digital arrest scam 1930 helpline : devendra fadnavis : फसवणूक झाल्यास 1930 वर तात्काळ फोन करा; फडणवीस

Digital Arrest Scam : डिजिटल अरेस्टच्या जाळ्यात अडकू नका

सायबर गुन्हेगारांकडून पोलीस, सीबीआय किंवा न्यायाधीशांच्या नावाने नागरिकांना भीती दाखवून, घाबरवून फसवणूक केली जाते. त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही प्रकारांना बळी न पडता सायबर फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र सायबरच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डिजिटल अरेस्ट या सायबर जनजागृती लघुपटाचे आणि १९३० महाराष्ट्र सायबर अँथमचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सायबर फसवणुकीनंतरचा गोल्डन अवर अत्यंत महत्त्वाचा असून, या काळात तक्रार नोंदविल्यास फसवणुकीची रक्कम रोखण्याची किंवा परत मिळविण्याची शक्यता अधिक असते. मात्र नागरिकांकडून तक्रार नोंदविण्यास तीन ते पंधरा दिवसांचा विलंब झाल्यास पैसे अनेक खात्यांमधून वळविले जातात आणि त्यांची रिकव्हरी अत्यंत कठीण होते. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विलंब न करता १९३० वर संपर्क साधणे आवश्यक आहे.

मोबाईल, ऑनलाइन व्यवहार, विविध पेमेंट गेटवे आणि डिजिटल माध्यमे ही दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहेत. तंत्रज्ञानामुळे जीवन सुलभ झाले असले, तरी त्याचबरोबर नागरिक सायबर गुन्ह्यांना बळी पडण्याची शक्यताही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर सायबर गुन्हेगारांचा मुकाबला करण्यासाठी पोलिस यंत्रणेला आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यासोबतच नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करणे आवश्यक असल्याचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.

सायबर गुन्हेगारांकडून पार्सलमध्ये ड्रग्ज सापडल्याचे सांगणे, ओटीपी फ्रॉड, बनावट फोन कॉल, पोलीस अथवा सीबीआयच्या नावाने धमकावणे अशा विविध क्लृप्त्यांचा वापर केला जातो. स्क्रीनवर खाकी वर्दीतील व्यक्ती, पोलीस अधिकारी किंवा न्यायाधीशांचे रूप पाहून सामान्य नागरिक घाबरून जातो आणि त्यातून फसवणुकीला बळी पडतो. त्यामुळे अशा कोणत्याही दबावाला किंवा भीतीला बळी न पडण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले.