८॥
आणि इतिहास पुराणे ऐकून ॥ सन्मार्गे चालू लागले संपूर्ण ॥ परी पुढे कलीच्या योगेकरून ॥ संकट दारुण पातले ॥३९॥
वेदशास्त्र पुराणे निंदूनि ॥ तयांचा दूरचि त्याग करूनि ॥ पाखंड बौद्धमते निशिदिनी ॥ वर्तू लागले सकळिक ॥४०॥
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र ॥ लोम विलोम आणि संकर ॥ ह्या सर्व जातींचे नारी नर ॥ अधर्मे वर्तू लागले ॥४१॥
सकळ मेदिनीवरुती ॥ बौद्धधर्म पसरला अती ॥ देव ग्रामदेवतांप्रती भजू लागले जैनशास्त्रे ॥४२॥
वेदशास्त्रे पुराणे समस्त ॥ अनुदिनी चालली लोपत ॥ श्रुतिस्मृति पुराणोक्त पंथ ॥ बहुतेक पै लोपले ॥४३॥
अहो श्रोते तुम्ही कराल प्रश्न ॥ ऐसे व्हावया काय कारण ॥ तरी मंडनमिश्र नामेकरून ॥ एक जैन उद्भवला ॥४४॥
तो केवळ बुद्धीचा सागर ॥ देवगुरूपरी वक्ता चतुर ॥ जयाच्या विद्येची साचार ॥ सरी न पावे शुकही ॥४५॥
तेणे स्वये अति दारुण ॥ करूनिया पै अनुष्ठान ॥ सरस्वती आणि कृशान ॥ प्रसन्न करून घेतले ॥४६॥
अग्नीमाजी हवन करूनी ॥ कल्पिले काढी कुंडांतुनी ॥ याचकजनांची इच्छा झणी ॥ तृप्त करी सर्वदा ॥४७॥
जैसा पूर्वी रावणसुत ॥ महापराक्रमी इंद्रजित ॥ हवन करोनी अश्वांसहित ॥ रथ काढिता जाहला ॥४८॥
तैसा तो मंडनमिश्रित अय्या ॥ अग्नीत हवन करूनिया ॥ त्यातूनि पितांबरादिक वस्तु चया काढीतसे यथेच्छ ॥४९॥
विद्या पाहता अति प्रबळ ॥ हुंकारे सूर्यासि उभा करील ॥ अत्यद्भुत सामर्थ्य केवळ ॥ सांगता वाचे न वदवे ॥५०॥
शास्त्री पुराणिक पंडित ॥ अय्याचा मानिती धाक बहुत ॥ वादविवाद करिता समस्त ॥ खंडित होत तत्क्षणी ॥५१॥
स्वये नवी शास्त्रे करूनी ॥ पंडिता जिंकी तयांचेनी ॥ कोणी न टिकती सभास्थानी ॥ मुखा गवसणी घालीत ॥५२॥
मोठे मोठे पंडित सगळे ॥ वादविवाद करिता थकले ॥ सकळ सृष्टीते जिंकिले ॥ आपुल्या शास्त्री अय्याने ॥५३॥
श्रुतिस्मृत्युक्त सद्धर्ममार्ग ॥ अधर्म ऐसे दावूनि सवेग ॥ आपुली शास्त्रे सर्वत्र सांग ॥ स्थापन केली दुष्टाने ॥५४॥
आणि चारी वर्ण अठरा याती ॥ यांची मती भ्रष्टावूनि अती ॥ ग्रामदैवते आपुल्या हाती ॥ आपुल्या शास्त्रे स्थापिली ॥५५॥
पूर्व शास्त्रे पडली एकीकडे ॥ जैने स्वशास्त्र केले उघडे ॥ तया अय्याच्या सामर्थ्यापुढे ॥ चकित झाले सर्वही ॥५६॥
आणि आमुचा धर्म नाही उत्तम ॥ जैनधर्म हा बहु सुगम ॥ ऐसे म्हणोनि सर्व जन परम ॥ अंतरी खिन्न जाहले ॥५७॥
मग वेदशास्त्रे पुराणे सोज्वळ ॥ यासि टाकूनि तत्काळ ॥ चारी वर्ण अठरा याति सकळ ॥ चालवू लागले जैनधर्म ॥५८॥
अहो त्या मंडनमिश्रालागून ॥ असे सरस्वती सुप्रसन्न ॥ म्हणोनि त्याच्या जिव्हाग्री बैसोन ॥ बोलिल्या वचना सत्य करी ॥५९॥
आणि सदा होऊनि अंकित ॥ तया अय्याच्या घरी राबत ॥ मद्यपान करूनि सतत ॥ अनाचार वाढवी तो ॥६०॥
नित्य प्रातःकाळी उठोन ॥ मद्याचा एक घट मांडून ॥ तेथे सरस्वतीची पूजा करून ॥ नैवेद्य अर्पी मद्याचा ॥६१॥
ऐसा तो अय्या त्रिकाळ जाणा ॥ सरस्वतीच्या करूनि पूजना ॥ प्रसाद म्हणोनि मद्यपाना ॥ करीतसे यथेष्ट ॥६२॥
नाही आचार ना विचार ॥ कर्मभ्रष्ट पाखंडी थोर ॥ आपुला शास्त्रघर्म साचार ॥ सर्व स्थळी स्थापीतसे ॥६३॥
सर्व जनांसी शिष्य करून ॥ स्वये तयांचा गुरु होऊन ॥ श्रुतिस्मृत्युक्त धर्म संपूर्ण ॥ आचरो नेदी कवणासी ॥६४॥
ऐसा अनर्थ करिता फार ॥ भूमीसी होऊनि अति भार ॥ रात्रंदिवस ती अनिवार ॥ दुःखाश्रु टाकू लागली ॥६५॥
देव ब्राह्मण साधुसंत ॥ दुःखे पोळती अहोरात ॥ काही काळे हे वृत्त समस्त ॥ श्रुत जाहले शंकरासी ॥६६॥
तेव्हा तो शंकर पिनाकपाणी ॥ अत्यंत कोपाविष्ट होऊनि ॥ म्हणे सर्व कर्ममार्ग बुडवुनी ॥ वर्तती की जैनधर्मे ॥६७॥
सकळही भूमंडळावर ॥ जैनधर्माचा झाला की प्रसार ॥ तरी आता मी अवतरोनी शंकर ॥ जैनधर्मा उच्छेदितो ॥६८॥
ऐसे कोपे बोलोनि शिव ॥ जो अनाथनाथ कृपार्णव ॥ पुराणपुरुष महादेव ॥ भाललोचन जगदात्मा ॥६९॥
जो अनंत ब्रह्मांडनायक ॥ भस्मासुरवरदायक ॥ त्रिशूळपाणी मदनांतक ॥ चंद्रशेखर उमापती ॥७०॥
तेणे तत्काळ मेदिनीवर ॥ उत्तरदेशी निर्मळ क्षेत्र ॥ तेथे विप्रकुळामाजी सत्वर ॥ घेतला अवतार नररूपे ॥७१॥
तेव्हा समुद्रवसनेलागुन ॥ परमानंद झाला संपूर्ण ॥ दश दिशांतरे प्रसन्न ॥ देव संपूर्ण हर्षले ॥७२॥
मंद सुगंध शीतळ ॥ वाहू लागला तो अनिळ ॥ वापी कूप नद्यांचे जळ ॥ झाले निर्मळ तत्क्षणी ॥७३॥
ऐसी शुभ चिन्हे अपार ॥ होऊ लागली पृथ्वीवरी ॥ मुनी जाणूनी समाचार ॥ निर्मळ क्षेत्री पातले ॥७४॥
आणि जाऊनिया विप्रसदनी ॥ बाळजातक वर्तवूनी ॥ शंकराचार्य ऐसे तत्क्षणी ॥ नाम ठेविते जाहले ॥७५॥
आता ह्या नामासी काय कारण ॥ तरी शं म्हणजे सुकल्याण ॥ कृञू धातृचा अर्थ करण ॥ आणि आचार्य म्हणजे सद्गुरू ॥७६॥
ऐसा हा तीन शब्दांचा अर्थ ॥ आणि हा सदुपदेश यथार्थ ॥ सर्व लोकांचे कल्याण सतत ॥ करणार असा निश्चये ॥७७॥
अथवा शंकर छेदावया ॥ अवतरला असे म्हणोनिया ॥ शंकराचार्य ऐसे तया ॥ नाम ठेविते जाहले ॥७८॥
असो ऐसा तो कर्पूरगौर ॥ वैदिक मार्ग स्थापावया सत्वर ॥ शंकराचार्य नामे भूवर ॥ निर्मळक्षेत्री अवतरला ॥७९॥
पुढे झाले उपनयन ॥ सकळ विद्या अभ्यासून ॥ अल्प वयांतचि संन्यासग्रहण ॥ करिता झाला मातृआज्ञे ॥८०॥
मग सवे घेऊनि शिष्यमंडळी ॥ तीर्थयात्रार्थ भूमंडळी ॥ फिरता जैनमताची आगळी प्रवृत्ति देखिली सर्वत्र ॥८१॥
देशोदेशींचे निखिलजन ॥ शंकराचार्यांचा करीत अपमान ॥ सकळ जनांचे लागले ध्यान ॥ जैनशास्त्राकडे पा ॥८२॥
असो ऐसे फिरता मेदिनीसी ॥ आचार्य पातले कोल्हापुरासी ॥ मग शिष्यांसहित एके दिवशी ॥ ग्रामात चालिले भिक्षार्थ ॥८३॥
घरोघरी भिक्षा याचित ॥ येऊनि कांसाराच्या आळीत ॥ तयांजवळी भिक्षा मागत ॥ तो हसू लागले जैन ते ॥८४॥
आणि म्हणती भिक्षा कैची येथ ॥ काचरस आहे कढईत ॥ पाहिजे तरी हा समस्त भिक्षेलागी समर्पितो ॥८५॥
तै स्वामी म्हणती कासाराप्रती ॥ तुमची आहे जैनयाती ॥ तरी अन्य भिक्षा न घेऊ निश्चिती ॥ कांचरसचि आम्हां द्या ॥८६॥
ऐसे तयाप्रती सांगुनी ॥ स्वामी म्हणती शिष्यांलागुनी ॥ तुम्ही स्वहस्तांच्या ओंजळी करुनी ॥ कांचरस प्राशिजे ॥८७॥
ऐसे स्वामीचे ऐकूनि वचन ॥ भिवोनी सकळ शिष्यजन ॥ म्हणती वाचलो तरी यासमान ॥ बहुत गुरु संपादू ॥८८॥
हा प्रत्यक्ष तप्त काचरस ॥ स्पर्शता मृत्यु येईल आम्हांस ॥ ज्याचे त्याणेचि घ्यावे विष ॥ आम्हा नलगे सेवा ही ॥८९॥
ऐसे बोलून शिष्यजन ॥ पळू लागले सर्व तेथून ॥ मग स्वामी स्वये ओंजळ करून ॥ म्हणती ओता कांचरस ॥९०॥
अहो पूर्वी समुद्रमंथनकाळी ॥ काळकूटविष ज्वाळामाळी ॥ प्रगटला तया येऊनि जवळी ॥ स्वये प्राशिता झाला जो ॥९१॥
तोचि तो शंकराचार्य भगवान ॥ तयासि काय कांचरस कठिण ॥ कल्पांतीच्या कृशानूलागून ॥ गिळील जाण क्षणार्धे ॥९२॥
असो मग ते दुष्ट कांसार ॥ तो तप्त कांचरस प्रखर ॥ आचार्यांच्या ओंजळीत सत्वर ॥ ओतिते झाले भिक्षेसी ॥९३॥
जया रसाचा बिंदु तत्त्वता ॥ भूमीवर पडला असता ॥ जळोनि जाईल भूमी समस्ता ॥ ऐसा तप्त अत्यंत ॥९४॥
परी तो जगद्गुरु भगवान ॥ अति शीतळ मधुर जीवन ॥ प्यावे तैसे त्या रसा तत्क्षण ॥ प्राशिता झाला साचार ॥९५॥
ऐसे तयाचे पाहूनि साहस ॥ कांसारांचे दचकले मानस ॥ म्हणती हा पै पुराणपुरुष ॥ धर्मस्थापनार्थ अवतरला ॥९६॥
अहो पाहता ज्या रसाप्रती ॥ आमुचे नेत्र गरगरा फिरती ॥ तो रस प्याला स्वये निगुती ॥ धन्य मूर्ती शंकराचार्य ॥९७॥
ऐसे सर्व कांसारी बोलून ॥ घट्ट धरिले स्वामीचे चरण ॥ मग शंकराचार्य तेथून ॥ जैनग्रामासी पातले ॥९८॥
आणि स्वकीय शिष्यमुखेसी ॥ निरोपिले मंडनमिश्रासी ॥ की तुम्ही भेटूनि आम्हांसी ॥ शास्त्र विवाद कीजिये ॥९९॥
वादी समस्त शास्त्रवैभवे ॥ आम्हालागी त्वा जिंकावे ॥ अथवा आम्ही पराभवावे ॥ सद्धर्म शास्त्रे तुम्हांसी ॥१००॥
ऐसा शंकराचार्यांचा निरोप ॥ ऐकूनि तो महागर्वकूप ॥ मंडनमिश्र आगळे अमूप ॥ बोलता झाला अभिमाने ॥१॥
अरे आजपर्यंत बहु पंडित ॥ वादार्थ आले मी मी म्हणत ॥ परि ते म्या जिंकिले समस्त ॥ आमच्या जैनशास्त्रेसी ॥२॥
आता हा येऊनि संन्यासी ॥ सांगोन पाठवितो आम्हांसी ॥ तरी मी आजि जिंकीन यासी ॥ सरस्वतीच्या प्रसादे ॥३॥
ऐसे गर्वे बोले वचन ॥ सरस्वतीचे करूनि ध्यान ॥ तो मंडनमिश्र जगद्गुरुलागुन ॥ जाऊनि भेटला तात्काळ ॥४॥
ते दोघेही तेजस्वी महापुरुष ॥ केवळ जैसे चंद्र चंडांश ॥ दोघांचेही पराक्रम विशेष ॥ समसमान निर्धारे ॥५॥
दोघेही बोलती एकमेकांसी ॥ सभा करावी आजचे दिवशी ॥ वेदशास्त्राची स्वमुखेसी ॥ चर्चा व्हावी सविस्तर ॥६॥
पूर्वपक्ष उत्तरपक्ष करोन ॥ अर्थ विवरावा संपूर्ण ॥ ज्यासी नर्थ न होय पूर्ण ॥ तयाचे शास्त्र मिथ्या पै ॥७॥
आणि जो पराजय पावेल ॥ तद्धर्म विध्वंसूनि सकळ ॥ ग्रंथही तयाचे तात्काळ ॥ बुडवूनिया टाकावे ॥८॥
ऐसे दोघेही प्रतिज्ञा बोलुनी ॥ बैसले मध्ये पडदा लावुनी ॥ सर्व जातींचे लोक तत्क्षणी ॥ सभेलागुनी पातले ॥९॥
तो मंडनमिश्रे पडद्याआंत शंकराचार्यासी नकळत ॥ मद्यघट ठेवूनि तयात ॥ सरस्वती स्थापूनि पूजिली ॥११०॥
तै तया मद्याच्या घटांतूनि ॥ सरस्वती बोले अय्यालागुनी ॥ आता मी शंकराचार्यासि झणी ॥ शास्त्रमते विध्वंसिते ॥११॥
तू माझ्या मागे बैसून ॥ चमत्कार पाहे संपूर्ण ॥ मी तुज आहे सुप्रसन्न ॥ वचन सत्य करीन पाहे ॥१२॥
ऐसिये प्रकारे सुंदर ॥ सरस्वतीचा ऐकूनि वर ॥ तो महापंडित मंडनमिश्र ॥ समाधान पावला ॥१३॥
मग पडद्याआतून ॥ शंकराचार्यासी बोले वचन ॥ कोणता वेद आरंभून ॥ अर्थ करू सांग पा ॥१४॥
तै शंकराचार्य बोलत ॥ चारी वेद करी समाप्त ॥ जे जे मी पुसेन यथार्थ ॥ ते ते मजसी सांगावे ॥१५॥
ठायी ठायी अर्थ पुसेन ॥ त्याचे करावे समाधान ॥ न सांगता पदवीपासून ॥ भ्रष्ट करीन क्षणमात्रे ॥१६॥
मग त्याच आचार्यभाषिता ॥ मान्य करूनि तो तत्त्वता ॥ सरस्वतीसि म्हणे हे माता ॥ बोल आता सत्वरी ॥१७॥
तै श्रीशंकराचार्याप्रती ॥ बोलू लागली सरस्वती ॥ परी शंकराचार्यांच्या चित्ती ॥ जैन बोलतो ऐसेच ॥१८॥
म्हणोनि आचार्य बोलले ॥ अय्या ऋग्वेद आरंभी ये वेळे ॥ तव सरस्वतीने मुख काढिले ॥ घटातूनि बाहेरी ॥१९॥
प्रथम ऋग्वेद ऋचांसहित ॥ सरस्वती चालली बोलत ॥ ठायी ठायी आचार्य पुसत ॥ अर्थकूटे तेधवा ॥१२०॥
परी ज्याच्या मुखापासून ॥ चार वेद झाले उत्पन्न ॥ त्या ब्रह्मयाचे ते कन्यारत्न ॥ न अडखळे कोठेची ॥२१॥
शंकराचार्य जे जे पुसत ॥ त्याचे तत्क्षणी ती उत्तर देत ॥ असो ऐसा ऋग्वेद समस्त ॥ समाप्त जाणा जाहला ॥२२॥
परी सरस्वती म्हणते वेद ॥ हा आचार्यी नेणोनि भेद ॥ आता बोले रे यजुर्वेद ॥ ऐसे अय्यासी सांगितले ॥२३॥
ते स्वामींचे ऐकूनि भाषित ॥ सरस्वती पडद्याआत ॥ यजुर्वेदालागी त्वरित ॥ आरंभिती जाहली ॥२४॥
अस्खलित शब्द उमटती ॥ शंकराचार्य अर्थ पुसती ॥ परी कुशलत्वे ती सरस्वती ॥ करी समाधान तत्काळ ॥२५॥
आचार्यांचा न चाले उपाव ॥ कोठेच न होय पाडाव ॥ मग अंतरी एक उपाय ॥ ऐसा त्यांनी योजिला ॥२६॥
पूर्वी ऋग्वेद जाहला ॥ आता यजुर्वेद असे चालला ॥ तरी यासी ऋग्वेदातील भला ॥ पुनरपी प्रश्न कीजिये ॥२७॥
ऐसा करूनिया निश्चय ॥ अय्यासी बोलती आचार्य अरे तू सांप्रत निःसंशय ॥ यजुर्वेद बोलतोसी ॥२८॥
परी ऋग्वेदामाजी देख ॥ शंका राहिली असे एक ॥ तरी ती ऋचा बोलूनि सम्यक ॥ अर्थ सांगे पुनरपि ॥२९॥
ऐशा स्वामीच्या प्रश्नाला ॥ ऐकून स्तब्धली ब्रह्मबाळा ॥ पूर्वी ऋग्वेद सर्व म्हणितला ॥ परी तिसी त्याचा आठव नसे ॥१३०॥
अहो सरस्वतीचा ऐसा मार्ग ॥ की वेद शास्त्र पुराणे सांग ॥ आरंभापासोनि स्पष्ट सवेग ॥ संपूर्णहि म्हणे पा ॥३१॥
परी पुढे पुढे म्हणत असता ॥ मध्येच पुशिले पूर्वोक्त अर्था ॥ तरी तियेसी पूर्वोक्त सर्वथा ॥ स्मरत नसे काहीच ॥३२॥
म्हणोनि अंतरी गडबडोन ॥ स्तब्ध होतसे तत्क्षण ॥ हे तियेचे वर्म कठीण ॥ ठाउके नसे कोणासी ॥३३॥
परी शंकराचार्य चतुर ॥ अंतरी करिती विचार ॥ ऐसे वेद सार्थ साचार ॥ ब्रह्मांडी कोण बोलणार ॥३४॥
ब्रह्मा आणि सरस्वती ॥ ही मात्र बोलतील निश्चिती ॥ या दोघांवाचूनि जगती ॥ नसे कोणी समर्थ ॥३५॥
ह्या अय्याच्या बापाचेने ॥ ऐसे नोहे वेद बोलणे ॥ मग ह्या क्षुल्लक पामराचेने ॥ कोठोनिया बोलवेल ॥३६॥
तरी येथे काही तरी ॥ कपट आहे निर्धारी ॥ ऐसे जाणोनिया अंतरी ॥ अय्यालागी बोलत ॥३७॥
अरे आता उगा राहिलासी ॥ मग प्रश्नासी का नोत्तरिसी ॥ तो तो अय्या गडबडोनि मानसी ॥ म्हणे अनर्थ ओढवला ॥३८॥
दोन चार वेळा स्वामींनी ॥ प्रश्निले असे अय्यालागुनी ॥ परी तो अत्यंत भय पावोनी ॥ काहीच वाणी बोलेना ॥३९॥
मग शंकराचार्य उठोन ॥ पाहाती पडदा उघडोन ॥ तो तेथे मद्यघटांतून ॥ मुख बाहेर आले असे ॥१४०॥
ते पाहता ही सरस्वती होय ॥ ऐसा अंतरी करूनि निश्चय ॥ जगद्गुरु शंकराचार्य ॥ कोपे संतप्त जाहले ॥४१॥
मग सकळ पडदे फाडून ॥ शिरी घातला दंड दारुण ॥ तेथे तो मद्यघट फुटोन ॥ चूर्ण तत्क्षणी जाहला ॥४२॥
आणि म्हणती हे दुराचारिणी ॥ जैनालागी प्रसन्न होउनी ॥ वेदशास्त्रचर्चा रात्रंदिनी ॥ चांडाळिणी करितेस ॥४३॥
तुझे न पहावे जारिणी मुख ॥ ज्याच्या पोटी जन्मलीस देख ॥ त्या ब्रह्मयासीच तू निःशंक ॥ अंगभोग देसी निर्लज्जे ॥४४॥
ऐसी तू महापापिणी ॥ ह्या जैनासी वश होऊनी ॥ जैनशास्त्र स्थापावयालागुनी ॥ सर्वदा रत झालीस ॥४५॥
ह्या दुष्ट पाखांड मतासी ॥ आश्रय देऊनि अहर्निशी ॥ अठरा याती चार वर्णासी ॥ एकंकार केलास ॥४६॥
जैनी झाले लोक समग्र ॥ हा तूचि केलासी वर्णसंकर ॥ वेदशास्त्रे पुराणे परिकर ॥ एकीकडे राहिली ॥४७॥
या जैनाची शास्त्रे संपूर्ण ॥ तुवा त्यांचा धरोनि अभिमान जैनमत प्रगटवून ॥ लोका पाखंडी घातलेस ॥४८॥
तुझ्या आश्रये ह्या दुष्टे स्वमते ॥ पृथ्वीवरील ग्रामदैवते ॥ स्थापूनिया स्वकीय हस्ते ॥ भ्रष्ट केली सर्वही ॥४९॥
ऐसा तुझ्यायोगे सगळा अत्यनर्थ ओढवला ॥ तो म्या कैलासी ऐकिला ॥ म्हणोनि घेतला अवतार ॥१५०॥
तू अनाचार केलासि अत्यंत ॥ तरी सदा राहे नीच मुखात ॥ अत्यंजादिकांच्या गृही सतत ॥ वास होवो मम शापे ॥५१॥
ऐसे रीती सरस्वतीप्रती ॥ शंकरस्वामी शाप देती ॥ मग ती कोपोनी सरस्वती ॥ स्वामीप्रती बोलत ॥५२॥
तू तो धर्म स्थापावयासी ॥ साक्षात् शंकर अवतरलासी ॥ तरी तुजा देह कीटकदेशी ॥ पडेल जाण मद्वचने ॥५३॥
ऐसे स्वामीस शापून ॥ सरस्वती गुप्त झाली तत्क्षण ॥ मग स्वामीचे धरूनि चरण ॥ मंडनमिश्र लोळत ॥५४॥
परी शंकराचार्यी तत्क्षणी ॥ जैनशास्त्रांच्या मोटा बांधुनि ॥ अति अगाध समुद्रजीवनी ॥ नेऊनिया बुडविल्या ॥५५॥
त्यांतूनि एक अमरकोश ॥ सर्वोपयोगी असे विशेष ॥ म्हणोनि त्या मात्र ग्रंथास ॥ शंकराचार्यी रक्षिले ॥५६॥
असो ऐसे जैनशास्त्रांसी ॥ विध्वंसूनिया क्षणार्धेसी ॥ मग जवळ पाचारूनि जनांसी ॥ स्वामी तयासी बोलत ॥५७॥
अहो ही ग्रामदैवते समस्त ॥ आहेत खरी जैनस्थापित ॥ परी त्याते तुम्ही सतत ॥ भजत जावे स्वधर्मे ॥५८॥
जैने स्थापिली म्हणोनी ॥ संशय काही न धरावा मनी ॥ आपुला धर्म आपणालागुनी ॥ देवापाशी काय असे ॥५९॥
ऐसे स्वामी सकळ लोका ॥ सांगती तेव्हा अय्या देखा ॥ स्वामीचरणी स्वकीय मस्तका ॥ ठेवूनिया विनवीत ॥१६०॥
म्हणे स्वामी जैनमत संपूर्ण ॥ तुम्ही टाकिले उच्छेदून ॥ परी कृपे जनाचे अभिधान ॥ किंचित् तरी रक्षावे ॥६१॥
ऐसी ऐकता दीनवाणी ॥ कृपा उपजोनि स्वामीच्या मनी ॥ ग्रामदेवतांच्या सन्निधानी ॥ जैनाचा धोंडा स्थापिला ॥६२॥
जेथे जेथे ग्रामदैवत ॥ तेथे जैनांचा धोंडा वसत ॥ ग्रामदेवतासंगे त्याप्रत ॥ प्रतिदिनी पूजिती ॥६३॥
असो मग स्वामी तेजोरशी ॥ आज्ञापिती सकळ जनांसी ॥ की आपुल्या जातिधर्मेसी ॥ पूर्वीप्रमाणे वर्तावे ॥६४॥
जरी अधर्मे वर्ताल कोणी ॥ तरी दंडीन ऐसे बोलुनि ॥ वेदशास्त्र पुराणे तत्क्षणी ॥ प्रगट केली साचार ॥६५॥
मग सकळही ब्राह्मण ॥ करू लागले वेदशास्त्राध्ययन ॥ आणि अन्य जनही संपूर्ण ॥ वर्तू लागले स्वधर्मे ॥६६॥
ऐसे शंकराचार्ये दयाळे ॥ आपुल्या उत्तम बुद्धिबळे ॥ जैनांचे पाखंडमत आगळे ॥ विध्वंसिले सर्वही ॥६७॥
श्रुतिस्मृत्युक्त धर्म परिकर ॥ सर्वत्र स्थापिला पृथ्वीवर ॥ तेवीच अद्वैताचा साचार ॥ मार्ग सर्वांसी दाविला ॥६८॥
एवं महाराज शंकर ॥ भक्तवत्सल कर्पूरगौर ॥ अवतरोनिया भूमीवर ॥ भूभार हरिता जाहला ॥६९॥
अहो शंकराची लीला अगाध ॥ जो भक्तवत्सल स्वानंदकंद ॥ सेवका तारूनिया विशद ॥ निजपदासी नेतसे ॥१७०॥
काय वर्णावे त्याचे चरित ॥ जे दीन अनाथ सद्भक्त ॥ शिव पंचाक्षरी षडाक्षरी जपत ॥ तया तारीत प्रसादे ॥७१॥
दाशार्हराव आणि कलावती ॥ बहुला विदुर पापमती ॥ तेही शिवपंचाक्षरे निगुती ॥ अक्षय गती पावले ॥७२॥
शबर केवळ निषाद ॥ शिवकृपे तरला हे प्रसिद्ध ॥ भस्म झालेली तद्भार्या शुद्ध ॥ पुनरपि देहे प्रगटली ॥७३॥
श्रीशिवयोगिने ॥ सुमति भद्रायू कारणे ॥ शिवकवचाच्या उपदेशाने ॥ पावन केली साचार ॥७४॥
मैत्रेयीच्या उपदेशेकरूनी ॥ शिवव्रत आचरता सीमंतिनी ॥ यमुनेत पति बुडाला असोनी आला वाचोनी शिवकृपे ॥७५॥
पराशर ऋषीने आपण ॥ रुद्राभिषेकेकरून ॥ राजपुत्राचा मृत्यु टाळून ॥ तयासि राज्यी स्थापिले ॥७६॥
ऐसे शिवकवचरुद्र ॥ षडाक्षरी पंचाक्षरी इत्यादि मंत्र ॥ सर्वोद्धारक आहेत पवित्र ॥ परी अभक्ता काय ते ॥७७॥
जरी गर्गमुनिसारिखे सद्गुरु ॥ दाशार्हरायापरी शिष्य थोरू ॥ भाविक असतील तरी उद्धारू ॥ होईल जाण निश्चये ॥७८॥
जरी भद्रायूसमान शिष्यजन ॥ शिवयोगियापरी गुरु सुजाण ॥ तरी प्रत्यक्ष शिव प्रगटोन ॥ नेईल शिष्या कैलासा ॥७९॥
कलियुगामाजी गुरु महंत ॥ एक अडक्यासि तीन मिळत ॥ परी सद्गुरुसम अत्यद्भुत ॥ सामर्थ्य तेथे कैचे पा ॥१८०॥
द्रव्याची इच्छा धरूनि मनी ॥ केवळ शिष्यजनांसि भोंदुनी ॥ मंत्रतंत्र फुंकोनी कानी ॥ व्यर्थ साधना लाविती ॥८१॥
शिष्यही अभाविक दुर्जन ॥ गुरूचे पाहाती सदा न्यून ॥ म्हणोनि दोघा नरक दारुण ॥ प्राप्त होय शेवटी ॥८२॥
आतांचे गुरुशिष्य सकळिक ॥ केवळ द्रव्याचे गिराइक ॥ दाशार्हादिकांपरी तो एक ॥ शिष्य न दिसे कलियुगी ॥८३॥
सद्गुरु तो शिष्यांच्या धना ॥ नरकासम मानिती जाणा ॥ सच्छिष्यहि तनुमनधना ॥ अर्पितात गुरुपायी ॥८४॥
म्हणोनि तरले ते दाशार्हादिक ॥ नातरी तेच मंत्र सकळिक ॥ परी हे आतांचि जन मूर्ख ॥ द्रव्यलोभे भुलले पै ॥८५॥
अहो कृतयुगामाजी पाहता ॥ अस्थिगत प्राण होता ॥ जेव्हा अस्थी पडती सर्वथा ॥ तेव्हा प्राण जातसे ॥८६॥
म्हणोनि तोपर्यंत साधन ॥ करित बैसती अरण्यी जाऊन ॥ त्रेतायुगी ते चर्मगत प्राण ॥ चर्म झडता मृत्यु होय ॥८७॥
द्वापारी प्राण नाडीगत ॥ नाडी सुकती तो वाचत ॥ ऐसे पूर्वी आयुष्य बहुत ॥ होते सकळ मानवा ॥८८॥
आणि लक्ष अयुत सहस्त्र वर्षे ॥ ऐसी तेव्हा होती आयुष्ये ॥ म्हणोनि सकळ बहुत वर्षै ॥ अनुष्ठाने आचरत ॥८९॥
आणि ऐसे तप करित ॥ की जेणे अंगी वारुळ वाढत ॥ मग प्रसन्न होऊनि भगवंत ॥ आपुल्या नेत पदासी ॥१९०॥
आता तो अन्नमय प्राण ॥ अन्नाविण सत्वर मरण ॥ आणि आयुष्य तेहि अपूर्ण ॥ नोहे साधन काहीच ॥९१॥
देहाचा नाही भरवसा ॥ कोण दिवस येईल कैसा ॥ म्हणोनि साक्षाज्जगदीशा ॥ अंतरी दया उद्भवली ॥९२॥
आणि औटघटिकात पूर्ण ॥ परमेश्वरप्राप्ती होऊन ॥ मोक्षासि जावे उद्धरोन ॥ ऐसा मार्ग काढिला ॥९३॥
तो मार्ग म्हणाल कवण ॥ तरी सद्गुरुसी जावे शरण ॥ यावीण मोक्षलाभालागून ॥ इतर साधन नसेचि ॥९४॥
आता सद्गुरु तो कैसा असावा ॥ सदा आनंद तन्मनी वसावा ॥ वामदेव गर्ग शुक किंवा ॥ पराशरापरी साचा ॥९५॥
शिष्यही असावे भाविक ॥ गुरूच मानावा ईश्वर एक ॥ ऐसे घडता हे सकळिक ॥ जन तरतील कलियुगी ॥९६॥
श्रीधर म्हणे श्रोतयासी ॥ ज्या मंत्री तरले महाऋषी ॥ तेचि हे मंत्र तुम्हांसी ॥ प्रकाशित केले पा ॥९७॥
ज्या मंत्रे भद्रायु तरला ॥ जेणे दाशार्हराव उद्धरला ॥ आणि जो मंत्र सुमति राणीला ॥ शिवयोगिये दिधला असे ॥९८॥
ज्या मंत्रे बहुला उद्धरली ॥ विदुर पावला शिवपदकमळी ॥ आणि भ्रतारासहित तरली ॥ सीमंतिनी ज्या मंत्रे ॥९९॥
तेचि षडाक्षर पंचाक्षरी रुद्र ॥ मृत्युंजय शिवकवच पवित्र ॥ इत्यादि सकळहि मंत्र ॥ या ग्रंथात कथियेले ॥२००॥
परी श्रोते तुम्ही म्हणाल जरी ॥ तेचि मंत्र असता निर्धारी ॥ तिही सांप्रत पूर्वीच्या परी ॥ का न उद्धरती जन हे ॥१॥
तरि जपकर्त्याचे मन ॥ शुद्ध असेल तरी तत्क्षण ॥ पूर्वीप्रमाणे तयासि गुण ॥ येईल जाण निश्चये ॥२॥
यालागी विशुद्ध भावेसी ॥ जपावे या शिवमंत्रासी ॥ आणि सर्वांनीही अहर्निशी ॥ शिवलीलामृतासी ऐकिजे ॥३॥
आपुल्या प्रपंचालागुनी ॥ सावध जैसे अहर्निशी ॥ तैसे जरी शिवस्मरणी ॥ तरी मग उणे कायसे ॥४॥
कलियुगींच्या जनांकारणे ॥ शंकराचार्य ह्या अभिधाने ॥ अवतार घेऊनिया शिवाने ॥ जैनमत बुडविले ॥५॥
ऐसा सद्धर्मप्रतिपालक ॥ जो शंभु अर्पर्णानायक ॥ तयाचे स्मरण करिता सकळिक ॥ भवभय निरसे पै ॥६॥
आपुल्या कार्यात रात्रंदिन ॥ गुंतले असती जे का जन ॥ ते अभागी आयुष्य सरोन ॥ पावती निधन अकस्मात ॥७॥
जे कित्येक प्रपंची गुंतले ॥ शिवध्यान करू विसरले ॥ जन्मासि आले तैसेचि गेले ॥ ते जन्मले मेले सारखेच ॥८॥
जे जन्मोनि काही करीत नाही ॥ ते शेवटी जावोनि यमाचे गेही ॥ तेथे जन्मोनि नरकडोही ॥ अनेक भोग भोगित ॥९॥
आणि पुनरपि नाना योनीत ॥ जन्मोनि अनंत दुःखे भोगित ॥ एवं संसृतीच्या आवर्तांत ॥ बुचकळत सर्वदा ॥२१०॥
म्हणोनि सांगतो सर्वालागुन ॥ शिवचरणी भाव धरोन ॥ करिता शिवलीलामृतपान ॥ जन्ममरण खंडेल ॥११॥
शिवस्मरणकर्त्या जनांसी ॥ शिव नेतो मोक्षपदासी ॥ ब्राह्मणादि सर्व जातींसी ॥ शिवस्मरण तारक ॥१२॥
परी ब्राह्मण आपुल्या कर्मात ॥ बैसती बहुत ग्रंथ घोकित ॥ आणि प्रपंची होऊनि रत ॥ शिवस्मरण विसरले ॥१३॥
वैश्य ते आपुल्या व्यवहारेसी ॥ द्रव्याची दुणाई इच्छूनि मानसी ॥ तागडी धरित अहर्निशी ॥ शिवस्मरण मग कैचे ॥१४॥
आणि क्षत्रिय ते संपूर्ण ॥ नाना शस्त्रे सांभाळून ॥ सदा युद्ध इच्छिती म्हणोन ॥ शिवस्मरण विसरले ॥१५॥
कुणब्यासी नाहि घरदार ॥ नित्य नूतन संसार ॥ भूमिसेवा करिती निरंतर ॥ मग शिवस्मरण कैचे तया ॥१६॥
सोनार सुतार कासार ॥ करिती आपुले व्यवहार ॥ प्रपंची गुंतले निरंतर ॥ मग शिवस्मरण कोठूनी ॥१७॥
ऐशा सकळही याती ॥ आपापुल्या व्यवहारी गुंतती ॥ जन्ममरणाच्या आवृत्ती ॥ न सुटती साचार ॥१८॥
पुनः पुनः जन्ममरणे ॥ चौर्यांशी लक्ष योनी भोगणे ॥ परी तयांच्या परिहाराकारणे ॥ शिवनाममृत यथार्थ ॥१९॥
यालागी शिवलीलामृत ग्रंथ ॥ पापी जनोद्धारक निश्चित ॥ याते जे श्रवण पठण करित ॥ ते जन होत शिवरूप ॥२२०॥
एक मंडळामाझारी ॥ म्हणजे बेचाळीस दिनाभीतरी ॥ सदाशिवमूर्ती ध्याऊनि अंतरी ॥ सात आवर्तने करिती जे ॥२१॥
तया श्रीगौरीरमण ॥ प्रत्यक्ष देऊनिया दर्शन ॥ सकळ कामना करितो पूर्ण ॥ ऐसा महिमा ग्रंथाचा ॥२२॥
श्रावणमासी सोमवारी ॥ एक एक आवर्तन जो करी ॥ श्रीशंकर तयाचे घरी ॥ वास करितो सर्वदा ॥२३॥
श्रीशंकर झालिया प्रसन्न ॥ जगी तयासी काय न्यून ॥ जैसी कामधेनु मिळता संपूर्ण ॥ मनोरथ पूर्ण होतात ॥२४॥
जरी पाहिजे शंभूची कृपा ॥ तरी हा आहे मार्ग सोपा ॥ करीत पंचाक्षरादि मंत्र जपा ॥ शिवलीलामृत वाचावे ॥२५॥
शनिप्रदोषी शिवरात्रीदिनी ॥ तीन आवर्तने करिता तत्क्षणी ॥ सर्व बंधमुक्त होऊनी ॥ इच्छिला पदार्थ लाधतो ॥२६॥
आता शकेल श्रोत्यांचे मन ॥ श्रीशिवमंत्राच्या जपेकरून ॥ जैसी दाशार्हाच्या अंगातून ॥ पापे निघाली काकरूपे ॥२७॥
तेवी पंचाक्षरी मंत्राचा जप ॥ आम्ही करीत असता अमूप ॥ काकरूपे आमुचे पाप ॥ गेले का न दिसे पै ॥२८॥
तरी श्रोतेजन हो ऐका ऐसी अंतरी न धरा शंका ॥ स्कंदपुराणी व्याजे का ॥ लिहिले तेचि हे कथिलेसे ॥२९॥
यालागी हे असत्य म्हणता ॥ जिव्हेसी कीटक पडतील तत्त्वता ॥ दाशार्हापरी भावे वर्तता ॥ पापे भस्म होतील ॥२३०॥
चवदा अध्यायाभीतरी जे ॥ मंत्र कथिले ऋषीश्वरी ॥ तिही निष्पाप होऊनि सत्वरी ॥ बहुत जन उद्धरिले ॥३१॥
शिवकवचे भद्रायुबाळ ॥ शिवमंत्रे शारदा निर्मळ ॥ राजपुत्राचा आलेला काळ ॥ रुद्रावर्तने परतला ॥३२॥
शबरस्त्री भस्म झाली ॥ परी ती नैवेद्यार्पणाच्या वेळी ॥ अन्नपात्र घेऊनि पतीजवळी ॥ उभी राहिली पूर्ववत ॥३३॥
बहुला ती केवळ पातकी ॥ पश्चात्तापे गेली स्वर्गलोकी ॥ विदुर भ्रतार होता नरकी ॥ तोही तेथे आणविला ॥३४॥
वामदेवे ब्रह्मराक्षसास ॥ गौतमे कल्माषपादरायास ॥ श्रीशिवे श्रियाळ चांगुणेस ॥ आणि चिलयास उद्धरिले ॥३५॥
दाशार्हराव आणि कलावती ॥ शिवमंत्रे पावली मुक्ती ॥ व्याध तरला अरण्यपंथी ॥ कीर्तनश्रवणमात्रेच ॥३६॥
गोरक्ष बाळ अज्ञान ॥ तोहि तरला शिवमंत्रेकरून ॥ मंत्रांत मंत्र श्रेष्ठ हे दोन ॥ पंचाक्षरी आणि षडाक्षरी ॥३७॥
शिवकवच महामंत्रासहित ॥ मृत्युंजयभस्ममंत्र विख्यात ॥ रुद्रावर्तन चिताभस्मपूत ॥ आणि शिवदर्शन उत्तम ॥३८॥
ह्यांची माहात्म्ये संपुर्ण ॥ चवदा अध्यायात वर्णून ॥ ह्या पंधराव्या अध्यायी आख्यान ॥ जगद्गुरूचे कथियेले ॥३९॥
स्कंदाप्रति शंकर सांगत ॥ जे ह्या मंत्रासि मुखे बोलत ॥ तया मी प्रत्यक्ष उमानाथ ॥ दर्शन देतो प्रीतीने ॥२४०॥
जो शिवलीलेसी पठण करी ॥ तयासि प्रसन्न गिरिकुमारी ॥ आणि मीहि तयासी अहोरात्री ॥ न विसंबे निश्चये ॥४१॥
ऐसे श्रीगिरिजानाथ ॥ कथिते जाहले स्कंदाप्रत ॥ म्हणोनि मीहि तैसेचि येथ ॥ वर्णियेले असे पा ॥४२॥
मी आपुल्या पदरींचे काही ॥ उगाच वर्णन केले नाही श्रोतेजनी ह्रदयाठायी ॥ विकल्प काही न धरावा ॥४३॥
शिवलीलेचे चवदा अध्याय ॥ हा पंधरावा कोठील काय ॥ ऐसा मनी विकल्प होय ॥ तरी सांगतो ऐकिजे ॥४४॥
ज्या शिवे भक्त तारिले अपार ॥ आणि ज्याचा शिवलीलामृत ग्रंथ पवित्र ॥ त्याणेच ह्या कलियुगी अवतार ॥ धर्मस्थापनार्थ घेतला ॥४५॥
शिवमहिमा अगाध ॥ सकळहि कीजे प्रसिद्ध ॥ म्हणोनि पंधरावा अध्याय शुद्ध ॥ शिवाज्ञेने वर्णिला ॥४६॥
पूर्वयुगी जी लीला वर्तली ॥ ती चवदा अध्यायी वर्णिली ॥ कलियुगी श्रीचंद्रमौळी ॥ शंकराचार्य अवतरले ॥४७॥
तेचि सविस्तर कथन ॥ या पंधराव्यात केले पूर्ण ॥ श्रोती श्रवणार्थ रात्रंदिन ॥ सादर असावे साचार ॥४८॥
हे पंधरा अध्याय संपूर्ण ॥ नित्य करावे श्रवण पठण ॥ अथवा सात पारायणे ॥ अत्यादरे करावी ॥४९॥
मद्य मांस भक्षून ॥ न करावे ग्रंथपठण ॥ की स्नान केल्यावाचून ॥ पारायण न करावे ॥२५०॥
रजस्वलेच्या श्रवणी ॥ न पडावा हा मंत्रशिरोमणी ॥ की अभक्ष्य भक्षण भक्षूनी ॥ शिवो नये या ग्रंथा ॥५१॥
आणि जो दुष्ट दुर्जन ॥ अविश्वासू निंदक महान ॥ तयाच्या श्रवणी जाण ॥ न घालावा सर्वथा ॥५२॥
रजस्वला स्त्रियांसमान ॥ दुर्जन निंदकांचे मन ॥ केवळ अशुद्ध असते म्हणोन ॥ ग्रंथश्रवणा योग्य नव्हे ॥५३॥
ह्या ग्रंथाच्या पठणेकरून ॥ इच्छिले सर्व प्राप्त होऊन ॥ गडांतरे रोग मृत्यु पाप ऋण ॥ दारिद्र संकटे निरसती ॥५४॥
अष्ट कुष्ठादि रोग निरसती ॥ श्रृंखळादि बंधने तुटती ॥ आयुष्यवर्धन धन संतती ॥ अखंडित होय पा ॥५५॥
आणि तुष्टि पुष्टि सायुज्यसदन ॥ पठणमात्रे लाधते पूर्ण ॥ याच्या नित्य पारायणासमान ॥ पुण्य नाही दुसरे ॥५६॥
पंधरा अध्याय ग्रंथ सकळ ॥ जरी नित्य नेमे न वाचवेल ॥ तरी बेचाळीस ओव्या सोज्वळ ॥ भक्तिभावे वाचाव्या ॥५७॥
नित्य प्रभाती स्नान करून ॥ बेचाळीस ओव्या वाचिता पूर्ण ॥ सर्व शिवलीलामृत पठण ॥ केल्याचे पुण्य होईल ॥५८॥
शिवलीलामृत ग्रंथ विशेष ॥ पंधरा अध्याय बहु सुरस ॥ त्यांतील निवडोनि सारांश ॥ बेचाळीस ओव्या काढिल्या ॥५९॥
आता बेचाळीस ओव्या कोणत्या ॥ तरी सांगतो ऐकाव्या त्या ॥ श्रवणमात्रे सकळ श्रोत्या ॥ स्वर्गप्राप्ती निश्चये ॥२६०॥
(नित्यपाठाच्या बेचाळीस ओव्या ॥ ॐ नमोजी शिवा अपरिमिता ॥ आदि अनादि मायातीता ॥ पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता ॥ हेरंबताता जगद्गुरु ॥६१॥
ज्योतिर्मयस्वरूपा पुराणपुरुषा ॥ अनादिसिद्धा आनंदवनविलासा ॥ मायाचक्रचाळका अविनाशा ॥ अनंतवेषा जगत्पते ॥६२॥
जयजय विरूपाक्षा पंचवदना ॥ कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या ॥ मनोजदमना मनमोहना ॥ कर्ममोचका विश्वंभरा ॥६३॥
जेथे सर्वदा शिवस्मरण ॥ तेथे भुक्ति मुक्ति आनंद कल्याण ॥ नाना संकटे विघ्ने दारुण ॥ न बाधिती कालत्रयी ॥६४॥
संकेते अथवा हास्येकरून ॥ भलत्या मिषे घडो शिवस्मरण ॥ न कळता परिस लोहालागुन ॥ झगडता सुवर्ण करीतसे ॥६५॥
न कळत प्राशिता अमृत ॥ अमर काया होय यथार्थ ॥ औषध नेणता भक्षिता ॥ परी रोग हरे तत्काळ ॥६६॥
जय जय मंगलधामा ॥ निजजनतारक आत्मारामा ॥ चराचरफलांकित कल्पद्रुमा ॥ नामा अनामा अतीता ॥६७॥
हिमाचलसुतामनरंजना ॥ स्कंदजनका शफरीध्वजादहना ॥ ब्रह्मानंदा भाललोचना ॥ भवभंजना महेश्वरा ॥६८॥
हे शिवा वामदेवा अघोरा तत्पुरुषा ईशाना ईश्वरा ॥ अर्धनारीनटेश्वरा ॥ गिरुजारंगा गिरीशा ॥६९॥
धराधरेंद्रमानससरोवरी ॥ तू शुद्ध मराळ क्रीडसी निर्धारी ॥ तव अपार गुणासी परोपरी ॥ सर्वदा वर्णिती आम्नाय ॥२७०॥
नकळे तुझे आदिमध्यावसान ॥ आपणचि सर्व कर्ता कारण ॥ कोठे प्रगटशी याचे अनुमान ॥ ठायी न पडे ब्रह्मादिका ॥७१॥
जाणोनि भक्तांचे मानस ॥ तेथेंचि प्रगटशी जगन्निवास ॥ सर्वकाळ भक्तकार्यास स्वांगे उडी घालिसी ॥७२॥
सदाशिव ही अक्षरे चारी ॥ सदा उच्चारी ज्याची वैखरी ॥ तो परमपावन संसारी ॥ होऊनि तारी इतरांते ॥७३॥
बहुत शास्त्रवक्ते नर ॥ प्रायश्चित्तांचे करिता विचार ॥ परी शिवनाम एक पवित्र ॥ सर्व प्रायश्चिता आगळे ॥७४॥
नामाचा महिमा अद्भुत ॥ त्यावरी प्रदोषव्रत आचरत ॥ त्यांसी सर्व सिद्धि प्राप्त होत ॥ सत्य सत्य त्रिवाचा ॥७५॥
जयजयाजी पंचवदना ॥ महा पापद्रुमनिकृंतना ॥ मदमत्सरकाननदहना ॥ निरंजना भवहारका ॥७६॥
हिमाद्रिजामाता गंगाधरा ॥ सुहास्यवदना कर्पूरगौरा ॥ पद्मनाभमनरंजना त्रिनेत्रा ॥ त्रिदोषशमना त्रिभुवनेशा ॥७७॥
नीलग्रीवा अहिभूषणा ॥ नंदिवाहना अंधकमर्दना ॥ दक्षप्रजापति मखभंजना ॥ दानवदमना दयानिधे ॥७८॥
जय जय किशोर चंद्रशेखरा ॥ उर्वीधरेंद्रनंदिनीवरा ॥ त्रिपुरमर्दना कैलासविहारा ॥ तुझ्या लीला विचित्र ॥७९॥
कोटि भानुतेजा अपरिमिता ॥ विश्वव्यापका विश्वनाथा ॥ समाधिप्रिया भुतादिनाथा ॥ मूर्तामूर्ता त्रयीमूर्तै ॥२८०॥
परमानंदा परमपवित्रा ॥ परात्परा पंचदशनेत्रा ॥ पशुपते पयःफेनगात्रा ॥ परममंगला परब्रह्मा ॥८१॥
जय जय श्रीब्रह्मानंदमूर्ती ॥ तू वेदवंद्य भोळा चक्रवर्ती ॥ शिवयोगीरूपे भद्रायूप्रती ॥ अगाध नीती कथिलीस ॥८२॥
जय जय भस्मोध्दूलितांगा ॥ योगिध्येया भक्तभवभंगा ॥ सकळजनरआराध्यलिंगा ॥ नेई वेगी तुजपाशी ॥८३॥
जेथे नाही शिवाचे नाम ॥ तो धिक् ग्राम धिक् आश्रम ॥ धिक् ग्रहपुर उत्तम ॥ आणि दानधर्मा धिक्कार ॥८४॥
जेथे शिवनामाचा उच्चार ॥ तेथे कैचा जन्ममृत्युसंसार ॥ ज्यांसी शिव शिव छंद निरंतर ॥ त्यांही जिंकिले कळिकाळा ॥५॥
जयाची शिवनामी भक्ती ॥ तयाची सर्व पापे जळती ॥ आणि चुके पुनरावृत्ती ॥ तो केवळ शिवरूप ॥८६॥
जैसे प्राणियांचे चित्त ॥ विषयी गुंते अहोरात ॥ तैसे शिवनामी जरी लागत ॥ तरी मग बंधन कैचे ॥८७॥
कामगजविदारकपंचानना ॥ क्रोधजलदविध्वंसप्रभंजना ॥ लोभांधकार चंडकिरणा ॥ धर्मवर्धना दशभुजा ॥८८॥
मत्सरविपिनकृशाना ॥ दंभनगभंदका सहस्त्रनयना ॥ लोभमहासागरशोषणा ॥ अगस्त्य महामुनिवर्या ॥८९॥
आनंदकैलासविहारा ॥ निगमागमवंद्या दीनोद्धारा ॥ रुंडमालांकितशरीरा ॥ ब्रह्मानंदा दयानिधे ॥२९०॥
धन्य धन्य तेचि जन ॥ जे शिवभजनी परायण ॥ सदा शिवलीलामृत पठण ॥ किंवा श्रवण करिती पै ॥९१॥
सूत सांगे शौनकांप्रति ॥ जे भस्म रुद्राक्ष धारण करिती ॥ त्यांच्या पुण्यासी नाही गणती ॥ त्रिजगती धन्य ते ॥९२॥
जे करिती रुद्राक्ष धारण ॥ त्यांसी वंदिती शक्रद्रुहिण ॥ केवळ तयांचे घेता दर्शन ॥ तरती जन तत्काळ ॥९३॥
ब्राह्मणादि चार वर्ण ॥ ब्रह्मचर्यादि आश्रमी संपूर्ण ॥ स्त्री बाल वृद्ध आणि तरुण ॥ याही शिवकीर्तन करावे ॥९४॥
शिवकीर्तन नावडे अणुमात्र ॥ तो अंत्यजाहूनि अपवित्र ॥ लेइले नाना वस्त्रालंकार ॥ तरी ते केवळ प्रेतचि ॥९५॥
जरी भक्षिती मिष्टान्न ॥ तरी ते केवळ पशूसमान ॥ मयूरांगीचे व्यर्थ नयन ॥ तैसे नेत्र तयांचे ॥९६॥
शिव शिव म्हणता वाचे ॥ मूळ न राहे पापाचे ॥ ऐसे माहात्म्य शंकराचे ॥ निगमागम वर्णिती ॥९७॥
जो जगदात्मा सदाशिव ॥ ज्यासि वंदिती कमलोद्भव ॥ गजास्य इंद्र माधव ॥ आणि नारदादि योगींद्र ॥९८॥
जो जगद्गुरु ब्रह्मानंद ॥ अपर्णाह्रदयाब्जमिलिंद ॥ शुद्ध चैतन्य जगदादिकंद ॥ विश्वंभर दयाब्धी ॥९९॥
जो पंचमुख दशनयन ॥ भार्गववरद भक्तजीवन ॥ अघोर भस्मासुरमर्दन ॥ भेदातीत भूतपती ॥३००॥
तो तू स्वजनभद्रकारक ॥ संकटी रक्षिसी भोळ्या भाविका ॥ ऐसी कीर्ति अलोलिका ॥ गाजतसे ब्रह्मांडी ॥१॥
म्हणोनि भावे तुजलागून ॥ शरण रिघालो असे मी दीन ॥ तरी या संकटातून ॥ काढूनि पूर्ण संरक्षी ॥२॥ (ओव्या बेचाळीस समाप्त ॥)
ब्रह्मानंद म्हणे श्रीधर ॥ ह्या बेचाळीस ओव्या समग्र ॥ शिवलीलामृताचे होय सार ॥ श्रोती निरंतर परिसाव्या ॥३॥
सकळ शिवलीलामृताचे ॥ आणि ह्या बेचाळीस ओव्यांचे ॥ श्रवण पठण केल्याचे ॥ फळ असे समान ॥४॥
जेवी इक्षुरस गाळुनी ॥ शर्करा काढिजे त्यांतुनी ॥ तेवीच हे शिवलीलेतुनी ॥ सार काढिले सज्जनार्थ ॥५॥
कोणी व्यवहारी गुंतत ॥ म्हणोनि वाचवेना सर्व ग्रंथ ॥ कित्येक ते आळस करित ॥ ग्रंथ विस्तृत म्हणोनिया ॥६॥
हे जाणोनिया अंतरात ॥ शंकरआज्ञे नित्य पठणार्थ ॥ श्रीशिवलीलेच्या सारभूत ॥ ऐशा ह्या ओव्या रचियेल्या ॥७॥
भोळा चक्रवर्ती उदार ॥ भक्तवत्सल कर्पूरगौर ॥ तारावया जन समग्र ॥ नाना उपाय करितसे ॥८॥
तो दीनांचा कनवाळू ॥ नानारीती करीत सांभाळू ॥ परी हे दुर्जन कृतघ्न केवळू ॥ मुखे नामही न घेती पा ॥९॥
शिवनाम मुखी असावे म्हणोन ॥ साधुसंत करिती यत्न ॥ परी हे सर्व अति मूर्ख जन ॥ प्रपंची गुंतोन पडताती ॥३१०॥
तरणिउदयापासून ॥ अस्तमानापर्यंत अनुदिन ॥ निंदावाद मुखातून ॥ परी शिवनाम न येचि ॥११॥
यालागी सज्जनालागुनी ॥ विनवितो उभय हस्त जोडोनी ॥ शिवलीलामृत पठणेकरूनी ॥ मोक्ष जोडुनी घेईजे ॥१२॥
नित्य समस्त नोहे पठण ॥ तरी बेचाळीस ओव्या संपूर्ण ॥ वाचिता शुद्धभावे करून ॥ मनोरथ पूर्ण होतील ॥१३॥
पंचाक्षरी षडाक्षरी मृत्युंजय ॥ इत्यादि मंत्र जपता दिव्य ॥ काशीविश्वेश्वराचे दर्शन भव्य ॥ घेतले ऐसे होतसे ॥१४॥
श्रीविश्वेश्वराच्या मुखांतील ॥ हे मंत्र आहेत सकळ ॥ म्हणोनि तो जाश्वनीळ ॥ प्रत्यक्ष होय जपकर्त्या ॥१५॥
आता शेवटी मी श्रीधर ॥ श्रोतयांप्रती जोडूनि कर ॥ विनंति करतो ही सादर ॥ अंतरामाजी ठेवावी ॥१६॥
पंचाक्षरी षडाक्षरी रुद्र ॥ शिवकवच मृत्युंजयादि मंत्र ॥ शिवलीलामृतामाजी पवित्र ॥ आहेत जाणा निर्धारे ॥१७॥
यालागी हा उत्तम ग्रंथ ॥ कदापि न द्यावा दुर्जनाप्रत ॥ तथापि देणार तरी निश्चित ॥ इतके गुह्य राखावे ॥१८॥
हा पंधरावा अध्याय संपूर्ण ॥ आणि मंत्र न द्यावे निंदकालागून ॥ एवढे श्रीधर हस्त जोडून ॥ श्रोतयांप्रती मागत ॥१९॥
हा शिवलीलामृत ग्रंथ ॥ श्रीमत्स्कंदपुराणांतर्गत ॥ ब्रह्मोत्तरखंडीचा अर्थ ॥ असे यथार्थ सर्वही ॥३२०॥
स्कंदपुरानी व्यास नारायणे ॥ जैसे कथिले संस्कृत भाषेने ॥ आणि नैमिषारण्यी सूताने ॥ जैसे ऋषींसी कथिले पै ॥२१॥
तैसे हे प्राकृत भाषेत समस्त ॥ पंधरा अध्याय शिवलीलामृत ॥ रचिले येणे श्रीविश्वनाथ ॥ असो प्रीत सर्वदा ॥२२॥
जैसे शंकरे कर्णी कथिले ॥ तैसे पत्री असे लिहिले ॥ न्यूनाधिक यद्यपि जाहले ॥ तरी दोष नसे मजवरी ॥२३॥
जय जय शिवा कर्पूरगौरा ॥ ब्रह्मानंद जगदुद्धारा ॥ श्रीधरह्रदयारविंद भ्रमरा ॥ अक्षय अभंगा दयानिधे ॥२४॥
शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड ॥ रसभरित जेवी इक्षुदंड ॥ संत सज्जन परिसोत अखंड ॥ पंचदशोध्याय गोड हा ॥३२५॥
समाप्त ॥
॥श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु॥
श्री शिवलीलामृत अध्याय पंधरावा